जुलै १९१० लंडनहून मोरिया नावाचे जहाज भारताकडे रवाना झाले त्यात भारताचे क्रांतीवीर कैदेत होते त्यांच्या भोवती कडेकोट पहारा होता. लंडन आणि मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या भोवती जहाजावर डोळयात तेल घालुन पहारा देत होते. त्यांच्या डोळयात धूळ फेकुन समुद्रामध्ये उडी मारून पोहत कुठल्यातरी विदेशी समुद्र किना-यावर पोहचण्याची योजना त्या क्रांतीवीराच्या मनामध्ये येत होती. या अगोदरही त्याने दोनदा प्रयत्न केला पण यावेळी त्याने प्राणाची शर्थ लावून आपली योजना यशस्वी होईल याबाबत योजना मनात तयार केली. जहाजात शौचाला जाण्याची इच्छा प्रगट केलेली होती. शौचालयास आतील व्यक्ती दिसेल अशी काचेची व्यवस्था होती. अशा काचेवर त्याने रात्रीचे कपडे टाकुन समुद्रात उडी घेतली. त्याकडे पोलीस शिपाईचे लक्ष गेले त्याने शौचालयाचे दार उघडण्याचा प्रयत्न केला परंतु क्रांतीवीराने ते दार आतून बंद केलेले होते. शिपायाचा दार उघडयाचा प्रयत्न निष्फळ ठरला. शिपायाने कैदी पळाल्याचा ओरडाओरड करून पहारा देणारी यंत्रणा जागी केली.
क्रांतीवीराने शौचालयातील खिडकीची काच फोडून समुद्रात उडी घेतली. खिडकीतुन उडी घेतांना फुटलेल्या काचांचे वळ शरीरावर जखम करून गेले हा क्रांतीवीर समुद्र पोहत होता शिपायांनी त्यावर गोळयांचा वर्षाव सुरू केला हा वीर फ्रांसचा समुद्रकिनारा गाठत असतांना शरीरावर समुद्राच्या खा-या पाण्यामुळे प्रचंड वेदना होत फ्रान्सचा किनारावर येवून पोहचला परंतु फ्रान्स सरकारने त्यांना मदत केली नाही ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. हा प्रसंग भारताच्या क्रांतीवीरांच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदला गेला आहे. भारताच्या स्वातंत्रयासाठी इंग्रजांच्या हाती तुरी देवून निसटण्याचा प्रयत्न करून क्रांतीची ज्योत पेटविण्यासाठी जगविख्यात उडीचा महानायक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर.
या ऐतिहासिक उडी चे वर्णन करतांना कवी मनमोहन नातू म्हणतात,
ही अशी उडी बघतांना, कर्तव्य मृत्यु विस्मरला।
बुरूजावर पडलेला, झाशीतला घोडा हसला।
दामोदर गेले वरला, मदनलाल गाली फुलला।
कान्होरे खुदकन हसला, क्रांतीच्या केतुवरला।
अस्मान कडाडून गेला।
दुनियेत फक्त आहेत, विख्यात बहाददर दोन।
जे गेले आईकरीता, सागरास ओलांडून।
हनुमंतानंतर आहे, या विनायकाचा मान।
दिव्यात्म्याने शरीराचा, त्या केला सांभाळ।
स्वातंत्रवीर सावरकर भारताच्या उज्वल भविष्याच्या क्रांतीचा धगधगती मशाल आहे. ती कधीच मिनमिनती होणार नाहीच प्रखरतेने प्रज्वलीत राहील. त्यांच्या वैचारीक मशाल विझविण्याचा अनेक समाजकंटकांनी अनेक मार्गानी पुरेपुर प्रयत्न केला तो निष्फळ झाला. स्वातंत्रवीर सावरकर म्हणजे स्वातंत्रदेवेतेच्या हाती असलेले प्रखर राष्ट्रभक्तीने प्रज्वलीत झालेले खडग आहे. जगाच्या इतिहासात आजवर असे व्यक्तिमत्व झालेले नाही त्यांचे साहित्य भारताला वैभवशाली, बलशाली करण्यासाठी निर्माण झालेले मातृभक्तीची गीताआहे.
हिंदुस्थानात ज्या असामान्य महान व्यक्ती होवून गेल्या, त्यात स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च स्थान आहे.
आजच्या नव्या पिढीला स्वातंत्रवीर सावरकर एक देशभक्त आणि अंदमानातील असहाय वेदना राष्ट्रासाठी सहन करणारा महान त्यागी पुरूष ऐवढीच ओळख कदाचीत असावी. भारताला मिळालेले स्वातंत्रय असंख्य क्रांतिकारकांच्या जीवनाच्या त्यागातून, बलिदानातून भारतमातेला वाहिलेले सुवर्ण कमळ पुष्प आहे. याच स्वातंत्रया करीता विनायक दामोदर सावरकर नावाच्या तेज:पुंज क्रांतिसूर्याने आपल्या सर्वार्थाचे समर्पण केले. त्यांच्या त्यागातून, त्यांच्या शौर्यातून आणि त्यांच्या प्रखर विचारातून मिळालेले स्वातंत्रय अबाधित राखण्याची जबाबदारी सर्व हिंदुस्थानी नागरीकांची आहे.
स्वातंत्रवीर सावरकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवघरातील अष्टभूजादेवी समोर घेतलेली प्रतिज्ञा त्यांच्या स्वातंत्रय प्राप्ती ध्येय अखंड हिंदुस्थानासाठी होते असे निश्चित होते. जून 1897 ला ब्रिटिश अधिकारी रॅन्डचा वध गोळया झाडून झाला. त्या प्रकरणी चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी रानडे यांना फाशी देण्यात आली. ब्रिटिश सरकारची सत्ता सशस्त्र क्रांतीने उखडून फेकण्याची योजना क्रांतीकारकांची होती. सशस्त्र क्रांतीची योजना पुढे चालविण्यासाठी वीर सावरकरांनी प्रतिज्ञा घेतली होती. ‘‘माझया देशाच्या स्वातंत्रयासाठी मी सशस्त्र युध्दात शत्रूस मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजी सारखा विजयी होऊन माझया मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन……………… यापुढे मी माझया देशाचे स्वातंत्रय परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून ‘मारिता मारिता मरेतो’ झुंजेन!!!’
मातृभूमीच्या स्वातंत्रयासाठी प्रचंड तळमळ अंतकरणात असलेले वीर सावरकर आपल्या भाषणात भारत, हिंदुस्थान, मातृभूमी याच शब्दांचा वापर त्यांनी केला म्हणजेच या शब्दामध्ये अखंडत्व राष्ट्राची संरचना अंतभूर्त होत आहे. म्हणुनच त्यांच्या स्वातंत्रय प्राप्तीचे ध्येय अखंड हिंदुस्थान होते. पुढे वीर सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारक संघटनेचा संकल्प असा होता की, ‘हिंदुस्थानास स्वतंत्र करावयाचे, हिंदुस्थानास एक राष्ट्र करावयाचे, हिंदुस्थानास लोकसत्ताक करावयाचे, या सूत्रांसह चौथे सूत्र हेही घोषित केले जाई की, हिंदीस राष्ट्रभाषा करावयाची, नागरीस राष्ट्रलिपी करावयाचे!.’ भारताच्या पारतंत्रयाच्या श्रृंखला मोडण्यासाठी क्रांतीकारकांनी अनमोल जीवनाचा सर्वश्री होम केला. त्या क्रांतीकारकांचे मुकूटमणी वीर सावरकर यांना प्रखर राष्ट्रवादाचे आराध्य दैवत मूळ महापुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरक विचाराचे बाळकडू अमृत मिळालेले होते. त्यामुळे वीर सावरकरांनी तेजस्वी क्रांतीवीरांची श्रृंखला उभी केली. छत्रपती शिवरायांचे नाव घेताच मोगल बादशाहांमध्ये भितीची धडकी भरत होती. त्याच प्रमाणे ब्रिटिश सत्ता वीर सावरकरांच्या क्रांती कार्यामुळे भयभीत झाली होती. छत्रपती शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचा वारसा अविरतपणे चालविण्याचा संकल्प केला तो फक्त वीर सावरकरांनीच.
लखनौ येथे मुस्लीम लिग च्या अधिवेशनात बॅ.जीना यांनी, हिंदुस्थानचे दोन तुकडे करून मुसलमानांसाठी ‘पाकिस्तान’ या मुस्लिम राष्ट्राची मागणी केली होती. वीर सावरकरांनी या मागणीला विरोध केला अखंड भारत करीता उदघोष केला. वीर सावरकर म्हणाले, ‘‘माझया हदयात अखंड भारताचा नकाशा कोरलेला आहे. मी त्यातला कोणता भाग तोडून देवू? पेशावर देईल तर त्या प्रांतात पाणिनी (संस्कृत भाषेचा व्याकरणकार) झाला. व्दारका देईल तर साक्षात भगवान कृष्णाचा अवतार तेथे झाला आहे. बंगालमध्ये कालीमातेची, चैतन्याची पूजा होते. महाराष्ट्र म्हणाल तर मी माझे हदयच तोडून दिल्यासारखे होईल. व्यास, वाल्मिकी, पराशर अशा महान तपस्व्यांनी पावन केलेल्या देशाचे या अखंड भारताचे तुकडे करण्यास कोणता हाडाचा हिंदू तयार होईल? हा देश म्हणजे आमचे केवळ घर नव्हे, तर ते एक पवित्र मंदिर आहे. आमच्या हदयातील प्रतिमा दुभंगली तर ती मृत होईल. मला पूजा करता येणार नाही. ती प्रतिमा मला अखंडच ठेवली पाहिजे.’’
वीर सावरकरांचे संपूर्ण जीवन राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले होते. त्यांच्या साहित्यातून बहुतांशी आपल्या राष्ट्राला ते जननी म्हणत होते. त्यांची पूजा आणि भक्ती केवळ एकच होती ती म्हणजे भारत मातेची भक्ती होय. आपल्या हदयस्थानावर अखंड भारत मातेची मुर्ती विराजमान असतांना देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होतांनाचा आनंद असतांना देशाचे तुकडे होणार, भारताचे विभाजन होणार हे वास्तव त्यांना दिसु लागले होते तेव्हा त्यांच्या अंतकरणात मोठी जिव्हारी जखम झालेली असेल याची कल्पना होवू शकत नाही. वीर सावरकर नावाची राष्ट्रक्रांती ही अखंड भारतासाठीच होती. पाकीस्थानचे पहिले जनरल गव्हर्नर म्हणुन बॅरिस्टर जिना यांनी घोषणा केली होती की, ‘हसके लिया पाकीस्थान, लडके लेंगे हिंदूस्थान’ या वक्तव्याला भारतात कोणीही प्रतुत्त्यर दिले नाही. पाकडयांची क्रुर साम्राज्यवादी धोरण लपून राहिले नाही. जीनाच्या मृत्युनंतर पाक शासक भारतावर आक्रमण करीत राहीले अशा परीस्थीतीत वीर सावरकरांनी त्याला प्रत्युत्तर दिले की, ‘एक धक्का और दो, पाकीस्थान तोड दो.’ देशात शस्त्रसंपन्नता आणि सैन्यबळ वाढवावे अशी आवाहन तत्कालिन शासनाकडे केली असता त्याकडे दुर्लश करण्यात आले आणि परिणामी आपल्या देशावर चीन आणि पाकिस्थान शत्रुराष्ट्राचे आक्रमणाला समोर जावे लागले.
देश विभाजनामुळे देशावर येणारे शत्रुंचे आक्रमणाचा त्रास वर्तमानात ही सुरू आहे. त्यामुळे फुटीरवृत्ती वाढत आहे. पुन्हा देश विभाजनाचा धोका नाकारता येत नाही. परकीयांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी वीर सावरकरांनी अखंड हिंदुस्थान विचारांची साखळी निर्माण केली त्याला अनेक कडया राष्ट्रीयत्वाच्या जोडण्यासाठी हिंदुत्वाची प्रखर उर्जा तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रभक्त युवकांची हिंदुराष्ट्राच्या पुर्ननिर्माणकरीता कार्य करण्याची आवश्यकता आहे, धर्महिन व समाजवाद या पाश्चात्य् तत्वांनी भारताच्या राष्ट्रीयत्वाला अडसर निर्माण होत आहे. त्यातून भारत विद्रोही तत्वे तयार होत आहे भारताच्या अखंडत्वासाठी हिंदुत्वाचा विचार महत्वाचा आणि आवश्यक आहे.
‘‘आसिंधू-सिंधुपर्यता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्रचैव स वै हिंदुरितिस्मृत:।।
सिंधू पासुन सागरापर्यत विस्तारलेली ही भरतभूमी ज्याची ‘पितृभू’ म्हणजे पूर्वजांची भूमी आहे आणि ज्यांची ‘पुण्यभू’ म्हणजे धर्माची नि धर्मपुरूषांची किंवा संस्कृतिची, पवित्र अभिमानविषयांची भूमी आहे, तो हिंदू होय. म्हणजे सनातनी, शीख, जैन, लिंगायत,आस्तिक-नास्तिक, अज्ञेयवादी भारतीय, शैव नि वैष्णव, महानुभाव नि भागवत, आर्यसमाजी, प्रार्थनासमाजी नि ब्राम्होसमाजी, बौध्द पुर्वी हिंदु होते. अशा समस्त भारतवर्षाला अर्पण-तर्पण-समर्पण भूमी माननारे हिंदुत्वाचे अंतरंग आहे. वरील दोन ओळीत हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडणारे, हिंदुत्वाची समर्पक व्याख्या करणारे एकमेव क्रांती पुरूष वीर सावरकर होते. हिंदुत्वाकडे बघण्याची वीर सावरकरांची दृष्टी व्यापक तर होतीच त्या पलीकडे समाजशास्त्रीय होती. देशाच्या एकात्मतेच्या व अखंडत्वाच्या दृष्टीने स्वाभाविक पुरक होती. वीर सावकरांनी या अगोदर हिंदुत्व विषयक इतर व्याख्यांचा सुक्ष्म अभ्यास ही केला. वीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या हिंदुस्थानाच्या अखंडत्वाला समरसतेच्या एकसुत्रात बांधणारी आहे. हिंदुना विश्वधर्म आणि मानवताधर्माचा परिपाक देणारी आहे. कारण हिंदु ही जीवन पध्दती असून जीवनजीवन पध्दती हिच धर्माचे स्वरूप आहे. जगातील एकमेव प्राची संस्कृति सिंधु संस्कृति. देशातीलच नव्हे जगातील कानाकोप-यातील लोक आपल्या आर्यवृताला, भारतवर्षाला सिंधुस्थान-हिंदुस्थान म्हणतात. सिंधुसंस्कृतिचा उगम हिंदुसंस्कृतिने विस्तारीत गेला. म्हणुनच हिंदु शब्दा बददल वीर सावरकरांनाआत्मीयताच नाहीतर सातत्याने आग्रह होता.
‘हिंदुत्व’ केवळ हिंदुधर्मच नाही. हिंदुत्वाचा एक भाग आहे. हिंदुत्वाच्या विशाल संकल्पनेत विविध पंथ-उपपंथ,उपासना पध्दती, आस्तिक-नास्तिक सर्व भारतीय मानवी जीवन दर्शनाला सामावून घेणारी हिंदुत्वाची नाळ वीर सावरकरांनी केली. जातीभेद नि चातुर्वर्ण्य म्हणजे हिंदुत्व नाही. रत्नागिरीच्या स्थानबध्दतेच्या काळात वीर सावरकरांनी जातीभेदाचा सुक्ष्म विचार केला होता जातिभेद भोळसट समजुती आहेत. जातिभेद केवळ पोथीजात आहे जातींनी जी उच्च-निच्चता पाळली आहे. त्यातुन विषमता तयार होते ती आपल्या राष्ट्रासाठी घातक आहे. जातीची नाळ मोडावयाची असल्यास वेदोक्त बंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी या सात शृंखला तोडुन हिंदुनी संघटित झाले पाहिजे हे वीर सावरकरांचे ब्रम्हवाक्य होते. हिंदु हा मानवधर्म असल्यामुळे मुसलमान, ख्रिश्चन हे देखील हिंदु होवू शकतात त्यांचे पुर्वज हिंदुच होते. जो या देशाचा तेजस्वी इतिहास, परंपरा आणि संस्कृति मानतो, या देशाला आपली मातृभूमी, पितृभूमी, पुण्यभूमी मानतो तो हिंदुच आहे मग त्याची उपासना पध्दत कोणतेही असो तो हिंदुच आहे. तो हिंदुराष्ट्राचा पायाआहे. हाच हिंदुत्वाचा समग्र विचार आहे.
२६ जून १९३७ पुण्यात ‘हिंदुसंघटन’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘आम्हा हिंदुना अभिमान बाळगण्यासारखं काही असेल तर ते हिंदुस्थानच आहे. हिंदु हा हिंदु राष्ट्राकरीता झगडेल तसा इतर कोणीही नाही. गेल्या शंभर वर्षातील उजळणी केली तरी प्रत्येक हिंदुचे कष्ट आणि हिंदुचेच प्राण खर्ची पडलेले आढळतील. अंदमानात नेलेले सारे हिंदुच होते. फासावर ज्यांना टांगल ते हिंदुच होते. हिंदु या देशाचा पाया आहे…..” स्वातंत्र्यवीरांची आर्त हिंदुनां आर्त हाक होती. हिंदुचे हिंदुराष्ट्र चिरंतन असुन दृष्टी विश्वात्मक आहे. संपुर्ण विश्वाचे कल्याण करणारे आहे. कारण संत ज्ञानेश्वराची विश्वात्मक विचाराची दृष्टी वीर सावरकरांना लाभलेली आहे.
हिंदुचे अस्तित्व जगात रहावे म्हणुन अनेकाविध माध्यमातुन समस्त जगताला हिंदुराष्ट्राचा उलगडा करून दाखविणारे हिंदुहदयसम्राट, हिंदुस्थानासाठी असीम त्याग, किर्ती आणि वैभव यांना लाथ मारून हिंदुराष्ट्राकरीता स्वत:च्या बांधवाकडून आतोनात छळ सहन करणारे वीर सावरकर. स्वातंत्रयवीर सावरकरांना म्हणावे तरी काय? क्रांतीकारक म्हणावे! ज्ञानसुर्य म्हणावे! देशभक्त म्हणावे! क्रांतीवीर म्हणावे! खरे पाहता स्वातंत्रयवीर सावरकर क्रांतीकारक होते, क्रांतीवीर तर होतेच. ज्ञानसुर्य ही होते या सर्व पदव्यांच्या पलीकडे ही वीर सावरकर संपूर्ण हिंदुराष्ट्राच्या आचार अन विचाराला समृध्दतेची, शक्तीशाली, तेजपुंज गवसणी घालणारे सकल हिंदुचे स्फुर्तीस्थान होते. वीर सावरकर वक्ता, वादपटू, कवी, निबंधकार, इतिहासकार, आत्मचरित्रलेखक, विव्दान, बहुश्रुत पुरूष, अनेक-गुणमंडित पुरूष, आधुनिक भारतीय नेत्यांत दुर्मिळ आहे. राष्ट्रधर्माचे ध्येय ठेवणारा, देशभक्तीचा अभूतपूर्व आदर्श घालून देणारा, वीर सावरकरांचे स्थान अढळ राहील. वीर सावरकरांच्या राष्ट्रभक्ती विचारांचे अमृत नव्या पिढीपर्यत पोहचले पाहिजे. अखंड भारत, समर्थ भारत, विश्वातील सामर्थ्य संपन्न व वैभवशाली हिंदुराष्ट्र हे वीर सावरकरांचे स्वप्न होते.
आम्ही भारताच्या स्वातंत्रयाची पहाट पाहू शकलो नसलो तरी वैभवशाली अखंड भारताची पहाट नक्कीच पाहू असा अखंड भारताचा संकल्प करूया!
ही माय थोर होईल। वैभवे दिव्य शोभेल
अखंड भारत होईल। तो सोन्याचा दिन येवो।।
स्वातंत्रयवीर सावरकरांना माझे शतश: अभिवादन!
– अमोल तपासे,
सीताबर्डी,नागपूर
email – tapaseamol31@gmail.com*
Leave a Reply