इसापनीतीमधील ही एक कथा आहे. एकदा एका शेतकऱ्याने बुलबुल पक्ष्याचे गाणे ऐकले. ते त्याला इतके आवडले, की बुलबुलचे हे गाणे आपण कायम ऐकत राहावे असे त्याला वाटले. म्हणून त्याने त्या पक्ष्याला पकडायचे ठरवले.
एके दिवशी रानात शेतकऱ्याने आपल्या पिकात जाळे लावले. बुलबुल पक्षी दाणे खायला म्हणून आला आणि नेमका त्या जाळ्यात अडकला. शेतकऱ्याने त्याला पकडून पिंजऱ्यात ठेवले व त्याला गाणे गायला सांगितले. मात्र बुलबुल पक्षी शेतकऱ्याला म्हणाला, मी या पिंजऱ्यात गाणे गाऊ शकणार नाही. जर तू मला मोकळे सोडलेस तर मात्र मी चांगले गाणे गाऊ शकतो.
शेतकऱ्याला वाटले, की याला पिंजऱ्याबाहेर मोकळे सोडले तर हा उडून जाईल व पुन्हा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बुलबुलला म्हणाला, नाही, तू पिंजऱ्यातच गाणे म्हण आणि माझे ऐकले नाहीस तर मी तुला कापून खाऊन टाकीन.
ते ऐकून बुलबुल पक्षी फारच घाबरला व गयावया करून शेतकऱ्याला म्हणाला, तू जर मला सोडून दिलेस तर मी तुम्हाला जीवनातील तीन महत्त्वाची तत्त्वे सांगीन. शेतकरी त्याला प्रथम तयार झाला नाही, मात्र त्याला उत्सुकता लागून राहिली, की हा पक्षी मला कोणती तत्त्वे सांगणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याने पिंजऱ्याचे दार उघडून बुलबुल पक्ष्याला बाहेर काढले.
बाहेर काढताच बुलबुल पक्षी झटकन समोरच्या झाडावर जाऊन बसला आणि शेतकऱ्याला म्हणाला, आता ऐक ती तीन महत्त्वाची तत्त्वे!
पहिले म्हणजे ज्याला बंदिवान केले त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये. दुसरे म्हणजे आपल्याला मिळालेली वस्तू सहसा कधीही सोडू नये आणि तिसरे तत्त्व म्हणजे जे आपल्या हातातून गेले त्याबद्दल हळहळ करीत बसू नये. एवढे सांगून तो बुलबुल पक्षी उडून गेला आणि तो शेतकरी त्याने सांगितलेल्या तीन तत्त्वांचा विचार करीत बसला.
Leave a Reply