नवीन लेखन...

तांबोपाटा जंगलातला निवास – पेरू

दक्षिण अमेरिकेचा विचार मनात आला की ऍमेझोनची आठवण हमखास येते. नुसत ऍमेझोन म्हटल तरी तिचा सागरासारखा भासणारा विस्तार,त्यातले विविध प्रकारचे जलचर, प्रचंड उंचीची झाडे, दाट जंगल,तिच्या काठावरचे अजस्त्र कीटक, आणि त्यात उगवणा-या कमळांपेक्षाही जवळपास तीन फूट व्यास असणारी त्यांची पाने हे सर्व आठवायला लागते.त्यामुळे दक्षिण अमेरिकेला जायचे ठरवल्याबरोबर ऍमेझोन बघण्याचे आकर्षण होते.परंतू आम्हाला ऍमेझोन बरोबरच तिथले नास्काच्या रेषा, माचूपिचू, कोरिकांच्या ,उरोस असे बरेच काही, उत्तम सीझनमध्ये, कमीतकमी दिवसात पहायचे होते. ते सगळे सामावणारी टूर कंपनी मिळणे दुरापास्तच होते. त्यामुळे आम्ही ऍमेझोन नदीच्या ऐवजी तिच्या उपनदीवरच समाधान मानायचे ठरवले. मनात थोडीशी नाराजी घेऊनच ‘अनुभव हॉलीडेज’ बरोबर आम्ही दक्षिण अमेरिकेला निघालो. आमची नाराजी पाहून संचालक मयुरेश भट नुसते स्मित करत होते. कुठlलेही स्पष्टीकरण देण्याच्या फंदात ते तेव्हा अजिबात पडले नाहीत. कारण आम्हाला जे विलक्षण अनुभव ऍमेझोन न पहाताही तिथे मिळणार होते त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पेरू या देशात आम्हाला त्यासाठी जायचे होते. अर्जेंटिना, चिले पाहून आम्ही पेरूची राजधानी लीमाला गेलो.

सायंकाळी उशीरा आम्ही लीमात पोहोचलो. इथे एक गाईड्बाई आमची वाट पहात होत्या. नेहमीच्या पद्धतीने त्यांनी लीमाची माहिती सांगायला सुरूवात केली. लीमात खरतर खूप कमी पाऊस पडतो म्हणे .पण हा फारसा न पडणारा पाऊस आम्हाला भेटायला खूपच उत्सुक असावा असे दिसत होते. कारण इथे उतरल्यापासून तो झिमझिम करत त्याचे आस्तित्व दाखवत होता. लीमा हे पेरूतल्या सर्व महत्वाच्या स्थळांना रेल्वेने, विमानाने, रस्त्याने जोडणारे उत्तम मध्यवर्ती ठिकाण आहे. शहर राजधानीचे असल्याने मोठे रस्ते, उंच इमारती, छान हॉटेल्स, सगळ्य़ा सोई हे नेहमी दिसणारेच दृश्य होते. पण आमच्यासाठी एक गंमतपण होती. भारत सोडल्यापासून आपले पोळीभाजीचे जेवण मिळाले नव्हते ते लीमामध्ये अनपेक्षितपणे मिळाले. शर्मा नावाच्या गृहस्थांचे हॉटेल आमची वाटच पहात होते. भारतात रोजच्या रोज खाऊन कंटाळावाणी वाटणारी पोळीभाजी तिथे लीमामध्ये किती गोड लागली म्हणून सांगू ! मंद आवाजातले अवीट गोडीचे भारतीय संगीत, तिखट चटपटीत भजी, मस्त कैरीचं लोणचं, झणझणीत लसणाच्या फोडणीची आलूपालकची भाजी, गरमागरम मऊसूत पोळ्या, बुंदी रायता…..आहाहा….अगदी “प्रवासी असे जेउनी तृप्त झाले” चा अनुभव आला. आमची खातीरदारी करणारे भारतीय पोशाखातले अगत्यशील शर्माजी व त्यांचे सहकारी कायम लक्षात रहातील.त्या जेवणासाठीतरी लीमा सोडायला मनाची तयारी नव्हती.कारण लीमातले अजून काहीच पाहिले नव्हते.ते सगळे नंतर पहायचे होते. यावेळी एकच रात्र राहून पुढे पुअर्तो माल्डोनाडोला जाणार होतो.

रात्रभराचा लीमाचा मुक्काम आटोपून आम्ही पुअर्तो माल्डोनाडोला निघालो. विमानोड्डाणानंतर लगेचच लीमा संपून खालचे डोंगर दिसायला लागले. लांबच लांब पसरलेले डोंगर व क्वचित दिसणारी छोटी गावे सोडली तर कुझ्को पर्यंत तरी पहाण्यासारखे खास काही नव्हते. कुझ्को मात्र विमानातून अगदी साधेसुधे, कौलारू घरे असणारे वाटले. खाली उतरायचे नव्हते, त्यामुळे विमानात बसल्या बसल्याच जमेल तेवढे नजरेत साठवायला सुरूवात केली. घरं तर इतकी जवळ की, परत उड्डाण करताना विमानाचा पंख अगदी भिंतीबाहेरच्या घरांना लागेल अशी भीती वाटावी. होती दुमजली, पण सगळी बाहेरच्या भिंती बिनगिलाव्याची, विटा दाखवणारी. घरांच्या गच्चीवरून लहानमुले चक्क पतंग उडवतही होती. कुझ्को सोडल्यावर आमचे विमान परत डोंगरद-यांवरून उडू लागले.

हळूहळू खाली दिसाणा-या परिसरात हिरवागार गालिचा दिसायला लागला. बघता बघता त्याचा पसारा वाढत गेला व नजर जाईल तिथपर्यंत हिरवेगार जंगल पसरलेले दिसू लागले. गच्च भरलेले ब्रोकोलीचे गड्डे एका टोपलीत, अगदी जवळजवळ, गर्दी करून, गच्च कोंबून बसवावेत तसे घनदाट जंगल खाली दिसू लागले. जमिनीचा तर कुठे मागमूसही दिसेना. हेच ते सुप्रसिद्ध ऍमेझोनच जंगल असावं असा विचार मनात यायला लागला तोच “आपण आत्ता ऍमेझोनची मुख्य उपनदी माद्रे दी ऑस वरून उडत आहोत व खाली जे जंगल दिसतय ते ऍमेझोनच्या खो-यातील जंगलाचा एक भाग आहे” अशी माहिती ऐकू आली. पहाता पहाता विमान जंगल पार करू लागलं व खाली कोकोच्या रंगाची अगदी एकाद्या दोरखंडासारखी लांबलचक रेघ जंगलाचे दोन भाग करताना दिसू लागली. “माद्रे दी दिऑस नदी खालून वहाते आहे ती बघा’’ अशी माहिती पायलटने लगेचच सांगायला सुरुवात केली. या नदीचा विस्तार, तिची पाणी वहाण्याची क्षमता, तिची खोली वगैरे वगैरे बरेच काही कानावर पडत होते. पण माझ्या डोक्यात काही फारसे शिरत नव्हते. वरून दिसणारे घनदाट जंगल व त्यात आपण तीन दिवस रहाणार, तर आपले कसे होणार या विचारनेच मला सध्यातरी हैराण केले होते.

विमान हळूहळू पुअर्तो माल्डोनाडोकडे झेपावत होतं. माद्रे दि दिऑसला आता तांबोपाटा नदीही येऊन मिळाली व तिचा विस्तार वाढला. चॉकलेटी रंगाचं पाणी खळखळ करत घनदाट जंगल कापत वहाताना दिसत होतं. बघताबघता विमान जमिनीवर उतरलं. धुळीनं भरलेली छोटीछोटी घरं असलेल माल्डोनाडो गाव फारसं आकर्षक दिसलं नाही. आपल्याकडचं एकादं छोटसं खेडेगाव असावं तसं गाव दिसत होतं. विमानतळाबाहेर एक १५-१६ सीटर बस आमची वाट पहात होती. बसमध्ये बसताना एक गंमत झाली. आमच्या ‘अनुभव’च्या ग्रुप बरोबर आणखीही एक ५-६ जणांचा युरोपियन ग्रुप होता. विमानातून उतरल्यावर बसमध्ये चढताना नेहमीप्रमाणे सगळे पुरूष मागे होते व आम्ही बायका पुढे होतो. बस खूप उंच होती. त्यामुळे स्टुल व आम्हाला हाताचा आधार देणारा (किंवा आमचे वजनदार गाठोडे बसमध्ये यशस्वीपणे ढकलू शकणारा) स्थानिक गाईड जसा रिकामा होईल तसतश्या एकेकजणी बसमधे चढत होतो व आपल्याबरोबर नव-या साठीही जागा पकडत होतो. मी सगळ्यात पुढच्या बाकाकडे गेले व खिडकी पकडली. माझ्यामागे एक युरोपियन ग्रुपमधली बाई चढली. ती माझ्या बाकाजवळ येताच मी निमूट सरकून तिला जागा दिली तर ती आपली भांडायलाच लागली की. तशी ती इंग्लिशच बोलत असावी अशी अंधुक शंका येत होती खरं.. पण तिचे काय म्हणणे होते ते मला काही केल्या कळेना. शेवटी मला इंग्रजी कळतच नसावं या निर्णयाप्रत ती आली आणि तिने खुणांची भाषा सुरू केली. सिंगापूरमध्ये बरीच वर्षे राहिल्याने ती मात्र मला ताबडतोब कळाली. तिने म्हणे मी बसलेल्या जागेवर खालूनच तिचा रूमाल टाकला होता… जागा धरायला म्हणून. (मागच्या जन्मी ती नक्की भारतात जन्मली असावी). मी तर रूमाल कुठेच पाहिला नव्हता. ती रूमाल शोधू लागली तर कुठे सापडेना. मी पण जागेवर घट्ट बसून एव्हाना माझा मराठी बाणा दाखवायला लागले होते. तिच्या खाणाखुणा ज्यास्त भराभर व ठळक होऊ लागल्या. ह्या गोंधळात मूळ शोधशोध नक्की कशाची याचाच संभ्रम उरलेल्या मंडळींच्या मनात निर्माण झाला. शेवटी बसच्या शेजारी उभे असलेल्या मुलाच्या लक्षात काहीतरी आले व वा-याच्या झोताबरोबर बसखाली गेलेला धूळभरला रूमाल त्याने खाली वाकून त्या बाईकडे दिला. झाले…….. त्या धुळीने तिला इतक्या शिंका आल्या व खोकला लागला की काही विचारू नका. तिच्याकडच्या सॉफ्ट ड्रिंकने तिचा खोकला काही केल्या थांबेना. शेवटी माझ्याकडच्या पाण्याने किमया केली, बाईंचा खोकला व राग एकदमच शांत झाला.सगळा उलगडा झाल्यावर आम्ही त्यातून आमचा पुढचा मुक्काम जंगलातील ज्या इंकाटेरा हॉटेल मध्ये होता त्याच्या तांबोपाट गावातील रजिस्ट्रेशन ऑफीसकडे . तांबोपाटा गाव तसं लहानसंच, बरेचसे रस्ते माती धुळीने माखलेले, मध्येच चहाच्या छोट्याछोट्या टप-या, कुठे वाणसामानाची किरकोळ दुकाने, वाटेत रस्त्यावरून धावणारी मुले, बैठी कौलारू घरे, त्याच्या दारात बायकापुरूष गप्पा मारताहेत …..सगळ अगदी परिचित वाटत होतं. क्षणभर भारतातूनच प्रवास करतोय की काय असा भास होत होता. पण दुकानांवरच्या अगम्य भाषेतल्या पाट्या आम्हाला पेरूमध्ये असण्याची जाणीव करून देत होत्या. गावातले लोक अगदी कुतूहलाने आमच्या बसकडे बघत होते.

या गोंधळात आमची बस कधी सुटली, मुक्कामाला कधी पोहोचली काही कळले नाही. लीमा सोडतानाच आम्हाला आमचे गाईड मयुरेश भट यांनी फक्त तीन दिवसांसाठी लागणारं आवश्यक तेवढच सामान वेगळं पॅक करायची सूचना दिली होती. त्याप्रमाणे सगळी तयारी आम्ही केली होती. बाकीचे सगळे सामानही आमच्याबरोबरच होते तर हे वेगळे पॅकिंग का? याचे उत्तर थोड्याच वेळात मिळाले.

आमची बस रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये पोहोचल्यावर थंडगार टॉवेल व सरबत देऊन आमचे स्वागत झाले. आता सूर्य अगदी माथ्यावर आला असल्याने खूपच गरम होत होते. घामाने अंग अगदी चिंब भिजले. टॉवेलने खूपच बरे वाटले. तिथेच मागच्या बाजूला एक फुलपाखरांचे म्युझियमही होते. पण ते अर्थातच नंतर पहायचे होते. तिथे आमच्याकडून आम्ही कुठले, कशासाठी तिथे आलोत, किती दिवस रहाणार, कुठे रहाणार, इथे आमचे काही बरेवाईट झाले तर तसे कळवायला आमच्या कुटुंबियांचे फोन नं. पत्ते, इ मेल आय डी वगैरे बरेचसे काहीबाही लिहून घेतले. इतरांचे माहीत नाही पण या शेवटच्या कॉलममुळे मी मात्र गंभीर झाले. सगळ्य़ांचे फॉर्म भरून झाल्यावर व पासपोर्टच्या त्यांना हव्या तितक्या प्रती काढून झाल्यावर आम्ही आता फक्त ३ दिवसांचे सामान घेऊन व उरलेले कम्युनिटी सेंटर मध्येच ठेऊन “ट्रॅव्हल लाईट” करत पुन्हा त्याच बसमध्ये बसलो व माद्रे दी दिऑस नदीच्या किना-याकडे निघालो. माद्रे दि दिऑस ही नदी समोर वहात होती. आता ती बरीच रुंद दिसत होती. जरी नदीत भरपूर पाणी होते तरी नदीचे पात्र रस्त्यापासून खूपच खोल म्हणजे निदान वीस फूट तरी खोल होते. नदी किनारा साधारणपणे रस्त्यापासून फर्लांगभर दूर होता व त्यापुढे आम्हाला बराच खडा उतार उतरून नदीत उभ्या असणा-या छोट्या होडीत बसायचे होते. हे सगळे पाहूनच तिथूनच माघारी वळावे असे वाटायला लागले. पण हा विचार अंमलात आणायला फार उशीर झाला होता. पुढे जाण्याशिवाय काही दुसरा पर्याय नव्हता.

नदीच्या पात्रात एक १०-१२ माणसे मावतील एवढी मोटरबोट उभी होती. बोट ब-या अवस्थेतली दिसत होती. २-३ सहाय्यकही दिसत होते. नदीचे चॉकलेटी रंगाचे संथ वहाणरे पाणी खुणावत होते. माझ्या मनाची तयारी हळूहळु होत होती. पण निरखून बघितले तरी नदीपर्यंत जायला पक्क्या पाय-या कुठे दिसेनात. फक्त उतारावर मध्ये मध्ये लाकडी ओबडधोबड ओंडके मातीत रूतवलेले दिसत होते. तेवढ्यात आमचे गाईड भटसाहेब अगदी मस्त कॉंक्रीट्च्या जिन्यावरून उतरावे तसे त्या ओंडक्यांवर पाय ठेऊन उतरले व आम्हाला उतरायला प्रोत्साहित करु लागले. आम्ही जरी कसेतरी धाडस करून जायचे ठरवले तरी सामानाचे काय? ते कसे नेणार? ओरडून आम्ही त्याबद्दल काही विचारणार तोच कुठुनतरी काही माणसे अवतरली व आमच्याशेजारी उभ्या असणा-या आमच्या बॅगा पाठीवर टाकून त्या निसरड्या ओंडक्यांवरून खाली उतरून बोटीत शिरलीसुद्धा. आमच्या बॅगांचा त्यांच्या आरामदायी प्रवासाबद्दल इतका हेवा वाटला म्हणून सांगू ! कसेबसे सगळा धीर एकवटून मी पुढे गेले व लटपटत ओंडक्यांवर पाय ठेऊन बोटीत बसणार तोच बोट दूर सरकली. पण मघाशी खाली अदृश्य झालेल्या माणसांनी मला सावरून नीट बोटीत बसवले. हुश्शः करून मी आता नदीची मजा अनुभवू लागले.
आमचा बोटीचा प्रवास ५०-५५ मिनिटांचा होता. आम्ही ज्या किना-यावरून बोटीत बसलो तो किनारा हळूहळू दूर जायला लागला. बोट नदी प्रवाहाच्या मधोमध आली तरी दुस-या किना-यावर झोपड्या, हॉटेलसदृश काहीसुद्धा दिसेना. आमची बोट हेलकावे खात होती, पुढेपुढे जात होती, आता दोन्ही किनारे दिसेनात. नदीच्या विस्ताराची आता कुठे खरी कल्पना आली. थोड्याच वेळात दुसरीकडे दूरवर झाडे झुडपे दिसू लागली, वहात्या पाण्याबरोबर होडी त्यांच्याजवळ पोहोचली व किना-याला – किनारा कसला पहिल्यासारखाच खड चढ होता, तिथे-पोहोचली. परत आमची तशाच लाकडी ओंडक्यावर पाय ठेऊन वर चढायची खटपट चालू झाली. १०-१५ पाय-याच होत्या पण ५०० चढल्यासारखी दमछाक झाली. वर गेल्यावर दिसले की उंच वाढलेल्या झाडांमागे एकमजली, कौलारू घर आहे. आमच्या जिवात जीव आला. तिथपर्यंत जायला फक्त एक चिखलात व पाण्यात बुडालेली पायवाट होती. पाय ठेवायला मोठमोठ्या झाडाच्या बुंध्यांचे कापलेले तुकडे होते. चालताना ते डुगडुग करायचे, पाय घसरायचा व तोल सावरताना आमची तारांबळ व्हायची. सुखाची गोष्ट एकच होती की आमची फजिती पहायला तिथे आमच्याशिवाय कोणीही नव्हतं! कसेबसे आम्ही पुढे एका मोठ्या झोपडीवजा खोलीत गेलो. हे आमच्या तिथल्या मुक्कामाचे इन्काटेरा हॉटेलचे ऑफीस कम रिसेप्शन सेंटर.

आम्हाला तिथे बसवून पुन्हा पासपोर्टच्या कॉपीज काढून घेणं, तिथल्या आमच्या मुक्कामात काय काय सोई (खरं तर २४ तास दिवे नसणं, टीव्ही, फोन, इंटरनेट वगैरे नसणं) असतील याची व आमच्या काय ऍक्टीव्हीटीज तिथे असतील याची कल्पना देणं झाल्यावर आम्हाला त्या हॉटेलच्या नकाशाची प्रत दिली व खोली नं. सांगितला पण किल्ली कुठे दिली होती? आमचा गोंघळ दूर करण्यासाठी ना तिथे अनुभवचे गाईड होते ना हॉटेलचे! सगळे त्या ऑफिसच्या मागे असणा-या रेस्टॉरंट मध्ये अदृश्य झाले होते. शेवटी नकाशाप्रमाणे आम्हीच खोल्या शोधायला निघालो. ऑफीसच्या मागे परत तसाच छोटा रस्ता होता. तो आम्हाला जेवणघर कम विश्रांती गृहाकडे घेऊन गेला. तिथे पोहोचल्या पोहोचल्य़ा आम्हाला टॉवेल व चहा मिळाला. तिथल्या कर्मचा-यांपैकी पुष्कळ जणांना इंग्रजी येत नव्हते. रेस्टॉरंटच्या मागे चांगला लाकडी कॉरीडॉर होता. तो साधारणपणे २ फर्लांग तरी लांबीचा असावा व त्यापुढे दोन्ही बाजूंना जमिनीपासून ३-४ फूट उंचावर छोट्या छोट्या लाकडी खोल्या होत्या. मध्ये लाकडी ओंडके जमिनीत रूतवलेली पायवाट व ठराविक अंतरावर ४-४ खोल्यांचा समूह, अशा साधारण ३५-३६ खोल्या तरी असाव्यात. कॉरिडॉरच्या आजुबाजूला मस्त फुलझाडांचे ताटवे होते. वेगवेगळ्या रंगातली जास्वंदाची फुले पहाताना आत्तापर्यंतच्या प्रवासाचा सगळा शीण दूर झाला. कॉरिडॉरच्या शेवटी अचानकच एक ओळखीचा सुगंध नाकात शिरला. तो होता सोनटक्क्याचा. फुललेली टपोरी पांढरीशुभ्र सोनटक्क्याची फुलं मस्त वा-यावर डुलत होती. नुकताच पाऊस पडून गेला होता, झाडांची पाने स्वच्छ, हिरवीगार, तजेलदार दिसत होती. एकूण हवेतला उकाडा सोडला तर वातावरण मोठे रम्य होते. सगळे पहात आम्ही आमच्या खोलीपाशी पोहोचलो .आमचीही खोली जमीनीपासून ३-४ फूट उंचीच्या लाकडी ओंडक्यांवर उभी होती. खोली संपूर्ण लाकडी जमीन व छत असलेली, आधारापुरते लाकडी खांब, डासांना अटकाव व्हावा यासाठी बारीक लोखंडी जाळी लावलेली होती. फक्त टॉयलेट सोडले तर, भिंती हा प्रकारच कुठल्याच खोलीला नव्हता. त्यामुळे लांबूनही खोल्यांच्या आतले सगळे अगदी स्पष्ट दिसत होते. खोली बघताच कपडे कुठे बदलायचे, झोपायचे कसे वगैरे असंख्य प्रश्न डोक्यात गर्दी करू लागले. आमची २८ नं.ची खोली सगळ्यात शेवटी होती. त्याच्या पुढे सेवकांची रहाण्याची ठिकाणे व त्यामागे जंगल.

आमच्या खोलीच्या शेजारच्या खोलीपलीकडे माद्रे दी दिऑस नदी वहात होती. मोटरबोटीच्या आवाजात दबलेला तिचा आवाज आता शांत वातावरणात चांगला स्पष्ट ऐकू येऊ लागला. आमच्या खोलीजवळ एक भलेमोठ्ठे नीर फणसाचे झाड होते. त्यावर एक विड्याच्या पानांसारख्या दिसणा-या पानांची वेल चिकटली होती. तिचे अगदी बारीक देठ झाडात इतके घट्ट रूतले होते की झाडावर फक्त पानेच चिकटलीत की काय अशी शंका येत होती. खोलीत जायला ४ लाकडी पाय-या होत्या. किल्लीशिवय दार कसे उघडायचे या विचारातच पाय-या चढायला सुरूवात केली व नुसत्या लोटलेल्या दाराने आम्हाला खोलीत प्रवेश दिला.

खोली बाहेरची सज्जारूपी बैठकीची जागा, त्यात मस्त दोन झुले-हॅमॉक टांगलेले व आतली पलंगाची जागा व त्याच्याही आत टॉयलेट व आरसा, बेसीन वगैरेची जागा अशी बाहेरून लहान दिसली तरी दोन माणसांना पुरेशी प्रशस्त होती. बॅगा ठेवायला कोप-यात दोन फडताळेही होती. शिवाय दोन बॅट-या, दोन पाण्याच्या ऍल्युमिनियमच्या बाटल्या, डासांना पळवून लावण्यासाठी रिपेलंटच्या दोन बाटल्या, साबण शांपू असे सामानही होते. आणखी हो! कुठल्याच हॉटेलात न दिसलेली आपल्याकडच्या खेड्यातूनही हळूहळू गायब होऊ लागलेली एक वस्तूही होती. ती म्हणजे कंदील. ४ कंदील कशासाठी याचे उत्तर मिळायला मात्र रात्र पडावी लागली. छपरी पलांगावर मच्छरदाणी गुंडाळून ठेवलेली होती. एवढ्या सगळ्य़ा सोई होत्या पण कुलुप किल्ली मात्र नव्हती. इतकच काय दारांना कडीही नव्हती. मुख्य दाराला तर नाहीच पण टॉयलेटलाही आतून कडी नाही. सगळ्य़ा खोल्या तर दोन दोन माणसांसाठीच्या. दाराला कडी तर हवीच.पण त्यासाठी गंमत्शीर सोय होती. टॉयलेटच्या दाराला बाहेर दोरीला बांधलेला एक लाकडी तुकडा लोंबकाळत होता. तो दारावर वाजवायचा की झालं म्हणे. आणि तुम्ही आत असताना काही अनपेक्षित अडचण आली तर आत दाराला एक शिटी लोंबत होती. ती वाजवली की ताबडतोब तुम्हाला आवश्यक ती मदत मिळेल म्हणे. केल्याने देशाटन …..काय काय माहिती मिळते…….दिवे सकाळी फक्त २ तास व संध्याकाळी ३ तास. रात्री कधीतरी पंखाही चालू व्हायचा. पण त्याचा भरोसा नाही. त्यामुळे अर्थातच दूरदर्शन वा दूरध्वनी नाहीच. एकूण जंगलातच वास्तव्य ना! आम्ही जरा फ्रेश होत होतो तोवर दुपारच्या जेवणाची शिट्टी वाजली आणि आम्हाला भुकेची जाणीव झाली.

रेस्टॉरंट ५० प्रवाशांची सोय करू शकेल इतक मोठं होतं. मेनुकार्ड या वस्तुला सध्यातरी आमच्या जगात ’एक अगम्य भाषेतल पुस्तक’ इतकाच अर्थ होता. काही कळत नसूनही गंमत म्हणून आम्ही दरवेळी ते हाताळत होतो. आमचे गाईड आम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये शिरलो की सरळ किचन मध्ये अदृश्य होत व थोड्याच वेळात भरपूर भाज्या घातलेले ब-यापैकी मसालेदार, टॉमॅटो कांद्यांच्या चकत्यांनी सजवलेले दिसायला खूप वेगळे असणारे पदार्थ समोर येत. आताही वेगवेगळ्या ५-६ तरी डिशेस असतील. भूक लागली होती तरी खाण्याचे धाडस होत नव्हते. पण इथे ३ दिवस रहायचे होते. त्यामुळे खाणे तर भागच होते. पण सुरुवात केल्यावर मात्र छान वाटले. गरम गरम सूप, ब्रेड ,भात व भाज्या खूपच मस्त लागले. जेवणाची सांगता डेझर्ट्ने झाल्यावर डोळे आपोआप जड व्हायला लागले. एव्हाना परत पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे आमचा मूळचा कॅनॉपीवर जाण्याचा बेत बदलून पाऊस थांबल्यावर जंगलात फेरफटका मारायला जायचे ठरवले. त्या अगोदर विश्रांती आवश्यकच.

बरोब्बर ४ वाजता आम्हाला ऑफिसमध्ये बोलावले होते. चहाही तिथेच मिळणार होता. संपूर्ण फुललेल्या सोनटक्क्याच्या फुलांचा फोटो काढण्याचा मोह माझ्या नव-याने इतका वेळ कसाकाय आवरला होता तोच जाणे. त्यामुळे माझी तयारी व्हायच्या आत स्वारी गेली सुद्धा. मी मुलखाची भित्री. मी कसली एकटी त्या जंगलातल्या खोलीत थांबतेय? खोलीच्या दाराला अडसर घालून मी पण ऑफिसकडे निघाले. पाय-या उतरायला लागले तर पायाजवळून काहीतरी टुणकन उडी मारून पळालं असं वाटलं. भास असेल, म्हणून शेवटची पायरी उतरले तर एक उदी रंगाचा, मुंगसाच्या पेक्षा खूपच मोठ्ठा, पण तसाच दिसणारा प्राणी माझी वाट अडवून उभा. आपल्या छोट्याश्या लुकलुकत्या डोळ्यांनी तो मला न्याहाळत होता. स्वारी आपल्या मागचे पाय व छोट्याश्या शेपटीवर बसून पुढच्या पायांनी नुकताच पडलेला नीरफणस कुरूकुरू खात होती. असला प्राणी मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. मी परत जिन्यावर चढावे की काय या विचारात मागे वळले तर त्याचाच मघाशी मला नमस्कार करून (पायावरून पळालेला) पळालेला मित्र मला निरखत होता. मी किंचाळणार तोच दुरून येणा-या कर्मचा-याने टाळ्या वाजवल्या व मंडळी नीरफणस तसाच टाकून पळाली. नंतर समजले की हे ’अगुती’ नावाचे प्राणी आता ब-यापैकी माणसाळलेले आहेत. ह्यांचा आकार छोट्या सश्यापासून कोकरापर्यंत केवढाही असतो. सहसा ते कुणाला त्रास देत नाहीत. नंतरच्या २ दिवसात ह्या अगुतींच्या लीला बघण्यात खूप मजा आली. खोलीच्या दारातही कधीकधी हे साहेब आरामात बसलेले असायचे. म्हणजे खोलीच्या दाराचा अडसर ह्या साहेबांसाठी होता तर !
आम्ही ऑफिसमध्ये गेलो तर तिथे एक मध्यम वयाच्या, बेताच्या उंचीच्या, उन्हाने तांबूस झालेल्या उजळ वर्णाच्या, गोल चेह-याच्या, खाकी युनिफॉर्म मधल्या, तरतरीत, हसतमुख गाईडबाई आमची वाटच पहात होत्या. आमचे चहापाणी झाल्यावर त्यांनी सगळ्यांना जंगलाच्या ज्या भागात फिरणार होतो तिथली समग्र माहिती सांगितली. आता आम्हाला सूर्यकिरणांचा फारसा स्पर्श सुद्धा होत नसलेल्या ऍमेझोनच्या खो-यातील जंगलात शिरायचे आहे या कल्पनेनेच अंगावर काटा आला. विशेषतः ‘अनाकोंडा’ हा सिनेमा ज्यांनी पाहिला होता त्यांना तर सगळीकडे तोच दिसू लागला तर नवल नाही. शिवाय ‘जळवा कशा न कळत पायाला चिकटतात व रक्त शोषून घेतात’ ही कुठेतरी वाचलेल्या पुस्तकातली माहिती आठवायला या पेक्षा योग्य जागा दुसरी कुठली असायला? त्यामुळे माहिती ऎकतानाच छातीतली धडधडही वाढत होती. आम्हाला दुस-या खोलीत नेण्यात आले. तिथे गमबुटांच्या खूप सा-या जोड्या भिंतीलगतच्या शेल्फवर उलट्या लटकत होत्या. त्यातील आपल्या पायाशी जुळवून घेणारी जोडी निवडून घ्यायला सांगितली गेली. गमबूट वेगवेगळ्या आकारमानाशी जुळवून घेण्यात तरबेज होते पण आमचे पाय? मी तर गुडघ्यापर्यंत येणा-या गमबूटात आयुष्यात प्रथमच पाय कोंबणार होते. दोघेही एकमेकांना सर्वस्वी अपरिचित. रिश्ता व्हावा कसा? खूप वेळ माझी पाय व बूट यांच्याशी मारामारी चालली होती. पाय व बूट दोघेही पुल्लिंगी ! माझं बाईमाणसाचं कोण ऐकणार? शेवटी माझ्या नव-याला माझी धडपड बघवेना, त्यांच्या मदतीने पायबुटाचे सख्य झाले व कशीबशी मी तयार झाले. हे फक्त आमचेच ‘बायकोबाई खुर्चीवर पाय धरून व नवरोजी त्यांचे बूट हातात धरून ओणवे किंवा जमिनीवर उकिडवे ’ असे नव्हते बरका ! आमच्या सहप्रवाशांच्यातही हेच चालले होते. शेवटी आमची वरात ऑफिसच्या बाहेर पडली. हातात भल्यामोठ्या पर्सेस, पाठीवर पाण्याच्य़ा बाटल्या, हातात टॉर्च, अंगाला डास पळवण्याचे औषध चोपडलेले, पायात जडजड गमबूट….अहाहा…काय मस्त अवतार होता आमचा! तो बघायला तिथला नेहमीचा रहिवासी पाऊस तर हवाच. पुन्हा थांबून पिशवीतले रेनकोट अंगावर चढवण्याचा कार्यक्रम झाला आणि सौंदर्यात भर पडली.

ऑफिसला वळसा घालून आम्ही जंगलात शिरलो. प्रथम अगदी छोटीछोटी फुलझाडे होती व मधूनच जाणारी पायवाट होती. पायवाटेवर झाडांच्या लाकडी फळ्या होत्या. त्यावर पाने व दगडवाळू पसरलेले होते. पावसाने थोड्याश्या निसरड्या झालेल्य वाटेवरून सराईत पावले टाकत चाललेल्या गाईडच्या पाठोपाठ आम्ही सांभाळून चालत होतो. पायवाट वाटली तेवढी वाईट नव्हती त्यामुळे थोडे रिलॅक्सही वाटत होते. आता हळूहळू उजेड कमी होतोय असे वाटायला लागले कारण झाडांची उंची वाढायला लागली. वर बघितले तर आकाशही दिसेनासे झाले एवढी झाडे उंच झाली. पायवाटेचे रूपांतर आता अगदी बारीक व खाचखळग्यांनी भरलेल्या, दोन झाडांमधून जाणा-या वाटेत झाले. चिखलपाण्याने आमचे बूट बरबटून गेले. बघता बघता भोवतालचे जंगल दाट होत गेले. काही ठिकाणी तर दोन झाडातून वाट काढणेही कठीण झाले. चालताना खड्ड्यात पाय पडून तोलही जात होता. पण झाडांचा आधार अजिबात घेऊ नका असा आमच्या गाईडचा सक्त हुकूम होता. ती आणखीही बरेच काही सांगत होती पण ऑफिस मधल्या लेक्चरमधले बरेचसे डोक्यावरून गेल्याने व आत्ता सांभाळुन चालण्याच्या नादात असल्याने सगळे ‘नळी फुंकिली सोनारे’ असे झाले. आम्हाला वाटले की झाडांच्या काळजीने ती असे सांगतेय की काय! पण तिच्या सांगण्याकडे लक्ष्य न दिल्याचा परिणाम लगेच कळला. आमच्यापैकी एकीने तोल सावरायला म्हणून एका झाडाला नुसती २-३ बोटे टेकवली मात्र, क्षणभरात तिचा हात मुंग्यांनी भरला की ! ती हात झटकायला लागली तर त्या मुंग्या सगळीकडे पसरायला लागल्या, ब-याचशा खालीही पडल्या. हे सगळे होताना नुसते पहाण्या पलीकडे कोणीच काही करू शकत नव्हते. सगळे किती झटपट झाले पण मुंग्यानी तेवढ्यातही आपला इंगा दाखवून दिला. त्या फायर ऍंट म्हणून ओळखल्या जातात. आकाराने नेहमीच्या लाल मुंग्यापेक्षा कितीतरी मोठ्या, काळपटलाल रंगाच्या ह्या मुंग्या झाडाच्या खोडातल्या फटीत घट्ट चिकटून धावत असतात व दुसरा काही आधार मिळाला तर खूपच झपाट्याने त्यावर चढतात. त्यांचा दंश नेहमीच्या मुंग्यांपेक्षा कितीतरी जास्त तीव्र असतो. अगदी भाजल्यासारखी जळजळ व वेदना ५-६ तास तरी जाणवते. मध्येच थोडीशी मोकळी जागा मिळताच तिथे थांबून बघितले तर हात चांगलाच लाल झाला होता. मुंग्यांचा प्रताप कळल्यावर सगळेजण जास्तच काळजीपूर्वक चालायला लागलो.
थोडे पुढे गेल्यावर आमची गाईड एक ठिकाणी थांबली.आता थोडी मोकळी जागा लागली होती. मोठी मोठी झाडॆ जरा दूर होती त्यामुळे सूर्य आम्हाला मधून मधून दिसत होता. पायाखालची वाटही झाडांच्या वाळलेल्या साली पडून थोडी बरी झालेली होती. आमच्या गाईडने एका ३ फुटी उंच असलेल्या झाडाची काही पाने तोडली, एक एक आमच्या हातात दिले व त्याचे देठ चोखायला सांगितले. कोणाचेच मन अशा न धुतलेल्या, अनोळखी पानाला तोंड लावायला तयार होईना. शेवटी तिनेच ते स्वतःच्या तोंडाला लावले तेंव्हा कुठे आम्ही तयार झालो. एकमेकांकडे पहात हळूच प्रत्येकाने पानाला जीभ लावण्याचे धाडस केले. पानाच्या देठातला रस जीभेवर पसरताच तो एकदम पेपरमिंट सारखा लागला. म्हणून जरा जोरात चोखला तर काय….. जीभ एकदम जड झाली. अगदी दात काढताना डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन तोंड बधीर करावे तशी ! तोंडातून शब्द फुटेना. हे झाड ऍनेस्थेशियाचा परिणाम करणारं होतं. जवळ जवळ १५-२० मिनिटे तरी जीभ व गालाची बधीरता टिकली. आमची तोंडे गप्प होती त्यामुळे त्या संधीचा फायदा घेऊन गाईडने त्या झाडाचे नाव, त्याचे उपयोग, त्याची बोटॅनिकल जात वगैरे बरचसं काहीबाही सांगून टाकल. अजूनही पेरूमधल्या ग्रामीण भागात ह्या झाडाच्या रसाचा उपयोग काही शस्त्रक्रिया करताना करतात एवढीच माहिती काय ती लक्षात राहिली.

पुढच्या आमच्या भटकंतीत बरीच विविध झाडे बघितली, त्यांची बरीचशी माहिती डोक्यात साठवण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला व नंतर नंतर सगळ्या माहितीची मस्तपैकी सरमिसळही करून टाकली. काहीकाही झाडे मात्र अगदी पक्की डोक्यात बसली. ‘चालणारा पाम’ हे त्यापैकी एक. अंदाजे ५० फुटांपेक्षाही जास्त उंचीचे. ५-६ फूट लांबीची आकाशाकडे सूर्यप्रकाशासाठी तळहाताप्रमाणे पसरलेली पाने, मधले सरळसोट खोड, त्याचे पाय म्हणजे मुळे असे हे पामचे झाड राखाडी, पांढरट, मधूनच निळसर छटा दाखवणारे. त्याच्यावरच्या टोकदार काट्यांमुळे त्याच्यापासून सगळ्यांना थोडेसे लांबच ठेवत होते. त्याची मुळे जमीनीच्याखाली तर रूतलेली होतीच पण ६-७ फुटांपेक्षाही जास्त उंचीची जमिनीच्यावर दिसत होती. त्यामुळे हे झाड जणू काही स्टील्ट्वर उभे आहे असे दिसत होते. जुनी मुळे काही काळानंतर कुजतात व मरतात. पण त्या आधीच नवीन मुळे खोडातून जुन्या मुळांच्या वरच्या बाजूने निघून जमिनीत आपले पाय घट्ट रोऊन उभी असतात. झाडाला त्या नव्या मुळांचा आधार मिळतो, नव्या उंचीवरून निघालेल्या मुळांमुळे झाडाची उंची वाढते, झाडाची जागा व दिशा बदलते. ही सगळी क्रिया अतिशय संथ असते पण बरीच वर्षे बारकाईने निरीक्षण केले तर झाड मूळच्या जागेपासून काही अंतर दूर गेलेले दिसते. म्हणून ह्या झाडाला चालणारे पामचे झाड असे म्हणतात. सगळे ऐकून खूप मजा वाटली .

पामची भेट घेतल्यावर आम्ही गाईडच्या मागून अगदी काळजीपूर्वक घनदाट जंगलातील पायवाटे वरून चालत होतो. अचानक आमची गाईड थांबली, तिने खाली वाकून काहीतरी उचलले व दाखवले तर तिच्या भलामोठा शंख दिसला. तिने तो शंख कोण हातात घेतय असे विचारताच सगळे दोन पावलेमागे सरकले . कारण आता त्या शंखाखालून काहीतरी वळवळताना दिसू लागले. असल्या कामात पुढे माझा नवराच असणार हे एव्हाना सगळ्य़ा सहप्रवाशांना माहीत झालेच होते. त्यामुळे त्यांच्या नजरातले भाव बघून ह्यांनी तो शंख तळहातावर घेतला. पहाता पहाता त्या शंखातली वळवळ एकदम वाढली व ह्यांच्या तळहाताएवढी मोठी गोगलगाय आपला पसारा पसरून ह्यांच्या तळहातावर विसावलेली दिसली. तिचे कूळमूळ सगळ्याबद्दल माहिती ऐकुन झाल्यावर तिला परत झाडांच्या जवळ सोडून आमची वरात पुढे निघाली. या नंतर आम्हाला आमच्या गाईडने परत एका झाडाची पिवळसर रंगाची, डाळिंबाच्या जातीची पण आकाराने लहान अशी फळे चाखण्यास दिली. ती फळे कशाची, त्याचे गुणधर्म, जातकुळी वगैरे बरीच माहिती गाईडने सांगून आमच्या माहितीत भर घातली पण हे असले काही आपल्या खाण्यात परत येण्याची शक्यता नाही, तेंव्हा माहितीपेक्षा फलाहार जास्त छान या सबबीवर सगळे फळांचा आस्वाद घेण्यात रंगले. थोडा फलाहार झाल्यावर आम्ही पुढे निघालो. आपण जंगलातल्या कुठल्या भागातून आत शिरलो व आत्ता कुठे आहोत हेच कळेनासे झाले होते. गाईडने आम्हाला एका झाडाचे प्रत्येकी एकेक पान तोडायला सांगितले व ते तळहातावर कुस्करायला सांगितले.सगळ्यांचे हात हिरवेगार झाले. गाईडबाई माहिती सांगत होत्या त्या वेळात मंडळी हातावरचा पानांचा चोथा झटकण्यात गर्क होती. साधारण १०-१५ मिनिटे गेली असतील तोच आमचे हात लाल व्हायला लागले, व थोड्या वेळात ते गडद जांभळे झाले. हेच त्या झाडाचे वैशिष्ठ्य होते. खूप वेळपर्यंत हातांवर जांभळट रंग होता. या वैशिष्ट्याचा उपयोग कापड रंगवण्यासाठी करतात म्हणे. आणखीही अशाच ब-याच झाडांच्या जाती, वाटेत येणारे मोठ्ठेमोठ्ठे कोळी, मुंग्या, सापसुरळीसारखे प्राणी पहात बरेच हिंडलो व २-३ तासांचा फेरफटका मारून परत जंगलाच्या बाहेर आलो.

एव्हाना संध्याकाळचे ७ वाजले होते. बाहेर उजेड असला तरी जेवणघरात, ऑफीसमध्ये बराच अंधार जाणवत होता. विजेचे दिवे अजून पेटले नव्हते. त्यामुळे जंगलाच्या पार्श्वभूमीवर, कंदिलाच्या प्रकाशात फिरणा-या आमच्याच सावल्या मनावर एकप्रकारचे दडपण आणत होत्या. रातकिड्यांच्या किरकिरण्याने त्यात भरच पडत होती. गरमगरम कॉफीचे घुटके घेताना मात्र खूपच छान वाटत होते. आता पायातले गमबूट जडजड वाटायला लागले होते. पण आमचे नेहमीचे बूट तर खोलीत. त्यामुळे पाय ओढत, रमतगमत खोलीकडे मोर्चा वळवला. आमच्या खोलीकडे जातानाच्या वाटेवर एका टोपलीत काही सुक्या बिया व एक लाकडात बसवलेला अडकित्ता ठेवलेला दिसला. जवळ गेल्यावर ते ब्राझील नट्स आहेत हे कळले. सिंगापूरला ते पाहिले होते. लगेच ते अडकित्त्याने फोडून खाण्यात आले. सहप्रवाशांनाही ते दाखवले. थोडी गम्मत. ‘ह्या बाईंना बरीच माहिती आहे हो’ म्हणून फुकटात भाव पण खाल्ला. बघतबघता आमच्या खोलीपाशी येईपर्यंत अंधार पडला. खोलीच्या पाय-यांवर २, टॉयलेट मध्ये १ व पलंगापाशी १ असे ४ कंदील तिथल्या कर्मचा-यांनी एवढ्या वेळात आणून ठेवले होते. अजून वीज चालू झाली नव्हती, पंखा नव्हताच त्यामुळे खूप गरम होत होते. आम्ही व्हरांड्यात हॅमॉकवर बसण्याची चैन केली. ब-याच दिवसात एकमेकांशी बोलायला वेळ मिळाला नव्हता तो आत्ता सापडला. जेंव्हा आपण अशा वातावरणात फक्त २-४ दिवसच रहाणार आहोत याची खात्री असते तेंव्हा असे बदल खूपच छान वाटतात याचाही पुनःप्रत्यय आला.

इतके सगळे होईपर्यंत जेवणाची वेळ झाली. गरमगरम सूप, ब्रेड ने सूरूवात करून भाज्या, भात कधी पोट तृप्त करून संपला कळलेच नाही. आमचे गाईड मयुरेश भट वेगवेगळ्या चवींचे पदार्थ पण आम्हा शाकाहारींनाही चालतील असे बनवून घेण्यात एकदम पटाईत. त्यामुळे कुठेही माझी कधीही उपासमार झाली नाही. ह्यांना तर त्यांनी माशांचे, पेयांचे विविध प्रकार खायला घातले. जेवणात सगळीकडॆच चीजचे प्रमाण भरपूर. त्यामुळे कुरकुरीत ब्रेडवर भाज्या पसरल्या की पिझ्झा खाल्य़ासारखे समाधान. जेवणानंतर चहा कॉफीही होती. त्याचा आस्वाद घेत होतो तोच मयुरेश भटांनी जाहीर केले की “आपण लगेचच रात्रीच्या बोट सफरीवर जाणार आहोत. तुमच्या खोलीत डास प्रतिबंधक लोशन ठेवले आहे ते लाऊन हवे असेल तर खोलीतले टॉर्च घेऊन या.” इतरांचे माहीतनाही पण मला मात्र आम्ही बोटीतून उतरल्यानंतरचा निसरडा चढ दिसायला लागला. दिवसा ती सर्कस एकवेळ ठीक होती पण रात्रीच्या मिट्ट काळोखात ………! माझ्या मनाने न जाण्यासाठी काय पळवाट शोधावी याचा विचार ताबडतोब सुरू केला. पण तितक्यात एक अगुती टुणकन उडी मारून गेला अन माझा विचार बदलला. त्या अगुतीच्या सहवासात कंदिलाच्या प्रकाशात खोलीत किंवा रिसेप्शनपाशी बसण्यापेक्षा ‘सर्कस’ परवडली. डासविरोधी लोशन अंगाला चोपडून आमची वरात चांदण्याच्या अंधुक प्रकाशात निसरड्या लाकडी पाय-यांवरून हेलपाटत, ज्याचा जमेल त्याचा हात पकडत बोटीत स्थानापन्न झाली. मोटरबोटीने जोरदार फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र केले व आम्ही किनारा सोडला.

आम्ही इथे आलो होतो तीच बोट आत्ताही होती. बोटीच्या दोन्ही बाजूंना बसून आम्ही नदीची मजा पाहू लागलो. सकाळी जी नदी उन्हात चमकताना तांब्याच्या रसाची आहे असा भास होत होता, तीच आता पूर्ण काळीभोर दिसत होती. आमच्या हॉटेलचे कंदील आपला प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचवू शकत नव्हते. दुस-या किना-यावरही पूर्ण अंधार. मोटरबोटीचा आवाज सोडला तर दुसरा कसलाही आवाज नव्हता. पाण्याच्या लाटांचा बोटीवर आपटून होणारा चुबुकडुबुक आवाज बोटीच्या आवाजात मिसळून गेला होता. वातावरणात एकूणच गंभीरता जाणवत होती. बोट आता नदीपात्राच्या मधल्या धारेमधून जात होती. मी बाहेरच्या बाजूला थोडं झुकून आकाशकडे पाहिले आणि “आहाहा” असे उद्गार आपोआपच तोंडून निघाले. मधून मधून डोकावणारे ढगांचे पुंजके सोडले तर नजर जाईल तिथपर्यंत गडद निळे आकाश चांदण्यांनी नुसते चमकत होते. मला कुठलीच नक्षत्र ओळखता येत नाहीत. पण चांदण्यांचा जो काही पसारा दिसत होता तो एकदम अफलातून. लहानपणीच्या “मुठभर लाह्या त्यात चांदीचा रूपया “ या कोड्याची आठवण झाली. लाह्या पसरलेल्या दिसत होत्या पण रूपयाचा पत्ता नव्हता. बोट जसजशी पुढे जाईल तसतसे आकाश जास्तच शोभिवंत दिसत होते. आम्ही ते बघण्यात पूर्ण रंगून गेलो होतो तोच अचानक सगळीकडे शांतता पसरली. एवढा वेळ चालू असलेले मोटरबोटीचे इंजीन अचानक बंद झाले. आमची स्थानिक गाईड बोटीच्या शेपटाकडून अचानक पुढच्या भागात तिचा पॉवरफुल टॉर्च घेऊन धावली, बोट ब-यापैकी हिंदकाळली. काय झाले ते समजेना. माझ्यासारख्या पोहता न येणा-या बाईची काय अवस्था झाली असेल विचार करा ! तेवढ्यात बोटीच्या कॅप्टनने बोट थोडीथोडी किना-याजवळ आणली. आमचे लक्ष आता बोट का थांबली असेल याकडे लागले. गाईडबाई किना-यावर मधून मधून प्रकाशझोत टाकून काहीतरी शोधत होत्या. आता त्या प्रकाशात नदीकाठचा परिसर न्हाऊन निघाला. नदीकडेला उंच मातीची भिंत उभी होती, त्यावर झाडे होती आणि त्यांच्याखाली उभे राहून हरणाच्या आकराचे काही प्राणी आम्हाला न्याहाळत होते. हे अगुतीच्याच जातीचे, तसेच करड्या रंगाचे, पण कोकराएवढ्या आकाराचे प्राणी सहसा निरुपद्रवी व कळप करून हिंडतात. त्यांचे फोटो काढून झाल्यावर आमची बोट निघाली.

पुढे सगळीकडे कानोसा घेत व टेहळणी करत आम्ही खरतर सुसर शोधत होतो. पण ती त्यावेळी बहुधा दुसरीकडे पर्यट्नाला गेली असावी त्यामुळे तिची गाठ पडली नाही. तरी सुद्धा आम्ही घुबड, कोल्हा, पांढरे पक्षी, विषारी बेडूक, पाणसाप वगैरे बरेच काही पाहिलॆ. हे प्राणी पहाण्यापेक्षाही मला ती काळीभोर नदी, त्यात चमचमणारे चांदण्यांचे प्रतिबिंब, आमच्या बोटीमुळे उठणा-या लाटा, निळे आकाश, त्यात रेंगाळत जाणारे ढग, आजुबाजूचे जंगल, रातकिड्यांची किरकिर व त्यातून सैर करण्याचे आमचे रात्रीचे साहस हेच सगळे खूप खूप रोमहर्षक होते. जवळपास दोन तास आम्ही बोटीत घालवून हॉटेलवर परतलो. इतका वेळ गायब असलेल्या विजेने आपली हजेरी लावल्यामुळे रिसेप्शन, ऑफिस उजळून निघाले होते पण त्यामुळे तिथपर्यंत जाणारी पायवाट, आजुबाजूचे जंगल जास्तच अंधारात बुडाले होते. आमच्या टॉर्चचा आता उपयोग झाला. कंदिलाचा प्रकाश आम्हाला सोबत करत होताच. त्याच्या प्रकाशात आम्ही खोलीत पोहोचलो. पलिकडूनच नदी वहात होती. तिचा आवाज आता स्पष्ट ऎकायला येऊ लागला. आमच्या खोलीचा एकदम कायापालट झाला होता. सकाळपासून ज्या भिंती जाळीमुळे पारदर्शक दिसत होत्या त्या आता स्वच्छ पांढ-या पडद्यांनी पडदानशीन झाल्या होत्या. पलंगावरची मच्छरदाणी सोडून शिस्तीत नीटनेटक्या गादीखाली खोचलेली होती, लव्हेंडरचा सुवास पसरवणारी मेणबत्ती पलंगाशेजारील टीपॉयवर तेवत होती, कंदील पेटलेले होतेच, पाण्याच्या स्वच्छ बाटलीत पाणी भरलेले होते. दिवसभराची दमणूक, आयुष्यात कधीही केली नसेल एवढी दगदग, रातकिडे व बेडुक याची अंगाईगीते आणि अशी स्वच्छ खोली…..बस! आणखी काय हवे असणार? हे सर्व करणा-या सेवकांना मनातल्या मनात धन्यवाद देत निद्रादेवीच्या आधीन कधी झालो कळलेसुद्धा नाही.

सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने, खारूताईंच्या शिट्टीने व सोनटक्क्याच्या सुवासाने लवकरच जाग आली. लगेच आम्ही दोघे फेरफटका मारायला बाहेर निघालो. खोलीचे दार उघडताच पहिली भेट झाली अगुती महाशयांची. ते आरामात नीरफणसाच्या झाडावरून पडलेल्या फणसाची न्याहारी करत बसले होते. त्यांनी आमची जराही दखल घेतली नाही, इतकच काय पण “न्याहारी करणार का “असे विचारण्याची औपचारिकताही दाखवली नाही. ते आपले त्यांचा फणस खाण्यात गर्क होते. आम्हीही आता ब-यापैकी धीट झालो होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू पुढे सरकलो. रेस्टॉरंटकडे जाणा-या पायवाटेवर दोन्ही बाजूंना जास्वंदी व सोनटक्का फुलला होता. कालच्या पावसामुळे स्वच्छ झालेल्या तुकतुकीत पानांमधून डोकावणारी जास्वंदीची विविध रंगातली फुले भरभरून नेत्रसुख देत होती. जमिनीवरच्या गवतावरचे दवबिंदू पहाटेच्या सूर्यकिरणांत अगदी हि-यासारखे चमकत होते. मधूनच पळणारी खारूताई, टुणकन उडी मारणारे बेडूक व शेपटीवर बसून टुकुटुकू बघणारे अगुती त्या निसर्गचित्रात सौंदर्याची भरच घालत होते. या अशा रम्य वातावरणात गरमागरम वाफाळता चहा ……..वाः! क्या बात है!

काल पावसामुळे हुकलेला कॅनॉपी डे आज होता. त्यासाठी थोड्याच वेळात आम्ही परत गमबूटधारी होऊन कॅनॉपीकडे निघालो. बोटीत बसण्याची सर्कस होतीच. पण सवय झाल्याने का कालच्या पावसामुळे नदीचे पाणी वाढल्याने थोड्या पाय-या कमी भासल्यामुळे असेल पण बोटीत बसणे तेवढे अवघड वाटले नाही खरे. नदी तीच पण काल रात्रीपेक्षा खूप वेगळी दिसत होती. परत कोणीतरी पाण्यात चॉकलेट मिसळल्यासारखे पाणी दिसत होते. पाण्याची ओढही चांगलीच जाणवत होती. एक तास प्रवास करून आम्ही अगदीच वेगळ्या जंगलात आलो. इथेही त्याच गाईडबाई आमच्याबरोबर होत्या. त्यांनी आम्हाला मसाल्यांची झाडे असणा-या बागेत नेले. वेगवेगळ्या मसाल्यांची झाडे पहात आम्ही त्यांच्यामागून फिरत होतो. जवळपास एक तासाचा फेरफटका झाल्यावर आम्ही कॅनॉपीजवळ आलो. मी मान वर केली तर आकाश दिसतच नव्हते. सगळीकडे उंचच उंच झाडे. काही झाडे सरळसोट उंच तर काही आपला फांद्यांचा पसारा पसरून बसलेली, वेगवेगळ्या उंचींची, मान वर करून आकाशाकडे बघणारी. किती प्रकारांची झाडे होती, त्यांची वैशिष्ट्ये अशी बरीच माहिती कानावरून जात होती. अशी माहिती ऐकताना बी.एस.सी च्या आभ्यासात कुठे कुठे काही वाचल्याची आठवण होत होती. पण ते तेवढ्यापुरतेच. परत आत्ता विचाराल तर पाटी कोरीच! नवीन माहिती छोट्याश्या डोक्यात साठवण्यापेक्षा आजुबाजूचे निसर्गातले दृश्य शिक्षण या वयात जास्त महत्वाचे वाटत होते. अचानक माझी नजर माझ्या समोर असलेल्या झाडावर जमिनीपासून सुमारे ४-५ फूट उंचावर असणा-या राखाडी तपकिरी बांडगुळासारख्या गोळ्याकडे गेली. तो कशाचा आहे हे विचारण्या अगोदरच त्यात काहीतरी हालचाल दिसायला लागली. बारकाईने पाहिले तर ते मुंग्यांचे वारूळ होते. आत्तापर्यंत मी मुंग्यांचे वारूळ जमिनीवर असलेले पाहिले होते. पण ह्या विशिष्ट जातीच्या मुंग्या असे झाडावरच आपले घर करतात. या मुंग्यांचे आणखीही वैशिष्ट्य असे की, त्यांची चव पेपरमिंटसारखी असते. (आपल्या नेहेमीच्या मुंग्या चवीला आंबट असतात म्हणे)! त्यांची चव घ्यायला माझा नवरा सोडून दुसरे कोणी धजावले नाहीत. मुंग्याच फक्त असे करतात असे नाही तर इतर कीटकही वेगवेगळ्या उंचीवर आपले बस्तान बसवतात. त्या उंचीची, तिथला सूर्यप्रकाश, वारा, पाऊस/पाणी, उपलब्ध खाद्याची त्यंना इतकी सवय झालेली असते की चुकून त्यांच्यापैकी कोणी खाली जमिनीवर पडला तर तो त्या उंचीवर लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करतो. आणि जमीनीवरचा कीटक चुकून वर गेलाच तर तो ताबडतोब खाली येतो. ऐकून खूपच गंमत वाटली.

एव्हाना आम्ही कॅनॉपीपर्यंत येऊन पोहोचलो होतो. शंभर-सव्वाशे पाय-यांचा भला मोठा मनोरा समोर उभा होता. जमिनीत रोवलेल्या भक्कम चारखांबांच्या चौकटीभोवती दर ८ ते १० पाय-यांनंतर काटकोनात वळणे घेणारा, मध्ये कुठेही बसण्याची सोय नसणारा हा सुमारे ३ फूट रुंदीचा,लाकडी पाय-यांचा, वरचेवर पडणा-या पावसाने शेवाळलेला जिना प्रथमदर्शनीच मनात धडकी भरवत होता. खालून मान उंच करून पाहिले तर छातीच दडपली माझी. १०० फूट म्हणजे १० मजल्यांची उंची झाली की ! एवढे चढून जायचे ? बापरे ! कस काय जमणार ? “निदान थोडेसे उंचावर तरी चढून बघ, नंतर हवं तर परत ये” “असे मला सांगून गाईडबाईंच्या मागोमाग माझा नवरा पहाता पहाता वर पोहोचला सुद्धा! त्यांच्यानंतर त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेलेही इतर सहपर्यटक चढायला लागले ते पाहून माझी मलाच लाज वाटली. लाजेकाजेखातर का होईना थोडातरी प्रयत्न करूया म्हणून मी पहिल्या पायरीवर पाय टाकला, सहज वर पाहिले तर ‘मी काय करतेय, वर येतेय का नाही’’हे बघण्यासाठी हे सगळ्यात वरच्या प्लॅटफॉर्मच्या काठड्यावरून इतके वाकले होते होते मी दिसले नाही तर ते आणखी वाकतील या भीतीने मी वर कधी चढून गेले माझे मलाच कळले नाही. वर पोहोचेपर्यंत जाम धाप लागली होती, घामाने पूर्ण आंघोळ झाली होती तरीही वर पोहोचल्यावर जे काही दृश्य दिसले ते पाहिल्यावर सगळा शीण दूर झाला.

आपण नेहमी झाडांकडे मान उंचाऊन पहातो इथे काही झाडे मान उंचाऊन, काही बरोबरीच्या नात्याने समपातळीवरून तर काही ‘आमची टाळू पहायला अजून तुम्हाला तुमची उंची खूप वाढवायला हवी ’’ असे सांगत आमच्याकडॆ पहात होती. खालच्या उंचीवरच्या झाडांच्या शेंड्यावर कावळे, चिमण्या, बूबू असे पक्षी होते तर समपातळीवरच्या झाडांवर त्यांच्या पेक्षा छोट्या आकाराचे पक्षी होते. दूरवर असणा-या उंच झाडांच्या मधल्या फाद्यांवरून केकाटणारी (हौलिंग मंकी) माकडे आमच्याकडे नवलाईने पहात होती. झाडाची उंची जेवढी जास्त तेव्हढे त्यावर वस्ती करणा-या मंडळीचे आकरमान लहान ही नवीनच माहिती कळली. इतके उंच चढून वर गेलो होतो तरी सूर्याची किरणे झाडांच्या फंद्यांच्या पसा-यातून अधूनमधूनच डोकावत होती. आम्ही उभे होतो तो पहिल्या मनो-याच्या सर्वात वरचा प्लॅटफॉर्म होता. तिथले आजुबाजुचे दृश्य बघून ७-८ पाय-या उतरून पहिल्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उतरलो. हा अंदाजे १०-१२ चौ.फुटांचा हा प्लॅटफॉर्म क्वीनीला या झाडाच्या लाकडाच्या फळ्या वापरून, यलो मोंबीन झाडाच्या साधारण ३/४ उंचीवर झाडाच्या भक्कम खोडाला लाकडी चौकटीच्या आधाराने बांधला होता. आजुबाजूंच्या झाडांचाही आधार मोठमोठ्या सळयांच्या, दोरांच्या सहाय्याने प्लॅटफॉर्मला दिलेला होता. इथेही आजुबाजूला कुठे हात लावण्याची सोय नव्हती कारण सर्वत्र मुंग्या व मुंगळ्यांचा संचार! दृष्टी जाईल तिथवर हिरव्या रंगाच्या विविध छटा दिसत होत्या. पानांचे आकार तर अगणितच. लहान मोठी, सरळ, लांबूळकी, गोल…. किती प्रकारची पाने होती म्हणून सांगू? आमच्या पेक्षा खालच्या उंचीवरच्या झाडांचे शेंडे, आमच्या पातळीवरच्या झाडांच्या फांद्या व पानांचे पसारे तर मोठ्या उंच झाडांचे प्रचंड मोठे बुंधे …….पहावे तितके नेत्रसुख होते. मी तरी जे दिसतंय त्यावर खुश होते पण आमच्या गाईडबाई आम्हाला तिथच थांबू द्यायला तयार नव्हत्या. आम्ही इकडे तिकडॆ पहात होतो तोवर त्या २ वेळा सिमेंटच्या रस्त्यावरून चालाव्यात तितक्या आरामात पहिल्या झुलणा-या पुलावरून पलिकडे भराभर जाऊन परत आल्या होत्या. आम्हाला त्या पुलावरून पलिकडे जाताना कोणती काळजी घ्यायची ते सांगून पहाता पहाता त्या पुनः पलिकडे गेल्या व दुस-या प्लॅटफॉर्मवर उभे राहून ओरडून आम्हाला बोलावू लागल्या.

आत्ता कुठे आम्हा सगळ्यांचे लक्ष इन्काटेराच्या प्रसिद्ध कॅनॉपीकडे वळले. २००५ साली पर्यटकांसाठी तयार केलेल्या कॅनॉपीवरून आम्ही जमीनीपासून सुमारे १०० फूट उंचीवरून झाडांच्या वरून चालणार होतो या कल्पनेतच इथे पोहोचण्यापूर्वी खूप थ्रिल वाटत होतं. पण आता प्रत्यक्ष ती कसरत करायची म्हणजे थ्रिलपेक्षा भीतीच जास्त वाटायला लागली. सुरक्षिततेची पूर्णतया काळजी घेऊनच या कॅनॉपीची बांधणी केलेली आहे. जगातली सर्वात मोठी व सुरक्षित अशी ही कॅनॉपी एकंदर ३४४ मीटर लांबीची आहे. दोन भक्कम टॉवरच्या मध्ये सहा पूल व आठ प्लॅटफॉर्म आहेत. उत्तम सामान वापरून बनवलेल्या उभ्या समांतर जाळीच्या मध्ये पाय ठेवण्यासाठी ठोकलेल्या आडव्या फळ्यांवरून हळूहळू चालत पुढच्या फलाटाकडे आम्हाला पोहोचायचे होते. ‘दोन्हीबाजुंच्या जाळीच्या वरच्या कडेला घट्ट पकडून खालच्या लाकडी फळीवर पाय ठेवून चालायचे, कोणत्याही परिस्थितीत डाव्या उजव्या बाजूला झुकायचे नाही, जाळी स्वतःपासून दूर करायची नाही, मध्ये थांबायचे नाही’ या गाईडबाईंच्या सूचना रिपीट करून हे बघताबघता दुस-या फलाटावर पोहोचलेही. मी पण देवाचे नाव घेतले एकदा ह्यांच्याकडे बघितले व कॅनॉपीच्या पहिल्या पुलावर पाउल टाकले. पायाखालच्या फळ्या पावसाने व उंचावरच्या झाडावरून गळून पडणा-या उंबराच्या जातीच्या फुटलेल्या फळांनी व पक्षांच्या प्रातर्वीधीने बुळबुळीत झालेल्या होत्या. गाईड्बाईंनी आमच्या आधी त्या फळ्यांवरून जाऊन फळ्या ब-यापैकी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता तरीही न घसरता ताठपणे चालण्यासाठी मला बरेच प्रयत्न करावे लागले. त्यातच नजरही खाली जमिनीकडे गेली. मग काय ! पाय लटपटणे आणखीच जोरात ! कसेबसे १९-२० मीटरचे अंतर कापले व ‘‘जितं मया’’ अशा आविर्भावात दुस-या फलाटावर पोहोचले. तोही यलो मोंबीनच्याच आधाराने उभा होता. आता मी धीट झाल्यासारखी त्या फलाटवर फिरणे, आजूबाजूची झाडे पहाणे, पक्षी निरीक्षण करणे असल्या व्हीआयपी लीलाही करायला लागले. तेवढ्यात पुढच्या पुलावर जायची वेळ आली व बघताबघता पुढचे पाच पूल कधी ओलांडले कळलेही नाही. मधले दोन पूल खूपच लांब म्हणजे ३६ व ४१ मीटरच्या जवळपास होते पण तोवर त्या झुलणा-या पुलांवरून चालण्याची युक्ती समजली होती व सवयही झाली होती. आणखी एक फरक लक्षात आला. नदीवरचा किंवा रस्त्यावरचा खूप उंचीवरच्या हलत्या पुलावरून चालणे व हे पूल पार करणे ह्यात मुख्य फरक पुलावरून खाली दिसणा-या दृश्यामध्ये होता.

नदीवरच्या काय किंवा रस्त्यावरच्या काय पुलावरून थेट आपण किती उंचावरून चालतोय हे कळते व जास्त भीती वाटते. इथे कॅनॉपीवरून खाली बघितले तर थोड्याश्याच उंचीवर झाडांचे शेंडे व पानांचा पसारा दिसतो, जमिनीचे दर्शन जवळपास नाहीच. त्यामुळे उंचीची भीती खूपच कमी वाटते व आपण मजेत सगळे पूल पार करतो. सहा पुलांच्या नंतर खरतर आता सातव्या पुलापलिकडे जाण्याची इच्छा नव्ह्ती. पण समोरून खुणावणारे ट्री हाउस थांबूही देत नव्हते. हा पूल ओलांडून गेले तर परतही त्याच पुलावरून यायला हवे होते कारण खाली उतरण्याचा जिना सहाव्या पुलानंतर होता. ट्री हाऊस हा ‘डेड एंडच’ होता म्हणाना त्या कॅनॉपीचा ! शेवटी दमलेल्या पायांना ‘नंतर आराम देण्याचं’ आश्वासन देऊन समोर असलेला सातवा पूलही पार केला व झाडावर बांधलेल्या ट्री हाऊसमध्ये थोडावेळ बसण्याची गंमत अनुभवलीच. परत येऊन १०० फूटांचे जिने उतरून खाली आलो. आजपर्यंत असले कुठलेही साहस न केलेल्या मला हा अनुभव फारच विलक्षण व आनंदाचा होता.

आता यापुढचा आमचा प्रोग्रॅम जेवणानंतर सॅंड ओव्हल या तळ्यातील बोटिंगचा होता. घसरत्या पाय-यांवरून नदीतील नावेत बसून आम्ही थोड्याश्या अंतरावरच्या तांबोपाटाच्या राष्ट्रीय जंगलात गेलो. नदीकाठ सोडून आम्ही वेगवेगळ्या उंचीच्या झाडांच्या टेरा फर्मा या भागातून व आजुबाजूची झाडे, वनश्री पहात अंदाजे एक तासभर चाललो. नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे वातावरण खूपच आल्हाददायक होते. जंगलातला फेरफटका संपवून आम्ही सॅंड ओव्हल लेकपाशी पोहोचलो. पुन्हा निसरडा रस्ता उतरणे भाग होते. पण आता जराजरा सवय झाली होती. निळेशार पाणी उन्हात चमकत होते व आमच्यासाठी ६-७ माणसे बसू शकतील इतक्या छोट्या नावा पाण्यावर डुलत आमची वाट पहात होत्या. ४-५ पावले पाण्यातून चालूनच यावेळी नावेत बसलो. नावाड्याने लांबलचक बांबू पाण्यात रोवला अन आम्ही तळ्याच्या मध्यात पोहोचलो. तसे तळे खूप मोठे होते असे नाही पण मधोमध असलेल्या जमीनीच्या उंचवट्याला व त्यावर असणा-या झाडांना वळसे घेऊन जात होते. पाणी भरपूर खोल असावे असे त्यात रोवल्याजाणा-या बांबूमुळे वाटत होते. निळ्या पाण्यात काठावरची झाडे आपले प्रतिबिंब पहात होती. आमच्या नावेच्या पाण्यात शिरण्याने पाण्याच्या पृष्ठभागावर जे तरंग उठत होते त्यावर उन्हाचे छोटे छोटे कवडसे नाचत होते. नावा हळूहळू काठ सोडून पाण्यात शिरल्या. एक वळण घेतले व समोर दिसणारे दृश्यच बदलले. तळ्याच्या दुस-या काठावर बरीच झाडे दाटीवाटीने आपापला फांद्यांचा व पानांचा पसारा सांभाळून उभी होती. दूरून त्यावर निळ्या, पिवळ्या रंगांची फुले फुलली असावीत असे दिसत होते. जसजसे त्या झाडांच्या जवळ जाऊ लागलो तसतशी त्या फुलांची हलचाल होतेय असे दिसायला लागले. खूपच आश्चर्य वाटू लागले. आणखी जवळ जाताच चक्क फुलांच्या ऐवजी पिवळे, निळे पंख असणारे अतिशय सुंदर पक्षी हालचाल करत होते असे दिसले. दूरून दिसणा-या फुलांच्य जागी पक्षी असलेले पाहून खूप गंमत वाटली. लाल मान, निळे, हिरवे, पिवळे रंग असलेले मॅकॉ जातीचे पक्षी कळप करून झाडांवर बसलेले होते. हे पक्षी दिसायला अतिशय सुंदर आहेत. ते फळे, शेंगातल्या बिया, झाडांच्या साली वगैरे खातात. त्याबरोबर विषारी द्रव्येही त्यांच्या पोटात जातात.

ती पचवण्यासाठी ते त्यांच्याबरोबरच मातीही खातात म्हणे! अचानकपणे त्या पक्षांचा मूड बदलला व भूर्रर्र करून सगळा थवा उडून गेला. आम्हीही पुढच्या वळणवर पोहोचलो. तिथे राखाडी मान असलेले,तपकिरी डोळ्यांचे, केशरी पंखांना काळी झालर असणारे, डोक्यावर टोकदार तपकिरी तुरे अस्णारे हॉटझीन जातीचे पक्षी आमची वाटच पहात होते. हे पक्षी झाडांच्या खोडाच्या रंगाशी बरेचसे साम्य असणारे असल्याने दूरून लक्षात येत नाहीत. हे ही दिसतात छान पण त्याचा वास मात्र खूपच घाण आहे. पूर्ण शाकाहारी असूनही त्यांच्या चयापचय क्रियेतून बाहेर पडणा-या वायूचा तो वास असतो. याशिवाय काळे कॅमनस, हमिंग बर्डस तर किती पाहिले याची गणतीच नाही. तळ्याच्या पाण्यात मासीही भरपूर होते. दोन तास तरी आम्ही कधी झाडांच्या कमानी खालून तर कधी छोट्याश्या बोगद्यातून नावेतून फिरत होतो.खूप आनंद देणारा अनुभव मनात साठवून आम्ही परत आमच्या खोलीत आलो.

रात्री परत एकदा नदीतून रात्रीचे प्राणी शोधण्याची मोहिम झाली. पांढरे घुबड पहायला मिळाले. ज्याच्या नुसत्या स्पर्शानेही समोरचा प्राणी मरेल इतका विषारी बेडूकही बघायला मिळाला. परत पुन्हा अगुती वगैरे मंडळींची गाठभेट झाली. आता तिथला परिसर परिचयाचा झाला होता. त्यामुळे रात्रीच्या चांदण्यात नदीपर्यंत फेरफटकाही मारून झाला. सकाळी उठल्यावर पहिले काम दोन दिवस आमच्या पायाशी जुळवून घेणारे गमबूट परत करणे हे होते. आपल्याला एकादी गोष्ट उपयोगी पडते तोवरच ती हवी असते. गमबूटांचेही तसेच. चिखलाने माखलेले आमचे गमबूट हातात धरून कसे काय ऑफिसपर्यंत न्यायचे असा प्रश्न साहजिकच डोक्यात आला. पण सकाळी चहाच्या वेळी जमलो तेंव्हा बूट फक्त खोलीच्या बाहेर ठेवायचेत असे कळले व हायसे वाटले. तोच दुसरा प्रश्न मनात आला की इतके सारे बूट आता परत स्वच्छ कसे करणार? आम्हाला आमची उत्सुकता स्वस्थ बसू देईना. आम्ही आमचे बूट घेऊन जाणा-या सेवका मागोमाग गेलोच. एका तिरक्या सळईत बूट अडकवून त्यावर जोराचा पाण्याचा व हवेचा फवारा मारण्याची सोय पाहिली. पाच मिनिटात बूट काळेशार व नवीन पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज!

दुसरे दिवशी सकाळीच आम्ही आमचा मुक्काम हलवून कुझकोला परत जाणार होतो. इथे येताना य़ावेसे मनापासून वाटत नव्हते तसेच जातानाही जावेसे वाटत नव्हते. तिथल्या सर्व सेवकांना व आमच्या गाईडबाईंना धन्यवाद देऊन आम्ही परतीच्या मार्गाकडॆ वळलो. परत तांबोपाटा नदीतला परतीचा प्रवास सुरू झाला तरी नजर मात्र वरचेवर इंकाटेरा लॉजकडे परत परत वळत होती. एखाद्या ठिकाणी जाऊन एक सुद्धा वस्तूची खरेदी झाली नाही अशी ही पहिलीच वेळ असावी. दरवेळी खरेदीमुळे बॅगा जड होतात. यावेळी मन जड झालं होतं ! कशाने ते सांगू? आयुष्यात कल्पनेतही न केलेलं प्रत्यक्षातलं साहस, जंगलातले वास्तव्य, अगुतींचा सहवास, शंभर फूट उंचीवरून डोंबा-यासारखे झुलत्या पुलावरून चालणे, अद्भुत किमया दाखवणारी झाडे, विविध पक्षी………यातलं सगळं सगळं मनात भरून राहिलं होतं म्हणून. यातलं काही म्हणता काहीही विसरणे शक्य नाही.

— अनामिका बोरकर
A १८, वुडलॅंडस, गांधी भवन मार्ग,

कोथरुड, पुणे ४११ ०३८.
९८१९८६९०९०

1 Comment on तांबोपाटा जंगलातला निवास – पेरू

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..