नवीन लेखन...

ड्रॅक्यूलाचे अश्रू

मारिआ पित्ताला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं हे संशोधन तिसऱ्या व्लादनं लिहिलेल्या तीन पत्रांवर केलं आहे. ही तीनही पत्रं लॅटिन भाषेत लिहिलेली असून, तिसऱ्या व्लादनं ती सिबिऊ शहरातील व्यापाऱ्यांना पाठवली आहेत. यांतलं एक पत्र १४५७ साली लिहिलं असून, उर्वरित दोन पत्रं ही १४७५ साली लिहिली आहेत. सन १४५७ सालच्या पत्राचा शोध हा गेल्या शतकात बुखारेस्ट इथं लागला. मात्र १४७५ सालची पत्रं ही, गेली पाच शतकं सिबिऊ शहरातच व्यवस्थितरीत्या जतन करून ठेवली गेली आहेत. ही पत्रं कापसापासून तयार केलेल्या कागदावर लिहिली आहेत. या पत्रातील मजकूर सदर संशोधनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही; मात्र ती पत्रं तिसऱ्या व्लादनं ‘हाताळली‘ आहेत, हे महत्त्वाचं आहे. कागदपत्रं हाताळणाऱ्याचा त्या कागदांना स्पर्श होत असतो. या स्पर्शाद्वारे, कागद हाताळणाऱ्याच्या त्वचेतून झिरपणारा घाम व इतर काही पदार्थ, त्या कागदाला चिकटतात. जुन्या कागदपत्रांवर चिकटलेल्या अशा पदार्थांचा आजच्या प्रगत रासायनिक पद्धतींद्वारे अभ्यास केला गेल्यास, त्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल अंदाज बांधता येतो. मात्र असे कागद प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्वाचे असल्याने, त्या कागदावर चिकटलेले हे पदार्थ त्या कागदापासून वेगळे करताना, तो कागद मात्र खराब होऊ द्यायचा नसतो.

कागद खराब न करता, त्यावरचे पदार्थ काढून घेण्यासाठी एथिलिन व्हायनल अ‍ॅसिटेट या रसायनापासून बनवलेली, चिकटपट्टीसारखी दिसणारी एक पट्टी वापरली जाते. या पट्टीवर विशिष्ट प्रकारची बहुवारिकं लेपाच्या स्वरूपात पसरवलेली असतात. ही पट्टी जेव्हा त्या कागदावर ठेवली जाते, तेव्हा त्या कागदाला चिकटलेली प्रथिनं व इतर काही छोटे रेणू त्या लेपात शोषले जातात. त्यानंतर पट्टीवरील लेपात शोषले गेलेले हे पदार्थ, एखाद्या द्रावणात विरघळवून त्या द्रावणाचं रासायनिक पृथःकरण केलं जाते. मारिआ पित्ताला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हीच पद्धत वापरून, तिसऱ्या व्लादच्या पत्रांवर चिकटलेले पदार्थ अभ्यासले. या अभ्यासासाठी कागदावर चिकटलेल्या प्रथिनांचं प्रमाण कोणत्या ठिकाणी अधिक आहे, हे प्रथम शोधून काढणं आवश्यक होतं. त्यासाठी या संशोधकांनी या पत्रांवर अतिनील किरणांचा मारा केला. या प्रथिनांनी हे अतिनील किरण शोषून घेऊन, त्यांतली ऊर्जा दृश्य प्रकाशाच्या स्वरूपात उत्सर्जित केली. जिथं जास्त प्रमाणात प्रथिनं होती, तिथून अधिक प्रमाणात दृश्य प्रकाश उत्सर्जित झाला. अधिक प्रमाणात प्रथिनं अस्तित्वात असणाऱ्या जागा, या संशोधकांनी पुढील संशोधनाच्या दृष्टीनं नक्की केल्या. त्यानंतर या विशिष्ट ठिकाणी एथिलिन व्हायनल अ‍ॅसिटेटच्या पट्टीचे छोटे तुकडे लावून ठेवले व कागदावरील रेणूंच्या शोषणासाठी एक तासाचा कालावधी जाऊ दिला. त्यानंतर त्यांनी हे पट्टीचे तुकडे कागदावरून अलगद काढून घेतले. त्या पट्टीवरील लेपात शोषली गेलेली विविध प्रथिनं आणि इतर रसायनं, वेगवेगळ्या तीव्रतेच्या आम्लधर्मीय आणि अल्कधर्मीय द्रावणांत विरघळवली आणि आधुनिक उपकरणांद्वारे त्या द्रावणांचं रासायनिक विश्लेषण केलं.

मारिआ पित्ताला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या या विश्लेषणात, कागदावर सापडलेल्या प्रथिनांच्या आणि पेप्टाइडच्या गटांतील रसायनांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. पेप्टाइडची रचना ही जवळपास प्रथिनांसारखीच असते, त्यांचा आकार मात्र प्रथिनांपेक्षा लहान असतो. प्रथिनांद्वारे काढल्या गेलेल्या निष्कर्षांना पेप्टाइ़़डद्वारे काढलेल्या निष्कर्षांची जोड दिल्यास, मानवी शरीराबद्दलची अनुमानं अधिक अचूक ठरू शकतात. या संशोधकांना मानवी शरीरात तसंच, जीवाणू, विषाणू, बुरशी, कीटक, अशा इतर सजीवांत आढळणारी शेकडो प्रथिनं आणि पेप्टाइड या पत्रांवर आढळली. यांतील मानवी शरीरात सापडणाऱ्या, प्रथिनांची संख्या १६ आणि पेप्टाइडची संख्या ५७५ इतकी होती. या मानवी प्रथिनांपैकी तीन प्रथिनं ही श्वसनसंस्थेशी संबंधित होती, तर पाच प्रथिनं ही रक्ताशी संबंधित होती. उर्वरित प्रथिनं ही मुख्यतः त्वचेशी संबंधित होती. श्वसनसंस्थेशी निगडित असणाऱ्या प्रथिनांपैकी दोन प्रथिनांचा संबंध हा श्वसनाच्या विकारांशी आणि नेत्रपटलाच्या विकारांशीही असू शकतो. रक्ताशी निगडित प्रथिनांपैकी एक प्रथिन घामामध्ये आणि मानवी अश्रूंतही आढळतं.

प्रथिनांची ओळख पटल्यानंतर या संशोधकांनी आपलं लक्ष मानवी पेप्टाइडकडे वळवलं. या तीनही पत्रांवर श्वसनसंस्थेशी संबंधित आणि रक्ताशी संबंधित पेप्टाइड आढळून आली. यांतील काही पेप्टाइड तिसऱ्या व्लादला श्वसनसंस्थेचे आणि त्वचेचे विकार असल्याचं दर्शवत होती. या व्यतिरिक्त १४७५ सालच्या पत्रांत सापडलेली तीन विशिष्ट पेप्टाइ़ड ही अश्रूंमध्ये आणि नेत्रपटलात आढळणाऱ्या प्रथिनांशी संबंधित होती. त्याचबरोबर ही तीन पेप्टाइड तिसऱ्या व्लादला ‘हिमोलॅक्रिआ’ ही व्याधी असण्याची शक्यता दर्शवत होती. हिमोलॅक्रिआ या व्याधीत डोळ्यांतून येणारे अश्रू हे रक्तमिश्रित असतात! किंबहुना ड्रॅक्यूलाबद्दल ज्या दंतकथा पसरल्या आहेत, त्यातही ड्रॅक्यूलाच्या डोळ्यातून रक्त वाहत असल्याचे उल्लेख आहेत. तेव्हा तिसऱ्या व्लादच्या डोळ्यांतील अश्रू हे फक्त कथेतच नव्हे, तर प्रत्यक्षातही रक्तमिश्रित असल्याची शक्यता मारिआ पित्ताला आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या या संशोधनाद्वारे दिसून येत आहे. अर्थात हा निष्कर्ष काढताना, हे संशोधक मान्य करतात की, ही पत्रं त्याकाळी इतरांनीही हाताळली असणार. त्यामुळे ही रसायनं इतरांद्वारेही पत्रांवर चिकटली असतील. मात्र त्याचबरोबर हे संशोधक ही गोष्टसुद्धा स्पष्ट करतात की, या संशोधनातील निष्कर्ष हे फक्त अधिक प्रमाणात आढळणाऱ्या रसायनांवरून काढले गेले आहेत. या पत्रांचा लेखक तिसरा व्लाद हा असल्यानं, त्यानंच ही पत्रं सर्वाधिक हाताळली असणार. त्यामुळे ही प्रथिनं आणि पेप्टाइड तिसऱ्या व्लादचीच असण्याची, मोठी शक्यता या संशोधकांना वाटते आहे. साहजिकच, तिसरा व्लाद हा हिमोलॅक्रिआनं पीडित असल्याचा निष्कर्ष यावरून काढता येतो.

आज ड्रॅक्यूला म्हणून ओळखला जाणारा तिसरा व्लाद हा स्वतःच ‘ड्रॅक्यूल्ये’ हे नाव वापरत होता. हे नाव त्याला मिळालं, ते त्याच्या वडिलांकडून. त्याचे वडील व्लाद ड्रॅक्यूल या नावे ओळखले जायचे. ड्रॅक्यूल म्हणजे रोमानिअन भाषेत ड्रॅगन. त्यांना हे नाव एका विशेष सन्मानाद्वारे प्राप्त झालं होतं. यावरूनच तिसरा व्लाद ‘ड्रॅक्यूल्ये’ – म्हणजे ड्रॅक्यूलचा मुलगा – हे नाव वापरू लागला. या ड्रॅक्यूल्येवरूनच कालांतरानं तो ड्रॅक्यूला या नावे ओळखला जाऊ लागला. तिसऱ्या व्लादच्या क्रौर्याला कोणतीही सीमा नव्हती. त्यानं आपल्या बहुसंख्य शत्रूंना मृत्यूदंड दिला तो भयंकररीत्या – टोकदार सुळावर चढवून. इंग्रजी भाषेत याला इम्पेलिंग म्हटलं जातं. म्हणूनच तिसरा व्लाद इंग्रजीत ‘व्लाद दी इम्पेलर’ या नावेही ओळखला जातो. अशी रक्तलांच्छित कारकीर्द ल्यालेल्या, या तिसऱ्या व्लादच्या स्वतःच्या डोळ्यातले अश्रूही रक्तरंजित असावेत, हा एक विलक्षण योगायोग आहे!

(छायाचित्र सौजन्य  – Maria Pittala, et al / Wikimedia / Kunsthistorisches Museum)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..