नवीन लेखन...

आडनांवं आणि जात – ही जोडी फोडणं अावश्यक

आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं काम असतं, त्याच्या नांवाची पाटी वाचली आणि तो जर नांवावरून आपल्यापैकीच्या जातीचा वाटला, तर कुठेतरी साॅफ्ट काॅर्नर मिळणार अशी आशा निर्माण होते. अर्थात सरकारी कामं नियम आणि ‘काय (तरी)द्या’नं होत असल्यामुळे, प्रत्येक जात कामास येतेच असं नव्हे, पण आपला काॅन्फिडन्स वाढतो किंवा जातभिन्नत्वामुळे कमी होतो नक्की.

आपल्या देशातली आडनांवं हे जात ओळखण्याचं आधार कार्ड आहे असं माझं मत आहे. आडनांव सांगीतलं, की समोरच्याच्या चेहेऱ्यावरच बदललेले सुक्ष्म भाव, आपुलकीचे किंवा उच्च/नीचतेचे, बरंच काही सांगून जातात. अर्थात माझ्या निरिक्षणाशी सर्वजण सहमत असतील असं नव्हे किंवा मनातून सहमत असुनही उघडपणे तसं म्हणणार नाहीत याची मला कल्पना आहे. यात त्यांचा दोष नाही. आपल्याकडचं वातावरणच तसं आहे. उघडपणे एका तत्वाचा पुरस्कार करायचा आणि खाजगीत मात्र नेमकं त्या तत्वाच्या विरुद्ध वागायचं. सर्वजजण असं करतात असं मला म्हणायचं नाही, पण बहुतेकजण असं वागतात.

स्वत:च्या जातीसहीत इतर कोणत्याही जातीला नाकारणारे नरपुंगव जर आपल्या देशात खरोखरंच असते, तर मग जातीच्या नांवाखाली लाखों लोकांची संम्मेलनं, निदर्शनं, मोर्चे यशस्वी होताना दिसले नसते. पण तसं होताना दिसतं, सातत्याने सर्वच जातीत होताना दिसतं, याचा अर्थ जात कोणालाच सोडायची नाही असाच होतो माझ्या मते. आडनांवं पाहून आपल्याला त्या त्या विवक्षित जातीच्या कार्यक्रमाची निमंत्रणं फेसुकसारख्या माध्यमांवर येताना म्हणून तर आढळतात. तरुण, उच्च शिक्षित पिढीचा यातील सहभाग हा आश्चर्यकारक आणि म्हणून समाजाच्या दृष्टीने चिंताजनक ठरतो असंही मला वाटतं. तरुणाचं जातीप्रती जागृत असणं हे आरक्षणाशी निगडीत आहे नक्की. आरक्षणही ठेवायचं आणि जाती निर्मुलनाच्या गप्पा मारयच्या, आणि ह्या दोन्ही विरोधी गोष्टी कशा काय एकत्र जमवायच्या ते मात्र सांगायचं नाही. अर्थात आरक्षण हा संपूर्ण वेगळा मुद्दा असल्याने याचा इथं केवळ उल्लेख केला आहे.

काही आडनांव एकापेक्षा अधिक जातीत सारखीच सापडतात. अशा आडनांवाच्या दोन अनोळखी व्यक्ती काही कारणाणं बोलताना आढळल्या, तर अशावेळी त्या एकमेंकाशी अत्यंत सावधगीरीने बोलताना आढळतात. दोन माणसं म्हणून त्या बोलतच नाहीत. समोरच्याचा जातीचा अंदाज घेत (कारण आपण जातीभेद मानत नाही ही आपली सार्वजनिक भुमिका असते ना..!) संभाषण चालू राहातं, पण त्यात जान नसते. पण एकदा का कळलं, की समोरची व्यक्ती आपल्याच जातीची आहे, की मग मात्र जीवाशिवाची गाठ पडल्यासारखं वाटतं आणि मग ते दोघं मिळून आपलं आडनांव इतर जातींनी ‘उचलल्यामुळ’ आपलं कोणं आणि परकं कोण हे कळतच नाही हो, असं चुकचुकत चर्चा पुढे रंगते. पण तेच जर आडनांव सारखं परंतू जात भिन्न असेल, तर मात्र ते संभाषण वेगळ्या पद्धतीनं होतं हे अनुभवणं माझ्याही वाटेला अनेकदा आलेलं आहे.

माझं काही कामानिमित्त अनेकांच्या घरी जाणं होतं. मला इथं कबूल करायला आवडेल, माझे काही मित्र खरंच जातीच्या पलिकडे जाऊन निखळ माणूस बनलेत किंवा ते तसे बनलेत म्हणून माझी त्यांच्याशी जमतं, हे कळत नाही. परंतू मला काही आणसं अशीही भेटतात, ती जातीच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. काही वेळा अश्यांच्या घरी जाणं झालं, तर घरच्या ज्या सदस्यांच्या परिचयाने मी त्यांच्या घरी गेलेलो असतो, ते त्यांच्या घरच्यांशी माझा परिचय करून देतात. या प्रसंगी सर्वांच्याच नसली, तरी माझं आडनांव ऐकल्यानंतरची काही सदस्यांची देहबोली ही पुरशी सुचक असते. शब्दांपेक्षा देहच जास्त बोलतो अशावेळी. अभावाने, परंतू हा अनुभव येतो हे नक्की. असाच एकदा मी माझ्या आॅफिसच्या वरिष्ठांच्या घरी गेलो असता, त्यांच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाने, “बाबा, हे xxx आहेत का” असं विचारलेलं मी माझ्या कानाने ऐकलं आहे. खुप वाईट वाटलं तेंव्हा मला, पण एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं, की लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात..वास्तविक माझे हे वरिष्ठ माझ्याशी अत्यंत आपुलकीनं वागायचे पण त्यांच्या घरचा अनुभव मात्र एकदम वेगळा होता.

बऱ्याच जणांना आपल्या आडनांवाचा विविध कारणांनी मोठा अभिमान असतो. उठसुट तो ते दाखवायलाही कमी करत नाहीत. आमचं हे घराणं आणि ते घराणं हे सांगायची एकही संधी अशी लोकं दवडत नाहीत. खरं तर हे आडनांव त्याच्या अनेक पिढ्यांपूर्वी कुणातरीमुळे आपल्याला मिळालेलं असतं. त्यानंतरच्या त्याच्या अनेक पिढ्या आहार, निद्रा, भय, मैथून व या सर्वांसाठी कुठेतरी चाकरी, या पलिकडे गेलेल्या नसतात, पण त्यांना आपल्या आडनांवाचा कोण अभिमान आणि इतरांविषयी तुच्छता वाटतानाही दिसते. असा अभिमान बाळगताना आपण नेमकं कसं वागतोय, याचंही त्यांना भान नसतं. तर काही जणांना आपलं आडनांव नकोसं झालेलं असतं. जातीच्या आधाराने शिक्षण घेऊन आणि पुढे चांगली सरकारी नोकरी मिळवून अनेकजण पुढे गेलेत. हे चांगलं किंवा कसं हा इथे मुद्दा नाही, पण पुढे जाऊन अशांची भोतिक भरभराट झाली, की मग त्यांना आपल्या आडनांवांची लाज वाटू लागते आणि मग असे काही जण त्यांना शोभेल/आवडेल अशी आडनांवं घेतानाही दिसतात.

आडनांव आपली जात चटकन सांगतात. आपलं एखादं आडनांव असणं यात आपलं कर्तुत्व वा आपल्याला लाज वाटण्यासारखं काय असतं, हेच मला कळत नाही. आडनाव पिढीजात चालतं आलं, पडलं, दिलं, मिळालं, रूढ झालं, घडलं, घेतलं, धारण केलं किंवा सोडलं, त्याग केला किंवा पुसून टाकलं याच पद्धतीनं प्राप्त होतं किंवा जातं. बहुसंख्य आडनांव ही पुर्वी कधीतरी आपले पुर्वज करत असलेल्या कामावरून पडली आहेत. पुढे कामाचं स्वरूप बदललं तरी आडनांवं मात्र कायम राहीली आणि ते मग जातवाचक निदर्शक झालं. पुर्वज करत असलेल्या कामावरून आताच्या आधुनिक काळात अभिमान किंवा लाज, स्वत:बद्दल गर्व आणि इतरांबद्दल तुच्छता बाळगण्यात काय अर्थ आहे हे माझ्या लक्षात येत नाही, परंतू हा प्रकार सर्रास घडताना दिसतो. उदा. माझं स्वत:चं आडनांव महाराष्ट्रावर राज्य करून घेलेल्या चालुक्य सम्राटांवरून आलंय असं इतिहास सांगतो. परंतू माझं काहीच कर्तुत्व नसताना मी जर त्याच्या आडनांवाची महत्ती इतरांना सागून जर बडेजाव करू लागलो किंवा इतरांना माझ्यापेक्षा कमी दर्जाचं मानू लागलो, तर ते हास्यास्पदच होईल (आणि त्या मुळ चालुक्याला अपमानास्पद). असंच प्रत्येकाचं असतं याचं भान प्रत्येक व्यक्तीविशेषाने बाळगायला हवं, अन्यथा समाजात आधीच असलेली विषमता आणखी वाढते हे कुणीही सुबुद्ध नागरीक नाकारणार नाही.

आडनांव असणं ही आपली कायदेशीर अपरिहार्यता आहे. पण जर कायद्यात व्यवस्थित सुधारणा करून जर आडनांवांची गरजच नाहीशी केली, तर जातीव्यवस्थेला काही आळा नक्की बसु शकेल. शिवशाहीत कुठे आडनांवं प्रचलित असायची? म्हणजे असावित परंतू ती फार कुणी लावत असावेत असं दिसत नाही. अष्टप्रधान मंडळात तर रामचंद्र नीलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, निराजीपंत रावजी, दत्तोजीपंत त्रिंबक, रामजी त्रिंबक आदी नांवातील दुसरा शब्द आडनांवापेक्षा वडीलांचं नांव असावा असं दिसतं. पेशवे ही पदवी/पद पुढे आडनांव झालं हे ही अनेकांना माहित असावं/नसावं. माहितगारांनी यावर जास्त प्रकाश टाकावा. दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावं वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचं नांव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव. अशाप्रकारे आपल्यालाही नाही का करता येणार याचा विचार करायला हवा. फेसबुकवर बरेच जण हल्ली स्वत:च्या पहिल्या नांवासोबत आडनांव न लिहिता, आईचं व वडीलांचं नांव लिहिताना आढळतात, हे खरंच स्वागतार्ह्य आहे. हेच नेहेमीच्या जीवनातही करता आलं तर जाती निर्मुलनाच्या दिशेने ते एक ठोस पाऊल असेल असं मला वाटतं.

मला कळतंय की हा बालीश विचार आहे, परंतू बालीश विचारातूनही पुढे फार काही घडू शकतं. वर उल्लेख केलेला ‘बाबा, हे xxx आहेत का?” ह्या प्रश्नामुळे माझ्या मनात अनेक वर्ष ठुसठुसत असलेला विषय आज आपल्यासमोर मांडलाय. कुणाला पटेल अथवा पटणार नाही, परंतू यावर निदान चर्चा तरी व्हावी या अपेक्षेनं इथे पोस्ट केलाय.

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..