नवीन लेखन...

तब्बुचे ‘ते’ तीन रोल

नव्वदच्या दशकाच्या शेवटी एक मस्त हॉलीवूडपट आला होता.
‘What Women Want?’ नावाचा.
पाहिलाय तुम्ही? हेलेन हंट…? मेल गिब्सन..?
अरे..नाही पाहिला?
नो प्रॉब्लेम..!!
केदार शिंदेंचा ‘अगबाई अरेच्चा’ पाहिलाय ना? हां…येस्स..
तर, अगबाई अरेच्चा आणि What Women Want एकाच थिमवर होते. अर्थात कथा आणि ट्रिटमेंट पूर्ण वेगळी होती.
दोन्हीत एकच विषय हाताळला होता..
‘बायकांना आयुष्यात नक्की काय हवं असतं…
आणि ते जर एखाद्या पुरुषाला कळू लागलं तर…?
त्याला बायकांचे विचार ऐकूच येउ लागले तर…?’

ह्या चित्रपटाचा उल्लेख इथे एवढ्यासाठीच की महिला दिना निमीत्त ‘ओ वुमनिया’ साठी काय लिहावे असे विचार करताना मला हाच विचार मनात आला. स्त्रिया कधी कधी एका विशीष्ट unpredictable पद्धतीने वागतात ते का वागतात? स्त्रीयांच्या अंतरमनाचा एका uncommon पद्धतीने वेध घेणारे अलिकडे बनलेले सिनेमे कोणते? त्यावर जसा विचार करु लागलो तसे मला जाणवले ‘अरे…फार दूर जायची गरज नाहीये..’
एकाच अभिनेत्रीने साकारलेल्या तीन भूमिकांमधे मला हा समान धागा सापडला.
ती अभिनेत्री म्हणजे तब्बु..!!

अगदी खरं सांगायचं तर तब्बु माझी फेवरेट हिरोईन वगैरे नाहीये.
पण या तीन सिनेमातल्या तिच्या भूमिकांचा मी मोठा चाहता आहे.
ते का हेच मी या तीन सिनेमांच्या अनुषंगाने मांडणार आहे.
चला तर त्या तीन भूमिका कोणत्या ते पाहूत.

टेक १. मकबूल:

निम्मी..

मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज करणाऱ्या म्हाताऱ्या जहांगीर खान उर्फ अब्बाजीच्या मनावर राज करणारी त्याची रखेल, निम्मी.
जहांगिरच्या मुलासारखा असणाऱ्या,त्याच्याकडेच वाढलेल्या मकबुल मियांच्या, प्रेमात बुडालेली निम्मी..
जहांगिरने आपल्याला घरातच आसरा दिलाय पण आपल्याला बिवी चा दर्जा दिला नाही म्हणून मनोमन तडफडणारी निम्मी..
जहांगिरला उद्या आपल्यापेक्षा चांगली स्त्री मनात भरली तर तो आपल्याला खड्यासरशी दूर सारेल हे जाणून असलेली निम्मी.
निम्मीला हे असे आयुष्य नकोय. तिला आपला मान हवाय…
तिला सत्ता हवीय..निर्णय घेण्याची ताकत हवीय.
तिच्या प्रेमात असलेल्या मकबूलला मग ती आपला मोहरा बनवते.
आधी आडून आडून आणि मग उघडपणे मकबूलची महत्वाकांक्षेला हवा देत अब्बाजी विरुद्ध जायला कचरणाऱ्या मकबूलला अब्बाजीलाच संपवून टाकायला तयार करते.

मकबूल अब्बाजीला संपवतो व आपल्या सत्तेच्या विरुद्ध जाउ शकणाऱ्या इतर सहकाऱ्यांचा काटा काढतो. मकबूल आता अंडरवर्लडचा बादशाह होतो.
पण शेवटी निम्मीने केलेल्या कर्माची टोचणी तिला निट जगू देत नाही. पोटात वाढणारे बाळ मकबूलचे की अब्बाजीचे या प्रश्नाने तिची तगमग होत राहते. आपल्याच शय्येला, दग्याने, अब्बाजीची मृत्युशय्या करताना चेहऱ्यावर उडालेले रक्त तिला उठता बसता दिसू लागते. तिच्या बाळाच्या जन्मानंतरही अब्बाजीचे काल्पनिक भूत तिची पाठ सोडत नाही. इकडे ज्या मकबूलला आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी तिने सग्या सोयऱ्यांशी दुश्मनी घ्यायला लावली ते लोक एकत्र येतात आणि मकबूलचा डाव उधळून लावतात. शेवटी निम्मीच मकबूलच्या विनाशास कारण ठरते.

का केलं तिने असे…? काय मिळाले तिला हे करुन ?
हे असे प्रश्न शेवटी अनुत्तरीत राहतात.
खरे तर मकबूल हा शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ वर आधारीत सिनेमा.
इंग्रजी साहित्य विश्वात ‘लेडी मॅकबेथ’ हे पात्र प्रचंड महत्वाकांक्षी स्त्रीचे प्रारुप समजले जाते. इथे निम्मी ही ‘लेडी मॅकबेथ’ म्हणून आपल्यासमोर येते..पण दिग्दर्शक विशाल भारद्वाजने एका भारतीय स्त्रीचे प्रेम,समर्पण, अभिमान, व्देष, पश्चाताप हे सर्व रंग
निम्मीमधे इतक्या सुंदरपणे मिसळलेत की निम्मी ही भारतीय सिनेमामधल्या काही सर्वोत्तम व्यक्तीरेखांमधे गणली जावी अशी झाली आहे. तिला समजून घेणे अशक्य नाही पण अवघड नक्कीच.. काय बरोबर ना?

टेक २. दृष्यम

आय.जी. मीरा देशमुख

मीराचे व्यक्तीमत्व हे दुभागलेले आहे..
एकीकडे ती एका राज्याची पोलीस प्रमुख..
दुसरीकडे एका वयात येणाऱ्या मुलाची हळवी आई..
एकुलता एक मुलगा..आईबापाने लाडाने वाढवलेला..
त्यामुळेच वहावलेला हा तीचा मुलगा..
काही चुकीचे काम करतो..व त्यामुळे मारला जातो..
पण पूर्ण पोलीस यंत्रणा वापरुनही तो सापडत नाही..
एका कालावधीनंतर तो कायमचा गेलाय ही भावना बळावते..
मीरा एक कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी असली तरी एक आईही आहेच ना..
मुलगा कायमचा हरवलाय हे कळल्यावर ती उन्मळून पडते..
पण मग ज्यांनी तो हिरावून घेतलाय असा संशय आहे त्या कुटुंबाच्या ती पाठीमागे लागते…
जंग जंग पछाडते…साम दाम दंड भेद सर्व वापरते..
उद्देश हाच..की खूनी सापडायला हवा आणि मुलाचे प्रेत मिळायला हवे. त्या कुटुंबाला गुन्हा कबूल करयला लावण्यासाठी ती त्यांच्यावर टोकाची, अगदी अतिरेकी जबरदस्ती करते. त्या कुटूंबावर आत्यंतिक दबाव टाकताना मीरा त्या कुटुंबातल्या त्या दोन लहान मुलींनाही सोडत नाही.

मीरा..एक आई..जी आपल्या मुलासाठी व्याकुळ आहे..पण तरीही त्याच्याच वयाच्या मुलीवर ती स्वतः हात उगारते..मारझोड करते. कोवळ्या वयाच्या मुलीला आपला सहकारी लाथ मारायला जातो तरी ती आडवत नाही…

हे असे कसे शक्य आहे..? मीरा इतकी निष्ठुर, निर्दयी कशी वागू शकते? आपल्या पोलीसी खाक्या आणि एक सहृदयी आई यांची गल्लत कशी होउ देते? असे प्रश्न पडतात.

दृश्यमच्या पहिल्या भागाच्या शेवटी हरुन, थकून, पार कोलमडून गेलेली हिच मीरा आता दुसऱ्या भागात पुन्हा नागिनी प्रमाणे चवताळून त्याच कुटूंबाच्या पुन्हा मागे लागते.

एक स्त्री म्हणून बदलत जाणारी मीराची ही रुपे खरे की हा एक आभास, एक दृष्यम..? की शेवटी एक सिनेमॅटीक इलेमेंट फक्त?
नाही..मीरा देशमुखला समजून घेणंही इतक सोप नाहीये..
मला तरी असं वाटतं…
आणि तुम्हाला..?

टेक ३- अंधाधुन

सिमी सिन्हा

खरे तर सिमीच्या आयुष्यात इतके मोठे वादळ यायची गरजच नव्हती. पण ते येतं..आणि तिच्या आयुष्याची ऐशी की तैशी होते.
“त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम, देवौ ना जानाति कुतो मनुष्यः”
असे संस्कृत श्लोक खूप प्रचलीत आहे. (याचा अर्थ स्त्रीला समजून घेणं..तिचे चरित्र समजून घेणं हे मनुष्य तर सोडा, देवांनाही शक्य नाही)
आता हे कोणी generalize करायला गेले तर सर्व स्त्री वर्ग त्याला थोडेच सोडेल..? चांगलं फोडून काढेल ना. पण सिमीच्या कॅरॅक्टरला हा श्लोक अगदी बरोबर समर्पक बसतो.

आणि पुन्हा फिरुन आपण लेखाच्या सुरवातीच्या प्रश्नावर येतो तो म्हणजे ‘What women want?’.
सिमी सिन्हाचे अंधाधुन मधले हे पात्र उलगडताना मला राहून राहून हाच प्रश्न पडतो..ती असे का वागली?
छान प्रेम करणारा पती…तोही पुर्वाश्रमीचा हँडसम फिल्म ॲ‍क्टर..
रहायाला सुंदर लोकॅलिटीतला आलिशान फ्लॅट..
हाय सोसायटीमधे उठबस..
ना मुलांचे झेंगाट मागे ..ना कसल्या liabilities..
एक सावत्र मुलगी..तिही दूर राहते..
असे सर्व असताना..
आपल्या पतीला फसवत ती आपल्या प्रेमीला घरी बोलवत असते..
आपल्या लग्नाच्या वाढदिवशी देखील ती व्यभिचारात गुंग असते..
अचानक घरी येउन तिला तिचा पती रंगेहाथ पकडतो..
आणि तिचा इन्स्पेक्टर प्रियकर तिच्या नवऱ्याला सरळ शुट करतो…
सामान्य भारतीय स्त्री अशा परिस्थितीत भेदरुन जाइल..
panic होईल..
पण सिमी अतिशय थंडपणे सर्व परिस्थिती सांभाळते..
इतक्या थंडपणे..की सिनेमा पाहताना आपण जागेवर फ्रीज होतो..

(तो प्रसंग आठवा जेंव्हा ती अंध आकाशच्या घरी येते तेंव्हा अचानक तो भितीदायक मास्क तोंडावर चढवते. छातीचा ठोकाच चुकला माझा तो प्रसंग पाहताना).

सिमी ज्या थंडपणे काही गोष्टी करते तो तिचा थंडपणा खरंच थिजवणारा आहे. ती पुढे आता काय करणार आहे हा विचार करुन आपल्याला एसी मधेही घाम फुटतो. तिच्या प्रत्येक नवीन मुव्हला आपण मनात दाद देतो. कारण शेवटी Antagonist ताकतवर असेल तर Protagonist चा विजय अधिक सुखावणारा असतो..नाही का?

खरे तर या तिन्ही भूमिकांमधे सर्वात जटील, complex भूमिका ही सिमीचीच असावी…सतत रंग बदलणारी..सतत सतर्क असणारी..शत्रुवर बाजी पलटवणारी.. तुम्हालाही ती तशी वाटते का?

तर अशी ह्या तब्बूच्या तीन भूमीका.
तीन पूर्णपणे वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका.
तितक्याच ताकतीने तब्बूने त्या निभावल्या आहेत.
इतक्या.. की आज त्या तीन भूमिकांमधे तुम्ही इतर कोणाचाच विचार करु शकत नाही..
म्हणून तर तब्बू माझी ‘आवडती अभिनेत्री’ आहे..
जरी ती माझी ‘फेवरेट हिरोइन’ नसली तरी..
दोन्हीत फरक आहे…
ओह वुमनिया..!!
पटतय ना..?

— सुनिल गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..