नवीन लेखन...

स्वदेशी संकल्पना आणि व्यवहार 

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला रवींद्र महाजन यांचा लेख


‘स्वदेशी’ हा शब्द ऐकला की, आपल्या देशात तयार केलेली वस्तू खरेदी करणे, हा विचार मनात येतो. काही लोक तर स्वदेशी म्हणजे एवढेच असे समजतात.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटनमध्ये तयार झालेल्या मालावर बहिष्कार टाकून भारतात तयार झालेल्या वस्तूंचा अधिकाधिक वापर करून ब्रिटनचे आर्थिक नुकसान करणे व भारतातील लोकांसाठी रोजगार निर्माण करणे हे देशभक्तीचे कार्य समजले जात असे. अशा प्रकारे स्वदेशीचा अवलंब केल्यास स्वातंत्र्य लवकर मिळेल, अशी सर्वसामान्यांची मनोधारणा होती.

पण आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, स्वदेशी संकल्पना ही केवळ वस्तूंपुरतीच मर्यादित नाही. या मुद्याची जास्त चर्चा करण्यापूर्वी आपण हे पाहू, या की, आज हा स्वदेशीचा विचार कालोचित आहे का कालबाह्य झाला आहे?

स्वदेशीची कालोचितता

काही लोक असा विचार करतात की, आता जागतिकीकरणाचे युग आहे, ते अपरिहार्य आहे आणि त्यामुळे स्वदेशीला काही स्थान उरणार नाही. काही लोक असे म्हणतात की, हळूहळू देशांचे वेगळे अस्तित्व समाप्त होत चालले आहे. मात्र जगातील वास्तव तसे नाही. काही प्रमुख परदेशांमध्ये स्वदेशीची भावना जोर धरत आहे, वाढते आहे आणि देशांचे वेगळे अस्तित्व कमी न होता ते बळकट होत आहे. आणखी एका दृष्टीने आपला स्वदेशीचा विचार प्रासंगिक ठरतो. भांडवलशाही आणि कम्युनिझम दोन्हीही आपले घोषित उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी ठरले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ७३ वर्षांमध्ये, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपयोग न करता आपण पश्चिमेकडून मिळालेल्या विकासविषयक सिद्धांतांचा स्वीकार केला आणि भांडवलशाही व कम्युनिझम या दोन्हीचे मिश्रण असलेली विकासनीती अमलात आणली. सध्या भांडवलशाहीवादी राष्ट्रांकडून प्रशंसिलेल्या मुक्त बाजारनीतीचे आपण अवलंबन करीत आहोत.

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनसुद्धा आज आपला देश विकसित देश म्हणून ओळखला जात नाही. पश्चिमी देशांच्या विकास प्रारूपांचे अनुकरण करणाऱ्या इतर अविकसित देशांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि एकंदरीतच सर्व दुष्परिणामांचा आज आपला देश शिकार बनला आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची अनुभूती येत नाही आहे.

तेव्हा महत्त्वाचा पर्याय आणि जो आपला राष्ट्रीय पर्याय आहे त्याचा स्वीकार केल्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही आणि आपला राष्ट्रीय (स्वदेशी) पर्याय म्हणजे, ‘एकात्म मानव दर्शन – आज त्याचा अवलंब करण्याची वेळ आलेली आहे.

स्वदेशी नेहमीच कालोचित

आज सर्वत्र जागतिकीकरणाचे वातावरण असल्यामुळे स्वदेशीची आवश्यकता भासू लागली आहे असे नाही.

स्वदेशीची आवश्यकता आपल्याकडे नेहमीच होती आणि नेहमीच असेल. या दृष्टीने स्वदेशी नेहमीच कालोचित आहे. रामायणामधील हा प्रसंग पहा. रावणाचा वध केल्यानंतर लक्ष्मण श्रीरामांना विनंती करतो की, आता आपण लंकेचे अधिपती व्हावे व सिंहासन ग्रहण करावे. याला श्रीराम नकार देतात आणि म्हणतात, “लंका जरी सुवर्णभूमी असली तरी ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि।’ (माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षाही महान आहेत) हाही स्वदेशी भावनेचा एक आविष्कार आहे. ‘

स्वदेशी संकल्पना

स्वदेशी म्हणजे ‘स्व’ला अनुकूल, म्हणजे आपल्या संस्कृतीला अनुकूल संस्कृतीचे सार धर्म आणि धर्माचे सार आपली जीवनमूल्ये असतात. धर्म म्हणजे फक्त पूजापाठ नाही, तर धर्म म्हणजे ज्यांच्यामुळे समाजधारणा अपनाएँ स्वदेशी देश समुद्र होते, समाजसंवर्धन होते असे जीवनव्यवहाराचे नियम. जीवनमूल्ये यम (यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह येतात.) नियम (यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान येतात. ) समरसता, श्रमनिष्ठा, पर्यावरण मैत्री, निसर्गाचा संयमित वापर, कर्मयोग, मातृदेवो भव पितृदेवो भव – आचार्य देवो भव, स्वाध्यायान्मा प्रमदः, आत्मवत् सर्वभूतेषु वगैरे. या मूल्यांच्या आधारे सर्व व्यवहार चालणे व ती मूल्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येणे म्हणजेच स्वदेशीची संकल्पना आहे.

देशातील वाढता परदेशी प्रभाव

“सर्वे * बनाएं भवन्तु स संकल्प-स्वदेशी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्व सरकारांनी विशेषतः १९९० नंतरच्या सरकारांनी परदेशांकडून कर्ज घेऊन, नाही तर त्यांना भारतातील साधनसंपत्ती विकून विदेशांचा प्रभाव कमी-जास्त प्रमाणात वाढविला.

अ) परदेशी मालकी हक्काबरोबर परदेशी संस्कृती पण येते आणि कोणत्याही वाईट संस्कृतीचा लवकर फैलाव होतो, हे आपण पाहत आहोत.

ब) शिक्षणामधून राष्ट्रीय मानस निर्माण होते आणि आज या क्षेत्रात अनेक परदेशी संस्थांनी हातपाय पसरले आहेत. सबंध शिक्षणक्षेत्र भारतीयांच्या हातातच असले पाहिजे.

क) आपल्या अर्थव्यवस्थेवर हळूहळू विदेशी पकड घट्ट होऊ लागली आहे.

ड) देशाच्या निर्यातीपैकी दोन तृतीयांश हिस्सा परदेशी कंपन्यांच्या हातात आहे.

इ) आपण असे समजतो की, सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत अग्रेसर आहे. त्या क्षेत्रातील तीस टक्के निर्यात विदेशी कंपन्या करीत आहेत आणि विशेष फायदा मिळवून देणारे क्षेत्र त्यांच्याच हातात आहे.

ई) वर्तमानपत्रात आपण वाचतो की, परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअर बाजार कोसळला. याचा अर्थ असा की, भारतीय उद्योग क्षेत्रावर आता परदेशीयांची जबरदस्त पकड आहे. शेअर बाजारात भारतीय कंपन्या आपले स्थान घालवून बसत आहेत. एका अंदाजाप्रमाणे शेअर बाजारात परदेशीयांनी भारतीय कंपन्यांची ३५% मालकी काबीज केली आहे.

ही फक्त एक झलक आहे. देशाच्या सर्व कार्यक्षेत्रांमध्ये परदेशीयांची पकड मजबूत होऊ लागली आहे. सरकारने परदेशी गुंतवणूक, परदेशी मालमत्ता, देशाच्या अर्थव्यवहारात परदेशी मालकीची टक्केवारी, परदेशी अपसंस्कृतीचे दुष्परिणाम यावर एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली, तर त्यावर देशात चर्चा तरी होऊ शकेल. या महत्त्वाच्या मुद्याचा विचार करून आपले लोकसभा सदस्य सरकारकडे अशा श्वेतपत्रिकेची मागणी करतील का? स्वदेशी ही नेहमीच कालोचित असते. मजबूत होणारी अशी परदेशी पकड पाहता राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने स्वदेशी भावनेची वृद्धी होणे अत्यंत आवश्यक आहे.

स्वदेशी पर्याय

देशाच्या खऱ्या प्रगतीसाठी विकास पद्धती आपल्या राष्ट्रीय तत्त्वज्ञानावर म्हणजेच स्वदेशी तत्त्वज्ञानावर आधारलेली हवी. विकासाचा आपला स्वतःचा मार्ग असावा. तो आपण निश्चित केलेला असावा आणि राष्ट्रीय मानसिकतेला अनुकूल असावा.

परदेशांशी संबंध

परदेशांशी परस्पर सन्मानजनक आणि हितकारक संबंध असावेत अशी आपली इच्छा आहे. माननीय दत्तोपंत ठेंगडी नेहमी सांगत असत की, आम्ही केवळ अमेरिकेच्या लूटमारी व शोषण करणाऱ्या कंपन्या आणि त्यांना साथ देणाऱ्या सरकारी नीतीचा विरोध करतो. आम्ही अमेरिका राष्ट्र अथवा तेथील आम जनतेच्या विरोधात नाही. आम्हाला तर असे वाटते की, खुद्द अमेरिकन जनता ही सुद्धा या कंपन्यांच्या लुटीची शिकार बनली आहे. परदेशी भांडवलाबाबत आपली भूमिका काय असावी? देशाच्या विकासामध्ये देशातील नागरिकांची व त्यांच्या भांडवलाचीच भूमिका प्रमुख असली पाहिजे. परदेशी भांडवलाला इथे स्थान असू नये आणि असलेच तर शेवटचे व किमान गरजेपुरते असावे. ‘कृण्वन्तो विश्वामार्यम्’ व ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आमची मार्गदर्शक सूत्रे आहेत. या दृष्टीने योग्य वेळ आली की, किंवा आवश्यकता भासल्यास स्वदेशीची व्याप्ती मानवता, विशेष करून जगातील दुर्बल देशांपर्यंत वाढविली जाईल. ते आपल्या विचारांशी मिळतेजुळते आहे. आपण ते अवश्य करू.

स्वदेशी व्यवहार

कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोहोंना सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, देशातील वाढता परदेशी प्रभाव व तो कमी करण्याची आवश्यकता, तसेच आपल्या स्वदेशी चिंतन आणि समाज संवर्धक तत्त्वांचा उपयोग या तीनही दृष्टींनी देशातील सामाजिक नेतृत्वाला सामाजिक चिंतन, भावना आणि व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने गंभीरतेने कार्य करावे लागेल. हे न केल्यामुळे आपण परदेशी चक्रव्यूहामध्ये जास्त अडकत चाललो आहोत हे आपण आधी पाहिलेच आहे.

जरी सगळ्या राजकीय पक्षांचे नेतृत्व परदेशी मोहजालात कमी-जास्त प्रमाणात फसलेले असले तरी सामाजिक नेतृत्वाच्या स्तरावर ठोस कामगिरी करून राष्ट्रहित साध्य होऊ शकते. जर चांगले वातावरण असेल, तर परदेशाचे समर्थक मानले गेलेलेही स्वदेशीच्या गोष्टी बोलू लागतात.

आजच्या संदर्भात, स्वदेशीच्या प्रचाराच्या दृष्टीने काय करता येईल अशा काही महत्त्वपूर्ण कामांची यादी खाली दिली आहे. ही कामे तीन स्तरांवर होऊ शकतात – व्यक्तिगत, संस्थात्मक आणि राष्ट्रीय.

व्यक्तिगत स्तरावर

आपल्या व्यक्तिगत जीवनात स्वदेशी.

– घरातील वातावरणनिर्मिती.

– स्वदेशी वस्तूंचा उपयोग करणे.

स्वदेशीचा प्रचार: आपल्या आसपास आणि चर्चा करावी, कृती कार्यक्षेत्रात स्वदेशीचा प्रचार करावा, कार्यक्रम राबवावे.

परदेशीकरणाला विरोध: व्यक्ती म्हणून स्वतः आणि स्वदेशी भावना वाढविणाऱ्या संस्थांमार्फत स्वदेशीचा प्रचार करावा. परदेशीकरणाला विरोध करावा.

संस्थांचा स्वदेशी व्यवहार

सर्व सामाजिक व व्यावसायिक संस्थांनी आपल्या सभासदांना स्वदेशीबाबत प्राथमिक माहिती द्यावी.तसेच त्यांच्याकडून स्वदेशी व्यवहाराची अपेक्षा ठेवून नव्या पद्धतीने जुने व नवे प्रश्न कसे सोडवायचे याची माहिती द्यावी. स्वदेशीचे संस्कार रुजविण्यास शिक्षण क्षेत्र फार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. त्या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेल. स्वदेशी हा अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग व्हायला हवा. उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये स्वदेशी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा आणि चर्चा सतत व्हायला हव्यात. स्वदेशीवर खुली चर्चा, मनमोकळी चर्चा व्हावी आणि तिचे सगळे पैलू पारखून सर्वांच्या मताने निर्णय घेण्याची पद्धत विकसित व्हायला हवी.सर्व सामाजिक आणि व्यावसायिक संस्थांनी राज्याची भाषा, हिंदी आणि संस्कृतचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. या भाषा संगणकामध्ये वापरताना येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधून ते आपल्या सभासदांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले पाहिजे. आपल्या कामासाठीच्या आवश्यक वस्तू शक्यतो जवळपास खरेदी कराव्यात. अशा वस्तू निर्माण करण्यात स्थानिक लोकांना शक्य ती मदत करावी. शक्य असेल तिथे जाणीवपूर्वक स्वदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. समुचित स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इतर संस्थांना मदत करावी. आपले सभासद परदेशी अपसंस्कृतीच्या ओघामध्ये वाहून जाऊ नयेत यासाठी संस्थांनी शक्य असेल तेव्हा पर्यायी कार्यक्रमांचे आयोजन करावे. जसे भारतीय वर्षाचे स्वागत ( पूजा, संगीत, शोभायात्रा इ.), रक्षाबंधन, शिक्षक दिन, प्राचीन वैज्ञानिक दिन, गणेश पूजा, सरस्वती पूजन, सभासद परिवार संमेलन वगैरे.

राष्ट्रीय जीवनात स्वदेशी 

शिक्षण क्षेत्र: समाजजीवनामध्ये समुचित परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे उच्च माध्यम आहे. जगातील प्रमुख देशांमध्ये आणि भाषांमध्ये उपलब्ध असलेले ज्ञान, व्यवस्थितरीत्या अनुवादित करून आधी हिंदीत व मग इतर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे. हे काम एका विशेष कार्यगटातर्फे संचालित केले जावे. भारतीय भाषा नसलेले संगणक आणि कार्यप्रणाली (Operating Systems) यांच्या विक्रीला भारतात बंदी असावी. भारतीय भाषांमधील अक्षरे, प्रमाणीकरण आणि सुलभतेच्या दृष्टीने युनिकोडमध्येच असावी. पूज्य विनोबा भावे यांचे एक स्वप्न होते की, सर्व भारतीय भाषा आणि दक्षिण व पूर्व आशिया ( जपान, चीन, श्रीलंका) देशांतील भाषांसाठी देवनागरी लिपीचाच वापर करावा. देवनागरीला ते अतिशय उपयोगी मानत असत. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक संस्था स्थापन करावी. हे काम सक्तीने नाही, तर सामाजिक संस्थांमध्ये योग्य प्रचार करून होऊ शकेल. गुगल, याहूप्रमाणे भारतीय अणुडाक कंपन्यांना योजनापूर्वक प्रोत्साहन द्यावे म्हणजे आपले व्यवहार जास्त सुरक्षित होतील. वाईट संस्कृतीच्या प्रसारावरही थोडा वचक बसेल.

राष्ट्रजीवनातील सर्व क्षेत्रांतील नेतृत्व आणि विशेषतः आर्थिक व राजकीय क्षेत्रातील नेतृत्व, आज परदेशी मोहजालात फसलेले आहे. वाढती परदेशी पकड हा त्याचाच परिणाम आहे.

या मोहजालातून नेतृत्वाला बाहेर काढण्याचे काम सामाजिक नेतृत्वाला करावे लागेल. परदेशी पैशांच्या झगमगाटावर आणि बाजारकेंद्रित आर्थिक नीतीमुळे आपला देश वेगाने प्रगती करू शकणार नाही, महान बनू शकणार नाही. त्यासाठी आपल्या देशातील नागरिकांची आंतरिक प्रेरणा (देशभक्ती, पूर्णत्वाची आकांक्षा, देशाला जगात सन्मान प्राप्त व्हावा अशी तीव्र इच्छा, नवीन उच्चांक स्थापण्याची ऊर्मी, देशाचे तत्त्वज्ञान जगाला देण्याची अभिलाषा) जागी करावी लागेल आणि ही प्रेरणा स्वदेशीच्या भावनेनेच जागी होईल. नान्यः पंथा: विद्यते अयनाय !

(अर्थ व्यवस्थापन तज्ज्ञ. स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते. दीनदयाळ उपाध्याय हा अभ्यासाचा मुख्य विषय.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..