विद्वत्ता माणसाला प्रतिभेसारखीच उपजत मिळत असते, तो एक सहज गुण आहे. विद्वत्तेला अध्ययनाने आणि अभ्यासाने विकसित करता येते आणि विद्वान व्यक्ती ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ध्ययनरतच रहात असते. त्या व्यक्तीच्या अवती भोवती विद्वत्तेचे प्रखर तेज प्रकाशत असते, पण तो विद्वत्सूर्य मात्र चंद्रासारखा शीतल आणि पिकलेल्या फळांनी फलभारित झालेल्या झाडाप्रमाणे अवनत रहातो.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे असे प्रखर प्रकांड पंडित होते. आधुनिक महाराष्ट्राचे भीष्माचार्य असे त्यांना म्हणावयास कोणतीच हरकत नाही. १९०१ ते १९९४ या त्र्याण्णव वर्षांच्या प्रदीर्घ व समृद्ध जीवनात तर्कतीर्थांनी संयुक्त महाराष्ट्राची जडण घडण केली. संयुक्त महाराष्ट्र आज पन्नास वर्षे साजरी करत असताना त्यांचा आठवण होणे आवश्यक आहे.
तर्कतीर्थ विद्वत्सागर होते. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. अक्षरशः संगणकापेक्षाही वेगवान आणि अधिक संचय करून ठेवणारी. संगणक हा सृजनशील नसतो, त्याला जशी आज्ञावली द्याल तसाच तो वागतो, पण तर्कतीर्थ ह्या संगणकाची स्मरणशक्ती मात्र सृजनशील होती. पारंपरिकतेला आधुनिकतेचे नवे भान आणून देणारी होती.
१९८५ साली मला ” गडकर्यांच्या नाटकातील नायिका ह्ण या विषयावरील निबंधस्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले होते. पिंगेज् क्लासेसने आयोजित केलेल्या त्या राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसग्रहालयाच्या विशाल सभागृहात होता. पारितोषिक वितरण होणार होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते. वाचन करताना विश्वकोशाचे संपादक, साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष, रसशास्त्राचे विचक्षण समीक्षक, आधुनिक मराठी समीक्षेचे अभ्यासक, धर्मकोशाचे संपादक, वैदिक संस्कृतीच्या इतिहासाचे संशोधक, उपनिषदांचे भाषांतरकार अशा विविध नात्यांनी त्यांची आभाळाउवढी भव्य प्रतिमा माझ्या मनात उभी राहिली होती. तर्कतीर्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, राज्य ग्रंथ पुरस्कार, अशा विविध उपक्रमांची सुरुवात केली होती. सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराची चळवळ, आंतरजातीय विवाहाचा पहिला पुरोहित ( महात्मा गांधीजींचा पुत्र देवीदास, गांधीजी जातीने बनिया-वाणी आणि चक्रवर्ती राजगोपालाचारींची कन्या लक्ष्मी, भारताचे दुसरे गवर्नर जनरल राजगोपालाचारी हे जातीने ब्राह्मण या दोघांच्या विवाहासाठी गांधीजींच्या सांगण्यावरून तरुण शास्त्रीजींनी शास्त्राधार शोधला व त्या लग्नाचे पौरोहित्यही केले होते.) अशा अनेक गोष्टींनी त्यांचे व्यक्तिमत्व तरुण मनांना आकर्षून घेणारे होते.
पारितोषिक वितरणाच्या वेळी पिंगेज् क्लासेसने ज्येष्ठ समीक्षक स्वर्गीय माधव मनोहर यांच्या नेतृत्वाखाली तर्कतीर्थांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता भगवद्गीतेतील वेदांत, माझ्यासारखी विशीच्या आतली मुले, तरुण, प्रौढ, वृद्ध अशा सार्या लोकांनी ते सभागृह ओसंडून गेले होते. आधी व्याख्यान झाले. पांढरेशुभ्र दुपाखी धोतर, पांढराच झब्बा, त्यावर आकाशी रंगाचं खादीचं जाकीट, डोक्यावर पांढरी शुभ्र खादीची टोपी, डोळ्यांना काळ्या चौकटीचा चष्मा, कानात कदाचित अत्तराचा फाया असावा (मंद सुगंध त्यांच्या अवतीभवती दरवळत होता), खिशाला अडकवलेलं गांधीजींच्या पद्धतीचं साखळीचं घड्याळ. चेहर्यावर आयुष्ु समृद्धपणे जगल्याचा भाव. माधव मनोहरांनी तर्कतीर्थांचा परिचय करून दिल्यावर ते शांतपणे उठले, आणि पुढची चाळीस पन्नास मिनिटे ते भारतीय वेदांत, भारतीय तत्वज्ञानाची प्रस्थानत्रयी (वेद, उपनिषदे, गीता), गीतेतील कर्मयोग याबद्दल हळुवार पण स्पष्ट आवाजात बोलले. अनावश्यक भाषणबाजी त्यात नव्हती पण समजावून देण्याची त्यांची हातोटी मोठी विलक्षण होती. श्रोत्यांना मूर्ख न समजता आपला विषय प्रतिपादन करण्याचे मार्दव त्यात होते.
तर्कतीर्थांचे व्याख्यान संपले आणि पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रम संपला. माझी ती सौ आई माझ्यासह त्यांना भेटायला पुढे आली. तिने त्यांना खाली वाकून नमस्कार केला, तिला आशीर्वाद देताना तर्कतीर्थांनी क्षणभर तिच्याकडे पाहिले. ती काही बोलायच्या आधीच ते म्हणाले, – ” तुम्ही विलासिनी निमकर ना? १९५३ मध्ये आदर्श विद्यार्थिनी म्हणून सांगलीच्या सरस्वती शाळेमध्ये माझ्या हस्ते तुमचा सत्कार झाला होता, त्यावेळी तुमच्या नावातील विलासिनी या शब्दावरून मला ज्ञानेश्वरांच्या अभिनव वाग्विलासिनी या शब्दाची आठवण झाली होती, तेव्हा मी केयूरा न विभूष्यन्ति पुरुषम् हरा न चंद्रो ज्वाला ।वन्येक समालन करोति पुरुषम् या संस्कृत धरेन ।।हा श्लोक उद्धृत केला होता. कशा आहात तुम्ही? आता काय करता? ह्ण माझ्याकडे वळून ते म्हणाले, ” भाग्यवान आहात तुम्ही, अशी माता तुम्हाला मिळाली. ह्ण
आम्ही अवाक होऊन त्यांच्याकडे पहात राहिलो. एक ज्ञानतपस्वी एक छोट्याशा मुलीचा सत्कार होण्याची छोटीशी गोष्ट लक्षात ठेवतो व जवळ जवळ ३५ वर्षांनी त्या छोट्या मुलीचं प्रौढेत रूपांतर झाल्यावर तिला ओळखून तिची आठवण सांगतो. सारं काही अद्भूत!
आईच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि आमच्या बारक्या डोळ्यांपुढे आभाळ वाकून आशीर्वाद देताना दिसत होतं!!
— नितीन आरेकर
Leave a Reply