नवीन लेखन...

ते हात … गोष्ट सुनामी प्रलयानंतरची

 

मी कार्यालयामध्ये बसलो होतो. कामाचे नियोजन, झालेल्या कामाचा आढावा यावर चर्चा सुरू होती. इतक्यात, दूरध्वनी वाजला. वृत्तपत्राच्या कार्यालयात ही एक नित्याची बाब होती. दूरध्वनी उचलला. “आपण संपादक आहात का?” – प्रश्न आला. “हो.” मी उत्तर दिलं. “साहेब, एक विनंती करण्यासाठी दूरध्वनी केला होता. आजच्या अंकात तुम्ही तमिळनाडूतील विध्वंसाची जी छायाचित्रे प्रकाशित केली आहेत, ती धक्कादायक आहेत. त्यात लहान मुलांची जी छायाचित्रे आलीत, तशी ती प्रसिद्ध करू नका.” दूरध्वनीमधून येणारा आवाज कातर बनला होता. मी म्हणालो, “जे वास्तव आहे ते यापेक्षाही भयानक आहे. त्याची काही तरी जाणीव व्हावी, यासाठी ही चित्रे आहेत.”
“ते सगळं खरं आहे; पण आता जगाला कळलंय, की काय घडलंय. आता तरी हे थांबवा.” बोलणे संपले; पण विचारांचे चक्र थांबले नव्हते. मी पुन्हा सारे अंक चाळले. छायाचित्रे पाहिली. त्यात जे होते, ते निव्वळ वास्तव होते किंबहुना वास्तव त्यापेक्षा भयानक होते. जे प्रसिद्ध झाले होते, ते तुलनात्मक सौम्य होते; पण तरीही या छायाचित्रांतून घटनेमागच्या वेदना, त्रास, असहायता वाचकांपर्यंत पोहोचत होती. ज्यांनी हे वास्तव लाटांसारखे अंगावर घेतले, जे त्या लाटांबरोबर जलमय झाले, ज्यांनी या लाटांच्या कराल दाढेत आपल्या जवळच्यांना जाताना पाहिले, अनुभवलं, ज्यांच्या नजरा अजूनही आपले बाळ परत येईल, याची आतुरतेने वाट पाहत असतील, त्यांच्यापेक्षा या यातना मोठ्या नव्हत्या. या वेदना तीव्र नव्हत्या. हे माझे नाही, ही जाणीवही होती आणि जर हे माझ्याबाबतीत घडले असते, तर … ही भीतीही होती.

आपण सारे एकच आहोत; एकाच निसर्गाचे, परमेश्वराचे घटक आहोत, हे सारे ऐकले, वाचलेले गळून पडते. मी, माझे … हे शब्द प्रभावी होतात. दुःख, वेदना, संकटे ही किमान आतातरी माझी नाहीत, ही भावना प्रबळ होते. वृत्तपत्रांतील छायाचित्रेही नकोशी वाटू लागतात … मग नकोच वृत्तपत्र वाचणे, नकोच दूरचित्रवाणी पाहणे हा विचार प्रभावी होतो. ते सारे माझ्यासाठी नाहीच, असे म्हणून माणूस अन्य विषय शोधू लागतो. विषयांतर महत्त्वाचे ठरते. वास्तव न स्वीकारता, न पाहताच त्यापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू होतो. आपण आपल्या विश्वात रमायला लागतो. कोणी मानवतेची आठवण दिलीच किंवा आवाहन केलेच, तर आपल्या कर्तव्यपूर्तीचा एक तुकडा तोडून त्यापासून मुक्त होऊ पाहतो. निसर्गत मी जसा आहे, त्याचा अनैसर्गिक प्रवास त्याला कारणीभूत आहे का? कोठून सुरू होतो हा प्रवास? काय कारणीभूत असावे या प्रवासाला? नैसर्गिक आणि अनैसर्गिक या निव्वळ मनाच्या तर कल्पना नव्हेत? की ती ही मायाच? प्रश्नांची मालिका हवी तेवढी लांबविता येईल. आपणच आपल्यात डोकावून पाहिलं तर? मला वाटतं, स्वतशी होणारा प्रामाणिक संवाद जेथे थांबतो, तेथेच अनैसर्गिकतेचा प्रवास सुरू होत असावा अन्यथा जे वास्तव आहे त्यापासून दूर जाण्याचा, ते नाकारण्याचा प्रयत्न हेच नैसर्गिक आहे, असे वाटू लागलेच नसते. आपण आपल्याला तरी आहे तसे स्वीकारतो का? की, स्वतची फसवणूक करण्यातच आपल्याला आनंद लाभतो? दुःख नाकारणे किंवा त्या दुःखापासून दूर जाणे, ते आठवणीच्या एखाद्या बंदिस्त कप्प्यात बंद करणे, हा आनंद आहे का? तसे असेल तर मग हा आनंद शाश्वत का नाही? कदाचित, स्वतला स्वतपासून सातत्याने दूर नेणे, हे तर दुःखाचे खरे कारण नसेल? स्वत आहोत तसे स्वतला स्वीकारले, वास्तव आहे तसे स्वीकारले तर दुःख कोठे असेल? दुःखाचे अस्तित्वच नसेल तर आनंदाशिवाय काय असेल? मग आपल्या दुःखाचे मूळ नैसर्गिकतेमध्ये आहे की अनैसर्गिकतेमध्ये? आज मला होणार्‍या यातना किंवा घडलेल्या विदारकतेच्या वेदना जाणवतात, हे नैसर्गिक असायला हवेच; पण त्यापासून दूर जाण्यातच मला नैसर्गिकता वाटते. स्वतला संवेदनहीन करण्यातच आपण जीवनसंघर्षाशी सक्षम आहोत, असे वाटायला लागते. खरे तर संघर्षापेक्षाही वास्तव स्वीकारण्यात, त्याला सामोरे जाण्यात खरे धैर्य आहे. तुमच्या माझ्यात जर एकाच परमेश्वराचा वास असेल, तुम्ही अन् मी जर या सर्वशक्तिमान निसर्गाचाच एक घटक असू; तर त्यापासून कसे पळता येईल? त्याला किती टाळता येईल? माणसामाणसातील नैसर्गिकतेला, नैसर्गिक मानवतेला या दुर्दैवी घटनेमध्येही धुमारे फुटलेले दिसतात. मानवी हातांच्या रूपाने दुःखावर फुंकर घालणारे ते हात दिसू शकतात, अनुभवता येतात. अशा अनुभवासाठी परमेश्वर तुम्हाला सज्ज करो, ही प्रार्थना.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..