रिया पब्लिकेशन्स कोल्हापूर यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी,1926 साली लिहीलेल्या,‘मराठी भाषेचे शुध्दीकरण’ या पुस्तकाच्या मे 2012 (2000 प्रती) आणि ऑगस्ट 2013 मध्ये (2000 प्रती) पुनर्मुद्रणाच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत.त्यातूनच पुढे दिलेली माहिती घेतली आहे.
1924 साली स्वातंत्र्यवीरांनी,भाषाशुध्दीचं आंदोलन सुरू केलं.तेव्हाच त्यांनी भाषाशुध्दि ही पुस्तिका लिहीली. या पुस्तिकेत अ ची बाराखडी तर वापरली आहेच, शिवाय अर्धा (लंगडा)र,अैवजी र् हे चिन्ह वापरलं आहे.
गीर्वाण,तुर्क,सर्वांची हे शब्द ..अर् धा, गीर् वाण, तुर् क, सर् वांची…असे लिहीले आहेत. (माझ्या संगणकावर हा र् नीट लिहीता आला नाही. प्रिंटवर हातानं दुरूस्ती करावी लागेल.).
सुरुवातीलाच भाषाशुध्दीची मूलतत्वं दिली आहेत.
>> गीर्वाण भाषेतील साराच्यासारा संस्कृत शब्दसंभार आणि संस्कृतनिष्ठ अशा तामिळ,तेलगू ते आसामी,काश्मिरी, गौड,भिल्ल बोलीपर्यंत ज्या आमच्या भाषाभगिनी आहेत,त्या सर्वातील मूळचे प्रांतिक शब्द हे सर्व आमच्या राष्ट्रभाषेच्या शब्दकोशाचे मूलधन,स्वकीय शब्दांचे भांडवल होय.
>> ह्या आपल्या राष्ट्रीय शब्दभांडारात ज्या वस्तूंचे,विचारांचे वाचक शब्द होते वा आहेत वा निर्मिता येतात,त्या अर्थाचे अुर्दु,अिंग्रजी प्रभृति परकीय शब्द वापरू नयेत.जर तसे परकीय शब्द,आपल्या पूर्वीच्या ढिलाअीमुळे आपल्यात घुसले असतील तर त्यांना हुडकून काढून टाकावे.अद्यतन विज्ञानाची परिभाषा,नवेनवे संस्कृत-प्राकृतोत्पन्न शब्द पाडून व्यक्तविली जावी.
>> परंतु ज्या परदेशीवस्तू अित्यादी आपल्याकडे नव्हत्या, त्यामुळे ज्यांना आपले स्वकीय जुने शब्द सापडत नाहीत आणि ज्यांना त्यांच्या परकीय शब्दांसारखे सुटसुटीत स्वकीय शब्द काढणे दुर्घट जाते असे परकीय शब्द मात्र आपल्या भाषेत जसेचे तसे घेण्यात प्रत्यवाय नसावा. जसे..बूट,कोट,जाकीट,गुलाब,जिलबी,बुमरँग,टेबल,टेनिस अित्यादि. तथापि अशा नव्या वस्तु आपल्याकडे येताच,त्यांना कोणी स्वकीय नावे देअून ती रुळवून दाखवील तर अुत्तमच.
>> त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही परकीय भाषेत जर अेखादी शैली वा प्रयोग वा मोड ही सरस वा चटकदार वाटली तर तीहि आत्मसात करण्यास आडकाठी नसावी.
या नंतरचा,सुमारे 110 पानांचा मजकूर म्हणजे विद्वत्ता,स्वाभिमान आणि मराठी भाषाप्रभुत्व यांचा लालित्यपूर्ण अविष्कार आहे.शेवटी सुमारे 20 पानांचा भाषाशुध्दि शब्दकोष दिला आहे. त्यात, मराठीत घुसलेल्या अिंग्रजी,अुर्दु वगैरे परभाषीय संज्ञांना समर्पक संस्कृतप्रचुर,सावरकरांनी घडविलेल्या,मराठी संज्ञा दिलेल्या आहेत.
मालक,मालकीण,जखम,जखमी,हवा,हवामान,हवापाणी,हवापालट,वकील,वकीली,फलटन,जाहीर,जाहीरसभा, मुर्दाबाद,झिंदाबाद,खाते,अंमलबजावणी,अरबीसमुद्र,अर्ज,अर्जदार,अगर,अजिबात,अक्कल,अिसम,अिमान,अिज्जत, अैपत,अैवज,अिशारा,अस्सल,अव्वल,अखेर,अिन्कार,अेरवी,अंदाज,अेकजिनसी,अुमेदवारी,अिमारत,अहवाल,अुर्फ,अिरादा,कमाल,काबीज,कदर,कुस्ती,कर्ज,कायम,कैदी,किंमत,कारकून,खलास,खबरदार,खून,खेरीज,खुद्द,खुषी, खरीप, खुलासा, गैरहजर, गरीब, गुलामी, गुन्हा, चैन, चेहरा, जमीन, जबर, जरूर, जुलूम, नशिब, नकाशा, नाअीलाज, पोषाख, फायदा, बिलकूल, बक्षीस, बरोबर, लायक, नालायक, रजा, राजी, वगैरे, वस्ताद, शाहीर, मंजूर…वगैरे अनेक शब्द, परकीय, परभाषी म्हणून दिले आहेत.
वीर सावरकरांनी,वरील परभाषिक शब्दांना,मराठी शब्द सुचविले आहेत.हवा (वायू वारा),हवापाणी (जलवायू वारापाणी) हवामान (वायूमान ऋतूमान), हुशार (तरतरीत चाणाक्ष चलाख प्रज्ञावान बुध्दीमान), साहेब (राव पंत), हजेरी(अुपस्थिती विद्यमानता),शिक्का (मुद्रा),वगैरे (अित्यादी),शिकारी (मृगयु पारधी),वसुली (अुगराणी)…..
— गजानन वामनाचार्य
गुरूवार २४ जानेवारी २०१९
Leave a Reply