नवीन लेखन...

सुटीतले घर आणि घरातली सुटी

सुटीची चाहुल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात. एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं? दोन,व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करुया. यातले ‘पालक वारे’ कुठले व ‘मूल वारे’ कुठले हे तुम्ही ओळखलंच असेल. ‘सुटीत करायचं काय?’ असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा असो वा नसो त्याला कुठल्यातरी शिबिरात किंवा छंदवर्गात डांबून ठेवलं जातं. जे पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात. आपलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आाशा, आकांक्षा किंवा त्याच्या आवडी निवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हा त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे व त्याचा आत्मसन्मान जपला पाहिजे. सुटी ही एक संधी आहे,मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करुन देण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची पण सक्तीने शिकविण्याची नव्हे. विनोबांनी म्हंटलं आहे,’शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आले पाहिजे.’ मुलांच्या शिकण्यासाठी आपण हेच सूत्ररुपात वापरणार आहोत. मुलांना चाळीस दिवस सुटी आहे असं समजून मुलांसाठी कुठल्या वेगवेगळ्या उफमांची आखणी करणे शक्य आहे ते पाहुया. पण एक लक्षात ठेवा, यासाठी आपण ही मुलांना आपला थोडा वेळ द्यायला हवा आणि तो ही न चिडचिडता. हे सगळे उफम मुलांना शिकविण्यासाठी नाहीत तर त्यांना त्यातून काही नवं शिकायला मिळावं म्हणून आहेत. मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ देत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रयत्न करु दे. यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेऊ दे. आणि आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो हा विश्वास ही त्यांच्या मनात रुजू दे. तुमच्या मुलांना नवीन चुका करण्याची संधी तर द्याच पण चुकांतून शिकण्याची उमेद ही त्याच्या मनात चेतवा. पण कृपया.. .. तुमच्या इच्छे खातर व तुम्ही ठरवले आहे तेच तुमच्या मुलांना ‘शिकविण्याचा प्रयत्न’ करू नका किंबहुना तसा अट्टाहास ही करू नका.

1. आपण स्वयंपाकघरापासून सुरुवात करुया. स्वयंपाकघरात मिसळण्याचा डबा असतो. यातील प्रत्येक पदार्थाचे नाव मुलांना माहित असू शकते पण ते कधी व का वापरायचे याची त्यांना ओळख करुन द्यायला हवी. उदा. फोडणी करताना मोहरी व जिरे कधी घालायचे? का? भाजी शिजताना तिखट घालायचे? की शिजल्यावर? की त्याआधीच? फोडणीचे प्रकार किती? तडका म्हणजे काय?

2. कोणकोणत्या पदार्थांसाठी फोडणी करताना हळद वापरतात? का? ताकाची कढी करताना एकदा फोडणीसाठी हळद वापरून व एकदा न वापरता केली तर चवीत काय फरक पडतो?

3. भाज्यांचे मुख्य चार प्रकार आपण वापरतो. फळभाजी, फूलभाजी, पालेभाजी व कंदमुळे. हे प्रकार मुलांना ओळखता येतात का? त्याचा एखादा तक्ता तयार करता येईल का? त्या तक्त्यात कोणकोणत्या प्रकारची माहिती भरता येईल?

4. आपण ज्या भाज्या घरात आणतो ‘त्या ताज्या आहेत व चांगल्या पण आहेत’ हे ओळखण्यासाठी आपल्या अनुभवावर आधारित आपण काही कसोट्या तयार केलेल्या असतात. त्या कशा केल्या? का केल्या? त्यात काही सुधारणा कराविशी वाटते का? यासाठी मुलांना त्या कसोट्या दाखवा. त्यांना त्याचा अनुभव घेऊ दे. त्यात त्यांना काही सुधारणा सुचवाव्यासा वाटतात का? याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. त्यांचं म्हणणं जरी चुकत असेल तरी लगेच त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना समजून घ्या. त्यांना पुन्हा पुन्हा सुधारण्याची संधी द्या. उदा.ताजी पालेभाजी कशी ओळखावी? नारळ घेताना तो हलवून व वाजवून ही पाहतात? यापैकी कुठलीही एकच ा*ीया करुन चालेल का?का? बाजारात ताजी भाजी महाग असते व शिळी भाजी स्वस्त असते. पण नवीन बटाटे स्वस्त असतात व जुने बटाटे महाग असतात,असे का? (नविनच्या मानाने जुने बटाटे लवकर शिजतात.)

5. निरनिराळ्या फळांची वेगवेगळ्या तऱ्हेने ओळख करुन देणे. उदा. प्रत्येक फळ कापण्याच्या विशीष्ट पध्दती असतात. पपई, कलिंगड, फणस, पपनस, अननस, टरबूज अशी फळे मुलांना आवर्जून कापायला द्या. त्यांच्या चुका होतील ही ,पण त्यातूनच त्यांना शिकायला प्रोत्साहित करा.

6. वेगवेगळ्या फळांच्या बिया जमवा. त्या साफ करून ठेवा. त्याचं वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बिया डोंगरावर रुजवण्याचा प्रयत्न करा.

7. फळ ताजे च चांगले कसे ओळखावे? याबाबत मुलांशी चर्चा करा. संत्र व आंबा हातात घेतल्या नंतर त्याचा ताजेपणा व चांगलेपणा ओळखण्यासाठी काय काय कसोट्या असू शकतात याची एक तौलनिक यादीच तयार करा. वेगवेगळ्या फळांसंदर्भात अशा याद्या करणं सहज शक्य आहे.

8. काही फळांची चव ओळखण्यासाठी त्यांचा आधी वास घ्यावा लागतो. अशी फळे कोणती? त्याची सूची बनवा. वास नेमका कुठे घ्यायचा असतो? फळाच्या सर्वच ठिकाणी सारखाच वास येतो का? उदा. आंब्याच्या डेखाजवळ, मध्यभागी व त्याच्या टोकाजवळ सारखाच वास येतो का? अजिबात वास न येणारी फळे कोणती याची पण एक यादी तयार करा.

9. फळांचा एक तक्ता तयार करा. यातील रकाने असे ही असू शकतील : 1.फळाचे चित्र. 2.फळाचा रंग.. बाहेरुन. 3.फळाचा रंग.. आतून. 4.चव. 5.खाताना सालीसकट खाता येते का? 6.फळात बी दिसत नाही असे फळ. 7.एकच बी असणारे फळ. 8.अनेक बिया असणारे फळ. 9.फळाबाहेर बी असणारे फळ. 10.वर्षभर सहजी उपलब्ध असणारे फळ. 11.फळाचा हंगाम. 12.फळाचा ताजेपणा ओळखण्यासाठीच्या कसोट्या. 13.फळाचा चांगलेपणा ओळखण्याच्या कसोट्या. 14.फळाचे पान. 15.फळाचे अंदाजे वजन. 16.फळाचा औषधी उपयोग. 17.फळापासून तयार होणारे विविध गोड पदार्थ. 18.फळाचा रस काढून तो पितात का? 19.फळाचा उपयोग लोणची किंवा चटणी अशांसाठी होतो का? 20.घरातल्या कुणाकुणाला हे फळ आवडतं? इत्यादी. यापुढील रकाने तुमचे.

10. निरनिराळी फळे, भाज्या व कंदमुळे यांच्या पासून आपणास वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करता येतात.उदा. आंबा, जांभूळ, बीट, पालक, कोथिंबीर,चिंच इत्यादी. या संदर्भातला एक सुंदर रंगीत तक्ता तयार करता येईल.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

1 Comment on सुटीतले घर आणि घरातली सुटी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..