26. एखाद्या संध्याकाळी मुलांना साडीच्या दुकानात घेऊन जा. तेथील निरनिराळ्या साड्या,त्यांचे रंग, काठ, पोत, डिझाइन्स, त्यांची अनोखी खासियत याची मुलांना ओळख करुन द्या. (यासाठी त्यावेळी नवीन साडी विकत घेण्याची गरज नाही. हे तुम्ही ओळखले असेलच.)
27. त्याचप्रमाणे पॅण्ट,शर्ट व ब्लाउज यांना कशाप्रकारे इस्त्री करावी लागते याचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे. प्रत्येक कपड्याची घडी करण्याची पध्दत वेगवेगळी असते याची त्यांना जाणीव करुन द्यावी. घड्या करण्याचा सराव द्यावा. त्यातील बारकावे दाखवावेत. उदा. साडीची घडी करताना आधी हातात फॉल धरावा लागतो. साडीच्या निऱ्या कशा करतात? याबाबतची त्यांची उत्सुकता चाळवावी. त्यांना प्रयत्न करू द्यावा.
28. कपडे धुतल्यानंतर हँगरवर लावायची पध्दत व कपड्यांना इस्त्री केल्यावर ते हँगरवर लावायची पध्दत वेगवेगळी आहे,याबाबत त्यांना सजग करणं.
29. दोन मोठे ड्रॉइंग पेपर एकमेकांना चिकटवावेत. घरातल्या सर्वांनी मिळून त्यावर एक चित्र काढावे व सर्वांनी मिळूनच ते रंगवावे. भिंतीवर किंवा कपाटावर हे चित्र लावून ठेवावे. चित्राचा विषय हा निसर्गचित्र,डिझाइन किंवा सर्वांना आवडेल व सोपा वाटेल असा असावा.
30. ‘100 टक्के कॉपी चित्रांचे प्रदर्शन.’ सुटीच्या दिवशी मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांच्या समोर बसून त्यांचे चित्र काढावे. त्यानंतर मोठ्या माणसांनी लहान मुलांसमोर बसून त्यांचे चित्र काढावे. चित्र कुणाचे आहे याचे चित्राखाली नाव लिहू नये;पण चित्रकाराच नाव अवश्य लिहावे. अशा 100 टक्के कॉपी चित्रांचे घरातच प्रदर्शन लावावे.
31. वेगवेगळ्या प्रकारची शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी या सुटीचा उपयोग करता येईल. उदा. रंगात भिजवलेला दोरा वापरुन, ठसेकाम करुन, पाकळ्या किंवा पेन्सिलीची सालं चिकटवून, कोलाज, सुलेखन, स्प्रे पेंटिंग, जलरंग इत्यादी.
32. रविवारचे दोन तास भटकंती व शोधाशोध. आजपर्यंत आपण आपल्याच गावातल्या किंवा जवळच्या गावातल्या ज्या रस्त्यावरुन गेलो नाही किंवा जो रस्ता वा जो विभागच आपल्याला माहित नाही अशा ठिकाणी जाणे. नवीन रस्त्याचा/विभागाचा मुलांच्या सोबत शोध घेणे. मुलांसोबत शिकण्याची/शोधण्याची प्रक्रीया सुरू ठेवणे.
33. आपल्या घरापासून स्टेशन पर्यंत / घरापासून शाळेपर्यंत / घरापासून एस टी डेपो पर्यंत चालत जाण्यास उपयुक्त ठरेल असा नकाशा काढणे. वाटेत बँक, लोहमार्ग, देऊळ, मशीद, चर्च, मेडिकलचे दुकान, हापशी अशा आणि इतर गोष्टी असू शकतात. यासाठी विशिष्ट खुणांचा वापर करणे. शक्य असल्यास प्रमाणित स्केलचा वापर करणे. (पावलांनी अंतर मोजणे. पन्नास पावले म्हणजे एक सें.मी. यापध्दतीने स्केल घेऊन नकाशा काढणे.)
34. फक्त एक महिना घरातल्या सर्वांनी रोज झोपण्याच्या आधी ‘रोजनिशी’ लिहिणे. किमान एक ओळ तरी रोज लिहिलीच पाहिजे असा संकल्प करुन तो तडीस नेणे. (आपण आपल्या कामाची व आपण जे काही नवीन शिकलो त्याची नोंद ठेवता येणे गरजेचे आहे. रोजनिशी हा त्यासाठी उत्तम सराव आहे.)
35. आपल्याला पत्त्यांचे वेगवेगळे खेळ येत असतात. हे खेळ मुलांसोबत खेळावेत. आजी आजोबांच्या किंवा इतर कुणाच्या मदतीनेसुध्दा मुलांना पत्त्यांचे नवनवीन खेळ शिकवावेत. उदा.बदाम सात, गुलाम चोर, नॉ ऍट होम, लॅडीज, झब्बूचे वेगवेगले प्रकार, मुंबरी, मेंढीकोट, तीनशे चार, पाच तीन दोन, सात आठ इ.
36. मनोरंजक पण तरीही डोक्याला चालना देणारे अनेक खेळ बाजारात मिळतात. बाजारातून नुसते खेळ विकत आणून ते मुलांसमोर टाकले (म्हणजे गुरांसमोर चारा टाकतात तसे) तर मुले अशा खेळांशी फारवेळ खेळत नाहीत. आपणाला मुलांसोबत खेळावे लागते. वेळप्रसंगी हरावे लागते. तेव्हांच आवडीने मुले त्या खेळाशी खेळू लागतात. उनो, स्पेलो फन, ब्रेनव्हिटा, चायनीज टॅनग्राम असे काही खेळ चांगले आहेत.
37. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके आता उपलब्ध आहेत. मुलांच्या मदतीने जर का त्याचे वाचन केले तर त्यातील सोपे प्रयोग मुले स्वत:हून करू शकतील.
38. एखादा खेळाडू किंवा आपली आवडती व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या अनुशंगाने सर्व माहिती गोळा करून त्याचीच एक स्वतंत्र चिकट वही तयार करता येईल. उदा. सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, राष्ट्रपती कलाम, आंबेडकर, गांधी, डॉ.अभय व राणी बंग, मेधा पाटकर, नानाजी देशमुख, जे.के.रोलींग इत्यादी.
39. काही समारंभाच्या निमित्ताने किंवा सहल, वाढदिवस अशावेळी काढलेले खूप फोटो घरात असतात. काहीवेळा ते नुसतेच पाकीटात कोंबलेले असतात. सगळे फोटो अल्बम मधे लावणे.प्रत्येक फोटोच्या मागे तारीख घालणे. तारीख आठवत नसल्यास शोधून काढणे. व प्रत्येक फोटोच्या खाली,सर्वांनी मिळून एक गोड गोड, किंवा चमचमित वा झणझणित कॉमेंट लिहिणे.
40. गणितातल्या अपूर्णांकाविषयी काही मुलांना भीती असते. किंवा त्याचा मुलांनी धसका घेतलेला असतो. सुटीचा उपयोग अपूर्णांकाची भीती पूर्णपणे घालविण्यासाठी करता येईल. आपल्या घरातच कितीतरी पूर्णांक अपूर्णांक असतात. त्यापासूनच खेळायला सुरुवात करता येईल. हाफ पॅण्ट व फूल पॅण्ट. खिडकीचा पडदा हा दाराच्या पडद्याच्या अर्धा असतो. खिडकी व दरवाजा. मुख्या दाराची कडी व बाथरुमची कडी यातील फरक. हाफ बनियन व फुल बनियन. टी पॉय,छोटे टेबल व मोठे टेबल. पाण्याची अर्धा लिटरची व एक लिटरची बाटली. एक किलोची व अर्ध्या किलोची बरणी. छोटी बादली व मोठी बादली अशी उदाहरणे घेऊन मुलांना पूर्णांक व अपूर्णांकाचा प्रत्यक्ष अनुभव देता येईल. प्रयोगातूनच मुले शिकतील,समजून घेतील.
छान मला खुप आवडले आपले विचार