माझ्या आजोबांचं लग्न दोन वेळा झालं होतं. पहिली पत्नी प्लेगमध्ये गेल्यावर, गावातील व नात्यातीलच मुलीशी त्यांचं लग्न झालं. आजोबा पोलीस खात्यात होते. इंग्रजांच्या काळातील जमादार पदावर त्यांनी काम केले होते. गावोगावी प्रवासासाठी एक घोडी त्यांनी बाळगली होती. आमची आजी जुन्या पद्धतीप्रमाणे माजघरात असायची. कामाशिवाय बाहेर जाणं नसायचं.
कालांतराने आजोबा निवृत्त झाले व आजी जमादार झाली. मग तिचं नातेवाईकांकडे गावोगावी फिरणं सुरु झालं व आजोबा धार्मिक गोष्टीत रस घेऊ लागले.
माझ्या वडिलांचं लग्न लहान वयातच त्यांच्या आजोबांनी ठरवलं. पंचक्रोशीतीलच लांबच्या नात्यातील मुलगी, माझी आई झाली. वडील नोकरीच्या निमित्ताने शहरात होते व आई आजीच्या हाताखाली शेतीची कामे करीत होती. लग्नानंतर वीस वर्षांनी तिची सुटका होऊन ती पुण्यात आली.
तिसरी पिढी, म्हणजे आमची लग्न.. आमच्या काका, मामांनी ठरवली. त्यांच्या पुढाकाराने दोनाचे चार झाले.. लग्न नात्यांतील असल्यामुळे संसार सुरळीत झाला..
चौथी पिढीच्या लग्न प्रसंगी आई-वडीलांनाच स्थळं बघावी लागली. वधू-वर सूचक केंद्रात नोंदणी करुन फाईलींतून वधूचा शोध घ्यावा लागला. फोटो आणि बायोडाटांची देवाणघेवाण होऊ लागली. मुलीला पहायला गेल्यावर हमखास पोह्यांचीच डिश येऊ लागली. कित्येकदा फाॅर्ममध्ये भरलेली माहिती व प्रत्यक्षातील परिस्थिती यांचा मेळ बसेनासा झाला. अनावश्यक प्रश्नांना तोंड देताना लग्न व्यवस्थेबद्दल खंत वाटत होती.
आताची लग्नाची परिस्थिती फारच बिकट झालेली आहे. करीयर साठी लग्न उशीरा होऊ लागलीत. मुला-मुलींना निवडीचं स्वातंत्र्य हवं आहे. हायफाय रहाणीमानाच्या, अपेक्षा वाढलेल्या आहेत. तडजोडीची तयारी नाही. कौटुंबिक सुखाच्या संकल्पना बदललेल्या आहेत. पाच दिवसांचा आठवडा, दोन दिवसांची सुट्टी. आयटी मधील कामाची दिवसपाळी व रात्रपाळी. जेवणाच्या बदललेल्या वेळा, परिणामी पचनक्रिया बिघडणे. आॅनलाईन शाॅपिंगचं व्यसन. नको असलेल्या, चैनीच्या वस्तूंची माॅलमधून खरेदी. यामध्ये पिचून गेलेलं जीवन.. घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला की, आॅनलाईन मागवलेलं फास्ट फूड.. व्यायामाच्या अभावाने वाढलेलं वजन.. त्यासाठी युट्युबवर पाहून केलेले उपाय.. हे काही खरं नाही..
यापुढील पिढी लग्न न करता बरोबर रहाणाऱ्या विचारांची असेल.. कारण प्रत्येकाला आपली ‘स्पेस’ हवी.. हळूहळू आपण पाश्र्चात्यांचं अनुकरण कधी करु लागलो, हे कळलंच नाही…
सकाळी कामावर जाणाऱ्या पतीला खिडकीतून हात हलवून निरोप देणारी पत्नी, शाळेत मुलाला घेऊन जाणारी आई, संध्याकाळी पती कामावरुन आल्यावर त्याला चहाचा कप हातात देणारी पत्नी, रविवारी सकाळी सर्वांसाठी कांदेपोहे करणारी गृहिणी.. आता विस्मरणात जाऊ लागली आहे..
काळ बदलला, माणसंही बदलताहेत.. डिजिटल युग आलेलं आहे.. तरीदेखील पूर्वीचा नात्यांचा ओलावा आता राहिलेला नाही.. सगळं कसं ‘काॅंक्रीट’ सारखं कठीण झालंय… त्यावर जेवढे पावसाळे होतील, तेवढंच ते टणक होत जाईल..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-४-२२.
Leave a Reply