सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला. मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.
” हे परमेश्वरा काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ? ” बघ किती माणसे दगावलीत, त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष? तू तर ह्या जगाचा कर्ता करविता. ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.”
अचानक प्रकाशाचे तेज वाढल्याचे जाणवले. समोर काही तरी हालचाल जाणवली. आणि शब्द ऐकू येऊ लागले. मी एकाग्रतेने ऐकू लागलो.
” मीच ह्या सर्व विश्वाचा निर्माता. नदी नाले तलाव डोंगर वृक्ष वेली विविध वन्य प्राणी, आणि मानव. सर्वानीच आनंदाने जगावे ही योजना. माणसाला विचार करण्याची झेप बऱ्याच वरच्या दर्ज्याची दिली गेली. हेतू हा कि त्याने माझ्या निर्मितीला सहकार्य करावे. साह्य करावे. परंतु तो स्वार्थी वा अहंकारी बनत चालला. हे सारे जग त्याचाचसाठी असल्याचा त्याने गृह करून घेतला. सर्व नैसर्गिक योजनांना त्याने खीळ घालण्यास सुरवात केली. झाडे झुडपे, वृक्षलता, जीवप्राणी, ह्यांची बेसुमार कत्तल चालविली, हवा पाणी अन्न ह्यांचे संतुलन बिघडून टाकण्याचा सपाटा चालविला. पर्यावरण खलास होऊ पाहत आहे. एक जीव निर्माण केला गेला. त्यात कांही गुणधर्म दिले गेले. ते त्याच्या रक्त मास पेशीत घातले. त्यातून तसेच पुनर्निर्मिती करण्याची योजना दिली. परंतु ह्या सरळ साध्या मार्गाची वाट चालण्या ऐवजी मानवाने दिलेल्या ज्ञानाचा अहंकारी दुरुपयोग सुरु केला. त्याच रक्त मास पेशी यांच्या गुणधर्माचा गैर उपयोग करून, संमिश्र करून एक नवीन रक्त पेशी वा मास निर्माण करण्याचे दु:साहस केले. कोणत्याही पेशीचे एकत्रीकरण करून वेगळ्याच जीवाची निर्मिती केली. सर्वात जो सूक्ष्म विषाणू निर्मिला होता, त्याचे म्यूटेषण होत होत त्यापासून विविध विषाणूची निर्मिती होत गेली. ह्याच दुर्देवी मानवी दु:साहसात आणि त्याच्या निरनिराळ्या रासायनिक प्रयोगात स्वाईन फ्लूच्या विषाणूची निर्मिती झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तोच आता फोफावत आहे. ” – – –
“ मी एकदाच भस्मासुराला निर्माण केले होते, त्याची खंत आजही वाटते. पुन्हा तो तसा निर्माण झाला नाही. परंतु हा स्वार्थी अहंकारी मानव तर आपल्याच दुष्ट प्रवृतीने अनेक भस्मासुर निर्माण करीत आहे. जे ह्या माझ्या सुंदर निर्मित जगाचा नाश करतील. ह्याला मी पायबंध घालण्यास असमर्थ आहे. कारण जे मी ज्या नियमाच्या आधारे निर्मिले, त्यात बदल मुळीच केला जाणार नाही. पुढे काय होणार हे फक्त तो मानवच जाणे. “
अत्यंत निराश मानाने मी हे शब्द ऐकत होतो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply