असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes)शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते त्यासाठी आपणास काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते, जेणेकरून कोणतीही फसवणूक किंवा नुकसान टाळता येईल. त्याकरिता पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत.
१. वैयक्तिक माहितीची गोपनीयता
मोबाईल बँकिंग करताना वापरावी लागणारी कोणतीही माहिती उदाहरणार्थ तुमचा डेबिट कार्ड नंबर, अकाउंट नंबर, ओटीपी किंवा मोबाईल लोगिन पासवर्ड, m.पिन, युपीआय पिन कोणाजवळही उघड करू नका. ही माहिती गुप्त राखा. कोणतीही बँक कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची माहिती आपल्या ग्राहकांना विचारत नाही हे लक्षात ठेवावे. जर तुम्हाला अशा पद्धतीचा तुमची गोपनीय माहिती विचारणा संदर्भात फोन आला तरीही ही माहिती देऊ नये प्रत्यक्ष बँकेत जाऊन खात्री करावी.
सोशल मीडियाचा वापर करताना देखील शक्यतो वैयक्तिक माहिती कमीत कमी उघड होईल याची काळजी घ्यावी.
२. मोबाईल ॲप्स लॉक व मोबाईल लॉक
मोबाईल बँकिंग सुरक्षितता म्हणजे साहजिकच मोबाईलची सुरक्षितता प्राधान्याने येते. मोबाईल मध्ये स्क्रीन लॉक हा पर्याय असतो त्याचा वापर करा. याशिवाय मोबाईल बँकिंग करण्यासाठी जे ॲप तुम्ही वापरता त्यालाही पॅटर्न लॉक अथवा पासवर्ड लॉक तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे द्विस्तरीय सुरक्षितता मिळते.
३. पासवर्ड सुरक्षा
मोबाईल बँकिंग करताना आपणास विविध पासवर्ड वापरावे लागतात, त्याबाबत सुरक्षितेच्या दृष्टीने पुढील खबरदारी घ्यावी.
— मोबाईल बँकिंग करताना वापरायचे पासवर्ड काही ठराविक कालावधीनंतर बदलत राहावे.
— पासवर्ड तयार करताना अक्षरे, अंक आणि सिम्बॉल याचा वापर करून तयार करावा. सहज अंदाज करता येईल असे नाव, जन्मतारीख, गाडी नंबर, परिवारातील व्यक्तीचे नाव अशा गोष्टी पासवर्ड म्हणून वापरू नयेत.
— पासवर्ड कुणालाही सांगू नये तसेच तो कोठे लिहूनही ठेवू नये.
४. मोबाईल बँकींग ॲप्स बाबत
मोबाईल बँकिंग करण्यासाठी जे ॲप्स आपण वापरतो त्याबाबत पुढील प्रमाणे उपाय योजना करून सुरक्षितता वाढवता येते.
— ॲप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोर सारख्या अधिकृत ॲपस्टोरचाच वापर करावा
— मोबाईल बँकिंग करण्यासाठी शक्यतो बँकेने उपलब्ध केलेले अधिकृत ॲप्सचा वापर करावा कारण त्यामुळे अधिक सुरक्षितता मिळते.
— मोफत वायफाय असलेल्या ठिकाणी मोबाईल बँकींग ॲप्स वापरून बँकिंग व्यवहार करू नये.
५. वॉलेट्स चा योग्य वापर
नोटाबंदीनंतर ई- वॉलेट्स चे पेव फुटले आहे. अनेक विविध आकर्षक योजना दाखवून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न या कंपन्यांकडून होत आहे. अशावेळी सुरक्षितेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी.
— एखादे ॲप डाउनलोड करण्याआधी त्याची गरज आहे का याचा विचार करा आणि आवश्यक असेल तरच डाऊनलोड करा. नवं ते हवं या तत्त्वानुसार नवनवीन इ-वॉलेट चा वापर टाळावा
— वॉलेट्स मध्ये आवश्यक असेल तेवढीच रक्कम भरून ठेवावी. गरज असेल तेव्हाच वॉलेट मध्ये पैसे ॲड करावे.
— वॉलेट डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सुरक्षितता तपासून घ्या. ते ॲप वापरण्यासाठी विनाकारण अनावश्यक वैयक्तिक माहिती द्यावी लागत नाही ना हे तपासा. आपल्या कोणत्या परमिशन लागतात हे पहा.
६. मोबाईल बँकिंग साठी वेगळे अकाउंट असणे
मोबाईल बँकिंग करण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे मोबाईल बँकिंग करण्यासाठी वेगळे बँक अकाउंट असणे होय. त्याकरिता आपल्याला जेवढी रक्कम दरमहा मोबाईल बँकिंग करण्यासाठी अथवा इ वॉलेटचा वापर करण्यासाठी लागेल तेवढी रक्कम जमा असलेले एक वेगळे अकाउंट वापरता येईल आणि बँकिंग करण्यासाठी केवळ याच अकाउंट्सच्या डिटेल्सचा वापर आपणास करता येईल आणि आपले मुख्य सॅलरी अथवा सेविंग अकाउंट सुरक्षित ठेवता येईल.
अर्थात सर्वच व्यवहारासाठी असे करता येणार नाही परंतु किरकोळ रकमेच्या व्यवहारासाठी सतत मुख्य अकाउंटचा तपशील येण्याचा धोका टाळण्यासाठी या पर्यायाचा वापर करता येईल.
७. इतर टिप्स
— ई-मेल द्वारे अथवा मेसेज द्वारे मिळालेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन शॉपिंग करू नका किंवा इतर कोणतेही व्यवहार करू नका. लिंक पाठवलेल्या व्यक्तीकडून त्याबाबत माहिती घेतल्यानंतरच त्याचा वापर करावा.
— वापर नसेल तेव्हा मोबाईल मधील ब्लूटूथ, वायफाय, डाटा कनेक्शन आणि लोकेशन बंद करावे. आवश्यक असेल तेव्हाच या गोष्टी वापराव्यात.