नवीन लेखन...

स्वयपाकिण कोठे मिळेल ? वेताळ कथा

नाना झिपऱ्या हेकटच. त्याने पुन्हा खांद्यावर प्रेत घेतले. आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. चार सहा पावले नसतील टाकून तोच नानाच्या नाकाला उंची डिओचा वास आला. लोगोलाग वेताळाने प्रेतात प्रवेश करून संभाषण चालू केले.

“बँकेच्या कर्जांवरी व्याजा प्रमाणे तुझा हेकटपणा वया बरोबर चक्रवाढ दराने वाढत चाललाय. तू स्वतः बरोबर मला पण त्रास देतोयस. माझे काय जातंय म्हणा? मला मस्त फ्री राईड मिळतीयय. शिवाय फक्त ऐकून घेणार हक्कच ‘माणूस’ पण मिळतंय! असो . मघाशी मी येताना तु नाक मुरडल्याच माझ्या लक्षात आलंय ! तो काल लावलेल्या डिओचा वास आहे. डिओ का लावला? तू या प्रश्नात गुंतला असशील ! तर मग ऐक ‘कल कि बात’. ”

नाना वेताळाचा नमन मुकाट ऐकून घेत होता.

“त्याच काय झालं. काल मी एका तरुण हडळी बरोबर डेटिंगला गेलो होतो! मग काय ? मारले चार-दोन स्प्रे डिओचे! अहा, हाSSS,मस्त आमोशाच चांदणं पडलं होत! आम्ही दोघे हातात हात , म्हणजे खरं तर पंजात पंजे रे! ,घेऊन त्या वैरण माळावरल्या पिंपर्णीच्या ढोलीत ,बसलो होतो. निवांत एकांत लाभला असे वाटत असतानाच झाडावर काही तरी खुसपूस ऐकू आली. मी लक्ष्य एकाग्र करून ऐकू लागलो. त्याच झाडाच्या दक्षिण बाजूच्या टोकाच्या फांदीवर पिंगळा – पिंगळी बोलत होते.

“पिंगळे डार्लिंग , त्या गुलाबला नवीन स्वयंपाकीण मिळाली का ग ?”
“नाही ना ! अजून नाही. मला तर मेलीला त्याची खूप काळजी काळजी वाटतेय!”
“आता, काय करणार तू ?कारण तो तुझा गेल्या जन्मीचा भाऊ ना !”
“या झाडा खाली बसलेल्या वेताळाला पण त्या बिचाऱ्या गुलाबाची व्यथा माहित आहे. त्याने इतरांना सांगून गुलाबाचा प्रश्न सोडवलातर बरेच होईल. ”
“तर नानबा आज त्या सो कॉल्ड ‘गुलाब ‘ची कहाणी सांगतो. नीट कान देऊन ऐक . नितकोर चड्डीच्या जाणाऱ्या  येणाऱ्या पोरींन कडे डोळे फाडून पहात बसू नकोस! कारण त्यानंतर माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायचीत हे ध्यानात ठेव ! अरे नान्या आपल्या वयाचा तरी थोडा विचार करावा!”

या वेताळाला त्या फेसबुक मुळे ‘ उपदेश ‘ सिंड्रोमची बाधा झालेली दिसतीय! साल स्वतः डेटिंग वर जातो अन आम्हाला ‘वयाचा विचार करावा!’ म्हणून सल्ला देतो !

वेताळाने कथेस सुरवात केली.

एक आटपाट नगर होत. त्या नगरात गुलाब नावाचा तरुण रहात होता. या वयात त्या काळच्या रिवाजा प्रमाणे त्यानेही लग्न करण्याचा गाढवपणा केलाच! गुलाब आणि पाकळी (-पाकळी – हे हिरोईनचे नाव मस्त आहे ना! ) यांचे नुकतेच लग्न झाले होते. (ते  तरी काय करणार ?तेव्हा लिव्ह इन ची पद्धत नव्हती ना ! त्या काळी विम्याला आणि लग्नाला पारियायच  नव्हता ! असो. ) लग्न झाल्या मुळे ते सुखात होते. आनंदात पण होते. म्हणजे नवीन नवरा नवरी  असतात तेव्हडेच ! कारण एकावर एक फ्री या नियमाने लग्ना नंतर पाकळीची आई (या नंतर मात्र तिला फक्त ‘मम्मा’ म्हणायचं गडे ! अशी लाडिक धमकी पाकळीने गुलाबला पहिल्याच रात्रीची वाट न पहाता दिवसच देवून टाकली होती!) पाकळी सोबत लेकीचा संसार ‘नीट मार्गी ‘लावून देण्या साठी आली होती ! गुलाबच्या सुखातला फक्त हा स्पीड ब्रेकर होता.

पाकळी मुलगी , सुंदर  उपवर आणि तरुण असल्यामुळे बाकी गोष्टी गौण होत्या. म्हणजे शिक्षण, घरकाम वगैरे ! शिक्षण थोडं कमी असलं तरी तिला फॅशन,ब्युटीपार्लर्स , हॉटेल ,सिनेमा यातलं भन्नाट ‘ज्ञान’ होत. सहाजिकच ‘स्वयपाका ‘ सारख्या बी.पी.यल. कार्यानुभव असण्याची सुतराम शक्यता नव्हती. आणि समजा तिने इंटरेस्ट दाखवला असता तरी तिला कोण गाईड करणार ? मम्मा ?पण त्या बिचारीला तरी कोठे काय येत होते ? ती ‘किस्मत कि मारी’ हॉटेलीवरच अवलुंबून होती. आणि त्या साठीच तर पाकळीच्या पप्पानी चाळीस वर्ष नौकरी करून पाकळीच्या मम्मा साठी ‘पेन्शनची’सोय करून ठेवली आणि उपाशी मरून गेला ! पण म्म्माने काही मुद्पकखान्यात पाऊल टाकले नाही ! खरेच पूर्वीचे लोक करारीच होते ! अस्तु. पण पाकळीच्या ‘भूगोलात ‘ वेडावलेल्या गुलाबला हा इतिहास ठावूक नव्हता.

अश्या प्रकारे स्वर्ग सुखात रममाण असणाऱ्या गुलाब आणि पाकळीला भूतलावर उतरण्याचा  नको नको म्हणताना मुहूर्त लागलाच. त्या दिव्या क्षणाचे आपण आता साक्षीदार होवूयात.

त्या दिवशी थकून भागून म्हणजे, बॉसच्या ओंजळभर शिव्या खावून दमलेला गुलाब डोक्यात वैताग आणि पोटात भूक घेवून घरी परतला होता. बूट पायमोजे कोपऱ्यात भिरकावून त्याने पाकळीला आवाज दिला. पाकळीने तत्परतेने , विनयशीलपणे , सिनेमात्या आदर्श पत्नी प्रमाणे पाण्याचा ग्लास गुलाबच्या हाती दिला आणि ती खाली मान घालून लाजत उभी राहिली ((हो,- पायाच्या अंगठ्याने जमीन उकरीत होती – हे सांगायचे राहूनच गेलं बघा!)

“पाकळी डार्लिंग , जाम भूक लागलीय . काही तरी खायला करतेस का ?”
“हो का ? काय करू तुझ्या साठी माझ्या राजा ?”
“काहीही कर. पण एक सुचवू का ? बाहेर मस्त गार हवा सुटलीय. मधून मधून पावसाच्या सरी पडताहेत तेव्हा या ‘मोसम ‘ला कांदा भजी बहार आणतील ! तुला काय वाटते ?”
” भजी ? ईईई  नकॊरे बाबा! ते टी. व्ही. सीरिअल पुरत ठीक आहे. डॉक्टर डीप फ्राईड खाऊ नका म्हणून सांगताहेत. त्याने कोलेस्ट्रॉल वाढते.  तुला नसेल आत्ता नसेल पण तुमच्या कडे ‘हार्ट ‘ची हिस्ट्री आहे , हे विसरू नकोस. तेव्हडे भजी सोडून काय करू सांग?”
“मग काय करतेस?”
“काहीही.  तू म्हणशील ते !”
“अ , मग खिचडी कर . लोणचं, खिचडी -पापड मस्त बेत होईल !”
“काय रे ? कसलं खातोस? खिचडी! तुला माहित नसेल मागच्या रविवारी तुझी ती बहीण आली होती. तेव्हा मी करते खायला म्हणत होते. पण ऐकलं नाही ! सरळ किचन मध्ये घुसली , हंडा भर खिचडी केली!चार दिवस मी अन मम्मा खात होतो तेव्हा कुठे संपली! तिने सगळी मुगाची डाळ सपंवुन टाकलीय! तेव्हा सॉरी खिचडी नाही करता येणार रे ! तेव्हा ती खिचडी सोडून काय करू ?”
“मग नुसताच भात लाव . दुध भात खाईन. ”
“हे बघ गुलाब. तुझ वजन वाढतंय. पांढऱ्या वस्तू खाणे वजन वाढीस पोषक असतात. दूध अन भात नकोरे खावूस ! त्याने पोटाचा घेर पण वाढतो. शिवाय मला न बासमती शिवाय इतर तांदळाचा भात नाही लावता येत. अन आपल्या कडे तो बेचव इंद्रायणी का काय तांदूळ आहे. तेव्हा नको भाताचा हट्ट करुस !”
“मग काय करतेस ?”
” काहीही ! तू म्हणशील ते ! काय करू सांग?”
” पोहे कर . लवकर होतील. ”
” पोहे. हा ठीक आहे. आणि मी केले पण असते. ”
“म्हणजे घरात पोहे सम्पले  कि काय ?”
” नाही. आहेत. म्हणजे होते. त्याच काय झालं कि शेजारच्या सुमा काकूच्या मंगेशला पाहायला पाहुणे आले होते. त्या पोहे घेऊन गेल्या. तेव्हा व्हेरी व्हेरी सॉरी. ”
“भजी नको ,खिचडी नको , भात नको , पोहे सम्पले मग काय करतेस ?”
“तुझ्या साठी काय पण करीन ! तू फक्त सांग काय करू ?”
” माझी माय , ती ‘ दो मिनिट ‘वाली मॅगी तरी कर !माझ्या भुकेने जीव जातोय !”
“मॅगी !!! नो वे . त्यात शिसे असते! आणि ते विष माझ्या हाताने तुला खाऊ घालू ? जीव (कुणाचा ?)गेला तरी मॅगी करणार नाही !!”
“अरे देवा ! आग मग करणार तरी काय ?”
“तू म्हणशील ते !काय करू ?”
“काहीही करू नकोस !! मी बाहेर जाऊन काही तरी पोटात ढकलून येतो !” गुलाब पुरुषसुलभ रागावून म्हणाला.
“जस्ट. एकच मिनिट थांब!”पाकळी अजीजीने म्हणाली.
“काही करतेस काय ?”गुलाबने आशेने विचारले. शेवटी काय तर ‘उम्मीद पे दुनिया कायम है. ‘
“नाही रे !  मी पण येते !तशी मी तयारच आहे. फक्त साडी बदलून ड्रेस घालून येते . मग आपण निघूच! मला पण भूक लागलीच आहे!आपण त्या ‘मयुरी ‘त जाऊ यात. तेथे बर्गर मस्त मिळतो !”

अशा प्रकारे लेकीचा संसार ‘मार्गी ‘ लागल्याचे नुसते पाहून नव्हे तर सहभागी होऊन मम्मा सुखावल्या. पूर्वी सारखे गुलाबचे  डेबिट कार्डात भागेना. त्याची जागा आता क्रेडिट कार्डाने घेतली होती ! त्याच्या बोडख्यावरल्या कर्जात त्याने फुल ना फुलाची पाकळीची भरच पडत गेली. (अर्थात या फुलाची पाकळी गुलाबची होती !)

हॉटेलबाजीच्या धोक्याचा बिगुल गुलाबला ऐकू येऊ लागला. त्याने मोठ्या हिरीरीने स्वयंपाकाला बाई ठेवण्याचा प्रस्ताव मम्मा आणि पाकळी समोर ठेवला. अर्थात त्या माय लेकींनी तो हणून पडला. ‘मी नौकरी सोडून गावी शेती करीन!’ हि धमकी कामी आली. अनुभवी मम्माने आता फार ताणण्यात अर्थ नाही हे ताडले.

“अहो, जावाई बापू असे डोक्यात काय राख घालून घेताय? स्वयंपाकाचं काय मेल टेन्शन घेताय.  मी करीन हो. ”
गुलाब खुश झाला. बिन पैशाची सोया झाली होती!

मम्मा एक अफलातून कूक निघाली. लाखों मे एक ! पहिल्याच दिवशी तिने गुलाबला आवडते म्हणून पत्ता गोबीच्या भाजीला हात घातला. ती जुन्या वर्तमान पत्राच्या तुकड्याच्या लगद्या सारखी झाली होती. बहुदा हि बया गेल्या जन्मी रेल्वे कँटीन किंवा जेल मध्ये असिस्टंट कूक असावी!

शेवटी गुलाबने लोटांगण घालून त्या माय लेकिन कडून  एक ‘बाई ‘ मंजूर करून घेतली.

कांताबाईंनी अप्रतिम स्वादाच्या भाज्या,रेशमी चपात्या करायला सुरवात केली. गुलाबला स्वर्ग दोन बोट राहिला. मम्मा आणि पाकळी ,  तोंडावर तारीफ नाही केली तरी ‘ जेवण मस्त करते ‘ हे मान्य केले होते. सर्व सुरळीत झाल्याचा गुलाबला भास होत होता. आधन मधनं तो ‘कांताबाई उद्या रविवारचा गोळे भात करता का ?’अशी फर्माईश करू लागला.

गुलाबला जरी सर्व सुरळीत होतंय असे वाटत असले तरी मम्माला मात्र धोक्याची जाणीव झाली होती .   कांताबाई आल्या पासून नाही म्हटले तरी मम्माचे महत्व थोडे कमीच झाले होते. पाकळी पण गुलाब कडे ज्यास्तच लक्ष देत होती. कुछ तो करना पडेगा.

मम्माने सांगितले तेव्हा पाकळीच्या लक्षात आले कि गुलाब कांताबाईची नको तितकी तारीफ करतोय! शिवाय ती काळी-सावळी असली तरी तरतरीत आणि चमकदार डोळ्याची आहे. तिला काळजीत टाकून मम्माने ‘तू नको काळजी करू! मी बघते !’असे अभय दिले तेव्हा पाकळीने  पुन्हा फेसबुकात डोके खुपसले!

“कांताबाई ,भाजीत तेल जरा कमीच घालत जा .जावईबापूला तेल कमी करायला डॉक्टरांनी सांगितलंय.”
भाजीतले तेल टप्या टप्याने कमी होत गेले. शेवटी शेवटी तर मम्माने फक्त तेलात बुडवलेला चमचाच भाजी साठी कांताबाईला देऊ लागली!

“कांताबाई , मम्माला अल्सरचा त्रास होतोय तिखट नकान टाकू भाजीत!”इति पाकळी.
भाजीतलं तिखट बंद झालं.
“कांताबाई, मीठ कमीच टाका वरणात . पाकळीच बी. पी. वाढलं होत कालच्या चेकप मध्ये.
मिठ पण नो एन्ट्रीत अडकल !
अश्या प्रकारे भाजी वरणाचा चुथडा होवू लागला. कांताबाईच्या भाज्या मम्माच्या भाज्यांच्या चवीच्या पंगतीला आल्या,तेव्हाच दोघी मायलेकी संतोष पावल्या!
“पाकळी डार्लिंग , कांताबाई सुटीवर आहे का ?”
चार दिवस बेचव खाऊन झाल्यावर गुलाबने पूछा केली.
“नाही! का ?” आश्चर्य चकित झाल्याच्या या पाकळीच्या अभिनयाला दादासाहेब फाळके पुरस्कार कमीच होता !
“सुरवातीस छान भाज्या करायची पण या चार दिवसा पासून पांचट होताहेत! म्हणून विचारलं . ”
” अरे या कामवाल्या बाया अशाच असतात. पहिले दोन चार दिवस चांगलं करतात! पुन्हा आपलं नेहमीचंच! तरी मी म्हणाले तिला ‘ अहो कांताबाई ,थोडे लक्ष द्या भाज्यांकडे खूपच मचूळ होताहेत!’ तर तोऱ्यात म्हणते कशी, ‘ गुलाबरावांना आवडतो माझा स्वयंपाक ! तुमीच उगा नाव ठेवता. अन मला असच येत करायला ! जमत असलं तर बघा ! नायतर मैन्हा टाका आणि दुसरी बगा !’ यावर मी काय बोलणार?तुझी ती लाडकी ना ? आता तूच ठराव! आणि हो तूच तिला सांग ‘बाई आता नको येऊ’
गुलाबच्या डोक्यात आग फ्रेश भडकलेली असताना कांताबाई आली.
“कांताबाई, हे तुमचा  महिन्याचा हिशोब! नका येवू उद्या पासून!” पैसे टेबलावर ठेवून गुलाब झटक्यात घरात निघून गेला.
कांताबाईंनी शांतपणे पैसे घेतले . एक थंडगार नजरेने मम्मा आणि पाकळी कडे पहिले. ‘ मला सगळं कळलंय ‘ हे तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होते.
“भरल्या ताटावरून उपाशी माणसाला तुम्ही उठवल्याचा जाब तुम्हासनी देवाला द्यावा लागन !”इतके म्हणून ती निघून गेली.

त्या रात्री धुरकट – याला मम्मा स्मोकी म्हणते -डिनर करून उपाशी पोटी गुलाब बेड वर तळमळत होता. त्याचा डोक्यात एकच भुंगा मेंदूचा भुगा करत होता.
‘दुसरी स्वयंपाकीण कुठे मिळेल?’
“तर नानबा , आहे कारे तुझ्या पाहण्यात एखादी स्वयंपाकीणबाई त्या गुलाब साठी ?”वेताळाने विचारले.
” नाही ना वेताळा ! अरे मी पण शोधात आहेच ! साल माझ्या घरी  पण स्वयंपाकीण टिकतच नाही !”
गोष्टीच्या ओघात गुंतलेल्या नानाला मौनाचे लक्षात राहिले नाही !
“नान्या तू मौन मोडलंस ! मी निघालो ! पण दोन मिनिट थांब. ती तेरा शून्य तीन ए सी कार येतीय. तिच्यातच जावं म्हणतोय! आज जाम कंटाळा आलाय!”

तेव्हड्यात ती टॅक्सी आली वेताळ निवांत ड्रॉयव्हर शेजारी बसून निघून गेला.
हल्ली वेताळ आळशी झालाय असे झिपऱ्याला वाटत होते. पण वेताळाला ‘ऐष ‘करायची सवय जडली आहे अशी त्याला शंका येत होती!  आजच्या कथेबद्दल नाना झिपऱ्याने वेताळाला थँक्स म्हटले. कारण त्याने ‘स्वयंपाकीण का टिकत नाही ‘या साठी क्लू दिला होता !

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..