11. नैसर्गिक रंग वापरुन वेगवेगळी चित्रे रंगविता येतील.
12. सकाळपासून ते रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रक्रीया घडत असतात. अशा प्रक्रीयांची एक यादी तयार करायला हवी. उदा. कापणे, चिरणे, मळणे, तिंबणे, उकडणे, वाटणे, कुटणे, उलथणे, परतणे, घोळवणे, भिजवणे, उपसणे इत्यादी.
13. स्वयंपाकघरातील विविध प्रक्रीयांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना मिळालाच पाहिजे. हे अनुभव मिळत असताना जशा मुलांच्या काही चुका होतील तशाच काही गोष्टी वाया जाण्याची पण शक्यता आहे. पण आपले मूल शिकण्यासाठी हे आवश्यकच आहे याची कृपया नोंद घ्यावी. कणिक मळणे,पोळी लाटून बघणे, पापड भाजणे, कच्चा व उकडलेला बीट किसणे, नारळ खवणणे, तव्यावरचे ऑम्लेट, पोळी किंवा घावन उलथणे इत्यादी.
14. मुलांसोबत गप्पा मारत भाजी निवडणे, भाजी चिरणे सहज शक्य आहे. गप्पा मारताना हळू-हळू मुलांनाही भाजी निवडण्यासाठी/चिरण्यासाठी सहभागी करुन घेता येईल. आई/बाबां सोबत हा अनुभव घेताना त्यांना ही आनंद होईल,
15. कुठलाही एक पदार्थ जर तयार करायचा असेल तर त्यावेळी किती प्रक्रीया घडत असतील याची एक यादी तयार करायला हवी. उदा. भेंडीची भाजी करायची आहे किंवा चहा करायचा आहे तर क्रमवार घडणाऱ्या प्रक्रीया कोणत्या? याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घ्यावा आणि मगच लिहावे.
16. रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मुलांनी मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पदार्थ तायर करावा. उदा. भेळ, गाजराची कोशिंबीर, कांदा पोहे, दही पोहे, चिकी इत्यादी.
17. आपल्या घरात एका महिन्यासाठी किती किराणा सामान लागते याची यादी मुलांनी करावी. शक्य असल्यास, मुलांनी घरातल्या कुणा मोठ्या माणसासोबत बाजारात जाऊन ते खरेदी करावे. सर्व सामानांचे बाजारभाव टिपून ठेवावेत.
18. आई/बाबांच्या मदतीने ‘आमच्या रेसिपी’ नावाचे छोटे रेसिपी पॉकेट बुक तयार करावे. त्याचप्रमाणे काका/काकू किंवा मामा/मामी यांच्या मदतीने ‘मामाज् रेसिपी बुक’ किंवा ‘अंकल्स रेसिपी’ अशी पुस्तकांची मालिका पण तयार करता येईल.
19. घरातला फ्रीज स्वच्छं करणे. त्यातील शेल्फची रचना बदलून पाहाणे. (अशावेळी घरातल्या मोठ्या माणसांची मदत अपेक्षित आहे. ‘मदत याचा अर्थ सहवास’; सहभाग नव्हे.)
20. घरातील कुठल्याही कामाबद्दल घृणा किंवा तिटकारा वाटणे योग्य नाही. श्रममूल्य व श्रमानंद याची जाणीव असणे गरजेचे आहे. एखाद दिवशी आई/बाबांसोबत घरातील भांडी घासण्याचा / कपडे धुण्याचा अनुभव सुध्दा मुलांनी घ्यायला हवा.
21. थोडेफार सामान इकडे तिकडे हलवून स्वयंपाकघरातील किंवा घरातील रचना बदला येईल का? जर अशी रचना बदलायची असेल तर, ती का बदलायची? याबाबत चर्चा करता येईल. ही रचना बदलण्याअगोदर ज्या वस्तू सरकवायच्या असतील त्यांची मापं घ्यावी लागतील. मापं घेण्यासाठी काही वेळा दोऱ्याचा, काठीचा किंवा पट्टीचा उपयोग करावा लागेल. मुलांच्या सल्ल्यानुसार रचना एकवेळ बदलून पाहायला काहीच हरकत नाही.
22. घरातील सर्वांनी मिळून सर्वांचे कपड्यांचे,पुस्तकांचे खण आवरणे.
23. खण आवरत असताना बटण शिवणे, हुक शिवणे, फाटलेला कपडा शिवणे, उसवलेल्या ठिकाणी टिप घालणे यासाठी मुलांची मदत घ्यावी.
24. कपड्याचा खण आवरत असताना प्रत्येक कपड्याचा पोत कसा वेगळा असतो याची मुलांना ओळख करुन द्यावी. उदा. सिल्क साडी, कॉटन साडी, टी शर्ट, टॉवेल या गोष्टी आपण डोळे बंद करुन केवळ स्पर्शाने ओळखू शकतो कारण या कपड्यांचा पोत आपल्याला स्पर्शाने समजतो. घरातच असणारे वेगवेगळे 80 पोत ओळखायला मुलांना मदत करा. त्यांची एक यादी बनवा. उदा. सनमायका, लाकूड.खिडकीची काच, बाथरुमच्या दरवाज्यावरची काच, ओटा, सिंक, आरसा, जमीन, भिंत इ.
25. तसेच कपड्यांचे वेगवेगळे रंग व डिझाइन्स याबाबत ही मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा. प्रत्येक घरात किमान वेगवेगळ्या प्रकारच्या चार ते पाच साड्या असू शकतात. हे प्रकार नेमके कशामुळे पडले? त्यांची खासियत काय आहे? हा प्रकार कुणापेक्षा स्वस्त व कुणापेक्षा महाग असू शकतो? आणखी कुठले प्रकार असू शकतात? याबाबत मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा.
छान मला खुप आवडले आपले विचार