नवीन लेखन...

स्वच्छता

स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.

साधी गोष्ट असते बसमधून उतरल्यावर लगेच तिकीट तेथे फेकणे. चणे-दाणे खाऊन कागद रस्त्यातच फेकणे. सिगारेट-विडी ओढून ती थोटके रस्त्यात फेकणे, वरच्या मजल्यावरून केसांचा गुंता टाकणे. अशा तऱ्हेने काम झाल्यावर त्या वस्तू निरुपयोगी होतात म्हणून त्या रस्त्यात फेकून जणूं तुम्ही तुमच्या अस्वच्छतेचा दाखलाच देत असता.

आता आपण पाहतो, ४/५ मजली इमारती असतात. या आमच्या अशिक्षितच काय, पण सुशिक्षित बायकाही वरच्या मजल्यावरून केर खाली टाकतात. सकाळी फिरायला जाताना बघावे, गॅलऱ्या धुणे चालते. यातून आपला बचाव करत चालावे लागते. वरून खरकटे पाणी अंगावर कधी पडेल ते सांगता येत नाही. तुम्ही त्यांना काही बोलाल तर म्हणतात; त्यातले कण चिमण्या, उंदीर खातील. तुम्ही कशाला काळजी करता?

अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती, अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती,  पण आमचे चांगले सुशिक्षित गृहस्थ त्या पाटीवर थुंकून तिलाच रंगवून पुढे गेले. बायका पिशवीत किंवा कागदात केर भरत नाहीत. अंडी, मासळी इ. सर्व केर रस्त्यात टाकतात. त्यावर माशा बसतात. उंदीर, घुशी, कुत्री यांचा सुळसुळाट होतो. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरून हवा दूषित होते.

आमच्या भागात पोलीस कॉलनी आहे. येथे नेहमी पोलिसांच्या गाड्या उभ्या असतात. त्यांनी स्वच्छतेचे धडे लोकांना द्यावे असे म्हणावे तर हेच गाडीत बसून पान खाऊन रस्त्यावर थुंकत असतात. रस्त्यात पाण्याची बाटली घेऊन तोंड धुतात. तुम्हीच सांगा, ज्यांना स्वतःला शिस्त नाही ते दुसऱ्याला शिस्त काय लावणार?

सर्वच पोलीस वाईट नसतात, त्यांतही काही आदर्श भेटतात. मध्यंतरी डोंबिवलीत राहणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर रूपाली आंबोरे यांनी स्वतःच्या बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर साफ करायला हातात झाडू घेतलेला पाहून थोरामोठ्यांनी हातात झाडू घेऊन ह्या स्वच्छतेत भाग घेतला. आता दर रविवारी सर्व जण स्वच्छता करून आपला परिसर स्वच्छ ठेवून मन प्रसन्न ठेवीत आहेत.

अशा वेळी गाडगे महाराजांना आणि म. गांधींना विसरून चालणार नाही. स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, संडाससुद्धा साफ करून लोकांना स्वच्छतेचे धडे दिले. आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान सुरू केले. स्वतः हातात झाडू घेऊन आपला परिसर साफ केला. बरेच मोठमोठे लोक त्यात सामील झाले. काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी कोणी नेते येणार म्हटले की, आधीच स्वच्छता करून ठेवली जाते. २/४ कागद ठेवले जातात. चला, फोटो काढून पेपरात आला हे महत्त्वाचे.

स्वच्छता राखण्यासाठी दर वेळी सांगितले जाते की ओला कचरा, सुका कचरा बाजूला ठेवा; पण किती जण असे करतात? काही गावांमध्ये कचरा न्यायला गाडी येते. घंटेचा टण् टण् आवाज आला की ताबडतोब लोक हातात कचऱ्याच्या बॅगा-डबे घेऊन तेथे हजर राहून कचरा गाडीत टाकतात. नोकरीवाले लोक कचऱ्याच्या बॅगा खाली आणून ठेवतात. तेव्हा तो गाडीतून नेला जातो. त्यामुळे ही गावे बरीच स्वच्छ दिसतात. बागेत, नाट्य-सिनेमागृहाबाहेर व काही रस्त्यावर ‘माझा खाऊ मला द्या’ असे लिहिलेले विशिष्ट आकाराचे डबे ठेवलेले असतात. त्यामुळे बरेच लोक त्यांत केर टाकून आपण शिस्तशीर आहोत असे दाखवतात. काही बायका रेल्वेच्या डब्यात कधी चॉकलेट, कधी फळं खातात, भाज्या निवडतात; पण तो केर प्लास्टिक पिशवीत साठवून केराच्या टोपलीत टाकतात. आता तर बगीचे, समुद्रकिनारे साफ राखण्यासाठी रोबोचा उपयोग केला जाणार आहे. अशा तऱ्हेने स्वच्छता दिसली तर आपली मान गर्वाने उंचावेल.

अशा ह्या कचऱ्यामुळे रस्त्यातून कुत्री, मांजर, उंदीर, घुशी हिंडू लागले. त्यातून हल्ली प्लास्टिक पिशव्यांनी तर कहरच केला आहे. गटारे तुंबू लागली, ठिकठिकाणी पिशव्यांचे ढीग दिसू लागले. अशा अस्वच्छतेअभावी स्वाइन फ्ल्यू, मलेरिया, टायफाइड, काविळीसारखे महाभयंकर रोग होऊ लागले. आपल्या नद्या पाहा, सतत गाळाने भरलेल्या. त्यांत गिरण्यांमधून रासायनिक पदार्थ टाकले जातात. गणपती विसर्जनावेळी नदी, विहीर, समुद्रात विसर्जन करून पाणी दूषित केले जाते. नाट्यगृह, सिनेमागृहात खाद्यपदार्थ नेऊन तेथे सांडले की तेथे उंदीर व डासांची पैदास होते. मंदिरात देवावर दूध घालतात. स्वच्छतेअभावी दूध नासून हवा दूषित होते. अशी कितीतरी उदाहरणे द्यावी तेवढी थोडी आहेत.

ही इतर स्वच्छता झाली. त्याबरोबर शारीरिक व मानसिक स्वच्छतेकडे पण लक्ष ठेवले पाहिजे. लहान मुलांना भूक नसताना बळे-बळे खायला घालणे. अखेर तो ओकला तर नीट न पुसणे. सगळ्या माशा तेथेच काय, मुलांच्या अंगावरही घोंगावत असतात. इतर पदार्थावर बसतात. आता मुले बाहेरून खेळून आली की हातपाय धुणे, रोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, बाहेरचे कपडे घरी आल्यावर बदलणे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन मुलांना घरीच स्वच्छतेचे धडे देऊन तिचे फायदे सांगितले पाहिजेत. म्हणजे औषधाला दूर ठेवले जाईल म्हणूनच म्हटलं आहे, स्वच्छता म्हणजे मेकअप करून अथवा परफ्युम लावून स्वच्छ होणे नव्हे.

शरीराबरोबर मनाचीही स्वच्छता पाहिजे. खेळ म्हटले की, कोणीतरी जिंकणार; कोणीतरी हरणार. हारही स्वीकारायची तयारी पाहिजे. परीक्षेत गुण कमी मिळाले तर आपण कोठे चुकतो याचा विचार करावा. लोकांबद्दल वाईट विचार मनात येऊ देऊ नये. शिंक आली, खोकला आला तर रुमाल समोर धरावा. आपले मन स्वच्छ असेल तर वाईट विचार कधीच मनात येणार नाहीत.

दुसऱ्या देशात गेल्यावर तिथली स्वच्छता बघितली की आपल्या देशाची लाज वाटते. तेथे दंड केला जातो. त्यामुळे लोक आपोआप सुधारले आहेत. त्यांच्याकडे स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम असे शब्द वापरावे लागत नाहीत. आपल्याकडे दक्षिणेत गेले तर देवळे किती स्वच्छ असतात. मी पाँडेचेरीला गेले होते तेथील ऋषितुल्य, अरविंदबाबू आश्रम खूपच स्वच्छ होता. हे पाहून असे म्हणावेसे वाटते ‘स्वच्छता द्यावी सदा मनाची, आरोग्य लाभो सदा शांतिसुखाचे.’

शेखर आगासकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..