“ शास्त्रीय संगीतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व व स्वरलिपीचे जनक ”स्व.पं.विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६०रोजी कृष्ण जन्माष्टमी मुंबईच्या वाळकेश्र्वर येथे झाला. त्यांना लहानपणा पासूनच गायनाचे अंग होते. १० १२ वर्षाचे असताना त्यांना बासरी बाजवीण्याचा छंद जडला. मराठी शाळेतील शिक्षण संपवून मुंबईच्या एल्फिंन्स्टन स्कूल मध्ये इंग्रजीचे शिक्षण घेण्यास सुरवात केली. कॉलेज जिवनात पंडितजींना सतार वाजविण्याचे वेड जडले. वाळकेश्र्वर विभागात गोपाळगिरी व श्री वल्लभदास दामुले नामक राहात होते व ते चांगले सतार वाजवायचे. पंडितजींनी त्यांना त्यांच्या गुरूकडे घेऊन जाण्याची विनंती केली ती त्यांनी मान्य करून त्यांना सतारीचे उत्तम शिक्षण दिले.
सन १८८५ मे मध्ये पंडितजी बी.ए.परिक्षा पास झाले आणि त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. १८८७ मध्ये ते एल्.एल्.बी. परिक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी वकिली सुरू केली. एक वर्षभर त्यांनी कराची हायकोर्टात सुद्धा वकिली केली व एका वर्षानी ते परत मुंबईत वकिली करू लागले.
त्यांचा यथोचीत विवाह झाला त्यांना एक मुलगी झाली होती पण काही काळानंतर त्यांची मुलगी व पत्नी दोन्ही देवाघरी गेल्या त्यानंतर त्यांनी विवाह केला नाही.
लहान असतांपासून ते बासरी वाजवत असत तसेच त्यांनी सतारीचेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले होते. “गायन उत्तेजक मंडळी” मुंबई या संस्थेशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला. ही संस्था मुंबईचे पारशी लोक चालवत होते. याच संस्थेत प्रख्यात पंडित उस्ताद मंडळींना नोकरविर ठेऊन त्यांच्याकडून शास्त्रीय शिक्षणाचे धडे संगीत उच्छुकांना दिले जात असत. या संस्थेत रावजीबुवा बेळगावकर नावाचे ध्रुपदिये गायक होते. याच रावजीबुवा बेळगावकरांकडे पंडितजींनी ध्रुपद धमार शैलीचे अध्ययन केले आणि उस्ताद अलीहुसैन यांच्याकडून ख्याल गायकीचे धडे घेतले.
त्या काळात उत्तर हिन्दुस्थानातून नावाजलेले कलाकार मुंबईत येत असत. त्यांचे गायन ऐकून पंडितजी
त्यांची शिफारस करून ‘गायन उत्तेजक मंडळात’ त्यांची मैफल करण्याचे त्या गवयांना संधी मिळत असे. त्या काळच्या आणि चांगल्या चांगल्या वेगवेगळया गायकांची वेगगेगळया घराण्याची गायकी पंडितजींना ऐकाला मिळाली. त्या निमित्ताने त्या गायकांची ओळख सुद्धा झाली.
पंडितजी संस्कृत विषयाचे गाढे विव्दान होते. त्यांचा संस्कृत विषयाचा चांगला अभ्यास होता. संगीतावर जेवढे म्हणून ग्रंथ लिहीले होते त्यांचा त्यांनी अभ्यास सुरू केला. संस्कृत ग्रंथाचे शास्त्रीय संगिताच्या कलाने अभ्यास करताना त्यांना ग्रंथातील संगीता बद्दलचे लिखाण व प्रचलीत संगीत हयात खूपच फरक त्यांना त्याकाळी आढळला. ञ्याच सुमारास त्यांनी वकिली बंद करून संगीताचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले. संगीतावर ग्रंथ लिहीण्याचे ठरविले. या तयारीसाठी त्यांनी पूर्ण देशभर भ्रमण केले. प्रत्येक शहरात गावात जाऊन पुस्तकलयात जाऊन तेथील जुने पुराणे ग्रंथ व पुस्तकांचे वाचन केले. त्या वेळच्या संगीताच्या बुजुर्गांशी संगीत विषयावर दिर्घ चर्चा केल्या. त्यांनी सरतेशेवटी मुंबईला परत येऊनग् ग्रंथ लेखनाला सुरूवात केली. “लक्ष्य संगीत” नावाचा संस्कृत ग्रंथ पंडितजीनीं लिहीला ज्या मध्ये प्रचलित रागांचे नियम त्यांनी त्यात उद्ध्रुत केले आहेत. हिन्दुस्थानी संगीत शास्त्रीची संपूर्ण चर्चा आणि रागांचे वर्णन त्यांनी खूपच विव्दत्तापूर्वक प्राप्त केले होते जे क्रमिक पुस्तक सहा भागात क्रमशा प्रसिद्ध केले आहे.
स्व. पं. भातखंडे यांनी बरेच ग्रंथ लिहीले त्यातील महत्वाचे पूढे दिले आहेत. ‘लक्षण गति लक्ष्य संगीतम् सहा भागात क्रमिक पुस्तक मालिका अष्टोत्तरत लक्षणम् संगीत परिजात प्रवेशिका आणि राग विबोध प्रवेशिका. या व्यतिरीक्त ‘The Short Historical Survey of Music of Western India’ comparative study of Music System of 15th, 16th, 17th and 18th Centuries’ and ‘The Philosophy of Music’ या इंग्रजी ग्रंथाची नोंद आहे. अशा प्रकारे जवळजवळ ६५०० पानांचे मुदि्रत आणि प्रकाशित ग्रंथ त्यांनी भारतीय संगीताला दिले. आधुनिक हिन्दुस्थानी संगीताला ‘दहा थाटात रागांचे वर्गीकरण रागांच्या वेळेच्या स्थापना नियम आणि दाक्षिणात्य व उत्तर भारतीय संगीताचे साम्य व भेद यांना त्यांनी सर्व प्रथम प्रस्तुत करून एक प्रकारे संगीत क्षेत्राला देणगी देऊन ठेवली आहे.
त्यांच्या शिष्यांमध्ये स्व. वाडीलाल शिवराम स्व.राजाभैया पुंछवाले आणि पद्मभूषण स्व.कृष्ण नारायण रातान्जनकर यांच्या नावांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
असे सांगणयात येते की बडोदा संस्थानचे राजे स्वर्गीय सयाजीराव गायकवाड यांनी पंडितजींच्या शास्त्रीय संगीताच्या संशोधनासाठी त्यांना प्रोत्साहित करून सक्रीय साहाय्य सुद्धा केले होते. बडोदे ग्वालीयर आणि इंदूरच्या राजांनी त्यांच्या निरीक्षणाखाली संगीत संस्थाना खूप साहाय्य करून संगीतात उच्च शिक्षण घेणार्यांसाठी खूप मदत केली. लखनो मध्ये “मॉरिस कॉलेज ऑफ म्युझिक”ची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे झाली.
पंडितजींनी आपली स्वतःची एक सरळ सोपी सर्वांना कळेल व वाचता लिहिता येईल अशी नोटेशन पद्धती तयार केली जी आज सुद्धा खूप लोकप्रिय आहे. पंडितजींचे संगीता संबंधीचे कार्य हिन्दुस्थानी संगीतासाठी खूप महत्वाचे सिद्ध झाले आहे.
पं.भातखंडेना अंतिम दिनी पक्षाघाते घेरले होते. १९ सप्टेंबर १९३६साली गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ५ वाजता त्यांनी या नश्वर शरीराचा त्याग करून देव लोकाची वाट धरली. त्यांची कीर्ती व त्यांचे संगीतातील यश धुव्रतार्या सारखे सदोदीत झगमगत राहिले आहे.
जगदीश पटवर्धन
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply