राबली होती ती –
आयुष्यभर,
आईबापाघरी आणि –
नंतर सासरीही .
जणू आयुष्यच तिचं –
आजवर,
नव्हतं स्वतःसाठी –
जराही.
आठवत नव्हतं –
किंचितही तिला,
कधी केल्याची कुणी –
विचारपूस.
“दे ग थोडा आरामही –
जीवाला,”
“मरमरून नको त्याला –
जाळूस.”
जीवनात नव्हती कधी –
कसलीच हौसमौज,
भावनाहिन शरीर मात्र –
लागायचं रोजच्या रोज.
कुरतडत ठसठसत, भळभळती –
रात्र संपायची,
तशाच एका दिवसाची –
सुरवात पुन्हा व्हायची.
आजचा दिवस मात्र –
वेगळाच होता,
सजली होती ती –
नव्या लुगड्यानिशी,
कपाळावर कुंकवाचा –
मोठ्ठा होता टिळा,
केसात भरगच्च –
वेणी होती कसलीशी.
काळवंडला चेहरा सजलेला –
होता सवाष्णलेण्यांनी ,
आज काही करायला –
तिला सांगत नव्हतं कुणीही.
पुढे मागे लगबग तिच्या –
चालली होती साऱ्यांची ,
एकवटलेली प्रथमच तिच्या –
माणसं सासर माहेरची.
पुसट आनंदाची लकेर हलकी –
उमटली होती चेहऱ्यावर,
राग लोभ कसलाच नव्हता –
आता तिचा कोणावर.
उचलले तिला चौघांनी अन् –
उसळला क्षणिक गलका,
काचाट्यातूनी आयुष्याच्या –
मरणाने केली सुटका.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply