मागच्या काही वर्षांपासून देशातील राजकारणाकडे पाहायला गेलं तर, राजकारणाचा स्तर खूप खालावत गेलेला दिसत आहे. धर्म, जाती-पातीच्या नावावर अराजकता माजवून निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या राजकीय नेत्यांची जबरदस्त समस्या निर्माण झाली आहे.
भ्रष्टचार, बेरोजगारी, दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, शिक्षण -आरोग्य या क्षेत्रामध्ये असणारा भेदभाव व सरकारी उपाययोजनांची कमतरता या सर्व गोष्टींना कारणीभूत असणारी मुख्य गोष्ट म्हणजे या स्वार्थी,स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे गलिच्छ राजकारण हे आहे, यामुळे देश रसातळाला जात आहे कारण या भ्रष्ट लोकप्रतिनिधींवर कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही. आपण आपला देश संविधानावर चालतो असं म्हणतो परंतु, हे सर्व कायदे फक्त कागदावरच आहेत, त्याचा या गुंड प्रवृत्तीच्या भ्रष्ट नेत्यांवर काहीही परिणाम होत नाही, कारण कायदा पैशाने विकला जात आहे.
आज सामान्य माणसाला एखाद्या चौकीत -न्यायालयात जाण्याची वेळ आली आणि खरंच त्याच्यावर अन्याय झालेला असेल, तरीपण त्याच्या विरोधी असलेला म्हणजेच त्याच्यावर अन्याय करणारा माणूस हा पैशाने श्रीमंत असेल किंवा त्याचा एखाद्या नेत्याशी परिचय असेल, तर तो त्याच्या नावाचा उपयोग करून आणि पर्यायाने पैशाचा उपयोग करून तो आपली सहीसलामत सुटका करून घेतो. कारण त्याच्यावर या गुंड /भ्रष्ट नेत्याचा वरदहस्त असतो आणि त्यासोबत त्याला साथ करणारे दळभद्री पण थोड्याफार पैश्याच्या लोभापायी एका गरिबाला न्यायापासून दूर ठेवतात कारण त्याचा गुन्हा एवढाच असतो कि, त्याच्याकडे या लाचार लोकांना देण्यासाठी पैसा नसतो किंवा तो जास्त पैसा देण्यास कमी पडतो म्हणजे त्याला पैशे देऊन पण न्यायापासून वंचित राहावे लागते.
आज राजकारणामध्ये येणाऱ्या लोंकाची प्रवृत्ती हि समाजसेवा करण्याची अजिबात नाही. यांना फक्त स्वतःच स्वार्थ साधून आपली घर भरायची आहेत. अडाणी, गुंड प्रवृत्ती असलेल्या लोंकांचा लोंढा आज राजकारणामध्ये वाढतांना दिसत आहे. आणि ज्या लोकप्रतिनिधींना आपण सुशिक्षित, हुशार समजतो व त्याला निवडून देतो तो तर आपल्या हुशारीपणाचा वापर आपल्याला जास्तीतजास्त पैसा कसा कोठून मिळवता येईल हे बघत असतो, त्याला समाजाच्या विकासाशी काहीही कर्तव्य नसते. त्याला ताळ्यावर आणण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे. आपल्या देशामध्ये राजकारणामध्ये येण्यासाठी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही, कोणतेही शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. कोणीही या आणि गरिबाला लुटा, देशाला लुटा व मातीत घाला, असे काम चालू आहे. याला वेळीच आळा घालणे हे एक सुजाण नागरिक म्हुणुन आपले काम आहे.
आपल्या देशाची अजून एक खरी समस्या म्हणजे हि बिनडोक लोक जे कि, माझा पक्ष, माझा साहेब करत या स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या मागे फिरत असतात. स्वतःच्या परिवाराची, समाजाची काय अवस्था आहे याकडे यांचे अजिबात लक्ष नाही. हा जनतेचा बावळटपणा, अज्ञान, अशिक्षितपणा, देशप्रेमाचा अभाव, वैयक्तिक स्वार्थ,भ्रष्टाचारास सहकार्य अश्या एक ना अनेक गोष्टी आहेत. त्या फक्त लोक उघड्या डोळ्यांनी बघून मूग गिळून गप्प बसतात. आज कारागृहात राहून निवडणूक लढवणारा लोकप्रतिनिधी भरघोस मत्तांनी निवडून येतो, लोक त्याला निवडून पण देतात याला काय म्हणावे ? हि कुठली मानसिकता समाजामध्ये विकसित झाली आहे, काय माहित ? आज अश्या कितीतरी नेत्यांची उदाहरणे समाजामध्ये आहेत कि, त्यांच्यावर एकापेक्ष अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, आणि फक्त ते आरोप नाहीत तर त्यांनी ते भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध पण झालेले आहे. तरीपण हि लोक कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत बाहेर येउन लोंकांवर दहशत ठेवत आहेत आणि अजून मोठा भ्रष्टचार कसा करता येईल व सर्वामध्ये मोठा भ्रष्ट लोकप्रतिनिधी म्हणून कसे नाव कमवता येईल याची स्पर्धा करत आहेत असे म्हणावे लागेल.
“आज सर्व सुजाण नागरिकांनी या लोकप्रतिनिधींना आपला देश, किंवा आपले राज्य कसे चालवलं पाहिजे ? कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे ? याच विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरण आणि ते पूर्ण करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करून ते सत्यात उतरवणं म्हणजे खर जागृत राजकारण होय.” राजकारण हे फक्त निवडणुकापुरत मर्यादित नाही, तर त्याला विचार मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. असा विचार प्रत्येक जागृत नागरिकाने व राजकारण्याने ठेवणे गरजेचे आहे. आपण सर्व लोक्कांनी मिळून समाजातील सर्व स्तरांमध्ये कशी शांतता राहील, प्रत्येक हाताला काम कसे मिळेल, सर्वांचे जीवन हितकर /सुखकर कसे होईल याकडे लक्ष देऊन, ती व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
आज सत्ताधारी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर सामान्य जनतेच्या विरुद्ध वापरून त्यांना मदत न करता आणखी जास्त त्रास देऊन त्यांना कस अज्ञानामध्ये ठेवून आपली पोळी भाजून घेता येईल याच्यासाठी करत आहेत. त्यामुळे आपण असेच या स्वार्थी संधीसाधू राजकारण्यांना मोकळे सोडू तर ते आपल्याला हाकण्याचे काम राजरोसपणे करत राहतील, म्हणून त्यांना आत्ताच विरोध करून त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे.
— पांडुरंग लिंबाजी डोंबे
PD@Patil
Leave a Reply