स्वप्न पहावीत…
नाही कोण म्हणतंय ?
स्वप्नं जरूर पहावीत.
इतकी सारी पहावीत की
त्यांची ढिगारे व्हावीत.
भान ठेवून उघड्या डोळ्यांनी
त्या स्वप्नांकडे पहावं.
निर्धाराच्या अचूक बाणाने
त्या स्वप्नांना वेधावं.
स्वप्नांसाठी आजच्या वर्तमानाला
निरर्थक नाही मारावं.
उद्यासाठी आजच्या क्षणाला
व्यर्थ नाही टाळावं.
अशक्य अश्या स्वप्नांसाठी
शरीराने जरूर थकावं.
पण न खचता मनानं
पून्हा धैर्यानं उठावं.
तुटलेल्या मोडलेल्या स्वप्नांसाठी
कधी नाराज नाही व्हावं.
नव्या उमेदीने नव्या स्वप्नांकडे
दृढविश्वासाने पहावं.
स्वप्नांना कसं स्फूर्तीनं अन्
अगदी आनंदानं हाकावं.
अस होऊ नये की त्या स्वप्नांसाठी
बिचाऱ्या निद्रेनेच थकावं.
हरवलेल्या त्या स्वप्नांसाठी
कधी व्यर्थ नाही झुरावं.
नव्या अशा स्वप्नांसाठी झोपेला
अगदी शांत मनाने भरावं.
डॉ.सुभाष कटकदौंड