अजुनही एकांतात
कधी तिला आठवते
कोवळ्या त्या मनाचे
सुंदर गोड स्वप्न ते…
त्याला पाहुन
तिचं मन झुरलं होतं
कळलं नव्हतं तिला
पण ह्रुदय हरवलं होतं
बसल्या बसल्या बोटानं
वहीत रेषा ओढत होती
स्वतःच्या नावापुढे
त्याच नाव जोडत होती
झुरलेल मन तिचं
शब्द शोधत होतं
भावनां व्यक्त करण्यास
बळ शोधत होतं
ओठांवरच्या शब्दांना
कंठ नाहीच फूटला
हळुहळू मोगऱ्याचा
तो बहरही ओसरला
अल्पायुषी भावना ती
अशी न झुरता मेली
रेंगाळलेल्या पावलांनी
बोहल्यावर ती चढली
दूर राहिलेल्या वाटेसाठी
मन नाही अडखळलं
वास्तवाच्या हिरवळीवर
अगदी आनंदान रमलं…
अजूनही एकांतात
कधी तिला आठवते
पडलेले गोड स्वप्न ते
हसुन झटकून टाकते.
– डॉ.सुभाष कटकदौंड