ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकरांची मी अनेक पुस्तकं वाचली. त्यातील ‘माणदेशी माणसं’ पुस्तकातील ‘झेल्या’ला मी कधीही विसरू शकत नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं जगावेगळं नातं यात दिसून येतं. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षक झालेला लेखक खेड्यातील आपल्या शाळेवर रुजू होतो. मुलांची हजेरी घेताना ‘झेल्या’चं नाव घेतल्यावर ‘हजर’ असा आवाज येत नाही. मुलांकडून त्याच्याविषयी कळतं की, तो एका लोहाराचा मुलगा आहे. जो आपला दिवसभराचा वेळ चिंचा पाडण्यात व भटकण्यात वाया घालवतो आहे. लेखक त्याला शाळेत येण्याचा निरोप देतो. झेल्या शाळेत येऊ लागतो.
लेखक आणि झेल्यामध्ये काही दिवसांतच आपुलकीचं नातं निर्माण होते. शैक्षणिक वर्ष पूर्ण होतानाच शिक्षकाला बदलीचा आदेश येतो. झेल्याला फार वाईट वाटतं. शाळा सोडून जाताना लेखकाला निरोप द्यायला झेल्या गावच्या वेशीपर्यंत येतो. हातात वागवलेली ट्रंक लेखकाच्या हाती देताना तो भावनिक होऊन रडत सांगतो, ‘मास्तर, मी पुन्हा कधीच शाळेत जाणार नाही..’
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘चितळे मास्तर’ माझ्या मनावर ठसलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे मास्तर आताच्या पिढीमध्ये बोटावर मोजण्याइतकेच असतील. अभ्यासात कच्या असणाऱ्या मुलांसाठी आपल्या घरी त्यांची शिकवणी घेणारे चितळे मास्तर, तेच विद्यार्थी मोठे झाल्यावरही त्याच हक्काने त्यांच्याशी आपुलकीचं नातं जपतात.
मलादेखील पहिलीपासून ते काॅलेजपर्यंत शिक्षणाबरोबरच संस्कारही घडविणारे अनेक शिक्षक लाभले. अगदीं पहिलीच्या लिमये बाईंपासून काॅलेजमधील अनिरुद्ध देशपांडे सरांनी मला घडवलं आहे, याचा मला सार्ध अभिमान वाटतो.
बालवाडीत असताना आपण छोट्या चारचाकी बाबागाडीत सुरक्षित असतो. जीवनातील शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ करणाऱ्या पहिल्या शिक्षिका अक्षर ओळख करुन या बाबागाडीला गती देतात. पाचवी नंतर दहावीपर्यंत आपण तीनचाकी गाडीत असतो. या कालावधीत शिक्षक आपल्याला सर्व विषयांत पारंगत करतात, ज्यामुळे आपण सज्ञान होतो. ही तीनचाकी गाडी पलटू नये याची ते काळजी घेतात. काॅलेजमध्ये प्रवेश करताना आपण दुचाकीवर असतो. आपल्या आवडीच्या शाखेची पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला दुचाकीवर तोल सांभाळण्याची कसरत करावी लागते. शिक्षण पूर्ण होतं. त्यानंतर मात्र एकाच ‘आत्मनिर्भर’ चाकावर आपल्याला पुढील जीवन प्रवास करावा लागतो.
शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवसाय सुरू होतो. जबाबदाऱ्या वाढत जातात. लग्न होतं. संसार सुरू होतो. मुलंबाळं होतात. एव्हाना ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांचा वृद्धापकाळ सुरू झालेला असतो. कधीही, कुठेही आपले हे ‘शिल्पकार’ तुम्हाला दिसले तर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना अवश्य भेटा. कदाचित ते तुम्हाला लगेच ओळखू शकणार नाहीत, त्यांना त्यांच्यासोबत घडलेला एखादा त्यावेळचा प्रसंग सांगा. तो प्रसंग आठवल्यावर त्यांच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतील. आपण लावलेल्या रोपट्याचा झालेला विशाल वृक्ष पाहताना ‘माळीदादा’ न सुखावेल तरच नवल!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
५-९-२०.
Leave a Reply