नवीन लेखन...

सुरेश सरैया : सुरेल समालोचनाचे शतक

दूरदर्शनने क्रिकेट सामन्यांचे प्रसारण सुरू करण्याआधी रेडिओवरील कॉमेंट्री (समालोचन) हा भारतीय क्रिकेट आणि असंख्य क्रिकेटप्रेमींमधील लोभसवाणा दुवा होता. टीव्हीवर सामने आल्याने तोटाच झाला असे म्हणता येणार नाही पण शारीरिक ठेवणीनुसार डोळे आणि कानांमध्ये ‘चार  बोटांचे’ अंतर राहतेच ! ज्या मोकळेपणाने रेडिओवरील कॉमेंट्री ऐकता येते त्या मोकळेपणाने टीव्हीवर सामने पाहता येत नाहीत ही खंत मात्र उरतेच…

१९७५-७६ च्या हंगामातील भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा. एका कसोटी सामन्यात बिशनसिंग बेदीने एक रिटर्न कॅच सोडला (अर्थात स्वतःच्याच गोलंदाजीवरील झेल सोडला) आणि त्याच्या करंगळीला दुखापत झाली. ऑल इंडिया रेडिओसाठी कॉमेंट्री करणार्‍याने या घटनेचे ‘समालोचन’ असे मांडले : “बेदीने एक रिटर्न कॅच सोडला आहे आणि त्याच्या…” एक पॉझ आणि पुन्हा तेच, “बेदीने एक रिटर्न कॅच सोडला आहे आणि त्याच्या…” एक लाँग पॉझ आणि “त्याच्या हाताच्या ‘चार बोटांपैकी’ सर्वात लहान बोटाला दुखापत झाली आहे !”

पहिल्या पॉझदरम्यान ‘त्या’ समालोचकाने आपल्या हिंदी सहकार्‍याकडे एक नजर टाकली होती आणि त्याला करंगळी दाखविली होती. मायक्रोफोन समोर असताना ‘बाकी काही’ बोलणार कसे? यावर त्या ‘चाणाक्ष’ सहकार्‍याने “तू जाऊन ये, मी सांभाळतो” असे उत्तर देईपर्यंत लाँग पॉझ संपलेला होता…

हाताला चार बोटे असतात असा हजरजबाबी शोध लावणारी ती व्यक्ती होती सुरेश सुरैया आणि तो चाणाक्ष हिंदी सहकारी होता रवी चतुर्वेदी ! कॉमेंट्री करता-करता ऐनवेळी सरैयांना करंगळीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आठवलेच नाही आणि वर सांगितलेला बहुउल्लेखित किस्सा घडला.

२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.

बाळाचे पाय पाळण्यात दिसत असतीलही पण बाळाचे पंख मात्र शाळेतच दिसतात असे आम्हाला वाटते. स्टेशनमास्तर वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या सुरेशजींचे ‘गुण’ शाळेतच दिसून आले. शाळा अर्धी बुडविणे, काही तासांना बुट्ट्या मारणे असे किरकोळ पराक्रम अनेकांनी केले असतील पण सुरेशजी शाळेत जातच नसत! ते माटुंग्याच्या वेलकम हॉटेलात कॉमेंट्री ऐकत बसत अशी आठवण शिरीष कणेकरांनी ‘फटकेबाजी’मध्ये सांगितलेली आहे. १९५१ साली एन. सी. सी.च्या कॅम्पमध्ये सुरेशने काल्पनिक कॉमेंट्रीचा कार्यक्रम सादर केला आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचे सुवर्णपदक जिंकले, मग मेजर पारनाईकांनी क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अध्यक्षांना पत्र लिहून सुरेशच्या नावाची शिफारस केली असेही कणेकरांनी नमूद केले आहे.

चार बोटांचा वर उल्लेखिलेला किस्सा अनेक ठिकाणी वाचावयास मिळतो पण त्यामागची सुरेशजींची ‘अडचण’ कणेकरांनीच प्रकाशात आणली आहे. आपले शिक्षण काही इंग्रजी माध्यमातून झालेले नाही, त्यामुळे काही वेळा अशी अडचण येते असे सुरेशजींचे उत्तर होते. अगदी शाळकरी वयात कॉमेंट्र्या ऐकून आणि अंगा-नसांमध्ये क्रिकेटच भरलेले असल्यामुळे सुरेशजी कसोटी सामन्यांचे शतक गाठू शकले आहेत.

किंग्जटनवरील सबिना पार्क येथे झालेल्या एका कसोटीदरम्यान भलामोठा रन-अप असलेल्या एका गोलंदाजाने सरैयांना गोत्यात आणले होते. त्या गोलंदाजाची पावले चुकत होती आणि श्रोत्यांना खिळवून ठेवण्यासाठी इकडच्या-तिकडच्या गोष्टी सरैय्या सांगत होते. एक हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालीत असल्याचे पाहून ते म्हणाले होते, “ …. या हेलिकॉप्टरमधून खात्रीने इंदिरा गांधी उतरणार नाहीत.” त्या वेळी इंदिरा गांधी हेलिकॉप्टरमधून भारतदौरा करीत असल्याचा अनाहूत संदर्भ या विधानाला लागला आणि तत्कालीन नभोवाणी मंत्र्यांनी पुढील अनेक सामन्यांसाठी सुरेशजींच्या नावाला विरोध केला !

काळाची इनिंग सरकतच राहिली आणि सरैयांची पुन्हा कॉमेंट्री टीममध्ये निवडही झाली. कसोटी शतक त्यांनी गाठलेच आहे. आता त्यांच्या कॉमेंट्री करिअरने वर्षांचे अर्धशतक गाठावे.

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..