कर्करोग हा छुपा रोग आहे. त्याच्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाची गाठ तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. या अतिपूर्व स्थितीत माणसाला कोणताही त्रास जाणवत नाही; परंतु एक दिवस त्याला शारीरिक अडचण जाणवते व डॉक्टरांकडे जावे लागते. कर्करोगाच्या पूर्वस्थितीत कर्करोगांच्या पेशींची थोडीफार वाढ तयार झाल्यानंतरच हा रोग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.
त्यामुळे कर्करोग झाला आहे किंवा तो होण्याचा संभव आहे याचे निर्देशक असलेल्या लक्षणांचा विचार करणे आवश्यक आहे. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या कर्करोगांचे प्रमाण सर्वात अधिक आहे. तंबाखू खाणाऱ्या, तसेच विडी-सिगारेट ओढणाऱ्या मंडळींच्या मुखाच्या आतील ऊतीत किंवा ओठाच्या कडेला पांढरे चट्टे तयार होतात. या चट्ट्यांचे रुपांतर कर्करोगात होण्याचा दाट संभव असतो. तंबाखूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या चेहऱ्याचे व मुखाच्या आतील भागाचे आरशापुढे उभे राहून निरीक्षण केल्यास त्यांना कर्करोगाची पूर्वसूचना तर मिळेलच; पण कर्करोगाची गाठ गालाच्या आतील भाग किंवा जीभेवर असल्यास त्याचे निदान ते स्वतःच करू शकतील. धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो. या रोग्यामध्ये काहीजणांना औषधोपचारास दाद न देणारा खोकला येतो किंवा लहानशा श्रमाने थकवा येतो. या प्रकारचे बदल धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धोक्याचा कंदील दाखवत असतात. तंबाखू व तंबाखूच्या धुरात तीस ते चाळीस कर्करोगजन्य रसायने असतात. पान-तंबाखू, सुपारी खाणाऱ्या लोकांना गालाचा आतील भाग, जीभ, वरची टाळू, तसेच जिभेखालचा मऊ भाग, अन्ननलिका जठर इत्यादी ठिकाणी कर्करोग येतो. विडी-सिगारेट इत्यादींच्या व्यसनामुळे फुप्फुस, स्वरयंत्र, मूत्राशय, प्लिहा इत्यादी अवयवात कर्करोग होतो. आजकाल भारतात पान-मसाला व गुटखा हे व्यसन लावणारे पदार्थ लोकप्रिय झाले आहेत. पान-मसाल्याच्या सेवनाने यकृताच्या कार्यात बिघाड होतो व यकत, फुप्फुस, जठर इत्यादी अवयवात कर्करोग होतो, असे प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे.
गुटख्याच्या सेवनाने ओरल सबम्युकस फायब्रोसीस कर्करोगाची पूर्वपायरी असे समजल्या जाणाऱ्या मुखाचा रोग होतो. या रोगावर कोणतीही उपचारपद्धती आजतरी उपलब्ध नाही. भारतात दरवर्षी दहा लाख लोकांना नव्याने कर्करोग येतो. यातील चाळीस टक्क्यांहून अधिक रोगी तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाचे बळी पडतात. खाण्याचा तंबाखू, विडी-सिगारेट, दारु यांचे व्यसन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण हे निश्चित.
-डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply