या नंतरचा काही काळ मात्र मी स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीच्या जडणघडणीसाठी दिला. सुगम संगीताचे सर्व प्रकार मी शिकवत होतो. पण रागदारी संगीत, हार्मोनियम, तबला, गिटार अशी अनेक वाद्ये शिकण्यासाठी लोक चौकशी करायला लागले. माझ्या काही निपुण विद्यार्थ्यांनाच मी शिक्षक बनवले. अल्पावधीतच श्रीरंग टेंबे, सागर टेमघरे, प्रज्ञा टेंबे, मनिषा शहा, मनोज कांबळे, समीर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, कुलकर्णी असे अनेक शिक्षक हे सर्व प्रकार शिकवायला लागले. स्वर-मंचच्या विद्यार्थ्यांची संख्या २५० पेक्षा जास्त झाली. जागेची कमतरता भासू लागली. आमच्याकडे जागा होती, पण त्याचे योग्य नियोजन नव्हते. गणेश अंबिके या तरुण इंटिरिअर डिझाईनरने खूप छान प्लॅन तयार केला. सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कामानंतर डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते आमच्या नवीन अॅकॅडमीचे उद्घाटन झाले. स्वर-मंचच्या विद्यार्थ्यांचे अनेक जाहीर कार्यक्रम आम्ही सुरू केले. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या संहिता आम्ही तयार केल्या.
त्यामुळे स्वर-मंचच्या विद्यार्थ्यांना फक्त गाण्याचे शिक्षणच नाही, तर जाहीर कार्यक्रमात गाण्याची संधीदेखील मिळू लागली. दिवसभर माझा रियाज होऊ लागला आणि त्याचा चांगला परिणाम कार्यक्रमांमध्ये दिसू लागला. माझ्या गाण्यात सहजता आली. कलाकाराच्या कलेत सहजता तेव्हाच येऊ लागते जेव्हा त्याची तयारी भरपूर झालेली असते. यासाठी कलाकाराला अपार कष्ट करावे लागतात. अफाट प्रयत्नानंतरच कलाकाराच्या कलेत सहजता येते. वाचताना थोडे विलग वाटेल, पण हीच वस्तुस्थिती आहे. ही सहजता माझ्या गाण्यात हळूहळू येऊ लागली. आमच्या बँकेचे संचालक मित्र हेमंत महाजन यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक मराठी अकादमी इंदूरसाठी माझा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्रीमती सुमित्राताई महाजन होत्या. त्यांनी नेमके याच सहजतेचे आपल्या भाषणात कौतुक केले. ज्या संपूर्ण दिवसाच्या रियाजासाठी मी धडपडत होतो. तो म्युझिक अॅकॅडमीमुळे व्हायला लागला होता. त्याचीच पावती मला इंदूरमध्ये मिळाली. त्यामुळे या कार्यक्रमामुळे खूप समाधान मिळाले.
यानंतर ‘झी सारेगमप’ या अतिशय लोकप्रिय स्पर्धेसाठी गेस्ट परीक्षक म्हणून दोन भागांसाठी मला आमंत्रित करण्यात आले. एक गायक म्हणून मला मिळालेला हा मोठा बहुमान होता. निर्माते रुपेश राऊत यांनी या स्पर्धेची संहिता नीट समजावून सांगितली. निवेदन मैथिली पानसेने केले. या लोकप्रिय स्पर्धेचे परीक्षण हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.
मराठी सुगम संगीत, हिंदी गझल आणि हिंदी गीत-भजन या तीन गीत प्रकारांचा मान्यताप्राप्त गायक म्हणून मी ऑल इंडिया रेडिओसाठी सतत गात होतोच. रेडिओसाठी मी दोनशेपेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली होती. ‘भावसरगम’ हा मराठी सुगम संगीताचा एक विशेष कार्यक्रम रेडिओवर होत असे. निर्माते भूमानंद बोगम यांनी या कार्यक्रमात गाण्याची संधी दिली. कवयित्री वंदना विटणकर यांचे ‘स्वप्नगीत उमलले’ हे सुंदर भावगीत संगीतकार कृष्णराव गायकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायिका अपर्णा मयेकर यांच्याबरोबर मी गायलो. टेलिव्हिजन आणि रेडिओवर एकदा तरी गायला मिळावे अशी प्रत्येक गायक कलाकाराची इच्छा असते. तशीच माझीही होती. या दोन्ही माध्यमांमार्फत फारच मोठ्या संख्येच्या रसिकवर्गापर्यंत कलाकार पोहोचू शकतो. दोन्हीकडे अगदी छोट्या कार्यक्रमांपासून सुरवात करून आज मी दोन रसिकमान्य मोठे कार्यक्रम केले होते. दोन्ही ठिकाणी माझा कोणीही गॉडफादर नव्हता. त्याचबरोबर हेही सांगतो की दोन्ही ठिकाणचे निर्माते माझ्याशी अतिशय चांगले वागले. त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. एक मात्र मी केले. माझ्या गाण्याचा दर्जा सतत उंचावत राहिलो आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्या सतत संपर्कात राहिलो. मी करत असलेले प्रयत्न त्यांना सांगत राहिलो. कारण गायकांना जशी निर्मात्यांची गरज असते तशीच या निर्मात्यांना देखील निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या गायकांची गरज असते.
३१ मे २००२ हा दिवस माझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आला. माझी दुसरी मुलगी केतकी हिचा जन्म झाला. आमचे कुटुंब आता चौकोनी झाले. छोटी शर्वरी आता ताई झाली.
म्युझिक अॅकॅडमीमुळे गाण्यांचा अभ्यास करण्यासाठी मला वेळ मिळू लागला. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी एका कार्यक्रमात भेटले. ते म्हणाले,
“गाण्याच्या बाबतीत थोडा वेगळा विचार कर. गाणे गायले जाते तसेच ऐकलेही जाते. गाणे कसे गावे याचे शिक्षण तू देतोस, पण गाणे कसे ऐकावे याचे मार्गदर्शन कोण करणार? या विषयावर अभ्यास कर.” त्यांचा विचार अगदी योग्य होता. मी कामाला लागलो. लवकरच तेरा ज्येष्ठ नागरिक संघांसाठी ‘संगीताचा कान’ हा एक आगळावेगळा कार्यक्रम आम्ही सादर केला. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी माझी प्रगट मुलाखत घेतली. कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. लवकरच लोणावळा, माथेरान आणि इतर ठिकाणी या कार्यक्रमाचे काही प्रयोग आम्ही केले.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply