देशभरातील राजकारणी रोजच्या रोज पुनरोच्चार करत असलेल्या “स्वबळावर” या संज्ञेचा मी किचनमधे वापर करुन स्वबळावर दोघांसाठी उप्पिठ करायचा घाट घातला आणि घात झाला. कीचनमधील कारकीर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात ” जेवणाशिवाय किचनमधे फिरकू नका ” अशी तंबी मिळाली.
क्रमवार पाककृती:
“रवा” असा स्टीकर डकवलेला डबा शोधला परंतू तो रवा जाड होता का बारीक हे कळेना. रव्याच्या तुलनात्मक अभ्यासासाठी आणखी चार सहा डबे उघडले, दुसरा रवा मिळालाच नाही मग कंटाळून यालाच मध्यम ठरवले. मंद आचेचा बर्नर शोधण्यासाठी तिन्ही बर्नर अॉन करून काडी पेटवताच तिघेही पेटून उठले. बारीक निळसर जोतीवाल्याला चालू ठेवले आणि बाकीच्या दोघांचे नरडे आवळले.
दोघांसाठी दीड वाटी ‘मध्यम’ रवा मंद आचेवर भाजायला घेतला आणि किंचित तपकिरी झाल्यावर पाण्याची धार धरली. रवा पाण्याखाली गुदमरू लागला; रवा खाली आणि पाणी वर अशी अवस्था झाली. साखर, मीठ, आल्याची पेस्ट, मिरचीचे तुकडे आत्मसमर्पणासाठी तयार ठेवले होते पण पाण्याच्या महापूराने धोक्याची पातळी ओलांडून रवा हवालदिल अवस्थेत पाण्याच्या बुडबुड्यांशी जुळवून घ्यायला बघू लागला होता.
महापूर आटोक्यात आणण्यासाठी आर्धा वाटी रव्याची कुमक तैनात केली पण न भाजताच. कधी रव्याची भर तर कधी पाण्याची. तयार मिश्रण कांदा मोहरीच्या फोडणीसाठी ताटकळून कंटाळले पण इतक्यात उकळत्या फोडणीत ढकलणे जोखीमपूर्ण होते. परिस्थिती आटोक्याबाहेर चालली होती.
पण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तशी माझी पत्नी माझी फजिती बघत ठामपणे माझ्या मागे उभी ठाकली होती. वेळीच पाऊल उचलून तिने मला बाजूला केले (सारले) आणि माझ्या स्वबळाला बाजूला सारुन तिने सात ते आठ मिनिटात मटार, टोमँटो, ओले खोबरे, कोथिंबीर आणि एक अष्ठमौंश लिंबाच्या फोडीसह ” एकहाती” अप्रतिम उप्पिठ बनवले.
मी जर बिघडवले नसते तर ती तसे उप्पिठ घडवूच शकली नसती! हे तिच्या लक्षात येत नाहीये !!
— प्रकाश तांबे
8600478883