स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक – इंग्रजांची जगातून सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न अगदी बालपणापासून पाहणारा एक मुलगा संशोधन करून मेक्सिकोला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवतो. असा हा स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे.
क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला.
त्यांचे वडील सरकारी नोकर. आजोबांना १८५७ च्या लढ्यात सहभागी झालेल्या लढवय्यांविषयी आस्था होती. त्यांच्या सहवासात पांडुरंग असे. लहानपणी १८९१मध्ये इंग्रजांविरूद्ध भिल्ल सेना उभी करण्यासाठी जंगलात निघाले. मात्र, पोलिसांनी पकडून घरी आणले. हुर्डा पार्टीतही बॉम्ब, स्फोटकांची चर्चा करायचे. पुढील शिक्षणासाठी वर्ध्याहून नागपूरला आले. तेथे पांडुरंगने सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी वस्तूंचे दुकान काढले. १९०३ मध्ये इंग्लंडच्या युवराजांच्या राज्याभिषेकानिमित्त वाटलेली मिठाई पांडुरंगने फेकून दिली. शाळेतून मग निलंबित करण्यात आले. त्यातच प्लेगमुळे शाळा बंद झाल्या. प्लेगमुळे इंग्रजांचे अत्याचार वाढले, लोकांचे अतोनात हाल होत होते. यामुळे पांडुरंगचा इंग्रजांबद्दलचा राग वाढला. शाळा सुरू होताच वंदे मातरम् म्हटल्याने त्यांना पुन्हा शाळेतून काढून टाकले.
लग्न झाल्यानंतर पांडुरंग सुधारेल म्हणून वडिलांनी लग्न करण्याचा ठरवले. पण, पांडुरंग यांनी ठाम विरोध केला. दुसऱ्या प्रयत्नावेळी वडिलांशी भांडून ते घराबाहेर पडले. सशस्त्र क्रांतीसाठी विविध पर्याय तपासले. अद्ययावत स्फोटकांचे ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत झाले.
त्यांनी भारत सोडला. जपानमार्गे ते अमेरिकेला गेले. प्रवासात प्रत्येक थांब्यावर ब्रिटीश साम्राज्यवादाला विरोध करणाऱ्या नेत्यांशी ते चर्चा करत. चीन आणि जपानी सेनाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. अमेरिकेत बर्कली येथे ते मित्रासह राहू लागले. हॉटेलमध्ये भांडी घासण्यासह सर्व कामे केली. अर्थार्जन करत करत स्फोटकांचे प्रशिक्षण कसे घेता येईल, याचा शोध ते घेत होते. शेवटी कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्यानंतर लष्करी महाविद्यालयातही प्रवेश मिळाला. दोन्ही पदव्या एकदमच मिळवल्या. मात्र, अमेरिकेत ब्रिटिश गुप्तहेर शोधत होते. म्हणून ते मेक्सिकोला गेले. तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. दुष्काळी भागात शेती कशी करावी, यावर अभ्यास केला. इंग्रजाविरूद्ध युवकांना प्रेरित करणाऱ्या ‘गदर’च्या मराठी आवृत्तीचे ते संपादक झाले. पशुपालन आणि दुग्धव्यवसायाचे सखोल ज्ञान घेतले. एमएस् ही कृषिशास्त्रातील पदवी घेत, यशस्वीपणे स्फोटकांची निर्मिती केली.
पहिले महायुद्ध सुरू होताच मेक्सिको सोडून ते इराणला गेले. मुस्लिम नाव धारण करत अनेक भू-भाग स्वतंत्र केले. मात्र ‘फोडा आणि राज्य करा,’ या न्यायाने काम करणाऱ्या इंग्रजांनी पाठोपाठ आपली सत्ता कायम केली. त्यांना दोनदा अटक झाली. मात्र त्यांनी सुटका करून घेतली आणि पुन्हा मेक्सिकोला गेले. पुढे प्रेरणादायी लेखन आणि कृषी संशोधनावर लक्ष केंद्रित केले. जमीन आणि पिके, जनुकशास्त्र या विषयावरील अभ्यासाने मेक्सिकोत आदराचे स्थान मिळवले. तेवोसिंतले या रानटी तणाचा मक्यासह संकर घडवून त्यांनी तेवोमका हा मक्याचा नवा वाण बनवला. या मक्याच्या रोपाला तीस-तीस कणसे लागत. मेक्सिकन सरकारने राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी एकूण अडीच हजार संकरित वनस्पती तयार केल्या. मका, गहू, रताळी, ताग, सोयाबीन या पिकांच्या वाणात आणि पीक पद्धतीत सुधारणा घडवून ‘हिंदू जादूगर’ अशी ओळख मेक्सिकन लोकांमध्ये निर्माण केली.
भारत स्वतंत्र झाल्यावर ते भारतात आले. मात्र, बोटीतून उतरताच त्यांना अटक झाली. कारण इंग्रजांच्या काळ्या यादीत त्यांचे नाव होते. पुढे त्यांची सुटका झाली. त्यांनी भारतीय कृषी धोरणाविषयी महत्त्वाचे अहवाल दिले. भारताच्या सीमेवरील बर्फाळ भागात शेती करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देण्याच्या प्रकल्पावर ते गेले. सीमेवर शेती केल्यास सीमांचे रक्षण होईल, असे त्यांचे म्हणणे होते. सरकारने ही बाब मानली नाही. त्यांची योग्य दखल घेतली गेली नाही. मातृभूमीच्या सेवेची संधी शोधणाऱ्या या संशोधकाचे १८ जानेवारी १९६७ रोजी निधन झाले.
Leave a Reply