तारकांचे पुंज माळून, वाटते तुझ्या कवेत यावे,
दुःखांच्या आभाळीही,
मुक्त बघ जरा हिंडावे,–!!!
घायाळ जीव तो आंत आंत,
तो कोणा कसा कळावा,-? आत्म्यानेच आत्म्याला,
दिलासा कसा कुशीत द्यावा,–!!
ओढ नसावी शरीरातून,
असावी प्रीत मनामनांची,
धागे एकमेकांत गुंफत,
वीण गुंतावी काळजांची,–!!!
तुझे दुःख माझ्या उरात सले,
माझे व्हावे ना रे तुझे,
अश्रू माझे गाली सांडताना,
राजा,अंतर मात्र तुझे उले,–!!!
बंबाळलेली दोन्ही हृदये,
हाक परस्परांना देती,
प्रेमावाचून संकेतांची,
ताकदवान भाषा कोणती,–!!!
दुनिया केवढी निष्ठूर असे, निरपराधास शासन मिळे,
जो करतो काम प्रामाणिक,
त्याची कदर ठेवत नसे,–!!!
हुंदके दाबून ठेवलेले,
तुझ्या मिठीतच सांडावे, सामर्थ्यशाली बाहू तुझे,
वाटते मला भोवती असावे,-
जग तूच केवळ माझे,
तुझ्या सुखी जर आंच येते,
टेकडीसमान खंबीर मी, कोसळल्यागत पाहत राहते,–!!!
मिलन व्हावे दोन जिवांचे, एकरूपता अशी यावी,
तुझ्या मिठीत मरण सुखे एकमेव आंस माझ्या हृदयी,–!!!
शृंगाराची पूजा निव्वळ,
वासनेचा लवलेश नसे,
मुक्त त्या प्रणयक्रिडांत,
प्रेम ओतप्रोत असे,–!!!
तुझे भरले डोळे पुसुनी,
त्यावर ओठ टेकत आपुले,
दुःखच सारे घेईन पिऊनी,
खुशाल जगास मग झिडकारले,–!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply