स्वप्नांतल्या चांदण्यात एकदाच
तू भेटून जा
मोहरल्या मनातील गंध
तू असा लुटून जा
साद हलेकच तुला देते
प्रतिसाद तू देऊन जा
अंतरातील भावनांची ओल
अलगद तू मिटून जा
रातराणीच्या सुवासात आल्हाद
तू दरवळून जा
अलवार मिठीत तुझ्या
तू मला टिपून जा
दव भरल्या धुक्यात
तू हरवून जा
स्पर्श माझा मलमली
तू जरासा मोहरुन जा
ओढ लागली तुझी
तू मुग्ध होऊन जा
माझ्या अबोल मिठीत
तू मोहक गंधाळून जा
भाव भावनांचे कोष हे
तू धागा विणून जा
लाज गाली बहरली
तू मला वेढून जा
स्तब्ध झाले क्षण तुझ्यासाठी
तू निमिष थांबून जा
गुंतले तुझ्यात अवचित मी
तू गोफ बांधून जा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply