56. महिन्यातल्या एखाद्या संध्याकाळी घरातल्या सगळ्यांनी मिळून भेळ तयार करावी. कुणी कुठले काम करायचे याचे नियोजन मुलांनी करावे.
57. ‘चटकदार भेळेची रंगीत तालीम’ झाल्यावर, पालकांनी आपल्या मुलांच्या मित्रांना घरी बोलवावे व त्यांना भेळ खिलवावी.
58. मुलांना गोष्टीची पुस्तके किंवा वर्तमानपत्रातील वेगळ्या बातम्या, पुरवणी मधील एखादा लेख अवश्य वाचून दाखवा.
59. या सुटीत खाल्लेल्या फळांच्या बिया जमवा. सुटी संपल्यावर पावसाळ्यातल्या पहिल्या रविवरी मुलांसोबत गावाबाहेर जा. मुलांच्या मदतीने छोटे-छोटे खड्डे खणून या बिया त्यात पसरुन टाका.
60. गावाबाहेर जंगल करण्यासाठी आपल्या नातेवाइकांकडून, शेजाऱ्यांकडून, बाजारातून किंवा जिथून मिळतील तिथून बिया गोळा करा. मुलांच्या मदतिने घरात ‘बी बँक’ तयार करा.
61. सुटीतल्या एका रविवारी घरातल्या सर्वांनी ‘आपले कपडे आपणच धुवायचे’ असं ठरवा. कपडे धुण्याचं तंत्र व मंत्र मुलांसोबत शिका. मुलांसोबत पाण्यात थोडा दंगा पण करा.
62. महिन्यातून एक दिवस मुलाने आईसोबत स्वयंपाकघरात काम करायचे आहे.
63. फक्त सुटी पुरती घरातली काही रचना बदलता येईल का? कॉट, कपाट किंवा शोकेस सरकवून घराची रचना बदलता येते. याबाबत मुलांकडे काही कल्पना असू शकतात. त्याचा विचार करा. मुलांच्या मदतीने घराला वेगळा चेहरा द्या.
64. घरातील लाकडी स्टूल किंवा दरवाजा घासून ते रंगवणे मुलांना आवडते. तसे करण्याची मुलांना मुभा द्या. काम सुरू करण्याअगोदर ते काम मुलांना नीट समजावून सांगा. पण मुले काम करत असताना त्यांना हज्जारवेळा सूचना देऊ नका. (नाहीतर मुले वैतागुन काम अर्धवटच सोडतील) त्यापेक्षा त्यांच्या सोबत काम करा. रंगवताना मुलांसोबत रंगून जा.
65. आपले नातेवाईक व ओळखीचे यांचे पत्ते व फोन नंबर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वह्या मुलांच्या मदतीने तयार करा. या वहीत मुलांच्या मित्रांचे पत्ते व फोन नंबर असतील याची काळजी घ्या
66. घरातील शिवणाचा डबा यासाठी एक दिवस राखून ठेवा. बटण लावणे, हूक लावणे, शिवणे, टीप घालणे, धावदोरा घालणे याचा अनुभव मुलांना घेऊ दे.
67. आपल्या परिसरात काही खास वेगळी मुले असतात. अंध, अपंग मुले असतात. शाळा सुरू असताना या मुलांना देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. सुटीच्या दिवसात त्यांच्यासाठी थोडावेळ देता येईल. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं किंवा त्यांना बागेत घेऊन जाणं अस करता येईल.
68. मुलांनी आणि पालकांनी मिळून एक गट तयार करावा. या गटाने मिळून एखाद्या रविवारी गावातील बाग स्वच्छं करावी. किंवा नगर वाचनालयातील पुस्तके आवरुन, साफ करुन द्यावीत.
69. मुलांच्या वहीतील कोरे कागद फाडून घ्यावेत. मुलांच्या मदतीने हे कागद शिवून त्याची वही करावी. रफ वही म्हणून ही वापरता येते.
70. घरी येणाऱ्या निमंत्रण पत्रीका, किंवा काही जाहिराती जमवाव्यात. हे पाठकोरे कागद एका आकारात कापावेत. वरच्या बाजुने शिवावेत किंवा स्टेपल करावेत. पटकन काही लिहिण्यासाठी या पॅडचा चांगला उपयोग होतो.
ही यादी आणखी पण वाढविता येईल, पण त्यासाठी मुलांची सुटी वाढविता येणे शक्य नसल्याने आता इथेच थांबावे म्हणतो. मी जरी तुम्हाला सत्तर गोष्टी सुचविल्या असल्या तरी यातूनच तुम्हाला आणखी शंभर गोष्टी सुचतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि यासाठी काहीही मदत हवी असल्यास मला अवश्य कळवा. मी तुमच्या सोबतच आहे.
मी तुमच्या शंबर नंबरी पत्रांची वाट पाहतोय. कळावे.
मुलांवर लोभ असावा हीच एक विनंती.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
राजीव तांबे.
छान मला खुप आवडले आपले विचार