नवीन लेखन...

प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर

लावणीपासून बालगीत आणि गण-गवळणींपासून देशभक्ती, भक्तिगीतांपर्यंत गीतलेखनाचे सर्वांत जास्त प्रकार वापरून गेली पाच दशके मराठी गीतरसिकांना मोहित करणारे असामान्य प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर तथा मराठी चित्रसृष्टीचे ‘नाना’ यांचा जन्म हळदी, ता. करवीर येथे सामान्य कुटुंबात झाला. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील इंग्रजी राजवटीत १५ रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचे बाळकडू घरीच मिळाले. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने बारा बलुतेदारांची लोकप्रिय गीते ऐकल्याने ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतांतून अजरामर केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी १९४८ साली मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. ‘काशीला श्रावण बाळ निघाला…’, ‘आज मरूनीया जीव झाला मोकळा…’, ‘जग ही पैशाची किमया…’, ‘नको नको बनू आंधळा…’, ‘आमुचा जीवन प्याला….’, ‘जागा हो माणसा…’, ‘दिला मृगानं हुंदका…’ अशा असंख्य कविता त्यांनी रचल्या. त्यांच्या कवितांना इतका बहर होता की, ते दिवसाला १० ते ११ कविता लिहू लागले होते. १९५६ मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची संधी दिली. सांगली येथे सन १९६० साली ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याची संधी दिली. आयुष्यातील पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून अस्सल कोल्हापुरी नजराणाच खेबुडकर यांच्या लेखणीतून प्रकट झाला. ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या पहिल्याच लावणीच्या ठसक्याने मराठी गीतरसिकांना वेड लावले.

‘सामना’, ‘पिंजरा’, ‘साधी माणसं’ अशा सुमारे साडेतीनशे चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल अडीच हजारांवर गाणी लिहिली. यांत ‘तुम्हावर केली मर्जी मी बहाल’, ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ अशा एकाहून एक सरस लावण्यांबरोबर ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘मला हे दत्तगुरू दिसले’ यांसारखी भक्तिगीते, तर ‘राजा ललकारी अशी दे’, ‘ही कशानं धुंदी आली’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘बाई बाई… मनमोराचा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ अशा सर्वांगसुंदर गाण्यांचा समावेश आहे. अष्टविनायक चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ह्या त्यांच्या गाण्यामुळे सगळ्यांना ५ ते ७ मिनिटात त्यांनी अष्टविनायकाचे दर्शन घडवले. आजवर कोणत्याही मराठी गीतकाराने खेबुडकर यांच्याइतके काव्यप्रकार वापरले नाहीत. गण-गवळण, लावणी, भारुड, गोंधळ, सवाल-जवाब, बालगीत, प्रेमगीत, स्फूर्तिगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, मुक्तछंद, अभंग अशा मराठीत यच्चयावत काव्यप्रकारांत खेबुडकरांनी आपल्या शब्दसामर्थ्याने असामान्य गीते लिहिली. व्ही. शांताराम, पेंढारकर, दादा कोंडके, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके अशा दिग्गजांबरोबर जगदीश खेबुडकर यांनी जसे काम केले तसेच डॉ. अशोक पत्की, ‘पानिपत’कार विश्वाास पाटील, गायक रवींद्र साठे, संगीतकार अजय-अतुल यांनाही अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन केले.

कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटासाठी खेबुडकर यांनी गीतेही लिहिली होती. “शब्दरुप आले मुक्याला भावनांना, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, मला हे दत्तगुरू दिसले, कुण्या गावाचं आलं पाखरू, बुगडी माझी सांडली गं, विठ्ठल नामाची शाळा भरली, मोरया मोरया’ अशा ३५० मराठी चित्रपटांसाठी तब्बल २७५० लोकप्रिय गीते लिहिणाऱ्या मा.जगदीश खेबूडकर यांनी अगदी बालगीत ते प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, देशभक्तिपर गीते, गणगौळण, गौरीगीते, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीते, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबाऱ्याचे गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत असा एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य गाणी त्यांनी लिहिली होती. पंचवीस वर्षापूर्वी स्वत:ची नाट्यसंस्था निर्माण करुन “गावरान मेवा, जिवाची मुंबई, रंगा डायव्हर, राम दर्शन’ या कलाकृतींचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केली होती. मा.जगदीश खेबूडकर यांना राज्य शासनाचे अकरा, ‘रसरंग फाळके’, चित्रपट महामंडळाचे दोन, ‘गदिमा जीवनगौरव’, ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’, ‘कोल्हापूरभूषण’, ‘मृत्युंजय’, ‘सुरसिंगार संसद’, पुणे फेस्टिव्हल, ‘छत्रपती शाहू पुरस्कार’, ‘करवीरभूषण’, ‘साहित्य पुरस्कार’, ‘मार्मिक गौरवचिन्ह’, ‘लावणीरत्न’, ‘नटराज’, केंद्र शासन, ‘कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्यगौरव’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. मा.जगदीश खेबूडकर यांचे ३ मे २०११रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

जगदीश खेबूडकरांची गाजलेली गाणी

https://www.youtube.com/watch?v=KCvcsblHncI

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

2 Comments on प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर

  1. वेलणकर साहेब अतिशय छान व चागली माहिती दिलीत
    गावरान मेवा हा कार्यक्रम सुपर होता.

  2. कविवर्य जगदीश खेबुडकर ह्यांच्या कार्याचा अतिशय संक्षिप्त तरीही ओघवता ठाव घेतला आहे …??

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..