ललियाना घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक पं.विभव नागेशकर यांचा जन्म १९ एप्रिल १९५५ रोजी झाला.
भारतीय शास्त्रीय संगीतातील ललियाना घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक पं.विभव नागेशकर हे पंढरीनाथ नागेशकरांचे सुपुत्र होत. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून विभव नागेशकरांनी आपल्या वडिलांकडून म्हणजेच तालतपस्वी पंढरीनाथ नागेशकर यांच्याकडून तबल्याचे शास्त्रोक्त अध्ययन सुरु केले. अमीर हुसेन खाँ हे पंडित पंढरीनाथ नागेशकर यांचे गुरु होत. साहेबांची ख्याती पसरविण्याचे श्रेय नि:संशय पंढरीनाथ नागेशकरांना जाते. अजराडा, दिल्ली, पूरब, फरुखाबाद या चारही घराण्यांतील वादनशैलीचा पंढरीनाथ नागेशकरांनी अभ्यास केला असल्यामुळे, या वादनशैलीतील नेमकी सौंदर्यस्थळे टिपून त्यांनी आपली तबलावादनशैली समृद्ध केली होती.
१९८७ पासून विभव नागेशकर मुंबई विद्यापीठात तबला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. देशविदेशात त्यांनी विविध ठिकाणी प्रतिष्ठित संगीत संमेलनात आपल्या कलेचा अविष्कार दाखवला आहे. पंडित विभव नागेशकर हे प्रामुख्याने स्वतंत्र तबला वादन तसेच तबला साथसंगतीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षांपासून संपूर्ण भारतात तसेच जगभरात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी अनेक दौरे केले. पं.विभव नागेशकरांनी श्रीमती झरीन दारुवाला शर्मा, पं. डी. के. दातार, श्री.रोहिणी भाटे, पं. बुद्धादित्य मुखर्जी, पं. शिवकुमार शर्मा, पं.जसराज, पं. भिमसेन जोशी, पं.विश्वमोहन भट, प.हरीप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आणि संगीतक्षेत्रात श्रोत्यांच्या मनात नाव कमाविले. त्यांनी प्रतिष्ठीत अशा श्रीमती गिरीजाबाई केळकर समारोह (फोंडा, गोवा), केसरबाई केरकर महोत्सव (भोपाळ), उ.अल्लादिया खान स्मृती दिन समारोह(चेंबुर), पंडीत ओंकारनाथ फेस्टिवल (जामनगर), लक्ष्मीबाई जाधव समारोह (चेंबुर) स्वरानंद (दहीसर-मुंबई), पेशकर फाऊंडेशन (मुंबई),सप्तक (नाशीक) अनेक कार्यक्रमात तबला वादन केले आहे. १९७७ सालापासून पं. विभव नागेशकरांचे स्वतंत्र तबला वादनाचे निरनिराळे कार्यक्रम आकाशवाणी केंद्रामधून प्रसारित करण्यात येत आहेत. पं.विभव नागेशकरांना तालमणी व तसेच वल्हेमामा तबला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उस्ताद आमीर हुसेन खान यांच्या ललियाना घराण्याची परंपरा (दिल्ली, अजराडा, लखनऊ आणि फरुखाबाद या घराण्यांचा बाज) पुढे नेण्याचे त्यांचे कार्य अखंड चालू आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply