‘डिस्कव्हरी चॅनल’वर मागे एकदा एक फिल्म पाहिली होती. एक वाघीण एका हरणाच्या पाडसाचा जीवावर उदार होऊन सांभाळ करते असं त्या एक तासाच्या फिल्ममधे दाखवलं बोतं काळजाला भिडणारंच होतं ते त्या वाघीणीचं वागणं. आहार, निद्रा, भय आणि मेथून येवढ्याच जाणीवा असलेला वाघासारख्या हिंस्त्र पशूतील ‘प्रेम’ जागृत होत असेल चर एक प्राणीच असलेला माणूस त्याला अपवाद कसा असेल? माणूस म्हणून कोणीच वाईट नसतो. किमान माणूसकी तर सर्वच माणसांत असते. फक्त त्यावर त्या फिल्ममधल्या वाघीणीसारखा ‘प्रेम आणि आपुलकीचा प्रकाश’ पडावा लागतो आणि त्यातूनच ‘माणूसकीचं परावर्तन’ होत. हल्लीच ‘द लास्ट मिनीट’ ही डाॅक्युमेंटरी बघीतल्यावर तर ही जाणीव आणखी तिव्र होते. आपल्यापैकी बहुतेक सर्वांनी ही डाॅक्युमेंटरी पाहीली असेल.
गर्दीने भरलेल्या बसमधे एक गरोदर युवती चढते. बसायला जागा नसते. ती आशाळभूतपणे सर्वांकडे पाहाते परंतू कोणीही तिला स्वत: उठून बसायला जागा देत नाही. शेवटी एका पायाने अपंग असलेल्या व्यक्तीच्या मनात तिच्याव्षयी कणव निर्माण होऊन तो स्वत: उभा पाहून तीला बसायला जागा देतो. बस पुढे जात असताना काही वेळातच ती युवती, तीला जागा दिलेल्या त्या अपंग माणसाला धक्का देऊन चालत्या बसबाहेर ढकलून देते. हे पाहून आपल्याही मनात चीड उत्पन्न होते. बसमधून रस्त्यावर ढकलून दिलेला तो माणूस तिने असं का केलं असावं असा विचार करत दूर जाणाऱ्या बसकडे तो बघत असतानाच पुढे काही अंतरावर त्या बसमधेएक जोरदार स्फोट होतो. बसमधे चढलेली ती गरोदर युवती वास्तवात अतिरेकी असते व तिनेच तो स्फोट घडवलेला असतो आणि तिच्यावर दया करणाऱ्या त्या अपंग युवकाला तिनेच वाचवलेलं असतं. शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या तिने शेवटच्या मिनिटाला त्या अपंगाला का वाचवलं असा अनुच्चारीत प्रश्न आपल्यासमोर ठेवून डाॅक्युमेंटरी संपते.
एकाचवेळी शेकडो निष्पाप लोकांचा बळी एका क्षणात घेणाऱ्या त्या कठोर युवतीने, तिला जागा देणाऱ्या त्या अपंग युवकाचा जीव मात्र वाचवला. तिनं असं का केलं असावं? खुप विचार करूनही तिच्या मनात तिच्यावर दया करणाऱ्या त्या माणसाबद्दल माणुसकी/दया/उपकारांची भावना/कृतज्ञता वैगेरे जागृत झाली असावी, यापेक्षा वेगळं उत्तर मिळत नाही. त्या माणसाच्या दयाबुद्धीच्या स्वभावाचं परावर्तन, तिच्या मनातल्या तशाच कुठल्यातरी पैलूवर पडून तिनं त्याचा जीव वाचवला असावा हेच उत्तर हाती लागतं. मला मिळत असलेलं उत्तर आपल्यापैकी काही जणांना पटेल अथवा पटणारही नाही पण दुसरं काहीच उत्तर सापडत नाही.
मी ‘स्वभावातं परावर्तन’ म्हणतो ते हेच. माणूस कितीही क्रुरकर्मा असला तरी, आपण जर त्याच्याशी चांगलं वागलो, तर तो ही आतमधे कुठेतरी हलतो व त्याच्यातील चांगल्या स्वभावचंच परावर्तन होतं. हे काय मी नव्याने सांगत नाही, बहुतेक महामानव हेच सांगून गेलेत.
मुळात स्वत:ला माणूस म्हणवणारा कोणीही स्वभावाने कधीच वाईट नसतो. वाईट असते ती परिस्थिती. परिस्थितीचा प्रकाश त्याच्या मनावर कसा पडतो, त्या प्रमाणे त्याचं वागणं ठरतं. विपरीत परुस्थितितही सदसगविवेकबुद्धी व नितीमत्ता जागृत ठेवणारी माणसंही असतात पण ती अल्पसंख्य असतात. इतर बहुतेक अत्यंत तिखट पद्धतीने परिस्थितीला प्रतिसाद देतात. कोणीही किती वाईट वागत असेल तर आपण मात्र नितीनेच वागवं असाच निश्कर्ष निघतो. आगीशी पाण्याने आणि तलवारीशी ढालीनेच सामना करावा लागतो. तसंच वाईटाशी चांगुलपणानेच वागावं लागतं.
कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडला तर त्या वस्तूंवरून प्रकाशातील जो रंग परावर्तीत होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, तो रंग त्या वस्तूचा असं आपण ठरवतो हा प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम लहानपणी शाळेत विज्ञानाच्या तासाला वाचला होता. उदा. झाडांच्या पानावरून सूर्यप्रकाशातील ‘तानापिहिनीपाजा’ या रंगांपैकी केवळ हिरवा वा हिरवा रंग दिसेल अशा रंगांचे मिश्रण परावर्तीत होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि म्हणून आपल्याला झाडाचे पान ‘हिरवे’ दिसते. हाच नियम सर्व गोष्टींना लागू होतो. अंधारात वस्तूंवरून परावर्तीत होईल एवढा प्रकाशच नसल्याने सर्वच गोष्टी आपल्याला काळ्या दिसतात अथवा दिसतच नाहीत ते यामुळेच. याला ‘प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम’ असं म्हणतात. अर्थात हे शाळेत इयत्ता ५-६ वी वा मागेपुढे वाचलेलं आठवतं. हाच नियम मानवी स्वभावालाही लागू होतो असं म्हटलं तर चुकेलं का?
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply