नवीन लेखन...

सुट्टी

सुट्टीचं नाव निघालं की छोटयांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात. सुट्टी म्हणजे आराम, सुट्टी म्हणजे रोजच्या धावपळीपासून सुटका, सुट्टी म्हणजे विरंगुळा ही समीकरणं सर्वांच्याच मनात रुजलेली असतात. रोजची कामे उरकत असताना देखील सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात सुट्टीच्या तारखेकडे. आठवडयात शनिवार रविवारच्या मध्ये एखाद्या आडवारी सुट्टी आली की तो आठवडा मजेत जातो. आणि शनिवार रविवारला लागून सुट्टी आली की आनंदाची पर्वणीच.

लहानपणी शाळेत असताना मे महिन्याची सुट्टी दिवाळीची सुट्टी या दोन मोठया सुट्टया आणि नाताळची एक आठवड्याची सुट्टी ठरलेली असायची. आता मराठी शाळांमध्ये नाताळऐवजी गणपतीची सुट्टी दिली जाते. मे महिन्याच्या मोठया सुट्टीत काय करायचं याचा निर्णय आईवडील घेत. या मोठया सुट्टीत बरेचदा परगावी जाण्याचा बेत असे. दिवाळीची सुट्टी मात्र आपली हक्काची. या सुट्टीत शाळेच्या हस्तलिखिताची तयारी करणे, दिवाळीसाठी कंदील बनवणे. आईला फराळ बनवण्यात मदत करणे असे अनेक व्याप सांभाळावे लागत. याशिवाय सुट्टीतला अभ्यासही उरकावा लागे. सुट्टी पडताच प्रथम अभ्यासाचं ओझं उरकून मग उरलेली सुट्टी केवळ मजेत घालविण्याची सवय मी अंगवळणी पाडली होती. पहिल्या चारपाच दिवसात अभ्यास उरकला की पुढचे दहा पंधरा दिवस मजेत जात. स्टॅम्पचा आल्बम बनविणे, क्रिकेटपटूंचे फोटो जमवणे, गाण्याची वही तयार करणे असले उपद्व्याप उत्साहाने उरकताना सुट्टी अंगावर येई. लहानपणी दिवाळीच्या सुट्टीचा लुटलेला आनंद नंतर पुन्हा कधीच अनुभवता आला नाही.

कॉलेजात मोठया सुट्टीचा मुख्य उद्देश सिनेमा बघणे हाच असे. अभ्यासामुळे आणि परीक्षांमुळे पाहायचे राहून गेलेले चित्रपट सुट्टीत पाहिले जात. या सुट्टीत संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे मित्रांबरोबर केलेली भटकंती. आम्ही परळला राहात असताना सर्व मित्र एकत्र जमून शिवाजीपार्कला राऊंड मारायला जात असू. परळ ते शिवाजीपार्क चालणे त्यानंतर शिवाजीपार्कला दोन तीन फेऱ्या मारणे आणि पुन्हा चालत घरी परतणे हा व्यायाम मित्रांच्या संगतीत अगदी हसतखेळत पार पडे. आज फक्त शिवाजीपार्कला एक राऊंड मारली की मोठा व्यायाम केल्यासारखं वाटतं. सुट्टीतला तारुण्याचा उत्साह अवर्णनीयच म्हणावा लागेल.

कामधंद्यात अडकल्यानंतर मात्र सुट्टी हा विषय हळूहळू मागे पडत गेला. कधी आजारपणानिमित्त तर कधी घरची कामे उरकण्यासाठी सुट्टी घेतली खरी परंतु त्या सुट्टीची तुलना आधीच्या सुट्टयांशी होऊच शकत नाही. एकाद्या कामानिमित्त घेतलेल्या सुट्टीला सुट्टी म्हणता येत नाही. खरी सुट्टी म्हणजे काहीही न करण्याची मुभा. अशी सुट्टी अनेक वर्षात अनुभवली नव्हती. ह्यावर्षी अचानक अमेरिकेला महिनाभर राहण्याची संधी चालून आली आणि हरवलेला सुट्टीचा आनंद पुन्हा एकदा गवसला. अमेरिकेतील महिन्याभराचं वास्तव्य सुट्टी विषयावर फार मोठी टिपण्णी करुन गेलं.

अमेरिका हा एक कल्पनाही करता येणार नाही असा अवाढव्य देश. अवाढव्य सर्वच अर्थानी. आकाराने आणि सुबत्तेने देखील. इथले डोळे दिपविणारे वैभव पाहिलं की आपण थक्क होऊन जातो. जगात व्यवसायाच्या, कामधंद्याच्या किती अभुतपूर्व संधी आहेत याची झलक आपल्याला इथे अनुभवता येते. याशिवाय इथे नाना देशातले, नाना वंशातले लोक गुण्यगोविंदाने एकत्र नांदत असतात. या लोकांमध्ये मिसळताना जगाचा पसारा किती विस्तीर्ण आहे याची जाणीव होत राहाते.

हे सर्व अनोखं विश्व न्याहाळत असताना आपल्या दैनंदिन दिनचर्येचा आपल्याला पार विसर पडतो. रोजचं कामकाज, कामकाजातले ताणतणाव, अमका कसा वागतो आणि तमक्याशी कसं वागायचं- अशी सारी सारी गणितं आपण पार विसरुन जातो. मनातली कोळीष्टकं स्वच्छ होऊन जातात. अमाप संधींची दालने आपल्यासमोर खुली आहेत हा विश्वास अमेरिका आपल्या मनात रुजवते. अमेरिकेत घालविलेली सुट्टी म्हणूनच मनाला उभारी देऊन जाते. नव्या हिंमतीने, नव्या उत्साहाने आपण घरी परततो. मन ताजेतवानं होण्याची ही प्रचिती सुट्टी सार्थकीम लागल्याची पावती देऊन जाते.

खरी सुट्टी ही अशी असावी. कामकाजापासून दूर पळायला लावणारी सुट्टी क्षणभंगूर ठरते. अशी सुट्टी संपायला आली की मनावरचं मळभ पुन्हा गडद होऊ लागतं. पुन्हा आता आपण रोजच्या रामरगाडयात गुंतून जाणार हा विचार सुट्टीच्या आनंदावर विरजण टाकून जातो. याउलट अमेरिकेतील वास्तव्यासारखी सुट्टी उत्साहाचं माप पदरी पाडून जाते. अशी सुट्टी रोजच्या जगण्याला अर्थ देऊन जाते. अशी सुट्टी रोजच्या जगण्यातील ताणतणाव हलके करण्याचं बळ देऊन जाते.

प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी अशी सुट्टी अवश्य अनुभवावी. प्रत्येकालाच सुट्टीसाठी अमेरिका गाठणं शक्य नाही. मात्र जिथे कुठे जाऊ तिथल्या वातावरणाशी, चालरितींशी, संस्कृतीशी समरस होणं सहजशक्य असतं. असं वेगळया विश्वात मन रमवणं म्हणजे सुट्टी. वर्षातून एकदा जरी अशी सुट्टी अनुभवता आली की जीवनाला नवा अर्थ प्राप्त होतो.

-सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..