७८६ सुपर फास्ट अन् लयबध्द वेगाने धावणारी हावडा एक्स्प्रेस वेग मंदावून अचानक थांबली आणि काही वेळा पूर्वीच छान डोळा लागलेल्या ‘ समर ‘ ची झोप चाळवली … डोळ्यावरचा हात बाजूला करीत त्याने खिडकीतून बाहेर नजर टाकली तर बाहेर गडद अंधार होता..
” रतलाम आलं का चाचा? ” त्याने समोर बसलेल्या एका अनोळखी वृद्धाला विचारलं ” नाही नाही ..अजून अर्धा तास आहे साहेब ….सिग्नल साठी गाडी थांबली आहे” त्या अनुभवी माणसाने तत्परतेने उत्तर दिलं…
अर्धा तास !! … काल लंडन हून तो मुंबईत दाखल झाला होता आणि पहाटे पहाटे हावडा एक्स्प्रेस मध्ये बसून तो निघाला होता….रतलाम येण्यासाठी अद्याप अर्धा तास बाकी होता पण समर ..मनाने मात्र कधीच रतलाम मार्गे त्याच्या गावाला म्हणजे भरतपूरला पोहोचला होता..त्याच बालपण, शालेय जीवन आणि अगदी मिसरूड फुटे पर्यंतचं तारुण्य हे भरतपूर मध्येच गेलं होतं, रतलाम पासून अंदाजे दीड एकशे किलोमीटर लांब असलेलं भरतपूर एके काळी म्हणजे ब्रिटिश जमान्यात गोऱ्या साहेबांसाठी विश्रांती योग्य असं निसर्गाने नटलेलं …गर्द हिरव्या वनराजीने वेढलेलं..शांत असं ठिकाण म्हणून ओळखलं जायचं, छोट्याश्या या टुमदार गावची हवा ही तशी आल्हाददायक होती. समर मात्र लहान पणा पासूनच या गावात ‘ पाठक गुरुजींचा मुलगा ‘ याच नावाने ओळखला जायचा .
समर चे वडील म्हणजेच किशोरीलाल पाठक हे शिस्तीचे दुसरं नाव होतं. भरतपूर मधल्या सरिता आश्रम आणि त्या आश्रमाच्या शाळे साठी त्यांनी आपलं उभ आयुष्य वेचलं होतं. शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवताना त्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि शिस्त हेच दोन मार्ग अवलंबले होते.. अर्थात शाळेच्या ह्या शिस्ती मध्ये घरात देखील एकुलत्या एक समर साठी कसली ही सवलत नसायची , जो अभ्यास आणि शिकवण शाळेतील इतर मुलांसाठी होती तीच समर साठी असायची . ” तुझे बाबाच पेपर सेट करणार परीक्षेचे…मग तर काय तुला काळजीच नाही ” अशी समर ची चेष्टा करणाऱ्या त्याच्या मित्रांना द्यायला समर कडे मात्र कसनुसं हसण्या शिवाय कसलही उत्तर नसायचं …
करडा आणि काहीसा अबोल असलेल्या समर च्या बाबांचा घरात समर शी कधीच मनमोकळा संवाद नसायचा मग पेपर साठी मदत हा तर लांबचाच विषय !! त्यांच्या शिकवण्याच्या हातखंड्या मुळे अनेक पालक ” हवी तेव्हढी फी घ्या पण मुलांची शिकवणी घ्या ” अशी गळ त्यांना घालायचे पण आश्रम आणि शाळा यांच्याशी एकनिष्ठ असलेले आणि विद्यादान हे एक पवित्र कर्तव्य मानणारे कीशोरीलाल त्यास नम्र पणाने नकार द्यायचे ..
शाळा झाल्यावर मात्र गावातल्या गरजू पण हुशार विद्यार्थ्याची ते फुकट शिकवणी घ्यायचे, या शिकवणी मध्येच सर्वांसोबत समर ला बसावं लागायचं त्याला काही वेगळी वागणूक नसायची .
मग स्वच्छंदी …आणि खेळकर स्वभावाच्या समर ला कधी कधी आपल्या जन्मदात्या पित्याचा राग ही येई !! या दोघांच्या भिन्न स्वभावाच्या कात्री मध्ये अडकून हाल व्हायचे ते मात्र समर च्या आईचे अर्थात सुमित्रा ताईंचे! समरला कळायला लागल्या पासून मात्र ही माऊली ह्या बाप लेकांच्या मधली दरी कमी करायचा प्रयत्न करीत असे !! काहीश्या हट्टी, खेळकर आणि अभ्यासा व्यतिरिक्त मित्र मंडळी आणि सिनेमा, संगीत यात रमणाऱ्या आणि त्याच्या बाबांच्या भाषेत ‘ बेशिस्त व हाता बाहेर गेलेल्या ” समरला” अरे तुझे बाबा जे सांगतात ते तुझ्या भल्या साठीच आहे ” असं प्रेमाने समजावून झालं की ” अहो त्याचं खेळायच, फिरायच वय आहे, एव्हढी शिस्त आणि बंधनं कश्यासाठी घालताय त्याच्या वर? ” असं समर च्या बाबांच मन वळविण्याच कार्य त्या करत असत ..अर्थात याचा उपयोग काहीच होत नसे, जसा जसा समर मोठा होऊ लागला तसा ह्या बाप लेकांमधला संवाद आई मार्फत होऊ लागला होता..
दहावी च्या पूर्व परीक्षे आधी नेमकी कावीळ झाल्यामुळे समर आजारी पडला आणि आधीच अभ्यासाचा कंटाळा करणाऱ्या समर ला आता परीक्षेत नापास व्हावं लागतय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली!! तेव्हा मात्र सुमित्रा ताईंनी ” त्याला थोडी मदत करा किंवा मग परीक्षे साठी शाळेत सांगून काही तरी सवलत द्या अशी कळकळीची विनंती केली!!! अर्थात शाळेत एक प्रमुख शिक्षक ह्या नात्याने ह्या दोन्ही गोष्टी सहज शक्य असून ही ” त्याला शक्य तेव्हढा अभ्यास करून परीक्षेस बसू दे नाहीतर त्याची अनुपस्थिती लावण्यात येईल ” असं फर्मान त्यांनी सोडलं होतं ! … त्या परीक्षेत आणि नंतर दहावीत कसा बसा पास झालेल्या समर ने मात्र ” मी अकरावी बारावी रतलाम च्या होळकर कॉलेज मधून करणार आणि नंतर तिथेच नव्याने सुरू झालेल्या कॉम्पुटर डिझायनिंग इन्स्टिट्युट मधून कोर्स करून करियर करणार असे जाहीर केले होते ”
अर्थात त्याला त्यामुळे विदेशात जाऊन या क्षेत्रात अजून शिक्षण घेऊन नोकरी मिळवायची संधी आणि इच्छा खुणावत होती ! परंतु समरने इथे भारतातच राहून एखाद्या विज्ञान संशोधन क्षेत्रात कार्य करून देशाची सेवा करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती..त्यामुळे यांनी त्याच्या कॉम्पुटर डिझायनिंग कोर्स साठी ठाम नकार दिला आणि समर चा पूर्ण हिरमोड झाला…पण अखेर आईनेच यशस्वी मध्यस्ती करून कसतरी कोर्स साठी त्याच्या बाबांचं मन वळवलं…. कॉम्प्युटर ची आवड असलेल्या समर ने कोर्स मध्ये मात्र प्राविण्य मिळविलं आणि तो चांगल्या मार्कांनी पास झाला, युरोप मधील दोन तीन विद्यापीठां मध्ये त्याला आता पुढील कोर्स साठी प्रवेश मिळत होता परंतु खरी मेख पुढेच होती ..तिथे जरी शिष्यवृत्ती मिळणार होती तरी जायच्या आणि इतर खर्चा साठी सुरुवातीला एक लाख रुपये लागणार होते आणि त्या काळात एक लाख रुपये म्हणजे ” अरे बाप रे!!” म्हणायला लावणारे होते..
आणि मग समर ची वेगळीच घालमेल सुरू झाली!त्याचे बाबा त्याला लाख भर रुपये देणे म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागणार होता !! आणि कॉलेज च्या पहिल्या वर्षात असतानाच एक अघटीत घडले… हृदय विकाराच्या झटक्याने सुमित्रा ताईंनी शेवटचा श्वास घेतला आणि ह्या बाप लेका मधला एकुलता एक दुवा निखळला !! पाठकांच्या घरात एक कधी ही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली होती. दोघांमधला क्वचित होणारा संवाद ही आता जणू बंदच झाला होता!! सहचारिणी अशी अचानक निघून गेल्या मुळे किशोरीलाल देखील आता पूर्वी पेक्षा अधिकच शांत अन अबोल झाले होते..तर समरला देखील आईची उणीव पदोपदी भासत होती…
अश्यातच लंडन च्या युनिव्हर्सिटी मधून समर ला स्कॉलरशिप चे पत्र आले.आणि पुन्हा एकदा समर च्या उच्च शिक्षणा साठी परदेशी जाण्याच्या इच्छे ने उचल खाल्ली..परंतु आता बाबांना ‘ पटवायला ‘ आई जगात नव्हती नाही म्हणायला आता किशोरीलाल बऱ्यापैकी थकले होते!! त्यांचा जास्त वेळ आता आश्रम आणि शाळा यांच्या साठीच जाऊ लागला होता…
अश्याच एका संध्याकाळी त्यांनी समर ला हाक मारली…समर बाहेरच्या खोलीत आला तेव्हा त्यांच्या हातात ते स्कॉलरशिप च पत्र होतं..आणि दुसऱ्या हातात एक पाकीट …
समर च्या हातात ते पाकीट आणि पत्र देत ते म्हणाले ” बेटा हे तुझ स्कॉलरशिप च पत्र आणि हा एक लाखाचा धनादेश…तुझ्या त्या लंडन मधल्या युनिव्हर्सिटी प्रवेशा साठी…
जा बेटा आता तयारी कर ”
समर मात्र ते पाकीट त्यांच्या हातातून घ्यायचं सोडून अविश्र्वासाने केवळ त्यांच्या कडे पहात राहिला… अन् मग भानावर येत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले” पण बाबा ! ..हे पैसे? ?..आय मिन..तुम्ही कश्याला? ?आणि तुम्हाला एकटं सोडून मी कसं जाऊ?? ” समरच्या तोंडून ह्या गोंधळलेल्या अवस्थेत पडलेले सगळे प्रश्न शांतपणे ऐकून ते म्हणाले ” माझी काळजी नको करू बेटा, तुझं भविष्य, करियर ..या कडे लक्ष दे..
इथे आश्रम आहे शाळा आहे ..आश्रमाचे पुरोहित सर आहेत..” अर्थात समर मात्र अद्याप अस्वस्थच होता !! पाठक मास्तर च्या घरची परिस्थिती बेताचीच होती ..
आश्रमाच्याच आवारात माफक भाड्यात हे कुटुंब रहात होतं..आणि त्यामुळे बाबांनी हे एक लाख आपल्या करिता कसे जमा केले? ?? त्या नंतर मात्र बाबांच्या आग्रहा मुळे समर लंडन ला रवाना झाला आणि तिथे कॉलेज आणि मग कॅम्पस इंटरव्ह्यू मधून तिकडेच त्याला छानशी नोकरी मिळाली आणि तो तिथेच स्थायिक झाला ..आणि अश्या तऱ्हेने भरतपूर…ते रतलाम आणि देश …या सर्वांना तो एकप्रकारे पारखा झाला.. पहिले काही दिवस अधून मधून त्याचे बाबांना नियमित फोन व्हायचे ! पण नंतर नंतर तेही कमी झाले .. समरचे बाबा मात्र आवर्जून त्याला वाढदिवशी फोन करायचे ! आता गेल्या काही महिन्यात मात्र ते बरेचसे थकलेले … भागलेले असे वाटत होते…
पुरोहित काकांकडून समर ला समजत होते की घरात एकटे बसून राहण्या पेक्षा त्याचे बाबा आश्रमांत जास्त वेळ व्यतीत करीत असत…
आणि तीन दिवसापूर्वीच पुरोहित काकांकडून त्याला समजले होते की त्याच्या बाबांना आश्रमाच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केलं होतं, श्र्वास घ्यायला त्रास होत होता मग मात्र समर अतिशय अस्वस्थ झाला ! अर्थात ” आम्ही सगळे आहोत, तू काळजी करू नकोस ” असं जरी पुरोहित काका म्हणाले होते तरी ही समर ला मात्र त्याचं मन आतून खाऊ लागलं होतं….आणि पुरोहित काकांनी जेव्हा त्याला हे सांगितलं की लंडन मधल्या त्याच्या शिक्षणा साठी त्याच्या बाबांनी स्वतः चां भविष्य निर्वाह निधी जसा च्या तसा काढून समर च्या सुपूर्द केला होता तेव्हा मात्र तो फार व्यथित झाला .. आपल्या बाबांनी स्वतः एक साधं सरळ आयुष्य जगून आपल्या भविष्या साठी सर्वस्व दिलं,आपल्याला शिस्त लागावी म्हणून ते झटले..आणि आपण मात्र…! त्याने पुढचा मागचा विचार न करता कंपनीत सुट्टी टाकून विमानाचं तिकीट काढून स्वदेशी प्रयाण केलं….उशीर झाला होता पण अजून वेळ गेली नव्हती . तिकडे जाऊन बाबांना घेऊन इकडे यायचं असं मनोमन ठरवून तो विमानात बसला होता,मुंबईत दाखल होताच त्याने सर्वप्रथम त्याच्या बाबांनी दिलेले ते एक लाख बँकेतून काढून घेतले …आणि बाबा भेटताच त्यांना ते देऊन म्हणायचं ” बाबा तुमच्या नालायक समर ने तुमचे पैसे परत केले बरं!!! आता तो तुमची काळजी घेणार आहे ” आता त्याला त्याच्या बाबांशी खूप खूप बोलायचं होतं…
त्या एक लाख रुपयांची आठवण येऊन त्याने ती पैश्यांची हिरवी लेदर बॅग उगीचच छाती जवळ घट्ट धरली आणि डोळे पुसून खिडकी तून बाहेर पाहू लागला … समोर रतलाम जंक्शन ची पाटी दिसली तसं त्याला पुन्हा एकदा भरून आलं.
……त्याने स्टेशन बाहेर नजर टाकली…..इतक्या वर्षात ते शहर बऱ्यापैकी बदललं होतं! एकदा घड्याळात पाहून त्याची पावलं आपोआप टॅक्सी स्टँड कडे वळली, कारण भरतपूर ला जाणारी शेवटची एस टी एव्हाना कधीचीच गेली असणार होती, आणि आता टॅक्सी हाच एक पर्याय होता, पण टॅक्सी स्टँड वर देखील शुकशुकाट होता…कुतूहल वाटून त्याने चौकशी केली तर त्याला समजलं की गेल्या तीन दिवसंपासून सर्व टॅक्सी – टेम्पो संघटना संपावर होत्या…सर्व टॅक्सी तिथे नुसत्या उभ्या होत्या ..आणि संप मोडून त्याला इतक्या रात्री भरतपूर ला सोडायला अगदी दुप्पट तिप्पट भाड घेऊन देखील कोणीही तयार नव्हत ..आता सकाळी सहाच्या पहिल्या बस वाचून त्याला काहीच पर्याय नव्हता …त्याच विचारात खिन्न पणे तो पुन्हा स्टेशन समोरील चौकात आला ..रस्त्यावर बऱ्यापैकी सामसूम होती आणि समोरच त्याला एक टॅक्सी दिसली …. टॅक्सी चां क्रमांक होता 786 ….मागच्या काचेवर ख्वाजा गरीब नवाज च स्टिकर होतं आणि टॅक्सी अतिशय रसिकतेने जपलेली दिसत होती टॅक्सीवला त्या टॅक्सीला गुलाबाची फुलं आणि हार लावून सजवण्यात मग्न होता…
थोडा हुरूप वाटून समर त्याच्या कडे गेला आणि ” भरतपूर ” ला सोडण्याची त्याने विनंती केली ” साहेब माफ करा पण आज टॅक्सी नाहीये ! ” अशी बोळवण करून तो पुन्हा त्याच्या कामात गुंग झाला ..
समर ने मग अक्षरशः हात जोडून त्याला विनंती केली ” हवं तेव्हढ भाड घ्या चाचा..पण नाही म्हणू नका ..” पण टॅक्सी वाले अश्रफ चाचा मात्र तेव्हढ्याच विनम्र पणें नकार देऊन म्हणाले ” साहेब उद्या पर्यंत आमच्या संघटनेचा संप आहे, अश्यात मी भाड घेऊन आलो तर मला संघटनेचे लोक सोडणार नाहीत ! आणि त्यातून ही उद्या माझ्या मोठ्या मुलीचा निकाह आहे साहेब सकाळीच सात वाजता मला फॅमिली ला घेऊन शमशाबाद ला जायचं आहे खरच मला माफ करा ” ….आणि खरोखरच समोरच असलेल्या एका छोट्या घराला लायटिंग केलेली दिसत होती… छोटा सा मांडव टाकण्यात आला होता..आणि लग्न घराची गडबड सुरू होती ..तरी ही समर ने पुन्हा विनवणी केली ” चाचा ..समजून घ्या प्लीज मी परदेशातून आलोय, मला भरतपूर ला पोहोचणं खूप आवश्यक आहे…माझ्या वडिलांना ॲडमिट केलंय !! ” अखेर अश्रफ चाचा थोडे विचारात पडले …. ते पाहून समर पुन्हा म्हणाला ” हवं तर मी तुम्हाला दुप्पट..पाचपट भाड देईन.पण प्लीज चला ” आणि त्याने हात जोडले..
” अहो… असं नका म्हणू ” त्याचे ते जोडलेले हात हातात घेऊन चाचा म्हणाले ” साहेब पैश्याचा प्रश्न नाहीये हो ! पण घरात उद्या निकाह आहे …. घरात काय सांगू? ? आणि साहेब भरतपूर चा रस्ता म्हणजेच अडीच तीन तास …घाटाचा रस्ता! कसं करू सांगा !” हतबल आणि निराश होऊन समर अखेर जायला वळला …पण तेव्हढ्यात काही तरी विचार करून अश्रफ चाचा त्याला म्हणाले ” थांबा एक मिनिट साहेब ” आणि घरात गेले ..काही वेळ घरातून वाद विवाद झाल्याचे आवाज ऐकू आले आणि मान डोलवत अश्रफ चाचा आले आणि म्हणाले ” चला साहेब ..तुमच्या वडिलांची तब्येत महत्वाची …तुम्हाला सोडून मी परत येईन ..मग सकाळी सकाळी मला जाव लागेल शमशाबाद ला…चला लवकर !” एकी कडे डोळ्यात येऊ पाहणारं पाणी पुसत आणि दुसरीकडे चाचांना धन्यवाद देत समर गाडीत बसला…
….टॅक्सी शहराबाहेर पडून भरतपूर च्या रस्त्याला लागली आणि समर व अश्रफ चाचा यांच्या गप्पा सुरू झाल्या..समर ने त्यांना थोडक्यात आपलं बालपण …शाळा, कॉलेज आश्रम, बाबा त्यांची शिस्त … त्याच परदेशी शिक्षण आणि नोकरी ही सगळी कहाणी थोडक्यात सांगितली …आणि मग अश्रफ चाचा च्या छान आणि मनापासून सजवलेल्या टॅक्सी च कौतुक करीत तो त्यांना म्हणाला ” तुमचा तुमच्या टॅक्सीत खूप जीव दिसतोय चाचा !!! खूप छान जपलीये… सजवलीये तुम्ही..आणि नंबर ही 786 आहे !” त्यावर चाचा म्हणाले ” साहेब ही तर त्या उपरवल्याची देन आहे..यावर तर माझं घर चालतं….आणि आता माझ्या मुलीचा निकाह पण हिच्या मुळेच होतोय!!!” ” म्हणजे??? ” समर ने आश्चर्य वाटून विचारलं..
” काय सांगू साहेब ! सहा जणांच कुटुंब माझं…कमावणारा एकटा मिळकत बेताचीच ..त्यात असे संप..बंद वगैरे झाले की पोटावर पाय येतो आमच्या !! आता निकाह चां खर्च पन्नास हजार आहे ..मग आमच्या जहीर भाई कडे ही टॅक्सी गिरवी ठेवलीय साहेब …मनावर दगड ठेवून !!!…
हे ऐकून मात्र समर ला वाईट वाटलं …आणि..आणि मग काही काळ तसाच शांततेत गेला….तीन एक तासांचा रस्ता पण समर साठी सरता सरत नव्हता ..मनात विचारांचं काहूर माजलं होतं…. अखेर सुमारे साडे अकरा च्या सुमारास भरतपूर आलं…समर अगदी अधिरपणे खिडकीतून बाहेर डोकावून त्याच ते गाव, ते रस्ते पाहत होता…दहा एक मिनिटात तो आश्रमाच्या हॉस्पिटल मध्ये पोहोचला …आता कधी एकदा बाबांना भेटतो असं झालं होतं त्याला …
हॉस्पिटल च्या दारातच पुरोहित सर, आश्रमाचे इतर काही सभासद ….विद्यार्थी यांची गर्दी जमली होती .पुरोहित सर बरेच अस्वस्थ दिसत होते…कोणाला तरी काही सूचना देत होते…हे सगळं पाहून समर मात्र हबकला.. चेहऱ्यावर चिंतेचे गडद भाव दाटले आणि त्याच मनस्थितीत तो टॅक्सी तून उतरला आणि तेव्हढ्यात पुरोहित सरांची नजर त्याच्यावर पडली आणि ते झटकन धावत गेले समर कडे आणि त्यांनी अत्यंत गंभीर पणाने काही तरी त्याला सांगितलं ..ते ऐकून समर मात्र आहे त्या अवस्थेत हॉस्पिटल मध्ये पळत गेला…
सुमारे पंधरा मिनिटा आधी समर च्या बाबांना हृदय विकाराचा झटका आला होता ..पण हॉस्पिटल मध्येच असल्या मुळे ड्युटी वरील डॉक्टरांनी झटकन त्यांना आय सी यू मध्ये नेलं आणि इमर्जन्सी प्रोसिजर ने त्यांचे प्राण वाचवण्या ची पराकाष्ठा सुरू केली…त्यामुळे ही सगळी मंडळी हॉस्पिटल च्या मुख्य कर्डिओलॉजिस्ट ची वाट पाहत दारात उभी होती…समर आय सी यू कडे पळाला…त्याच्या मागोमाग कॉर्डियोलॉजिस्ट देखील आले …समर चटकन बाबांच्या बेड पाशी आला आणि अधीर पणाने त्याने बाबां जवळ जात त्यांचा हात हातात घेतला…त्यांनी ही हळूच किलकिल्या डोळ्यांनी समर कडे पाहिले ..आणि नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले . आणि समर च्या हातात हात असतानाच ते डोळे तसेच उघडे राहिले आणि त्यातील प्राण मात्र निघून गेले होते, जणू समर ची शेवटची भेट होण्यासाठीच ते थांबले होते!! बेड शेजारील मॉनिटर वरील आलेखाची रेषा सरळ पणाने गेली आणि समर ने अविश्र्वासाने एकदा बाबांकडे पाहून नजर डॉक्टरांकडे वळविली ..पण डॉक्टरांनी पुढे येऊन तपासणी करून समर च्या बाबांनी इहलोकीची यात्रा संपवली असल्याचा निर्वाळा दिला…
समर साठी हा मोठा धक्का होता, कळायच्या वया पर्यंत बाप लेकामध्ये फारसा संवाद नव्हता ..आणि बापाचे ऋण उमजले तेव्हा डोक्यावरील हे छत्र मात्र निघून गेले होते…तेव्हढ्यात समर च्या डोळ्यातल्या अश्रुंच्या धूसर पडद्या पुढे त्याला आय सी यू बाहेर इतर सर्व मंडळी सोबत उभे अश्रफ चाचा दिसले आणि त्याला खूप ओशाळल्या सारखं झालं, आपण ह्या सगळ्या गडबडीत त्यांना विसरून गेलो..त्यांचे पैसे द्यायचे राहिले, त्यांना लगेच परत ही जायचं होतं..
समर चटकन बाहेर आला आणि अश्रफ चाचा ची माफी मागत त्यांना पैसे देण्यासाठी पाकीटाला हात घातला .
” माफ करा साहेब मी भाड घेण्यासाठी थांबलो नाही..ते आत्ता महत्वाचं नाही, मी तुमची अवस्था समजू शकतो साहेब, पण गडबडीत तुम्ही ही बॅग गाडीत विसरला होता साहेब ” अस म्हणत त्यांनी ती हिरवी लेदर बॅग समर च्या हातात दिली.. समर ने ती बॅग छातीशी कवटाळली . त्यात त्याने त्याच्या बाबांना देण्यासाठी आणलेले एक लाख रुपये होते…पण ज्यांना द्यायचे ते बाबा मात्र त्याला कायमचे सोडून निघून गेले होते….
तेव्हढ्यात पुरोहित सर आणि हॉस्पिटल चे डीन व अजून एक दोन अधिकारी समर जवळ आले आणि त्यांनी समरचे सांत्वन करून मग त्याला काही कागदपत्र दिली व एक फॉर्म भरण्यासाठी दिला..
तो फॉर्म पाहून आणि त्यांच्या कडून ऐकून समर ला धक्काच बसला, कसली ही कर्मकांड आणि धार्मिक रीवाज न मानणाऱ्या समरच्या बाबांनी काही वर्षांपूर्वीच आश्रमाच्या मेडिकल कॉलेज साठी संपूर्ण देहदान करण्याचा संकल्प करून तसे फॉर्म्स भरून ठेवले होते !! आणि कदाचित आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये हे ओळखून त्यांनी काही दिवसापूर्वी पुरोहित सरांना याचे स्मरण दिले होते!!!! समर आता हतबल होऊन विषण्ण पणाने एका बाकावर बसला होता..स्वतः च्या वडिलांसाठी अंतिम कर्तव्य देखील आता त्याला करता येणार नव्हतं, तिकडे पुरोहित सर हॉस्पिटल ची इतर कार्यवाही करीत होते…
आणि हे सगळं होत असताना अश्रफ चाचा मात्र निर्विकार पणाने एका कोपऱ्यात बसून होते …
अखेर तेथील सर्व सोपस्कार पार पडले आणि एकदा बाबांचे शेवटचे दर्शन घेऊन झाल्यावर समर ने पुरोहित सरांशी त्याने काही चर्चा केली..पुरोहित सरांनी समर ला त्यांच्या सोबत येऊन आराम करण्याची विनंती केली पण समर ने त्यांना नम्र पणाने नकार दिला …आता भरतपूर मध्ये थांबणं त्याच्या साठी अवघड होतं, त्या आठवणी ..ती निर्माण झालेली पोकळी, सगळं असह्य होतं… आणि गंभीर पणाने तो अश्रफ चाचा समोर उभा राहिला ” चाचा, चला मला परत रतलाम ला सोडा, स्टेशनला!! ” हे ऐकून अश्रफ चाचा एकदम दचकलेच ” साहेब काळजी करू नका .तुम्ही तुमच्या वडिलांचे अंतिम संस्कार पूर्ण करा..माझी काळजी करू नका, मी पैश्या साठी थांबलो नाहीये तुम्हाला माझी काही मदत लागणार असेल तर सांगा …..
अर्थात समर ठाम होता !! शिवाय उद्या स्वतः च्या मुलीचा निकाह असून ही ..आणि अशक्य परिस्थितीत ते आपल्याला सोडायला इतक्या दूर आले, इतका वेळ त्यांचा गेला..याची खंत त्याला वाटतच होती…
अखेर सगळ्यांचा आणि भरतपूर चा..कदाचित शेवटचा निरोप घेऊन समर अश्रफ चाचांच्या टॅक्सी मध्ये बसला आणि परतीच्या प्रवासाला निघाला…..
एव्हाना मध्यरात्री चां प्रहर उलटून गेला होता…. विचार करून करून मानसिक आणि शारीरिक थकव्या मुळे समर चां डोळा लागला होता …अश्रफ चाचा मात्र सावध पणाने गाडी चालवत होते, अखेर रतलाम आलं तोवर रात्रीचा तम ओसरून आकाशात लाली पसरू लागली होती….समरला ही जाग आली होती..
स्टेशन जवळ आल्यावर समर गाडीतून उतरला ..पुढे येत त्यांनी अश्रफ चाचांना पुन्हा एकदा हात जोडून माफी आणि धन्यवाद दोन्ही दिले…टॅक्सी चे पैसे त्यांच्या हातात दिले आणि स्टेशन च्या पायऱ्या चढून आत जाऊ लागला समर ने दिलेले पैसे किती आहेत ते न बघताच त्यांनी ते खिशात ठेवले ..आणि ह्या अनोख्या पॅसेंजर च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागले..
घरी आल्यावर त्यांनी टॅक्सी लावली आणि घरात जाऊ लागले आणि जाता जाता त्यांनी त्यांच्या मुलाला आणि पुतण्याला गाडी स्वच्छ करून … शमशाबाद ला जायची तयारी करण्यास सांगितलं…
आणि पाच एक मिनिटात त्यांना त्यांच्या मुलाने जोरजोरात हाक मारून बोलावलं … ‘ आता काय झालं? ‘ असा विचार करत ते बाहेर आले आणि एकदम स्तब्ध झाले…
त्यांच्या मुलाच्या हातात ती समर ची ” हिरवी लेदर बॅग ” होती .. ” या अल्ला ! “असं म्हणत अश्रफ चाचा पुढे आले आणि ती बॅग हातात घेतली ..आता चटकन स्टेशन वर जाऊन ही बॅग समरला द्यावी या विचारात असताना त्या बॅग ला अडकवलेली एक छोटी चिठ्ठी त्यांना दिसली, आश्चर्य वाटून त्यांनी ती उघडुन वाचली .
” चाचा ..आता ही बॅग मी विसरलो नाहीये, तुमच्या मुलीच्या निकाह साठी ही छोटीशी भेट आहे समजा ..मी माझ्या आयुष्यातील काही कर्तव्य पूर्ण करू शकलो नाही …पण तुम्हाला अशी खंत वाटू नये ही प्रार्थना ..
तुमची प्रिय टॅक्सी गहाण ठेवू नका प्लीज !! शुभेच्छा ” ही जगावेगळी चिठ्ठी वाचून झाल्यावर त्यांनी बॅग उघडुन पहिली आणि त्यांना धक्काच बसला ..
धक्का ओसरून होताच मात्र डोळ्यातील आश्चर्याची जागा अश्रूंनी घेतली ….
एव्हाना चाचांच्या घरातली सगळी मंडळी तिथे जमा झाली होती.आणि काहीच न समजल्या मुळे चाचा च्या तोंडाकडे पाहू लागली …
पण चाचा मात्र ती बॅग छातीशी कवटाळून त्यांच्या ‘ टॅक्सी नंबर ८७६ ” कडे पहात होते….
Leave a Reply