मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगांव पासून तीन कि.मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथे एक लोखंडी कमान आहे त्या कमानीतून गेल्यावर या फाट्यापासून दीड ते दोन कि.मी. अंतरावर मुगवली गावाजवळच हे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. या गावातील एक शेतकरी नेहमीप्रमाणे नांगरणी करीत होता. एक दिवशी शेत नांगरत असताना एका दगडास नांगराचा फाळ लागला. ज्या ठिकाणी फाळ लागला त्या ठिकाणाहून रक्त येवू लागले. त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. झालेला प्रकार इतरांना सांगावा म्हणून तो शेतकरी गावात गेला आणि गावकऱ्यांना घडलेल-या गोष्टीची माहिती सांगितली. गांवकऱ्यांनी चर्चा करून एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा म्हणून गोरेगांव येथील एका तत्ञाने तेथे श्री गणेशाचे स्वयंभू स्थान असल्याचे सांगितले. हे ऐकून गावकऱ्यांनी त्या गणेशाच्या आजूबाजूची जागा स्वच्छ केली. तेव्हा सर्वांना श्री गजाननाचे दर्शन घडले. सर्व गावकऱ्यांनी यथासांग पूजा अर्चा केली व तेथे एक छोटेसे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. काही दिवसातच तेथे एक छोटेसे मंदिर उभारले गेले आज ३० वर्षानंतर तेथे एक भव्य मंदिर उभारण्याचे काम गावकऱ्यांनी हाती घेतले आहे.
हा श्री गजानन जागृत असल्याचे भाविक सांगतात. या गणेशाची मूर्ती जमिनीतून वर आलेल्या अवस्थेत आहे सुमारे दोन फूट लांबी व रूंदी असलेली गोलाकार पाषाणाची ही मुर्ती नैसर्गिक आहे. उभी सोंड, पोट आणि तेजस्वी आणि कृपाळू भावना प्रकट करणारे डोळे यामुळे मूर्ति फारच आकर्षक दिसते. हा गणेश सिंहासनाधिष्ट टेकून बसलेला, आणि पाय खाली सोडलेल्या अवस्थेत आहे.
१९८४ सालापासून गणपतीस महानेवेद्य दाखविण्याची प्रथा सुरू असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी माघी गणेश जयंतीला या ठीकाणी मोठी जत्रा भरते या जत्रेसाठी दूरदूरून भक्तगण फार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
नैवेद्याबद्दल विशेष सांगितले जाते की, या गणरायाचा नैवेद्य खास सोवळ्यात बनविण्यात येतो. एका केळीच्या मोठ्या पानात केलेला नैवेद्य व्यवस्थित वाढून ठेवला जातो. रात्री १२ वाजल्-यानंतर गुरुजी श्री गणेशाला भोजनासाठी मंत्राद्वारे आवाहन करतात. त्यानंतर गाभाऱ्याच्या खिडक्या दारे बंद केली जातात कांही वेळाने जेव्हा मंदिराचा दरवाजा उघडला जातो तेव्हा तो नैवेद्य विस्कटलेला असतो. त्यामुळे हा नैवेद्य श्री गणेशाने ग्रहण केला असा विश्वास भक्तगणांत निर्माण होतो हे दृष्य पाहण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
मुंबई पुण्याच्या जनतेला हे स्थान फारसे परिचित नाही. तरी सुध्दा मुद्दाम वाट वळवून या मंदिराला भेट देण्यासाठी नक्की जाव अस हे एक उत्तम स्थळ आहे. गावापासून दूर मोकळ्या जागेत शांत वातावरणात असलेले हे मंदिर पाहण्यास विसरु नका.
विद्याधर ठाणेकर
रामप्रहर ११ सप्टें. २००८
Leave a Reply