भूक लागलीय पण वडापाव नको, पैसे हवेत. कशासाठी ? मी पैसे देणार नाही हे तिनं ओळखलं असावं. हातातले पैसे परत थाळीत टाकून तिनं ते मोजायला सुरुवात केली. निघतोय असे बघितल्यावर खाली बघूनच म्हणाली, पैसा दिला नाय तर बा मारल.
ती समोर येऊन उभी राहिली. काचेचे टकमक डोळे, निर्विकार.
तशी बऱ्याच वेळा दिसते. दुपारी, संध्याकाळी, रात्री, सकाळची गर्दीत मात्र नसते. बरोबर नेहमी तीन-साडेतीन वर्षांचा लहानगा असतो. रडवेला. तिच्या चेहऱ्यावरची रेषाही हलत नाही.
हातात एक लहान थाळी, त्यात साईबाबांचा लहान फोटो, दोन फुलं, हळद- कुंकू वाहिलेलं, केसांच्या जटा, मागे खेचून बांधलेले केस, काळपट चेहरा, चार ठिकाणी ठिगळ लावलेला फ्रॉक . अनवाणी कळकट मळकट पाय. वय वर्ष पाच. थाळीतल्याच कुंकवाने मळवट भरलेला. वयाशी नातं जोडलेले निर्विकार डोळे.
लोकलमधल्या कुठल्याही डब्यात कितीही गर्दी असती तरी एका हातात साईबाबांची थाळी आणि दुसऱ्या हाता लहानग्याचं बखोट धरुन चढणार. उभ्या माणसांच्या गुढग्याभेवती उंची, गुढग्यापेक्षा कमी उंचीचा लहानगा पायापायातून रेटत आत शिरणार.
दोन बायकांच्या मध्ये उभी राहल्यावर मागे मागे राहणाऱ्या लहानग्याला बहुतेक धाकटा भाऊ असावा. मानेला धरुन पुढयात घेतला. चोरटया नजरेनं बसलेल्या सर्वांकडे बघूल घेतलं आणि जबरदस्तीन भावाची मान कडेवर बसलेल्या माणसाच्या पायावर आदळली. त्या माणसाने दचकून पाय मागे घेतले. कुठून तरी चिखलात लोळून आलेलं कुत्रं जवळ यायला लागल की, माणूस जसा आक्रसतो तसा तो त्या गर्दीतही आक्रसला. चेहऱ्यावर काय हा वैताग, असे भाव. तिन भीक मागताना शब्दही उच्चारलेला नसतो. बसलेला न बोलता हातानच तिला झिडकारतो.
पोरगं गांगरुन तसंच उभं. बळजबरीनं परत त्याला दुसऱ्याच्या पायावर आदळते. आदळताना साईबाबांची थाळी पुढे करते. त्यात पाच-दहा पैशाची नाणी पडलेली असतात.
ती निगरगट्ट बेरकी, छोटा भाऊ केविलवाणा. बघणाऱ्यांची सहानुभूती मिळवणारा.
थाळीत पाच दहा पैसे पडतात. ती त्याच डोक पायांवर आदळत राहते. कंटाळलेल पोरग नुसतं वाकण्याचे नाटक करत. ती सटकन एक चापट गालावर ठेवून देते. पोरगं आवाज न करता मुसमुसुन रडतं. गाडी कुठल्या तरी स्टेशनवर थांबलेली असतें. गर्दी थोडी हलते.
क्यू मारता है? कुणाला तरी त्याची कणव येते. इतक बारक पोरगं.
ती निगरट्ट. टकमक बघत राहते. मुलगा डोळे पुसत उभा. एकाकी हात खिशाकडे वळतात. थाळीत पैसे पडतात. ती काहीही न बोलता त्याला बखोटयाला धरुन डब्याच्या दुसऱ्या भागाकडे वळवते.
कधीतरी व्हीटीच्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर भावाला घेऊन बसलेली असते. नाहीतर मिळेल त्या गाडीने व्हीटी-ठाणे असा प्रवास. कार्यक्रम एकच.
ज्याला अजून बोलताही येत नसावं त्या मुलाला दिवसाून सात-आठ तास गाडीतून फिरवल्यावर त्याची हालत काय होणार? मार खाऊन खाऊन तोही निगरगट्ट होत असावा.
प्लॅटफॉर्मवर उतरलो, त्यावेळी रात्रीचे आठ वाजले असावेत. जिन्याच्या बाजूला खांबा शेजारी ते पोरग गाढ झोपल असावं. टकमक नजरेन ती हाताखाली चिल्लर मोजत होती. दिवसाची कमाई किती, खस्ता किती, टपल्या किती, तिरस्कार आणि पायपीट किती? दया आली.
हातातली चिल्लर. आपल्या लहानशा मुठीत गच्च झाकत डावा हात तिनं पुढे केला. साहेब चार-आठ आणे द्या. मी काहीच बोललो नाही. पोरगं उपाशी पोटीच झोपल असावं. तिच्या चेहऱ्यावर मात्र काहीच दिसत नव्हतं. बाजूचा चहाचा स्टॉल चालूच होता.
भूक लागली का?
होय, सक्काळपासनं काय खाल्ल नाय.
वडापावच नाव काढल्यावर ती उडया मारत येईल असं वाटलं, तर चेहऱ्यावरुन ती नाराज झाल्यासारखी वाटली.
नको घरी बा वाट बघतोय.
मला कळेना. भूक लागलीय पण वडापाव नको. पैसे हवेत. कशासाठी? मी पैसे देणार नाही हे तिन ओळखल असावं. हातातले पैसे परत थाळीत टाकून तिनं ते मोजयला सुरुवात केली. निघतोय असे बघितल्यावर खाली बघूनच म्हणाली, पैसा दिला नाय तर बा मारल.
मार खाऊन झोपलेलं पोरगं, कमी पैसे मिळाल्यानं मार खाण्याची तयारी करणारी. तिचा भावाला मारतानाचा क्रूरपणा कुठेतरी हरवलाय. मी खिळून उभा राहिलो. लोकल येत-जात राहिल्या.
——————————————————————————
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : 3 फेब्रुवारी 1994
Leave a Reply