आनुवंशिकतेशी संबंध असलेला दुसरा कर्करोग म्हणजे डोळ्याचा कॅन्सर. डोळ्यातील नेत्रगोलाच्या मागे प्रकाशाची संवेदना जाणणारा एक पटल असते. यास रेटिना असे म्हणतात.
या पटलाच्या उतीतील पेशीत होणाऱ्या कर्करोगास रेटिनोब्लास्टोमा असे म्हणतात. ज्या मुलांना रेडिनोब्लास्टोमा किंवा आरबी जनुक आनुवंशिकतेने प्राप्त होतो त्यांच्या दोन्ही डोळ्यांना कर्करोग होतो. ‘श्वास’ या चित्रपटात या रोगाचे हृदयस्पर्शी चित्रीकरण बघायला मिळते. एका कुटुंबातील काही जवळच्या नातेवाईकांना मोठ्या आतड्याचा कर्करोग आनुवंशिकतेने दान केलेल्या दूषित किंवा बदल झालेल्या उतपरिवर्तित जनुकांमुळे होतो. कर्करोगात दोन प्रकारचे जनुकीय वारसे कार्यान्वित असतात. एका प्रकारात आतड्याचा कर्करोग होण्याआधी एपीसी या नावाच्या उतपरिवर्तित जनुकामुळे मोठ्या आतड्यात पेशींचे पुंजके तयार होऊन संपूर्ण उती हजारो अर्बुदांनी भरून जाते.
कालांतराने यातील एखाद्या अर्बुदाचे रुपांतर मोठ्या आकाराच्या अॅडिनोमा नावाच्या सौम्य गाठीत होते. यातील पेशीत अगदी वेगळ्या जनुकात उतपरिवर्तन झाल्यानंतर ॲडिनोमाचे रुपांतर रौद्र कर्करोगात किंवा कॅन्सरमध्ये होते. दुसऱ्या प्रकारच्या आतड्याच्या कर्करोगाचा संबंध डीएनएमधील रचना दोष दुरुस्त करणाऱ्या जनुकातील बदलाशी असतो. असा दोष जन्मतः आलेल्या व्यक्तींच्या आतड्यात अर्बुदे म्हणजे पॉलिप्स निर्माण होत नाहीत.
डीएनएतील बदल किंवा जनुकातील न्यूक्लिओटाइडच्या बेसमध्ये झालेली चूक दुरुस्त करण्याची पेशींची क्षमता क्षीण होते. त्यामुळे आणखी काही महत्त्वाच्या जनुकात उतपरिवर्तन
होते. अशा पेशींच्या वाढीवर असलेला जनुकीय बंध नाहिसा होतो व त्या व्यक्तीस आतड्याचा कर्करोग होतो. एखाद्या निरोगी पेशीत योगायोगाने सुरुवातीचे कर्करोगकारक उतपरिवर्तन झाल्यावर तिच्यापासून कर्करोगाची गाठ तयार होण्याच्या वाटचालीत त्या पेशीतील ५-७ जनुकात उतपरिवर्तन होणे आवश्यक असते; परंतु आनुवंशिकतेने मिळालेला एक जनुक कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढवितो.
-डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply