अरे हे काय गोंदवून घेतलंस दंडावर?? एका मित्राला त्याच्या दंडावर केलेली रंगीबेरंगी कलाकारी अभिमानाने दाखवत असताना बघितल्यावर विचारले. रंगीबेरंगी नव्हतं फक्त लाल आणि काळपट हिरव्या रंगात कसली तरी सिँहाच्या तोंडासारखी आकृती होती. अरे टॅटू आहे हा याच्यासाठी मी अमुक एका आर्टिस्ट कडे गेलो होतो त्याला तमुक एवढे पैसे दिले आणि कितीतरी वेळ वेदना सहन करून काढून घेतला.
तू जे टॅटू बोलतोयस त्या प्रकारालाच गोंदवणे म्हणतात बरं ते जाऊ दे, पण एवढं सगळं कशासाठी??
म्हणजे तुझा टॅटू दुसऱ्यांना दाखवायचा तर त्यासाठी तुला फक्त बनियन घालून फिरायला लागेल. मांडीवर वगैरे पण नाही ना गोंदवले नाहीतर चड्डीवरच फिरायला लागेल. आता तो उखडला आणि तू गप बस स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांना नावं ठेवायची.
अरे पण यात करण्यासारखं काय आहे??
ते तुझ्यासारख्याला नाही कळणार. मग मी गप्प.
पूर्वी जत्रेत गेल्यावर कुठे ना कुठे गोंदवणारे बसलेले दिसायचे अजूनही दिसतात. बऱ्याच वेळा कळकटलेल्या आणि मळकटलेल्या अवस्थेतील स्थूल बायकाच हल्ली ज्याला आधुनिक जगात टॅटू बोलतात अशा कलाकारीचे दुकान मांडून बसलेल्या दिसतात. लहान असताना बहुतांश आदिवासी किंवा मागासलेल्या गरीब अशा महिला विशेष करून लहान मुली या गोंदवणाऱ्या बायकांजवळ काहीतरी गोंदवून घेत असताना दिसायच्या. कपाळावर लहान आकारांच्या टिकल्या गालावर किंवा हनुवटीवर लहान लहान फुलांचे डिझाईन असं काही बाही त्या काढून घेत. या गरीब बायकांना पावडर टिकली लावायला परवडत नसेल किंवा त्यांच्या गावात मिळत नसेल म्हणून कदाचित त्या अशा प्रकारे एकदाच वीस पंचवीस रुपयात गोंदवून घेत असतील असे तेव्हाच्या माझ्या बालमनाला वाटायचे. नंतर नंतर बऱ्याचशा ख्रिश्चन लोकांच्या तळहातावर किंवा अंगठ्याच्या खाली जिझस चा क्रॉस पण दिसायचा. शाळेत आणि कॉलेजला जाईपर्यंत पुढे टॅटूचे लक्षात येण्याएवढं प्रदर्शन पाहिलेले आठवत नाही. पहिल्या जहाजावर जेव्हा ब्राझील मध्ये गेलो तेव्हापासून म्हणजे सुमारे बारा वर्षांपासून टॅटू प्रकार जास्त दिसायला लागला.
ब्राझील मध्ये खूप गर्मी असल्यामुळे फक्त अंग झाकण्या इतके सुती कपडे घालतात. पुरुष तर मॉल, सार्वजनिक ठिकाणे, लहान आणि मोठ्या शहरात सुद्धा बनियन किंवा बनियन सुद्धा न घालता केवळ शॉर्ट्स वर बिनदिक्कत पणे फिरत असतात. ब्राझील मधील खूपशा पुरुषांच्या संपूर्ण पाठीवर, हातावर किंवा छातीवर विविध आकारांचे टॅटू बघायला मिळत.
एका शहरात तर एका ब्राझीलियन नागरिकाला आम्ही चौघे जण भारतीय आहोत समजल्यावर त्याने त्याच्या पोटरी वरील टॅटू आम्हाला कौतुकाने दाखवला. त्याच्या पोटरी वर त्याने गणपतीचा टॅटू काढला होता. त्याला विचारले हा आमचा देव आहे तू पायावर का काढलास तर तो दात काढून म्हणाला की माझ्या कडील सगळ्या जागा अगोदरच संपल्या होत्या असे म्हणून त्याने त्याचा शर्ट काढून संपूर्ण शरीरभर काढलेले चित्र विचित्र टॅटू दाखवले. हळू हळू हे फॅड जहाजांवर पण आपल्या भारतीयांमध्ये दिसायला लागले. कमी शिकलेल्या खलाशांपेक्षा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अंगावर रंगवलेले टॅटूची महती ऐकायला मिळू लागली. कोणी बायकोचे नाव लिहू लागला कोणी मुलांची लिहू लागला तर कोणी देव देवतांची नावं आणि आकार काढू लागले. आता तर काय टॅटू म्हणजे एक फॅशन न राहता जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखे ज्याचा तो मग स्त्री असो की पुरुष असो, टॅटू काढत सुटतो. कोणी हातावर, कोणी छातीवर, कोणी मानेवर, कोणी पाठीवर, कोणी कमरेवर आणि मग नंतर आम्ही टॅटू काढलाय हे दिसण्यासाठी केले जाणारे ओंगळवाणे प्रदर्शन. माझ्या मित्र सांगत होता की त्याच्या भावाने हातावर भलामोठा टॅटू काढला होता बायकोच्या नावाचा पण लग्नानंतर सहा महिन्यातच त्याची बायको घटस्फोट मागून कायमचीच निघून गेली.
बहुतेक करून गोरा किंवा गहू वर्ण असणारे सुशिक्षित, मॅच्युअर्ड लोकच टॅटू काढताना दिसतात आणि मग त्यांचे पाहून ईतर. देवाने दिलेल्या गौरवर्णाला सजवण्यासाठी आलेली ही आधुनिक पद्धत खरोखर कौतुकास्पदच म्हणायला हवी. झाल्यास आपल्या भारत सरकारने पण आधार कार्ड, एन आर सी किंवा एन पी आर ऐवजी ही टॅटू ची लाईफ टाइम सिस्टिम बनवली पाहिजे जन्माला आलेल प्रत्येक बाळ पाच वर्षाचे झाले की बॉर्न इन इंडिया असा कायमचा ठप्पा एकदाच मारून ठेवला पाहिजे.
गमतीचा भाग सोडला तर एकदा काढलेले टॅटू लेझर की काय काय थेरेपी वगैरे वापरून मिटवता येतात असे पण ऐकण्यात आहे आणि तसे होत नसले तरी प्लास्टिक सर्जरीने तरी जात असतीलच की.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply