“मनात जितके गुपितं नसतील तितके गुपित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. या गुपितांना एक पासवर्ड टाकला की ते सुरक्षित आहे, असा आपला समज होतो. पण,वरकरणी सेफ वाटणारे हे तंत्रज्ञान किती तकलादू आहे, हे आता समोर येऊ लागले आहे. ‘आपली गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे’ असा टाहो फोडत प्रायव्हसी स्टेटमेंट देणाऱ्या कंपन्यांचीच प्रायव्हसी धोक्यात येत असेल तर आपल्या प्रायव्हसीची काय कथा!”
तंत्रज्ञानाच्या विळख्यातील प्रायव्हसी!
आपल्या खिशात असलेल्या मोबाईल फोनला आपण पासवर्डच्या खुणेने किंवा परवलीच्या आकड्याने कडेकोट बंदिस्त करून ठेवतो..काही अत्याधुनिक मोबाईल कंपन्यांनी तर अंगठ्याचे ठसे आणि डोळ्यांच्या बुब्बुळांची खात्री पटवूनचं मोबाईल सुरु करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे, आपला मोबाईल आणि त्यातील खासगी डाटा पासवर्डने सुरक्षित असल्याचा आपला विश्वास असतो. पण, गोपनीयता आणि सुरक्षिततेचा हा विश्वास किती आंधळा आहे, हे एका हेरगिरी प्रकरणाने उघड केले आहे. एनएसओ नावाच्या इस्रायली कंपनीने ‘पेगासस’ नावाचे स्पायवेअर तयार केले असून त्याद्वारे वेगवेगळया देशातील मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार व वकिलांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘पेगॅसस’ नावाचे व्हायरस टाकून त्यांचे मोबाईल हॅक केल्याची माहिती व्हॉट्स अॅप संचालित करणाऱ्या फेसबूक कंपनीने अमेरिकेतील न्यायालयात दिली. यात भारतातील जवळपास दीड हजार जणांवर या माध्यमातून ‘नजर’ ठेवली जात असल्याचाही खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान इतके अत्याधुनिक आहे की ते स्मार्ट मोबाइलमध्ये घुसविण्यासाठी फार काही करावे लागत नाही. ज्याच्यावर लक्ष ठेवायचे त्याला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केला जातो आणि त्याने तो घेतला की हे पेगॅसस सॉफ्टवेअर त्याच्या फोनमध्ये शिरकाव करते. हे एकदा साध्य झाले की नंतर त्याद्वारे चोरून संभाषण ऐकणे, पासवर्ड चोरणे, संदेश, फोनमधील अॅड्रेस बुक, बँका आणि इतर नोंदी असे हवे ते काम हे पेगॅसस करतेच. पण ते इतके प्रगत आहे की फोन मालकास जरा देखील संशय न येऊ देता त्याचा कॅमेरा वा माइक सुरू करता येतो आणि हेरगिरी करावयाची आहे त्याच्या हालचालीचे, संभाषणाचे थेट प्रक्षेपण देखील केल्या जाऊ शकते. त्यामुळे माणसाच्या आयुष्याचे खासगीपण किती असुरक्षित झाले आहे, याचा अंदाज येतो.
पेगासस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील आणि जगातील काही विशिष्ट लोकांची हेरगिरी करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. ती कुणी व का केली? याचे उत्तर मिळेल किंवा कदाचित मिळणारही नाही. ‘पेगासस’ सॉफ्टवेअर बनवणाऱ्या इस्रायली कंपनीने आपण हे सॉफ्टवेअर फक्त देशोदेशीच्या सरकारांनाचं विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतात त्याचा वापर करण्याची परवानगी कोणी दिली? कोणाकोणाचे फोन असे ‘चोरून’ बघण्यात आले? का बघण्यात आले? याचा शोध घेतला जाणे गरजेचे आहे. कारणे या प्रकरणी व्हाट्सअप ला नोटीस बजावली आहे. परंतु, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय एका विचारसरणीच्या लोकांची हेरगिरी कशी करण्यात आली? हा प्रश्न संशय निर्माण करतो. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देशातील पंधराशे जणांवर व्हाट्सअपच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली होती. यात विशेषता मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि वकिलांचा समावेश आहे. त्यामागे कुणाचा काय उद्देश होता, हे स्पष्ट झाले पाहिजे. सदरची हेरगिरी सरकार पुरस्कृत होती का? याचंही उत्तर मिळालं पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा किंवा तत्सम कारणे पुढे करून अनेक सरकारांनी अशा प्रकारची हेरगिरी केली असल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. त्यामुळेच संशयाचे धुके दाट होण्याआधी या प्रकरणाचा उलगडा सरकार कडून केला जायला हवा!
महत्त्वाचे म्हणजे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केल्याची कबुली इजराइल कंपनीने दिली आहे. सदर सॉफ्टवेअर आपण केवळ देशांच्या सरकारांनाचं देत असल्याचे या कंपनीने म्हटले असले तरी तंत्रज्ञानावर कुणा एकाची मक्तेदारी फार काळ टिकून राहत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आपले स्मार्टफोन कितपत सुरक्षित आहेत?, याचा विचार करावा लागणार आहे. आपली जीवन जगण्याची सुलभता अधिक व्यापक करण्यासाठी मानवाने वेगवेगळ्या साधनांचा शोध लावला, मात्र या संसाधनांनी निर्माण केलेल्या आभासी जगात किती मग्न व्हायचे? याची मर्यादा त्याला न ठरवता आल्याने हेच तंत्रज्ञान आज त्याच्या जीवावर उठू लागले असल्याची बाब आता विविध प्रकारे अधोरेखित होऊ लागली आहे. आज लहान मुलांपासून ते आबालवृद्धांचा खिसा स्मार्टफोनने व्यापून घेतला. हातात स्मार्टफोन आला म्हटल्यावर सतत काहीतरी करण्याचा मोह प्रत्येकालाचं होतो. त्यात सोशल मीडियामुळे तर दिवसाचे चोवीस तास आपण मोबाईल मधेच गुंतलेले असतो. तंत्रज्ञान जसजसे प्रगत होऊ लागले आहे तसतसे माणूस मोबाईलच्या अधीन होऊ लागला आहे. बँकेचे व्यवहार, कामाच्या नोंदी, व्यवहाराची डिटेल्स, मेडिकल माहिती इतकेच काय तर खासगीतली खासगी गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असते. मनात जितके गुपितं नसतील तितके गुपित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. या गुपितांना एक पासवर्ड टाकला की ते सुरक्षित आहे, असा आपला समज होतो. पण,वरकरणी सेफ वाटणारे हे तंत्रज्ञान किती तकलादू आहे, हे आता समोर येऊ लागले आहे. ‘आपली गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे’ असा टाहो फोडत प्रायव्हसी स्टेटमेंट देणाऱ्या कंपन्यांचीच प्रायव्हसी धोक्यात येत असेल तर आपल्या प्रायव्हसीची काय कथा! ‘एंड टू एंड एन्क्रिप्शन’ची वारंवार ग्वाही देणारे व्हाट्सएप असो की व्यक्तिगत माहिती सुरक्षित ठेवण्याची हमी देणारे फेसबूक असो. सगळ्यांच्याच प्रायव्हसीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मध्यंतरी फेसबुकसारख्या लोकप्रिय माध्यमांवरून तब्बल ५ कोटी यूजर्सचा डेटा चोरीला जाऊन त्याचा निवडणुकीत गैरवापर करण्यात आल्याची बाब उघड झाली होती. आता व्हाट्सअपच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा प्रकार समोर येत आहे. सोशल मिडिया असो की कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर किती आणि कसा करायचा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.
पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आलेल्या हेरगिरी प्रकरणातून काय आणि किती सत्य बाहेर येईल, याबाबत सध्या तरी सांशकता आहे. व्हाट्सअप सॉफ्टवेअर कंपनी आणि भारत सरकार यांच्यातील आरोपांचा सूर बघितला तर याही प्रकरणाची सारवासारव करण्यात येणार असल्याचे जाणवते. त्यामुळे तथ्य आणि सत्य बाहेर येईलच, याची शाश्वती देता येत नाही. एक मात्र खरे की, आधुनिक तंत्रज्ञानाला कुठलाही गेट किपर नाही आणि त्याला बंधन घालणेही शक्य राहिलेले नाही. आज पिगॅसस सॉफ्टवेअरचे तंत्रज्ञान समोर आले. उद्या कोणतं सॉफ्टवेअर येईल, हे सांगता येत नाही.काळाप्रमाणे तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने बदल येत आहेत. वर्षानुवर्षे वापरले जाणारे तंत्र आता काही दिवसांतच नव्हे, काही तासांतच कालबाह्य होत आहे. आज मनुष्य आणि तंत्रज्ञान यांचा हातात हात घालून प्रवास सुरू असला, तरी तंत्रज्ञानाचा वेग असा काही आहे की भविष्यात काय होईल आणि त्याचे काय परिणाम असतील याचाही अंदाज लावणे महाकठीण आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या युगात आपली प्रायव्हसी अबाधित राखायची असेल तर संयम ढळू न देता या माध्यमांशी विवेकाने जुळवून घेणे फार जरुरीचे आहे..!
— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर
Leave a Reply