नवीन लेखन...

स्वर प्रवासातील पुढचे पाऊल

या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते. स्वर-मंचतर्फे मिथिलेशच्या गाण्यांची कॅसेट करण्याचा निर्णय मी आणि विश्वास पाटणकर यांनी घेतला. यातील गाणी वेगवेगळ्या गायक-गायिकांनी गावी म्हणजे मिथिलेशच्या संगीताला वाव मिळेल हे विश्वास पाटणकरांचे रास्त म्हणणे मी मान्य केले. यातील काही गाणी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गावी यासाठी मी आणि पाटणकर यांनी प्रयत्न केले. सुरेशजी तयार झाले. माझ्या स्वर-मंच कॅसेटसाठी प्रथमच सुरेश वाडकर गायले. त्यांच्या आवाजात तीन गाणी रेकॉर्ड झाली. मी तीन गाणी गायलो. गायिका रंजना जोगळेकर आणि मृदुला दाढे-जोशीही गायल्या. लवकरच ‘बहरू कळियासी आला’ या कॅसेटचा प्रकाशन समारंभ डोंबिवलीत ठाण्याचे महापौर श्री. मोहन गुप्ते यांच्या हस्ते झाला. मला आनंद वाटतो की मिथिलेश पाटणकर या क्षेत्रात आज बरीच कामे करतो आहे. त्याच्या करिअरची सुरवात स्वर-मंचच्या कॅसेटने झाली. माझे गुरु श्रीकांत ठाकरे यांनी एका मराठी कॅसेटसाठी संगीत दिग्दर्शन केले. ‘बिंदा टोन’ कॅसेटच्या या प्रोजेक्टमध्ये भूपेंद्र, सुरेश वाडकर, अजित कडकडे, हरिहरन, उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी या मान्यवर कलाकारांबरोबर मी गायलो.

त्याच वेळी अजून एका मराठी चित्रपटाची तयारी जोरात सुरू होती. आमच्या व्हीजेटीआय कॉलेजचे प्रोफेसर सुभाष सावरकरसर यांनी जुन्या प्रभातच्या धर्तीवर नवप्रभात चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. या नवप्रभातच्या नियोजन मंडळाचा मी एक सदस्य होतो. नवप्रभाततर्फे ‘नास्तिक’ या मराठी चित्रपटाचे काम सुरू झाले होते. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद सुभाष सावरकरांनी लिहिले होते, तर चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत मोघे करणार होते. ‘वाट ही काट्याकुट्यांची कोण तुजला संगती, तू तूझा रे सोबती’ हे सुभाष सावरकरांनी लिहिलेले अत्यंत सुंदर गीत संगीतकार विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली माझ्या आवाजात रेकॉर्ड झाले. या रेकॉर्डिंगनेच चित्रपटाचा मुहूर्त झाला. शुभेच्छा देण्यासाठी कवयित्री आणि मोठ्या शासकीय अधिकारी नीला सत्यनारायण उपस्थित होत्या. नीलाजींची काही गाणी मी रेडिओसाठी गायली होती. त्यामुळे आमचा चांगला परिचय होता. नीलाजी संपूर्ण रेकॉर्डिंग प्रक्रियेत आनंदाने सहभागी झाल्या.

कर्मवीर एस.एम. जोशी यांच्या जीवनावर कवीवर्य वसंत बापट यांनी लिहिलेले एक परिणामकारक गीत संगीतकार प्रभाकर पंडित यांनी माझ्या आवाजात रेकॉर्ड केले. गीत रामायणकार ग.दि. माडगूळकर यांचे संगीतकार दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेले शीर्षकगीत मी ‘आकाशाची फळे’ या टीव्ही सिरीयलसाठी गायलो.

या रेकॉर्डिंगबरोबर गाण्याचे जाहीर कार्यक्रम सुरू होतेच. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नागरी सत्काराचा भव्य कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने आयोजित केला. या कार्यक्रमात माझ्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. इस्कॉन या मान्यवर संस्थेसाठी जुहू येथील ऑडिटोरियममध्ये मी भजन संध्या सादर केली. या कार्यक्रमाच्या वेळी एक मजेदार घटना घडली. कार्यक्रमाच्या ध्वनीसंयोजनासाठी एक गोरा संन्यासी येऊन बसला. साऊंड रेकॉर्डिंग ऑपरेटरच्या जागी त्याला बसलेला पाहून मला थोडी काळजी वाटली. आयोजकांना मी त्याबाबत विचारले, त्यांनी सांगितले की, त्यांचे नाव जीम मिलर असून ते अमेरिकेहून आले आहेत. संन्यास घेण्यापूर्वी त्यांचा स्वतःचा साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ अमेरिकेत होता. ते स्वतः उत्तम साऊंड इंजिनीयर होते. इतकेच नव्हे तर इस्कॉन ऑडिटोरियममध्ये असलेली उत्कृष्ट साऊंड सिस्टिम त्यांनीच बसवलेली होती.

“तुम्ही काळजी करू नका. आजच्या कार्यक्रमाला कदाचित तुम्हाला आत्तापर्यंतचा उत्तम साऊंड मिळेल.”

आयोजक म्हणाले आणि नेमके तसेच घडले. उत्तम साऊंडमुळे नेहमीच कार्यक्रमाचा दर्जा उंचावतो. त्यामुळे कार्यक्रम खूपच रंगला. कार्यक्रमानंतर मी मिलरसाहेबांचे आभार मानले. त्यांना साऊंड इंजिनीयरपासूनच्या आजच्या प्रवासापर्यंत कुतूहलाने विचारले. त्यावर मिलरसाहेबांनी मिश्किलपणे दिलेले उत्तर अवाक् करून टाकणारे होते. ते म्हणाले, “साऊंड इंजिनीयर बनलो. स्वतःचा स्टुडिओही काढला. अनेक वर्षे ते काम मनापासून केले. पण पूर्ण समाधान मिळाले नाही. मग ठरवले की आता त्या साऊंड इंजिनीयरचा शोध करूया, ज्याने ढगांच्या गडगडाटापासून पक्षांच्या किलबिलाटापर्यंत निरनिराळे आवाज तयार केले. ज्याने ज्वालामुखींच्या स्फोटापासून सुंदर वाद्यांपर्यंत वेगवेगळ्या आवाजांची निर्मिती केली.” मी जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला.

अल्पबचत संचालनालयातर्फे भव्यतम लॉटरी सोडतीचे आयोजन ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये केले गेले. त्यानिमित्त माझा गझलांचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमातच लॉटरी ड्रॉ काढला गेला. एक गमतीचा विचार मनात येऊन गेला की, माझ्या कार्यक्रमाच्या कालावधीतच बरेच लोक श्रीमंत झाले. अनेकांच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडला. मनात एका जुन्या हिंदी गाण्याचे शब्द आले. ‘ओ दाता ओ दाता, दो हम को भी एक प्यारा बंगला, अरे हम भी तेरे चाहनेवालोंमे हैं।’

२९ डिसेंबर १९९२ हा दिवस माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस ठरला. आम्हाला कन्यारत्नाचा लाभ झाला. मी बाबा झालो. पहिली बेटी धनाची पेटी असे म्हणतात. एकूण त्या दात्याने माझ्या मनातील गाणे ऐकून ‘तथास्तु’ म्हटले असावे. पहिली बेटी त्याने मला दिली होती. धनाची पेटी तो नंतर पाठवणार असावा. दोन्ही घरात आनंदाचे वातावरण पसरले. खास करून आईसाठी ही फारच आनंददायक घटना होती. एकाच वर्षापूर्वी झालेल्या भाऊंच्या आघातानंतर आता ती पुन्हा पूर्ववत होत होती. तिचा स्वभाव मुळातच आनंदी होता. त्यामुळे या घटनेमुळे ती पुन्हा आनंदी झाली. मुलीचे नाव आम्ही ‘शर्वरी’ ठेवले. भगवान शंकरांना मोहित करण्यासाठी पार्वतीने देखण्या नृत्यांगनेचा शबरी अवतार घेतला त्यावेळी तिने नाव धारण केले ते ‘शर्वरी.’ आमची छोटी. शर्वरी तशीच देखणी होती. पण नावाप्रमाणेच पुढे मोठी झाल्यावर ती उत्तम नृत्यांगना बनणार आहे, याची त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती. शर्वरी आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आली. यावेळी माझी पहिली गाडी मी विकत घेतली. आपल्या स्वतःच्या गाडीतूनच शर्वरी घरी आली.

-अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..