तारफुल म्हणजे नावावरून कोणाला वाटेल की कुठल्या तरी रानटी किंवा जंगली फुलांचा प्रकार आहे. पण तारफुल म्हणजे ताडाच्या झाडाला येणारे फळ. आमच्या आगरी भाषेत ताडफळाला तारफुल बोलतात. उन्हाळ्यात थंडगार व गोड गोड ताडफळा साठी हल्ली खूप मागणी होत आहे.
मागच्या आठवड्यात ठाण्याला गेलो असता एका हातगाडीवर एक भैय्या हीच तारफुला विकत होता. त्याला सहज भाव विचारला तर त्याने 75 रुपये डझन एवढा भाव सांगितला. म्हणजे एका तारफुलातल्या एका गोळ्याला साधारण पणे सहा रुपयापेक्षा जास्त दराने विकलं जातय. एका तारफुलात साधारण पणे तीन ते चार गोळे असतात आणि चांगल्या प्रकारे बाजणाऱ्या ताडाच्या झाडावर एका वेळेला 8 ते 10 पेंडी आणि त्यावर प्रत्येकी 30 फळं पकडली तर सुमारे 250 ते 300 तारफुला निघतील म्हणजेच साधारण 1100 गोळे. आपण फक्त 90 डझन पकडले आणि 60 रुपये भाव गृहीत धरला तर साधारण पाच ते साडेपाच हजार एका झाडापासून उत्पन्न मिळू शकतं. आमच्या शेतावर अशी पाच झाडे आहेत ज्याना तारफुला लागतात. पण यातली बहुतेक सगळी तारफुला पाडली न गेल्याने जून होऊन किंवा ओजून जातात व खाली गळून पडतात.
चार ते पाच झाडांपासून वर्षाला वीस ते पंचवीस हजार उत्पन्न घरबसल्या मिळू शकतं. बरं या झाडांना खत पाणी वगैरे काही बघायला लागत नाही. शेताच्या बांधावर किंवा पडीक जागेत याच एखादं फळ एकदा रुजलं की ते मरता मरत नाही. त्याला आग लावली गेली किंवा त्याला तोडलं तरी ते वाढतच राहतं. फक्त फळं येण्यासाठी 15 ते 20 वर्ष लागतात एवढंच. मागील काही वर्षांपासून या ताडाची पिकलेली किंवा गळून गेल्याने खाली पडलेली असंख्य फळे मी पडीक किंवा ओसाड जागेवर टाकली त्यातली बहुतेक फळं रुजली व वाढू लागली आहेत. माझ्या लहानपणी मी आमच्या घरात बघायचो माझे चुलत भाऊ या ताडाच्या झाडांपासून ताडी काढायचे. औषधी गुणधर्म असणारी ताजी व भेसळ नसलेली ताडी घरातल्या लहान मुलांना सुद्धा पाजली जायची.
मागच्या आठवड्यात ठाण्यात ताड फळ विक्रेता पाहिल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या एका चुलत भावाने घरासमोरील एका ताडाच्या झाडावरील तारफुलांच्या चार पाच पेंडी तोडल्या व माझ्या घरी दोन पेंडी मुलांना खाण्यासाठी पाठवल्या. माझ्या मुलीला जेव्हा ताडफळ खायला दिले तेव्हा तिने हे “जेली फ्रुट” आहे का असे विचारल्यावर मला या तारफुला बद्दल लिहावंसं वाटलं.
ताडी जसजशी शिळी होत जाते तसतसा तिला एक प्रकारचा उग्र वास येत जातो व अशी शिळी ताडी प्यायल्याने थोडीशी नशा सुद्धा येत असते. पूर्वी तर या ताडी पासून घरोघरी दारू सुद्धा काढली जात असे. एखादा खास पाहूणा आला की त्याच्यासाठी हि ताडीची दारू दिली जात असे. जहाजावर असताना परदेशात एकजण भेटला होता त्याने भारतीय आहे असे समजल्यावर त्याने भारतातल्या ताडीच्या दारुबद्दल आवर्जून सांगितले. त्याने ताडीच्या दारूला तुम्ही ब्रँडिंग किंवा पेटंट काढून उत्पादन का नाही काढत असा प्रश्न देखील विचारला. त्याच्या प्रश्नावर उत्तर नव्हते त्यावेळेला, पण ताडी जिला औषधी गुणधर्म आहेत शरीर व आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणाऱ्या ताडी कडे नशा आणणारे चिप कॅटेगरीतील पेय म्हणूनच पहिले जात असल्याने आजपर्यंत कोणी ब्रँडिंग किंवा पेटंट च्या भानगडीत पडले नसावे.
जसजसे शहरीकरण होत गेले तसतसं ताडी काढण्याचे प्रमाण कमी कमी आणि हल्ली तर जवळपास बंदच होत गेलं आहे. ताडीमाडी विक्री केंद्रावर हल्ली मिळणारी ताडी हि केमिकल च्या साहाय्याने बनवली जाते. केमिकल पासून बनवलेली ही ताडी अत्यंत घातक व जीवघेणी असते. पूर्वी आमच्या भिवंडी तालुक्यात बहुतांश घरामध्ये ताडी विक्रीचा जोडधंदा केला जात असे. पण मासेमारी व शेती या पारंपरिक व्यवसायांसह ताडीसारखा जोडधंदा सुद्धा हल्ली जवळपास लुप्त होत चालला आहे. एकतर ताडाची झाडे शहरिकरणामुळे तोडली गेली. तसेच ताडाच्या उंच झाडावर चढण्यासाठी लागणारी ताकद आणि हिम्मत आताच्या युवक आणि तरुणांमध्ये दिसत नाही. ताडी आणि ताड फळं हे उत्पन्न किंवा व्यवसायाचे साधन बनू शकते म्हणून कोणी विचार केला नाही. एखादा भैय्या किंवा परप्रांतीय येऊन आपल्या भागात पिकणाऱ्या फळांवर स्वतःच पोट भरतोय आणि आपण आपल्या जागेत आपल्या भागात असलेल्या नैसर्गिक खजिन्याकडे दुर्लक्ष करून वाया तर घालवतोयच पण स्वतःच नष्ट सुद्धा करतोय.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply