दिल्लीच्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेवबाबा यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्याला टीअर गॅस असेही म्हणतात. दंगल नियंत्रणाच्या वेळी जमावाला पांगवण्यासाठीही अश्रुधुराचा वापर केला जातो.अश्रुधुराला लॅक्रिमेटर असेही म्हणतात. लॅक्रिमेटर याचा अर्थ डोळ्यात पाणी आणणारा रासायनिक घटक. त्याचा शोध डॉ.रॉबर्ट वूड यांनी १९१७ मध्ये लावला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात तेव्हा त्यातून जो वायू बाहेर पडतो त्यामुळे डोळ्यातील श्लेष्मल पटलांची आग होते व ते चुरचुरतात.
त्यामुळे डोळ्यातून पाणी वाहू लागते. श्वसनमार्गाच्या वरच्या भागाचा दाह यामुळे होतो. त्यामुळे कफ, खोकला येतो. डोळ्याला तात्पुरत्या स्वरूपात काही दिसत नाही. काही काळ अस्वस्थ वाटल्याने जमलेले लोक घटनास्थळाच्या ठिकाणाहून पळून जातात. अश्रुधुराचा उपयोग हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रासायनिक युद्धतंत्र म्हणून केला जात असे.
त्याचे परिणाम अल्पकालीन असल्याने त्याचा वापर नंतर दंगल नियंत्रण किंवा जमाव नियंत्रणासाठी होऊ लागला. कुठल्याही ठिकाणी जमाव अनावर होत असेल तर प्रथम अश्रुधूर सोडावा लागतो व त्यातूनही जमाव काबूत आला नाही तरच लाठीमार व गोळीबार ही पावले उचलली जातात. अश्रुधुरात जी कृत्रिम रसायने वापरली जातात ती कार्बनी हॅलोजन संयुगे असतात. ते खरे तर वायू स्वरूपात नसतात. नेहमीच्या स्थितीत ते द्रव किंवा घनरूपात असतात, पण बाहेर पडताना ते वायुरूपात येतात.
त्यांचे स्वरूप फवारा, ग्रेनेड किंवा हातबॉम्बसारखे असते. डब्ल्यू क्लोरोअॅसिटोफेनोन (सीएन) व ओ-क्लोरोबेन्झीलिडेने मॅलोनोनायट्राईल (सीएस) अशा दोन रसायनांचा वापर अश्रुधुरात असतो. सीएन हा नेहमी एरोसोलच्या मदतीने दंगलीच्या वेळी वापरतात. त्याचा परिणाम डोळे चुरचुरण्यात होतो.
सीएस हा मात्र जरा जास्त हानिकारक असतो. त्यामुळे डोळे व श्वसनमार्गाची जळजळ होते. स्वच्छ हवेत गेल्यावर पाच-दहा मिनिटांत त्याचा परिणाम कमी होतो. ब्रोमोअॅसिटोन, बेन्झिल ब्रोमाईड, इथिल ब्रोमोॲसिटेट, झायलिल ब्रोमाईड व अल्फा ब्रोमोबेन्झिल सायनाईड यांचाही वापर अश्रुधुरासाठी करता येतो.
पहिल्यांदा १९१५ मध्ये जो अश्रुधुराचा वापर करण्यात आला त्यात झायलिल ब्रोमाईडचा वापर केलेला होता. ही लॅक्रिमेटर रसायने वितंचकातील सल्फायड्रिल समूहांवर हल्लाबोल करतात. त्यात डोळे, नाक व तोंडाशी संबंधित ट्रायजेमिनल नर्व्ह या चेतापेशीच्या मार्गाने मेंदूकडे संवेदना पाठवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या टीआरपीए-१ या प्रथिनाधारित आयन चॅनेलवर परिणाम होतो. त्यामुळे सरतेशेवटी डोळ्यांतून पाणी येऊ लागते.
Leave a Reply