नवीन लेखन...

तळापासून ढवळल्यानंतर

कोरोनोत्तर नाटक हे कोरोनावरची तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाचे असण्याचा धोका आहे. ग्लोबलायझेशननंतर व्हायरस, डिस्क, डिलीट डेटा असे शब्द आले की झाली पोस्टग्लोबलायझेशन कविता असे वाटून कितीतरी कविता प्रसवल्या गेल्या. आता मास्क, सोशल डिस्टंसींग, सॅनेटायझर लॉकडाऊन यांचा मुक्तपणे वापर म्हणजे कोरोनोत्तर कलाकृती असा समज करून दिला जाऊ शकतो.

अनघा दिवाळी अंक 2021’ मध्ये प्रकाशित झालेला अभिराम भडकमकर यांचा हा लेख.


कोरोनोत्तर मराठी नाटक कसं असेल यावर सध्या अनेकजण विचार करत आहेत. ते कसे असले पाहिजे यावरही मते मांडत आहेत. कोरोनाचे संकट अभूतपूर्व असेच होते. त्याच्याशी कसा सामना करायचा हेच जगाला कळत नव्हते. या काळात खूप उलथापालथ झाली. माणसाचा, मानवी नातेसंबंधाचा एक वेगळा चेहरा समोर आला. जगाबद्दलच्या आणि जगण्याबद्दलच्या धारणाच बदलून गेल्या. हे सगळं नवं होतं. हा अनुभव नवा होता. यासगळ्याचं प्रतिबिंब नाटकात उतरावं असं म्हटलं जाऊ लागलं आहे. येणारं नाटक हे सगळं घेऊन येणारं असेल किंवा त्यानं ते सगळं घेऊनच यावं असंही आग्रहानं म्हटलं जाईल.

कारण आपल्याकडे नाटकाचे व साहित्याचे प्रयोजन याबाबत खूप गोंधळाची स्थिती आहे. सृजनाच्या प्राढियेबाबतचा  बाळबोधपणा या मागे आहे. मागे एक समीक्षक नेहमी नव्या नाटकवाल्यांनी रोजचे वर्तमानपत्रं वाचायला हवं असं आग्रहानं मांडत. (ते एका वृत्तपत्रात कामाला होते हे त्यामागचं कारण असेल का?) तर, त्यांचं म्हणणं असे होते की रंगकर्मींना आपल्या सभोवतालचं भान असलं पाहिजे. त्यानंतर जे आसपास घडतंय ते नाटकात दिसलं  पाहिजे तरच ते समकालीन होईल असंही म्हणत. ते आवर्जून विचारत संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, कुठाय त्यावर नाटक? अमुक घटना घडली मराठीत त्यावर नाटक का नाही? मग आम्हाला वाटायचं काल जे घडलं ते नाटकात दिसायला नाटक म्हणजे वर्तमानपत्रं आहे का? मुळात ते नाटककाराचं काम आहे का? एक प्रकारे  मराठी  नाटकात सामाजिक बांधिलकी, समकालीन वास्तवाचं दर्शन, त्यावरची उत्तरं, नव्या घाटाचे व शैलीचे प्रयोग आणि आता नव्याने जोडले गेलेले कर्तव्य म्हणजे ‘भूमिका घ्या’… बिचाऱया मराठी नाटकावर आपण किती ओझी लादतोय याचा विचार तरी करावा की नाही?

मुळात गोंधळ इथे आहे. घटना घडली की केले त्याचे नाट्यरूपांतर हे आणि इतकेच नाटकाचे प्रयोजन असते का? मुळात  घडलेल्या घटनेचे पडसाद नाटकातून कसे उमटतील याचं नेमकं काही गणित असतं का? एका समीक्षक विदुषी बाईंनी “मुंबईत दंगल झाली आणि त्याचा स्वर शिवाजीमंदिरात उमटलादेखील नाही”, असे म्हटले होते. त्यांचं विधान हे अत्यंत तकलादू आहे असे मी त्यांना नम्रपणे सांगितले व ते सांगताना माझ्याच ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकाचे उदाहरण दिले. दंगली सुरू असताना मी दादरला एका चाळीत पेईंग गेस्ट म्हणून रहायचो. समोरच एक मठ होता. त्या निर्मनुष्य झालेल्या रस्त्यांकडे पहात मी बाल्कनीत उभा असे. वातावरणात एक दहशत, हतबलता आणि एकाकीपण! अनामिक भय! पण माझ्या लक्षात आलं की इतर दिवशी ओस पडलेलल्या त्या रस्त्यांवर गुरूवारी मात्र  वर्दळ असते. लोक मठात येतात. त्यावेळी ते भय ती हतबलता कुठे जाते? आणि मनात ज्याचा त्याचा प्रश्न सुरू झालं. परमेश्वराचं अस्तित्व ही काय चीज आहे? मग आस्तिकता नास्तिकता यावर मंथन सुरू झालं. ईश्वराचं अस्तित्व लहानपणापासून माणसाच्या मनात ठसवलं जातं, इतकं की ते पुढे जाऊन त्याच्या कुबड्या बनून रहातं का? जर ईश्वराचं भय नसेल तर? त्याचं मनातलं अस्तित्व नैतिकतेचे काही पेच निर्माण करतं का? वगैरे विचारांनी मी गुरफटला गेलो आणि त्यातून नाटक जन्माला आलं. आता जर मी म्हटलं की कोण म्हणतं दंगलीवर प्रतिक्रिया उमटली नाही? हे नाटक ही दंगलीचंच नाटक नाही का? ऐकणारे गोंधळले कारण पुन्हा आपल्याकडे सृजनाची प्राढिया अशी बाळबोध करून टाकली असते की घडलेल्या घटनेवरची सृजनात्मक प्रताढियासुध्दा आपल्याला ठराविक साच्यातच लागते. तो साचा, त्या ओळखीच्या खुणा त्या बाईंना नाटकात न दिसल्याने त्यांच्या पठडीबाज विचारांना ते झेपलंच नाही. कौंचपक्ष्याला बाण लागल्यावर रामायण निर्माण होतं या सृजनाचा खोलवर विचार केला तर हे लक्षात येईल.

बरं समकालीन असं म्हणताना लेखकाचा समकाल कुठला? लेखक एकाच काळात बध्द होवून लिहू शकतो का? त्याचं लिखाण एकाच काळाशी बांधून घेतलेलं राहिलं तर मग लिखाणाचं प्रयोजन इतकं मर्यादित असू शकतं का असं विचारावंस वाटतं.

लिखाणातले तपशील कदाचित आजचे असतील पण तो जे म्हणतोय त्याला काळाचं बंधन नसेल तरच ते साहित्य काळाच्या पलिकडे जाणारं ठरू शकेल. कानेटकर शिवाजी महाराजांची कथा सांगतात पण त्यात आपल्याला जनरेशन गॅप दिसते. दळवींच्या बॅरीस्टरमध्ये तर आज काळाच्या ओघात आणि समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे लुफ्त झालेला आलवण केशवपनाचा काळ आहे. पण त्यातली घुसमट आणि लैंगीक भुका किती सार्वकालीक असतात. मोहन राकेशांच्या कालिदासाचं द्वंद्व हे आजचंच नव्हे तर सर्जक मनाचं चिरकालाचंच द्वंद्व आहे. मग कलाकृतीला समकालात बांधू घालणाऱया या अपेक्षा नाट्यकलेचं नुकसान करणाऱयाच नाहीत का? याचं कारण मी वर म्हटल्याप्रमाणे एकाच कलाकृतीनं हे ही केलं पाहिजे, त्यात हेही  आणि तेही असलं पाहिजे अशा अपेक्षात आहे.

दुर्देवानं या अपेक्षा नाट्याबाह्य घटकांकडून लादल्या जातात. नाटकानं अमुकच केलं पाहिजे म्हणत असताना त्यांना नाट्यकला एक साधन म्हणून वापरायची असते. त्यामागचे प्रयोजन किंवा अजेंडे वेगळे असतात. पण विद्यापिठीय सेमिनार्स, अभ्यासवर्ग आणि सर्वप्रकारच्या मिडीयातून अशा अपेक्षांचा गदारोळ केला जातो. आणि नाटकवाल्यांकडूनच त्यांच्याही नकळत नाट्यबाह्य घटकांनी दिलेल्या मोजपट्टयां, निकषात आपलं नाटक बसवायचा प्रयत्न होवू लागतो.

एका एकांकिकास्पर्धेला मी, कुमार सोहोनी आणि किशोर प्रधान परीक्षक होतो. एक सस्पेन्स थ्रिलर सादर झाले. उत्तम होते. त्याला नंबर दिला गेला. मुलं चकीतच झाली. मी म्हटले, “अरे इतकं सुरेख नाटक केलंत तरी तुम्हाला आश्चर्य का वाटतंय?” मुलं म्हणाली, “पण नाटकात सामाजिक संदेश नव्हता नं!”

मोजपट्ट्या आणि निकष झिरपत जातात आणि सर्जनाच्या प्राढियेला खीळ घालतात ते असे. मग नाटकातली फार्सिकल, रहस्यमय, गूढगर्भ, ऐतिहासिक, संगीतीका अगदी अतीनाट्य (मेलोड्रामा) अशी एकेक दालनं ओस पडत जाताना दिसतात. आणि कलाकृती एकाच प्रयोजनानं वाकलेल्या एकरेषीय आणि एक उद्देशिय होवून बसतात. निसर्गात जशी वेगवेगळ्या रुपरंगाची फळाफुलांची बिंनरंगाचीही झाडे असतात तसं नाटकही असायला हवं. कारण प्रत्येक प्रकारचं नाटक माणसाची समजूत, आकलन वाढवणारंच असतं.

कोरोनोत्तर नाटकाबाबत मला भिती वाटतेय ती हीच. आता या कालाबद्दल आपण लिहायलाच हवं या जाणीवेनं लोक लिहायला बसतील. या घटनेवरच्या त्यांच्या तात्कालिक प्रतिक्रिया उमटू लागतील लॉकडाऊनमध्येच काही वेब सिरीजचे शूटींग करून झालेसुध्दा. तात्कालिकतेला मी कमी लेखत नाही. पण अशा आघातांनंतर त्याचे पडसाद अंतर्मनात उमटत रहातात. त्यासाठी काही काळ जातो. महायुध्दानंतरही त्याचे पडसाद कितीतरी वर्षांनीसुध्दा उमटत राहिले आणि ते अधिक सकस आणि प्रगल्भ होते. महाभारताचे पडसाद तर आजही उमटतात. जे माझ्यामते भारतीयांचे पहिले महायुध्द होते. जगासाठीचे पहिले व दुसरे आपल्यासाठी दुसरे तिसरे महायुध्द होते. आजही त्यानी मांडलेले नातेसंबंधांचे मानवी स्वभावाचे कोडे आपल्याला पुरून उरते आहे.

कोरोनोत्तर नाटक हे कोरोनावरची तात्कालिक प्रातिक्रिया स्वरूपाचे असण्याचा धोका आहे. ग्लोबलायझेशननंतर व्हायरस, डिस्क, डिलीट डेटा असे शब्द आले की झाली पोस्टग्लोबलायझेशन कविता असे वाटून कितीतरी कविता प्रसवल्या गेल्या. आता मास्क, सोशल डिस्टंसींग, सॅनेटायझर लॉकडाऊन यांचा मुक्तपणे वापर म्हणजे कोरोनोत्तर कलाकृती असा समज करून दिला जाऊ शकतो.

मला कोरोनाचा नाटकाला धोका वाटतोय तो हा! या विषयावर काहीच कसे आले नाही? म्हणजे मराठी नाटकवाले असंवेदनशील आहेत, समाजभानाचा अभाव वगैरे खूप काही म्हटले जाईल. नाहीतरी दुसऱयाची संवेदनशिलता तपासणारी थर्मामीटरे घेऊन फिरणाऱया डॉक्टरांची पैदास हल्ली वाढली आहेच. पण या ट्रपमध्ये न फसणं हे अगत्याचं ठरेल.

घडलेली घटना सुफ्त मनात कशी उतरेल, कशी गोंदली जाईल याचे कुठलेही सूत्र नाही. त्यामुळे कोरी पाटी घेऊन सर्व काही टिपून घेण्याची ज्याची त्याची प्राढिया अनेकदा त्याच्याही नकळत सुरूच असणार. त्याला कुठला घाट मिळतो, ती कुठली शैली घेऊन येते किंवा त्याच्या नजरेनं टिपलेलं कसं कुठून झिरपेल याचा नेम नाही. ते होणारच आहे.

कारण अशा आपत्ती मानवाला विस्मयचकित करुन टाकतात. अंतर्बाह्य हादरवून सोडतात. वादळानं उन्मळून पडावं तसं उन्मळून पडायला होतं. त्यातून दिसलेला मानवाचा चेहरा कधी भेसूर तर कधी आश्वासक. कधी श्वासागणिक पैसे वाजवून घेणारा डॉक्टरही दिसतो, तर कधी आपला बेड तरूणाला द्या म्हणत मृत्यूला कवटाळणारा सामान्यातला असामान्यही भेटतो. एकाचवेळी माणुसकीवर, मांगल्यावर विश्वास बसणाऱया घटनाही त्याला दिसतात आणि त्याच वेळी माणसातलं पशूत्वही दिसतं. या सगळ्या प्रवृत्ती त्याला बुचकळ्यात टाकतात. मग तिथे काळ हा दुय्यम ठरतो आणि प्रबळ होतो तो मानवी जीवनाचा, मनुष्य स्वभावाचा चिरंतन शोध!

येणारं नवं नाटक निश्चितच यासगळ्याचा अनुभव घेतलेल्या मनातनं प्रसवलेलं असणार आहे. पण त्यातून येणारं नाटक समजून घ्यायला आपल्याला आपल्या चौकटीबध्द अपेक्षा बाजूला सारून नव्या नजरेनं ते बघता आलं पाहिजे. नाटकाकडून आपण जे प्रयोजन अपेक्षितो त्यापल्याड गेलेलं ते असू शकतं. त्यामुळे नव्या नाटकाकडे जुन्या मोजपट्ट्या लावून पहाता येणार नाही.

कलावंताचा भवताल हा केवळ तपशीलापुरताच आजचा असतो पण त्याला भूत भविष्य वर्तमानाची बंधनं घालून चालत नाही. त्या अर्थानं समकालीन ही संकल्पना फक्त तपशिलातच असते. हे त्यांना मान्य नसतं जे आजच्या तपशीलालाच समकालीन समजून वावरतात. आणि आजच्या प्रश्नांची आपण दिलेली उत्तरं समाजमनावर बिंबवणे हेच नाटकाचं प्रयोजन असलं पाहीजे असं मानतात.

नाटक यापलिकडे जातं. तसं कोरोनोत्तर नाटकही जाणार आहे. त्यानं नव्यानं पाहिलेला माणसाचा मनोव्यापार मांडणार आहे. नव्या या थपडेनं भेलकांडलेल्या मनाला सावरत तो पुन्हा मांडणी करणार आहे.

व्यावसायिक रंगभूमीपासून महाविद्यालयीन स्पर्धा रंगभूमी, लोकरंगभूमी पर्यंत सर्वत्र हे होताना दिसेल. आपापल्या शैलीत किंवा यानिमित्ताने सापडलेले आशयाचे शैलीचे नवे घाट यातून ते दिसेल. फक्त एक अधिक एक दोन या तालावर  कुठे आहे कोरोनावर नाटक असा प्रश्न विचारू नका. कोरोना या शब्दाचा उल्लेखही नसेल पण या कालखंडानं  दिलेली जाण समज त्यात प्रकटलेली दिसेल. आजवरच्या धारणा, आस्था यांना कदाचित सुरूंग लागलेला असेल किंवा त्या नीट घासूनपुसून घेत नवी मांडणी दिसेल.

नव्या नाटकात हे सर्व दिसेल. फक्त काळ जाऊ द्या. या सगळ्याकडे बघायला, ढवळल्या पाण्यावरचे वरवरचे तरंग नीट  खाली  बसायला वेळ लागेलच. आणि शांत डोहासारख्या दिसणाऱया जलाशयात आत मात्र खळबळ सुरू असणार आहे.

विंगेत खूप काही होतंय…

नवं काही येणार आहे…

— अभिराम भडकमकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..