आम्ही ग्रीनविच पिअरला उतरलो आणि आमचे स्वागत एका मोठ्या शिपच्या मॉडेलने केले.जुने शिडाचे जहाज होते ते. भोवताली हिरवे रान, समोर थेम्स चे पांढरे निळे पाणी आणि त्याच्या किनारी हे डार्क ब्राऊन जहाज एखाद्या विजेत्यांच्या आवेशात दिमाखात उभे होते.
त्याचे मनोसोक्त दर्शन घेवून ग्रीनविच Observatory च्या दिशेने कूच केले. स्वच्छ रस्ते, आजूबाजूला हिरवळ अशा प्रसन्न वातावरणात किती चालतोय ह्याचे भानच नव्हते. आजूबाजूचे सृष्टी सौंदर्य न्याहाळत, गप्पा मारत आम्ही पुढे जात होतो. किती वेळ चालतच होतो. पुढे आम्हाला ग्रीनविच मार्केट लागलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नेटकी मांडलेली दुकाने, छोट्या छोट्या फुलांचे, वेलींचे ताटव्यांची महिरप त्या नेटकेपणाने मांडून ठेवलेल्या दुकानांमध्ये अजून सुंदरतेची भर घालत होते. एका हॉटेलमध्ये थांबून आम्ही चहा – स्नॅक्स घेतले. बाहेरचं बसून वातावरणाचा आनंद घेत गरम गरम चहा मस्त लागला. तिथेच बसावस वाटत होतं.पण मग मात्र अंधार पडायच्या आत वर observatory पर्यंत पोहोचायचे असल्यामुळे आम्ही जरा वेगाने आणि आजूबाजूचे खुणावणारे सृष्टी सौंदर्य कटाक्षाने टाळून झपाझप पावले टाकायला लागलो.रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईने नटलेली झाडे, मध्ये नीट बांधलेला रस्ता अशा सुंदर दूनियेमधून आम्ही मार्ग क्रमण करत होतो. असे अर्धा पाऊण तास चालल्यावर लांबवर आम्हाला एक छोटेसे टेकडासारखे दिसले. पूर्ण हिरवळीने भरलेलं टेकाड.त्याला वर जाणाऱ्या लांब लांब पांढरट दगडाच्या पायऱ्या. एखाद्या मंदिराकडे तर नाही जात आहोत असे वाटणे अगदी स्वाभाविक होते.
पण तिथे पोहचण्याआधी आम्हाला एक मोठा अडसर पार करायचा होता. आमच्या आणि टेकडीच्या मध्ये असलेलं सुंदर ग्रीनविच पार्क. काय सुंदर पार्क होते ते! आता इथे आम्ही भोज्यासरख शिवून कसं पुढे जायचं?
आमच्या वाटाड्याच्या सगळ्या सूचना धुडकावून लावत आम्ही डाव्या हाताला पसरलेल्या पार्क मध्ये पसरलो. तिथे अनेक ब्रिटिश कुटुंबे त्यांच्या गोऱ्या गोमट्या बाळांना घेवून आली होती. हिरवळीवर मनसोक्त लोळून आम्ही पण एन्जॉय केले. शेवटी नाईलाजाने उठून समोरची टेकडी चढवला लागलो. हवा थंड होत होती आणि पटापट चालल्यामुळे थोडा दम लागत होता.एक 15 मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही Observatory च्या घुमट जवळ होतो. त्या Observatory च्या मागच्या बाजूला ती फेमस भूगोलात येवून त्रास देणारी झीरो डिग्री Longitude होती.
कशी असेल ती लाइन? ह्याचा विचार करत आम्ही मागच्या बाजूला पोहचलो. तिथे सगळीकडे फरसबंदी केलेली होती. मधोमध एक स्टीलची पट्टी होती जी शेवटी एका स्टीलच्या ग्लोबच्या तिरक्या ॲक्सिसला मिळत होती. स्टील पट्टीच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या देशाचे रेखांश लिहिले होते. ते तिथे लिहून आम्हाला काय फरक पडणार होता? पण उगीचच गोंधळात भर घालायची. आम्ही एक पाय पट्टीच्या एका बाजूला तर दुसऱ्या दुसऱ्या बाजूला ठेवून उभे राहिलो.आता आमचा लंडनच्या बाजूला असलेला पाय आमच्या ग्रीनविचच्या बाजूला असलेल्या पायाच्या एक तास मागे होता. तिथे आम्हाला GMT आणि BST वेगवेगळे आहेत हे कळले. काय गौड बंगाल आहे! आमच्या काकाजींच बरयं! त्यांच्या मते जंगलात फक्त दोनच वेळा. भूक लागली की खायचं आणि झोप आली की झोपायच. अगदी आदि मानवासारखं! ह्या प्राईम मेरिडियनला घेऊन पण वाद-विवाद होते. कुणी तरी म्हणाले खरे झिरो रेखांश फ्रान्समधे आहे. पृथ्वीला पण सोडल नाही माणसाने.मग वेळा बनवून मानवाने प्रगती केलीय का अधोगती? हे तो विश्वनियंताच ठरवेल, असा विचार मनात डोकावल्याशिवाय राहिला नाही.
थोडीशी भूगोलाची उजळणी करून आधीच असलेल्या अघाद ज्ञानात गोंधळाची भर टाकून आम्ही गाशा गुंडाळला. भूगोलाची लक्तर प्राईम मेरिडियनला लटकावून आम्ही खाली उतरलो. आता अंधार पडत चालला होता. आता परत कसं जायचंय असा सवाल सगळ्यांनी उपस्थित केला.
सोनेरी किरणांची जादू संपली असली तरी आम्हाला अचंबित करणारी जादू अजून संपली नव्हती. लंडनच्या जादुई पोतडीत अजून काही तरी होते आज!
आम्ही ती छोटी टेकडी आणि ग्रीनविच पार्क ओलांडून थोड चालत ग्रीनविच Underground स्टेशनला आलो. आमच्यासमोर एक Toy Train वाटणारी ट्रेन येवून थांबली. 2-3 डब्ब्यांची ड्रायव्हर नसलेली गाडी?
अजून किती अजुबे बघायचे एका दिवसात? खुश होवून आम्ही त्या जादुई नगरीतून जादूच्या गाडीत बसून निघालो. ती DLR..(Dockland Light Rail) होती. बिना ड्रायव्हर रिमोट कंट्रोल वर चालणारी ट्रेन. क्षणभर मला वाटलं की, Hamley’s मधली डेमोसाठी ठेवलेली रिमोट कंट्रोल ट्रेन तर इथे नाही आली? आम्ही तर एकदम पहिल्या डब्यात जाणाऱ्या दिशेने पहिलेच थांबलो. लहान मुलांसारखी excitement होती ती. लहानपणीचे इंजिनमध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न अशा प्रकारे अचानक सत्यात उतरले होते.
थोड्याच वेळात आम्ही बँक स्टेशनला उतरून सेंट्रल लाईन ने RCA ला आलो.
जाताना मोहमयी थेम्स मधला प्रवास, ग्रीनविचचे हिरवे सौंदर्य आणि येताना जादुई ट्रेनचा प्रवास असा स्वप्नवत दिवस उराशी बाळगत आम्ही एका स्वप्नातून दुसर्या स्वप्नात कधी शिरलो कळलेच नाही.
— यशश्री पाटील.
Leave a Reply