यानंतर दोन मोठ्या कार्यक्रमांसाठी मी गायलो. माझे आवडते संगीतकार एस.डी. बर्मन आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा एक प्रदीर्घ कार्यक्रम इंद्रधनू या संस्थेने केला आणि माझे गुरू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या रचनांचा ‘श्रीकांतसंध्या’ हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकरता साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे आम्ही सादर केला. या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायिका रंजना जोगळेकर आणि निवेदक भाऊ मराठे होते. या सर्व कार्यक्रमांनी मला लोकप्रियता तर दिलीच. पण माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ७५०व्या कार्यक्रमाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. माझ्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. ५०० नंतर ७५० वा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करायचा असे ठरवले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची तयारी आम्ही जोरात सुरू केली. माझ्या सर्व तरुण विद्यार्थ्यांचा उत्साह तर ओसांडून वहात होता. सर, या कार्यक्रमाला एक हिंदी फिल्मस्टार बोलावू या. सर, आपण अवधूत गुप्तेंना बोलावयाचे का? त्यावेळी ‘झी सारेगमप’ लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यामुळे आमच्या तरुण मंडळींचा आग्रह होता. माझा मित्र अविनाश जोशी अवधूत गुप्तेशी बोलला आणि अवधूतने लगेच होकार दिला. काही कार्यक्रमांच्या निमित्ताने अभिनेता चंकी पांडे यांच्याशी ओळख झाली होती. माझे मित्र सिन्नरकर यांनी त्याची भेट घडवून आणली. यापूर्वी चंकी ठाण्यात आलाच नव्हता. “तुम्हारा गाना सुनने के लिए पहेली बार मैं थाने आऊंगा,” चंकी म्हणाला. मग काय? आमची सर्व विद्यार्थी मंडळी एकदम खूष झाली. यावेळी कार्यक्रमासाठी प्रायोजक मिळायला वेळ लागला नाही. माझ्या पहिल्या जाहीर कार्यक्रमाला प्रयत्न करूनही प्रायोजक मिळाले नव्हते. पण आता वेळ बदलली होती. माझा ७५० वा कार्यक्रम होता. पुढील दोन महिने या कार्यक्रमासाठी एक मोठी टीम काम करत होती. वादक कलाकार, स्टेज डेकोरेशन, जाहिराती कार्यक्रमाच्या रिहल्सल्स या सर्वांमध्ये कार्यक्रमाचा दिवस कधी उजाडला ते कळलेच नाही. या टीममध्ये माझी पत्नी प्रियांका आणि मोठी मुलगी शर्वरीसुद्धा असल्याने आमचे संपूर्ण घर कार्यक्रमात बुडाले होते. ९ फेब्रुवारी २००७ च्या रात्री ठीक ८.३० वाजता माझ्या ७५०व्या जाहीर कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाची सुरवात माझी मुलगी शर्वरीच्या सरस्वतीस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे आणि अभिनेत्री समीरा गुजर करणार होते. ‘अनिरुद्ध, गडकरी रंगायतन श्रोत्यांनी संपूर्ण भरलेले आहे. जय शारदे वागेश्वरी कठीण गाणे आहे. शर्वरी घाबरणार तर नाही ना?bभाऊ मराठे काळजीच्या स्वरात मला विचारत होते. ‘शर्वरी माझी मुलगीच नाही तर माझी विद्यार्थिंनीसुद्धा आहे. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तिला संधी देणे हे सुद्धा माझे काम आहे.’ मी भाऊंना उत्तर दिले. शर्वरीने माझे शब्द सार्थ ठरवले. कार्यक्रमाची सुरुवात तिने उत्तम केली. टाळ्यांच्या कडकडाटात मी स्टेजवर प्रवेश केला. “बाबा, तुम्ही अगदी राजासारखे स्टेजवर आलात.” नंतर शर्वरी मला म्हणाली. पण मला त्यावेळी खरोखरच राजा असल्यासारखे वाटत होते. तीस वर्षे सातत्याने गाणे शिकून, रियाज करून मी गाण्याचा आत्मविश्वास मिळवला होता. आत्तापर्यंत गायलेल्या ७४९ कार्यक्रमांनी त्यात सहजता आणि सफाई आणली होती आणि रसिक प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मी मिळवले होते. माझे गाणे ऐकण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर समोर बसले होते. मग अजून काय हवे? काही गझल आणि गाणी सादर केल्यावर मान्यवरांना स्टेजवर निमंत्रित करण्यात आले. हिंदी चित्रपट अभिनेते चंकी पांडे, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते, खासदार प्रकाशजी परांजपे, माजी महापौर सतीश प्रधान, आमदार निरंजन डावखरे, चित्रपट दिग्दर्शक प्रमोद जोशी, निवेदक अशोक शेवडे आणि वासंती वर्तक, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष एम.वाय. गोखले, उपाध्यक्ष उत्तमराव जोशी, बीपीएल मोबाईलचे अध्यक्ष अरुण सोनाळकर, इंद्रधनूचे अध्यक्ष महेश वर्दे आणि कित्येक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
“नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेक मान्यवरांची उपस्थिती ही अनिरुद्धची खरी कमाई आहे.” माझ्या ठाणे शहराच्या या गझल गायकाला दिल्लीतही ओळखले जाते याचा मला सार्थ अभिमान आहे. खासदार प्रकाशजी परांजपे म्हणाले.
“अनिरुद्ध जोशी हा उत्तम गायकच नव्हे तर धाडसी आयोजकदेखील आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे इतके काटेकोर आयोजन पाहून मी थक्क झालो,” अवधूत गुप्तेने कौतुक केले. हे कौतुक माझ्या एकट्याचे नसून आमच्या टिमचे होते. त्यात माझे असंख्य विद्यार्थी, पत्नी प्रियांका, मुलगी शर्वरी आणि छोटी केतकी आणि माझी आईदेखील होती. मला एक मोठा फरक जाणवत होता. एकूण कार्यक्रमाचा ताण सोडल्यास मला परिश्रम बिलकूल झाले नव्हते. ‘स्वर-मंच’च्या अनेकांनी तो भार उचलला होता. मी लावलेल्या रोपट्याचा आता वृक्ष होत होता. याची काही गोड फळे मला चाखायला मिळत होती.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply