इतका वेळ ढगांशी घेतलेली झुंज यशस्वी ठरली. विमान ढगांचे आवरण भेदून लंडनकडे झेपावले. मी नेटाने डोळे उघडे ठेवून आणि गरगरणाऱ्या डोक्याकडे दुर्लक्ष करून खिडकीबाहेर पाहिले, आणि बघतच बसले.
खाली सर्वत्र लंडन शहर झळकत होते. माझ्या स्वप्न नगरीचे पहिले दृश्य अत्यंत मनोहारी होते. विमान लँड होत होते पण मी मनाच्या अवकाशात हिंदोळत होते.सर्वत्र हिरवेगार शहर, ब्राउन कौलारू घरे, मध्येच नजाकतदार वळणे घेणारी फेमस ‘थेम्स’ नदी, नदीवर छोटे-छोटे पूल,त्यातला एक नेहमी ‘फॉलिंग डाऊन वाला लंडन ब्रिज’ असणार. एका ठिकाणी एक पांढरी कमान, छोट्या बोटी, सुंदर चकाकणारे रस्ते, त्या रस्त्यावरून धावणाऱ्या रंगीबिरंगी गाड्या!!
या दोनच डोळ्यांनी किती पटापट चित्रे टिपणार? असे वाटत होते कि, मी एखादी स्वप्नातली दुनिया बघत आहे. खूप सुंदर नेटकेपणाने मांडून ठेवल्यासारखे लंडन शहर वाटले! सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. कारण भरपूर उजेड होता. मला मजा वाटली. सकाळी मी मुंबई सोडली तेव्हा माझ्या घड्याळात पावणेदहा वाजले होते. आता सुद्धा पावणेदहा वाजले होते. अर्थात हे दुबई टाइमिंग होते. आणि तेवढाच उजेड होता. एक क्षण असे वाटले कि मी आणि घड्याळ आहे तिथेच आहोत आणि खालचा पडदा कोणीतरी हलवला आहे. आधी मुंबई एअरपोर्टच दृश्य होतं. आता त्या जागी लंडन शहर आहे. तसही विमान धावतंय असं कधी जाणवत नाही.
असो ! After all unwanted experience of landing, I finally landed ‘the Land of English Man – ‘England’
प्लेन लँड झाले होते पण थोडे पुढे जावून तिथेच थांबले होते.दोन दोन मिनिटाच्या अंतराने आमच्या समोरून चार-पाच विमाने टेक ऑफ घेऊन गेली. मग आमच्या प्लेनला धावपट्टी क्रॉस करण्याचा सिग्नल मिळाला. ट्राफिक जामचे एक मजेशीर उदाहरण !
मला त्या दहा मिनिटात लहानपणी आई घेत असलेला एक जीके क्विझ गेम आठवला.
पटापट उत्तरे द्या!
“ विच इज द लोंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड?” – “नाईल”
“ विच इज द बिझीएस्ट एअरपोर्ट इन द वर्ल्ड?” – “ लंडन हिथ्रो “
त्या बिझिनेसचा अर्थ आता अनुभवला. प्लेनला रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नल ची गरज लागते असा हा एअरपोर्ट!!
माझ्या पेशन्ससे लिमिट संपले होते. कधी एकदा उतरते असे झाले. मी सामान घेऊन तयार राहिले. पण आधीच माणसे जास्त आणि झोन वाईस डिपार्चर, यामुळे माझा नंबर यायला वेळ लागला.
लंडन टाईम प्रमाणे सहा पस्तीस झाले होते. माझे घड्याळ मी लंडन टाईम नुसार ॲडजस्ट केले.मुंबई टाईम प्रमाणे सकाळी पावणे सातला मी मुंबई एअरपोर्टवर होते आता लंडन टाईम प्रमाणे संध्याकाळी पावणे सातला लंडन एअरपोर्ट ला होते. गमतीशीर आहे, हा वेळेचा खेळ!
मला माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरने आधीच सूचना देऊन ठेवल्या होत्या, त्याप्रमाणे विमानाच्या बाहेर आल्या आल्या मी खूप फास्ट चालायला सुरुवात केली. बॅग जड होती तरीही शक्य तितक्या घाईघाईत मी चालायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित खुणा ,डायरेक्शन बोर्ड्स सगळं होतं. कोणाला काही विचारायची गरज नव्हती. मी बॅगेज क्लेम ह्या दिशेने जायला सुरुवात केली.
मध्ये मध्ये लोकांच्या सोयीसाठी वाकर बेल्ट होते.तुम्ही नुसता त्यावर उभे राहायचे आणि तो बेल्ट सरकत दुसऱ्या एन्डला जातो. पण त्याचा स्पीड खूप स्लो होता. त्यावरूनही अनेक लोक भराभर चालत होती. मीही त्याचे अनुकरण केले. दमले किंवा हात भरुन आले की २ मिनिटे ऊभे रहायचे, परत सुरु चालणे.
प्रत्येक वेळेला बॅगेज क्लेम हा बोर्डा आला की मला वाटायचे आलो आपण आता. कसलं काय? असे अनेक पॅसेज क्रॉस केले पंधरा-वीस मिनिट तर मी नुसती चालत असेन. जड बॅग, खांद्यावर सॅक आणि उगीच थंडी वाजली तर वर असू दे म्हणून हातात बाळगलेलं जाड जॅकेट!! अशी माझी वरात किती पॅसेजेस् ओलांडत होती देव जाणे! शेवटी पंधरा-वीस मिनिटाच्या अथक प्रयत्नांनंतर मला इमिग्रेशन ऑफिस काउंटर्स दिसले. जीव भांड्यात/बॅगेत पडला.
या सगळ्या गोंधळात माझ्या हातापायांना भयंकर घाम आला होता. प्रचंड ऊकडायला लागले होते. मला कळेना की, मी मुंबई एअरपोर्टला आहे कि लंडनला!
शेवटी मी त्या इमिग्रेशन ऑफिस काऊंटरच्या लायनीत थांबले आणि मला माझ्या या प्रचंड मेहनतीचं फळ मिळालं! मी लाईन मध्ये दुसरी किंवा तिसरी असेन. एकाच वेळेला तीन-चार प्लेन लॅंड झाली होती. मी जर का पीएम च्या सूचना लक्षात न ठेवता रमत-गमत आले असते तर कदाचित खूप मोठ्या लांब लचक लायनीला तोंड द्यावे लागले असते. आता माझ्यापुढे फक्त तिघेजण होती आणि बघता बघता मागे भरपूर मोठी रांग झाली.
माझ्या पुढ्यातच तो इन्फोसिस वाला होता. त्याने विचारले, प्रवास कसा झाला? कोणी आला आहे का एअरपोर्ट वर! माझे नाही उत्तर ऐकून परत त्याला थोडा शॉक बसला असावा. त्याचे काम झाल्यावर तो बाहेर जाऊन थांबला. माझं पासपोर्ट स्टॅम्प झाल्यावर मी बाहेर आले.
पुढे लगेचच बॅग कलेक्शन होते. मी बॅग्ज् घेतल्या. आता माझ्याकडे १ हॅंड बॅग, १ ट्रोली बॅग, १ सॅक आणि १ जॅकेट असा लवाजमा होता.
मग त्या इन्फोसिसवाल्याने मला पॅडिंगटनला जाण्यासाठी ट्युब ट्रेन कुठून मिळेल हे दाखवले. आणि बाय करून निघून गेला. जाताना ऑल द बेस्ट असेही म्हणाला. तो गेल्यावर माझ्या लक्षात आलं आम्ही एकमेकांना नावही विचारलं नव्हतं. असो! माझ्या मदतीला देवाने एखादा दूत पाठवला असे मला असे वाटले. आता फक्त एकच पॅसेज क्रॉस केला आणि समोर टिकीट विंडो दिसली. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि तिकीट विंडोपर्यंत पोहोचले.
एअरपोर्टवर इतक्या व्यवस्थित इन्स्ट्रक्शन होत्या की कोणाला काही विचारायला विचारायला सुद्धा लागणार नाही. मी आता तिकीट विंडो जवळ उभे होते. तिथून मला पॅडिंगटन जाणाऱ्या ट्रेन साठी तिकीट घ्यायचे होते.
इंग्लंड ला ‘Gentleman’s कंट्री ‘ का म्हणतात, याची प्रचिती मला तिथूनच यायला सुरुवात झाली. खूप शानदार स्वागत झाले.
आमच्यात घडलेला संवाद असा –
“ Hello, I want to go to Padington. When is the train?”
“Good evening Mam, its there in 5 mins. Would you like to buy a ticket Mam?”
“Yes, how much it is for?”
“It’s only 13 pounds Mam” तो जरी ओन्ली म्हणाला तरी ते इंडियन ९००-९५० रुपये होतात हयाची त्याला काय कल्पना!!
“Paddington is the first station or what?” माझा एक बालिश प्रश्न!
“The train directly halts at Paddington. It takes only 15 mins to reach there Mam.” (बाप रे! १५ मिनिटांसाठी ९०० रुपये!! मी मनातल्या मनात पुटपुटले)
ऑफिसमधून मला 50 पौंडच्या 10 नोटस् दिल्या होत्या. त्यातली एक मी त्या माणसाला दिली.
चेहर्यावरचे स्माइल ढळू न देता, ती नोट घेवून, तिकीट आणि चेंज मला दिली. तेरा पौंडासाठी मी 50 पाऊंड दिले होते. भारतात असते तर, सुट्टे द्या! अशा तिरकस टोन मध्ये मला हाकललं असतं!
इथे शब्दाच्या पुढे मागे मॅडम किंवा सर याचे इंजिन आणि थँक्यू आणि सॉरीचे डब्बे जोडून त्यांची गाडी सुटते. इतकी विनम्रता कुठून येते? कधी कधी अजीर्ण होऊ शकते, पण सुरुवातीलाच ते विनम्र स्वागत बघून मला खूप भरून आले.
त्याबरोबरच त्या तिकीट काऊंटरवर असलेल्या माणसाने पहिल्यांदाच आलात का? हाही प्रश्न विचारला. हो! असे उत्तर मिळाल्यावर, ‘वेलकम टू लंडन! हाव अ गुड डे’ अशा साखर पेरलेल्या वाक्याबरोबर ट्यूब मॅप, प्लेसेस टू व्हिझिट, हिस्टरी ऑफ लंडन, स्ट्रॅफोर्ड अपॉन एवॉन – (बर्थ प्लेस ऑफ शेक्सपिअर) असे दोन – चार कॅटलॉगस् सुद्धा मला दिले.
संवादाची अखेर, “Enjoy your stay in London, Mam” अशा अजून एक सौहार्दपूर्वक वाक्याने झाली.
मी ते सगळं गोळा करून, हातात आलेले सुट्टे पैसे ओळखण्याचा आणि मोजण्याचा प्रयत्न करत होते. नाणी आधी कधी पाहिली नसल्यामुळे एक-एक जाणे बघेपर्यंत जरा वेळ गेला. तोपर्यंत मागे चार-पाच जण लाईन मध्ये स्थितप्रज्ञा सारखी उभी होती. चेहऱ्यावर कुठलीही कटकट ,राग काहीही नव्हता. शांतपणे माझा सगळा गोंधळ संपण्याची वाट बघत होते.
मी तिकीट, सुट्टे पैसे, कॅटलॉग सगळे बॅगेत ठेवून मागे वळले आणि शांतपणे माझं संपायची वाट बघणारे लोक बघून थोडी खजील झाले. त्यांना सॉरी म्हंटले. पण चेहऱ्यावर अजिबात त्रासिकपणा न आणता उलट हसून, वेलकम टू लंडन असं म्हणत त्यांनी त्यांच्या आदरातिथ्याची चुणूक दाखवली.
सगळे सामान घेऊन मी प्लॅटफॉर्मवर आले. माझ्या बाजूलाच एक कोरियन किंवा जपानी माणूस होता. मी त्याला विचारले,इथे फस्क्लास येतो का? मला आपली मुंबईच्या लोकलची सवय! आता इथल्या सगळ्याच गाड्या मुंबईतला फस्क्लास सारख्याच रादर जास्तच स्वच्छ नेटक्या आणि क्लोजड असतात. इथे लेडीज डबा वेगळा, फर्स्टक्लासचा डब्बा वेगळा, बारा डबे – नऊ डबे असे काही प्रकार नाहीत. पण हे कळेपर्यंत माझ्या तोंडून तो प्रश्न निघून गेला होता. त्या माणसाला माझा प्रश्नच कळला नाही. त्याने नुसते स्माईल दिले आणि तो दुसरीकडे गेला.
प्लॅटफॉर्मवर गाडी किती मिनिटात येणार आहे याचे इंडिकेटर असते. ‘Next train in 5 mins.’, ‘4 mins’.. असं ‘झिरो मिनिट’ आलं की गाडी प्लॅटफॉर्म वर असते.
ते सगळं सामान ट्रेनमध्ये ठेवताना मला ब्रह्मांड आठवलं. कारण प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये थोडी गॅप होती. लगेच तिथे अनाउन्समेंट ही चालू होती. ‘प्लीज माईंड द गॅप’!
गाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता. गाडी एका लांबलचक बोगद्यातून जात होती. इतके दिवस जाणार का नाही अशी मनाची अस्वस्थता, प्रवासाची तयारी, धावपळ, १२-१५ तासांचा प्रवास आणि आता हॉटेल कडे नेणारा आजच्या दिवसातला शेवटचा प्रवास. या सर्व घडामोडींमुळे मला आता जरा थकल्यासारखं जाणवत होतं. सगळ्यांची आठवण येत होती. अंधार्या बोगद्यात अजून थोडेसे नर्वस व्हायला होत होते.
गाडी बोगद्यातून बाहेर आली आणि अचानक मनाची मरगळ दूर झाली. खूप ताजेतवाने वाटले.
चित्रात मांडलेल्या खेळासारखे लंडन शहर चे जवळून दर्शन झाले….
— यशश्री पाटील.
Leave a Reply