नवीन लेखन...

इंग्रजी माध्यमातल्या इतिहासाच्या पुस्तकातला तानाजी उर्फ ‘सिंह’

‘विरारच्या नॅशनल शाळेत इयत्ता ४ च्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचे पुस्तका’चं एक पान आज एका ग्रुपवर वाचनात आलं. त्यात तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते असा स्पष्ट उल्लेख आहे. कोंढाण्याच्या लढाईत तानाजी मालुसऱ्यांना वीरमरण आले म्हणून कोंढाण्याचे नाव “सिंहगड” असे ठेवले असा इतिहास असताना, तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते, त्यामुळे कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले गेले असा इतिहास या पुस्तकांत असून तो तसाच शिकवला जात असावा असा संशय घेण्यास जागा आहे.

आता हे पुस्तक खरोखर अस्तित्वात आहे किंवा नाही, असल्यास त्याच शाळेत आहे की महाराष्ट्रातल्या सर्वच शाळांत आहे, तसं असल्यास कुठल्या माध्यमाच्या आणि नक्की कुठल्या यत्तेत आहे, बोर्ड राज्य की सीबीएसई की आयसीएसई अशी न संपणाऱ्या प्रश्नांची मालिकाच्या मालिका मनात फेर धरते. पण आपण शिक्षणाचा, विशेषत: प्राथमिक, जो खेळखंडोबा चालवलाय, तो पाहाता, असं होणं अगदीच अशक्य आहे असंही नाही.

पुस्तकातला हा धडा वाचून मला त्या सिंहगडावर जाऊन आत्महत्या करावीशी वाटली. शिवाजी-तानाजीने तर कदाचित केलीही असेल वर, माहीत नाही. विनोदी गोष्ट चटकन लक्षात राहाते म्हणून विनोद कुठे करावेत याचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. हा दैदिप्यमान इतिहास आहे आपला, त्याचं असं हसं नका हो बनवू. त्यापेक्षा तो नका शिकवू. काहीतरी विकृत शिकवण्यापेक्षा इतिहास विसरलेला किंवा माहितच नसलेला जास्त चांगला, अज्ञानात सुख असतं तसा..!

तानाजीचं टोपण नांव ‘सिंह’ होतं हा शोध कोणत्या शहाण्याने लावला? तानाजीला महाराजांनी ‘सिंह’ का म्हटलं, हे माहित असायला प्रथम सिंहाचा आणि शोर्याचा संबंध काय ते कळायला हवं. त्यासाठी मराठी भाषा माहित हवी. त्या त्या भाषेतले वाक्प्रचार त्याच भाषेच्या संदर्भात पाहीले तर जास्त चांगले समजतात. ‘सिंहाची छाती’, ‘सिंहासारखा शूर’ हे मराठी मुलांना मराठीतून जेवढं चांगलं कळेल तेवढं भाषांतरीत इंग्रजीतून कसं कळेल? ‘अॅन अॅपल अ डे, किप्स डाॅक्टर अवे’ हे इंग्लंडासारख्या थंड प्रदेशातील मुलांना नीट कळेल. आपण इथे ही म्हण तीचा मुळ प्रदेश, हवामान व संस्कृती लक्षात न घेता वेड्यासारखी वापरतो. आपल्या देशात मुळात अॅपल हे फळ थंड काश्मिर सोडलं तर कुठेच पिकत नाही, त्यात ते मोसमी, महागडं, कसं आणि कोणाला परवडायचं ते रोज? पण नाही, इंग्रजीत म्हण आहे ना, मग ती बरोबर. असंच या सिंहाचं झालंय.

तानाजीचं टोपण नांव ‘सिंह’ होतं हे पुस्तकातलं वाक्य वाचून मला पुढचा धोका जाणवला आणि पोटात गोळा आला. आमच्या मुंबईत कांस्मोपाॅलिटन वस्ती असते. म्हणजे एकाच मजल्यावर साळुंखे, पटेल, अय्यर, मिश्रा, चोप्रा, बॅनर्जी वैगेरे आपापलं प्रांतियत्व सांभाळत राष्ट्रीय एकात्मता वैगेरेही जमेल तशी सांभाळत असतात. या सर्व भिन्न प्रांतिय-भिन्न भाषिक मुलं मात्र एकाच इंग्रजी माध्यमात शिकत असतात. आता या उत्तर प्रदेशी मिश्रा किंवा पंजाबी चोपरांचं पहिलं नांव हटकून ‘xxxx सिंह’ वैगेरे असत. उदा राजनाथ सिंह किंवा गुरुविंदर सिंह इत्यादी. या धड्यातलं तानाजीचं टोपण नांव ‘सिंह’ होतं हे वाचून, तानाजी उद्या युपीवाला किंवा पंजाबी होता असा समज इथल्या मुलांचा झाला तर आश्चर्य वाटायला नको (असं वाटलंच तर राष्ट्रीय एकात्मता साधली गेल्याचं पुण्य मात्र नविन इतिहासाचार्यांना अनायासे मिळेल हा फायदा.)

‘तानाजीचे टोपण नांव सिंह होते. त्याच्या मानार्थ किल्ल्याचे नांव सिंहगड पडले’ ही वाक्य रचना नेमकी कुठली? मानार्थ की स्मरणार्थ? पडले की दिले की मिळाले? पुढे खाली मराठी शब्दांचे इंग्रजीत अर्थ दिले आहेत. त्यात ‘ऐतिहासिक’चा इंग्रजी अर्थ ‘Ancient’ असा दिला आहे. ‘ऐतिहासिक’ या शब्दाचा इंग्रजी अर्थ Historical असा असला पाहीजे, तो थेट ‘प्राचिन’ असा का आणि कोणी केला? यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, की आपल्या मुलांना धड त्यांची मातृभाषाही येत नाही आणि इंग्रजी तर त्याहूनही येत नसावी. भाषेसारख्या संपर्काच्या अगदी प्राथमिक गोष्टीची ही अवस्था असेल तर काय तो देश प्रगती करणार?

धन्य ते पुस्तककर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी सरकारही..!

कुसुमाग्रजाच्या वेळेस डोईवर मुगुट (की मुकूट?) घालून मंत्रालयाबाहेर उभी असलेली मराठी भाषा पार नग्न होऊन महाराष्ट्राच्याही बाहेर काढली गेलीय आपल्याकडूनच. द्रोपदीची साडी फेडली जात असताना एकापेक्षा एक वीर असलेले तिचे पती जसे शांत बसले होते, त्या षंढ भुमिकेत सध्या आपण सर्व आहोत. कसली पोलादी मनगटे नी कसली फत्तराची छाती..!!

जय महाराष्ट्र..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..